प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग ७ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                          रात्री शौर्य आणि सिया ऑफिसवरून त्यांच्या बंगल्यावर आले होते. दोघेही फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसले होते. थोड्यावेळाने जेवण करायला बसणार होते, त्याआधी दोघांना कामासंदर्भात काही चर्चा करायची होती. दोघेजण काही बोलणार त्या आधीच शौर्यचा फोन वाजला. त्याने स्क्रीनवर नंबर पाहिला तर त्याच्या वडिलांचा म्हणजेच, श्रीकांत धर्माधिकारी यांचा फोन होता. नाव पाहून त्याने लगेच फोन उचलला आणि बोलू लागला.

" हॅलो बाबा, कसे आहात? " शौर्यने फोन उचलल्या उचलल्या हसून विचारलं. सिया त्याच्या जवळच बसून होती.

" मी एकदम मस्त आहे. तुम्ही दोघेजण कसे आहात? " श्रीकांत उत्तरात म्हणाले आणि नंतर त्या दोघांच्या अवांतर गप्पा सुरू झाल्या.

काही वेळाने शौर्यकडे बोलण्यासाठी काहीच राहिलं नव्हतं म्हणून शौर्य शांत बसला होता, पण श्रीकांत यांना त्याच्याशी बोलायचं होतं. सुरुवात कुठून करावी ते त्यांना समजत नव्हतं.

" शौर्य, मला थोडं बोलायचं होतं. " श्रीकांत जरा हळू आवाजात आणि अडखळत बोलले.

" काय झालं बाबा? काही सिरीयस आहे का? तुमचा आवाज का असा खोल गेला? " शौर्यने काळजीने विचारलं, तसा त्यांनी तिकडून सुस्कारा सोडल्याचा त्याला आवाज आला.

" सियाबद्दल बोलायचं होतं. " श्रीकांत म्हणाले, तसा इकडे शौर्यला त्यांना आपल्याशी कुठल्या विषयावर बोलायचं असेल याचा अंदाज आला.

" मला समजलं बाबा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तुम्हाला त्या विषयावर काही बोलायचं असेल तर तिच्याशीच बोला. मी फोन तिच्याकडे देतो. " शौर्य आपला मोबाईल सियाकडे देणार तर श्रीकांत यांनी त्याला थांबवलं.

" थांब थांब, तिचं उत्तर आपल्याला आधीच माहित आहे. " श्रीकांत त्याला अडवत म्हणाले, पण ते ऐकून लगेच शौर्यच्या कपाळावर आठ्या पडल्या.

" तिचं उत्तर आपल्याला आधीच माहित आहे तर तुम्ही का तिच्या एवढे मागे लागला आहात? काही घाई नाहीय आपल्याला तिच्या लग्नाची. तिच्यासाठी अनुरूप असा जोडीदार अजूनही मिळालेला नाही. तुमच्या डोक्यामध्ये अजूनही तोच मुलगा असेल तर माझाही त्याला नकार आहे. " शौर्य आपलं कपाळ चोळत म्हणाला. त्याचं ते बोलणं ऐकून सियाने एक सुस्कारा सोडत नकारार्थी मान हलवली.

" अरे पण तो मुलगा चांगला आहे. काय हरकत आहे एकदा विचार करायला? आज ना उद्या तिचं लग्न होणारच आहे. मग कशासाठी हा नकार आहे? " श्रीकांत यांना त्याचं उत्तर आवडलं नव्हतं. जेव्हा कधी सियाच्या लग्नाचा ते विषय काढत होते, तेव्हा शौर्य त्या मुलासाठी नकार द्यायचा.

" कोण म्हटलं तुम्हाला चांगला आहे बाबा? कितीतरी जणांची फसवणूक करून त्याने पैसा उभा केला आहे. कितीतरी मुलींना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. अशा व्यक्तीच्या हातात मी माझी बहीण देऊ, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? जर तुमचं असं म्हणणं असेल तर ते मला अजिबात मान्य नाही. " शौर्य स्पष्टपणे आपला नकार कळवत होता.

आधीही त्याने हेच उत्तर दिलं होतं आणि आजही तेच उत्तर दिलं. त्याच्या या उत्तरावर सिया भारावून त्याच्याकडे पाहत होती. तिच्यासाठी तो एक पझेसिव्ह भाऊ होता. सध्या तर ती त्याच्यातच तिचे वडील पाहत होती. जे काम श्रीकांत यांनी करायला हवं होतं, ते काम शौर्य करत होता.

" मग तिला कायमच घरात बसवून ठेवणार आहेस का? दरवेळी तुझं हेच उत्तर मला ऐकवतोस. लग्नाचं वय झालं आहे तिचं. किती दिवस चालणार हे? " श्रीकांत काहीसे चिडून बोलले. दरवेळी त्याचं तेच उत्तर ऐकून ते वैतागलेले होते.

" मुळात तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ती स्वतः त्याबद्दल निर्णय घेऊ शकते, पण तिने आधीही तिचा निर्णय कळवला आहे. मला तिच्या इच्छेविरुद्ध जाण्याची इच्छा नाही. जोपर्यंत तिची इच्छा होणार नाही तोपर्यंत मी तिला लग्नासाठी फोर्स करणार नाही. तुम्ही माझ्यामार्फत तिला लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न करू नका. " श्रीकांत सियाच्या लग्नाबद्दल फक्त त्याच्याशीच का बोलत होते हे तो जाणून होता.

" शौर्य, हे आता अति होत आहे तुझं. तुला तुझं स्वतःचं सुद्धा आयुष्य सुरू करण्याची इच्छा नाही का? तिचं लग्न झाल्याशिवाय तू लग्न करणार नाहीस. तुझंही लग्नाचं वय होत चाललं आहे. थोडा तरी विचार करा तुम्ही दोघांनी. वय निघून गेल्यानंतर तुम्हा दोघांना हवा तसा जोडीदार मिळेल का? " श्रीकांत चिडक्या स्वरातच बोलत होते.

" बाबा, जेव्हा आमची इच्छा होईल आणि आम्हाला आमच्या मनासारखा जोडीदार मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की कळवू. सध्या तरी याविषयी चर्चा इथेच थांबवा. चर्चा वादामध्ये रूपांतरित करण्याची इच्छा नाही माझी. जेवणाची वेळ झाली आहे. आम्हाला सर्व कामं वेळेवर करायला आवडतात. " शौर्य असा म्हणाला आणि त्याच्या शेवटच्या वाक्यावर श्रीकांत यांनी संतापून फोन ठेवून दिला.

पुढे बोलण्यात काही अर्थ नाही हे त्यांना समजलं होतं. आपण कितीही बोललो तरी ते दोघेजण स्वतःच्या मनाचंच करणार, म्हणून त्यांनी न बोलता फोन ठेवून संताप व्यक्त केला होता.

त्यांनी फोन ठेवल्यानंतर शौर्य सियाकडे पाहून किंचित हसला. तिनेही एक छोटं हसू चेहऱ्यावर आणलं आणि मग दोघांनी तो विषय तिथेच सोडून दिला.


************************


" प्रेम, अरे बाळा अजून किती दिवस चालणार हे सर्व? " प्रेमच्या आई म्हणजेच मालती जेवण करताना त्याला विचारत होत्या.

" माहित नाही आई. अजून किती दिवस हे चालेल काहीच अंदाज नाही. हवी असलेली माहिती अजूनही मिळत नाहीय. आजपर्यंत कुठल्याही कामांमध्ये एवढी अडचण आली नव्हती. डोकं दुखवलं आहे या एकाच गोष्टीने. कुठल्या मार्गाने शोध घ्यावा काहीच समजत नाहीय. " प्रेम हातातला घास ताटात ठेवत म्हणाला. मालती काळजीने त्याच्याकडे पाहत होत्या.

" पण बाळा, जर ते नाही सापडलं तर धोका उद्भवू शकतो. तू तुझ्या त्या दोन मित्रांना... काय नाव त्यांचं?... हा... ते... ते... जाऊदे, कोणी का असेना, त्या दोघांना वारंवार प्रयत्न करायला सांग. " मालती रॉबर्ट आणि प्रीतमबद्दल बोलत होत्या, पण त्यांना त्या दोघांचं नाव आठवत नव्हतं. त्यांनी ते सोडलं आणि काळजीने त्याच्याकडे पाहत पुढे बोलल्या. प्रेमने लगेच त्यांच्या हातावर आपला हात ठेवला.

" तू काळजी करू नकोस आई. कुठलाही धोका उत्पन्न होणार नाही, याची मी काळजी घेईन. मी कोणालाही त्याचा त्रास होऊ देणार नाही. आमचे प्रयत्न चालूच आहेत. अजून थोडा संयम ठेवून काम करावं लागेल. " प्रेम मालती यांच्या हातावर हात ठेवून विश्वास देत म्हणाला. त्यावर त्यांनी एक सुस्कारा सोडला.

" तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी निर्धास्त आहे. त्या पोरीच्या जीवाला काही धोका नसू दे फक्त. " मालती काळजीयुक्त स्वरात म्हणाल्या.

" तिला मी काही होऊ देणार नाही आई. मी दोन वर्षांपासून तिच्यावर प्रेम करतो. असा कसा तिच्या जीवाला धोका होऊ देऊ शकतो? " प्रेमच्या आवाजात त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास दिसत होता.

" नाव काय म्हणालास त्या मुलीचं? " मालती यांनी विषय बदलण्यासाठी त्याला विचारलं. त्यांना सहसा कुठलीही गोष्ट जास्त वेळ लक्षात राहत नव्हती. त्याने या आधीही कितीतरी वेळा तिचं नाव त्यांना सांगितलं होतं, पण ते त्यांच्या लक्षात राहिलं नव्हतं.

" सिया... सिया धर्माधिकारी नाव आहे. " आपली आई विसरली म्हणून त्याने पुन्हा त्यांना तिचं नाव सांगितलं. नाव ऐकून त्यांनी आठवल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणले.

" तुझ्या बाबांनाही सियाबद्दल कळव. पोल्ट्री फार्ममध्ये खूपच व्यस्त झाले आहेत ते. तू सांगितल्याशिवाय त्यांना कळणार सुद्धा नाही. " मालती हसून म्हणाल्या आणि मग जेवण करू लागल्या. त्यानेही त्यावर किंचित हसून दिलं. मग त्यांना जेवताना पाहून तो आपल्या विचारात हरवला होता.

' सिया, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तो देवांश सरंजामे तुझ्या केसांनाही धक्का लावू शकणार नाही. त्याने तसा प्रयत्न जरी केला तरी माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी इथे आलो आहे. दोन वर्षांपासून तुला शोधत होतो, पण जेव्हा तुझ्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा हे देवांशचं प्रकरण माझ्यासमोर आलं. '

प्रेम मनातल्या मनात तिच्याशी बोलत होता. क्षणात त्याला दोन वर्षांपूर्वी तिला पाहिलं होतं तो क्षण आठवला.

' आजही तुझा तो हसतानाचा निखळ चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येतो. किती आनंदी होतीस तू ज्यावेळी तू तुझ्या मैत्रिणींसोबत होतीस. कामानिमित्त मी तिथे आलो आणि तुझा हसरा चेहरा माझ्या नजरेस पडला होता. तुझ्या त्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून माझा कामाचा सर्व थकवा क्षणार्धात निघून गेला. त्यानंतर दुप्पट ऊर्जेने काम करू लागलो होतो मी. माझं मन त्या क्षणापासून तुझ्यावर जडलं होतं आणि मी तेव्हाच ठरवलं होतं, तुझ्याशिवाय आयुष्यात दुसऱ्या कोणालाच आणायचं नाही. '

' तुझ्यासोबत हॉटेलमध्ये काम करण्याचा तर फक्त एक बहाणा आहे. त्यानिमित्ताने तुझ्यासोबत राहण्याची, एकत्र काम करण्याची इच्छा पूर्ण करून घेता येते. हॉटेल क्षेत्रात शिक्षण घेतल्याचा आज फायदा होत आहे मला. तुझ्याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे मला. त्यादिवशी इंटरव्ह्यू देताना तुझ्या डोळ्यांत पाहण्याची संधी मिळाली होती. माझ्या नजरेत अडकलेली तुझी नजर पाहून मी मनोमन सुखावून गेलो होतो. विश्वास ठेव माझ्यावर, त्या देवांशपासून तुला काहीही धोका होऊ देणार नाही मी. २४ तास एखाद्या अंगरक्षकाप्रमाणे तुझ्यासोबत राहीन मी. तुझा हा प्रेम फक्त तुझाच बनून राहील. ' प्रेम तिचा चेहरा डोळ्यांसमोर आणत आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत होता.

भविष्यात ही संधी त्याला मिळेल की नाही माहित नव्हतं, म्हणून आत्ताच बोलून घेत होता.



क्रमशः




🎭 Series Post

View all