प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग ८ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                                 प्रेम हॉटेलकडे जायला निघाला होता. त्याने त्याच्या आईच्या पाया पडून आशिर्वाद घेतला आणि तिथून जायला निघाला. थोडा पुढे गेलाच होता की तेवढ्यात मालती यांनी त्याला आवाज देऊन थांबवलं. त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं, तर त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट झळकत होती. ती काळजी कशासाठी असेल हे त्याच्या लक्षात आलं, आणि तो नकारार्थी मान हलवत किंचित हसला.

" लवकर काय तो शोध घे रे बाबा. उगाच त्या पोरीची चिंता लागून राहिली आहे. तिच्या जीवासोबत काही खेळ व्हायला नको. " मालती मागून त्याला आवाज देत म्हणाल्या. त्यांचं ऐकून त्याने हसून मान हलवली आणि पुढे निघून गेला.


                  प्रेम हॉटेलच्या मेन गेटच्या बाहेर पोहोचला आणि गेटमधून आत प्रवेश करणार की त्याला काहीसा गोंगाट ऐकू येऊ लागला. कोणीतरी मोठमोठ्याने भांडत आहे असंच वाटत होतं. हॉटेलच्या आवारातून आवाज येत होता, त्यामुळे प्रेम घाबरला आणि त्या दिशेने पळत सुटला. तिथे बरीच गर्दी झालेली दिसत होती. त्याने गर्दी कमी करत पुढे जाऊन पाहिलं, तर तिथे एक माणूस एका वेटरला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत होता आणि तो बिचारा वेटर त्याला थांबवण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. त्याला मारत असलेल्या व्यक्तीला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण तो वेडा झाल्यासारखा त्याला मारतच सुटला होता. ते पाहून प्रेम त्या दोघांच्या मध्ये येऊ लागला.

" सोडा त्याला... सोडा म्हणतोय ना... " प्रेमने मध्ये पडून त्या व्यक्तीला जोरात खेचून वेटरपासून बाजूला केलं.

" काय चाललं आहे इथे? " प्रेमने त्या दोघांना बाजूला करून वेटरला विचारलं. हॉटेलचा सर्वच स्टाफ तिथे उपस्थित होता, पण कोणीही भीतीमुळे पुढे यायला तयार नव्हतं.

" सर, हे सर एका महागड्या मद्याची मागणी करत आहेत. मी त्या सरांना सांगितलं की सध्या आपल्याकडे ते अवेलेबल नाहीय. तर त्यांनी मला मारायला सुरुवात केली. " तो वेटर कसाबसा बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्या व्यक्तीने त्याला एवढं मारलं होतं की त्याचे ओठ फुटून त्यातून रक्त बाहेर येत होतं.

" सॉरी सर, हे योग्य नाहीय. जर ते मद्य अवेलेबल नसेल तर तुम्हाला कुठून देणार आहोत? त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काहीतरी मागवू शकत होतात. आमच्याकडे एकापेक्षा एक उच्च प्रतीचे मद्य आहेत. " प्रेम शांतपणे त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण तो तर पिसाळल्यासारखा प्रेमवर धावून आला.

" मला नाही म्हणतोस?... मला?... तुला माहित तरी आहे का मी कोण आहे ते? " तो व्यक्ती प्रेमवर अक्षरशः झडप घालतच बोलत होता. प्रेमने थोडक्यात त्याचा वार चुकवला.

" सर तुम्ही काहीतरी चुकीचा गैरसमज करून घेत आहात. आपण आतमध्ये बसून बोलूयात. बाहेर उगाच तमाशा होत आहे. तुम्हाला जी पाहिजे त्यापेक्षा महागडी पेय दाखवतो. चला सर. " प्रेम अजूनही त्याला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करत होता. ही त्याची जबाबदारीच होती. तो त्याचं कर्तव्य व्यवस्थित बजावत होता, पण समोरचा माणूस एवढा वरचढ होता की त्याने झटकन प्रेमच्या शर्टची कॉलर पकडली.

" मला... ती... म्हणजे तीच... पाहिजेत. " तो व्यक्ती एका एका शब्दावर जोर देत म्हणाला.

प्रेमला समजलं की तो काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीमध्ये नाहीय. हॉटेलच्या आवारात सुरू असलेला हा दंगा त्याला आवडला नव्हता. त्यात तो माणूस ऐकत नव्हता म्हणून प्रेमचीही चिडचिड व्हायला लागली होती. तरी त्याने स्वतःवर महात्प्रयासाने नियंत्रण ठेवलं होतं. त्याला सहसा राग येत नव्हता, पण कोणी ऐकून न घेता आपल्याला त्रास देत असेल तर तो सुद्धा स्वतःच्या रागाला बाहेर पडण्यापासून थांबवू शकत नव्हता. सध्या तो शौर्य आणि सियाचा विचार करून शांत होता.

" सर, प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही आहोत. फक्त तुम्हाला जी पाहिजे ती ब्रँड आमच्याकडे सध्या अवेलेबल नाही, तर त्यापेक्षा दुसरी चांगली देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही आत तर चला. शांतपणे बोलूयात ना आपण. " प्रेम त्याला समजावण्याचा शेवटचा प्रयत्न करत होता, पण त्या माणसाने प्रेमला तसाच झटका देऊन खाली पाडलं. त्याच्या अचानक झालेल्या या कृतीने प्रेम आणि वेटरला काहीच समजेना झालं होतं.

" मी जी म्हणालो तीच हवी आहे. " असा म्हणत चिडून तो माणूस प्रेमच्या अंगावर धावून जाणार तेवढ्यात कोणीतरी मागून त्याचीच कॉलर पकडली.

" ऐऽऽऽऽऽ! कोणाची एवढी हिंमत झाली माझी कॉलर पकडण्याची? " मागून कॉलर पकडली गेल्याने त्या माणसाला मागे वळून पाहणं शक्य होत नव्हतं.

कोणी पकडलं आहे त्याचा चेहरा त्याला दिसत नव्हता. तेवढ्यात तशीच कॉलर धरून त्याला मागे खेचलं गेलं आणि तो माणूस धपकन मागे जमिनीवर पडला. जसा तो माणूस खाली पडला तसा कळवळू लागला. अचानक पडल्यामुळे त्याला लागलं होतं.

" मानलं की आमचं हॉटेल मोठं आहे, इथे नावाजलेले लोक येतात, आणि आम्ही त्यांची आदरपूर्वक सेवा करतो, पण हेही तेवढंच सत्य आहे की इथे गुंडागिरी सहन केली जात नाही. गुंडागिरी करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जातं. " त्या माणसाला खाली पाडल्यानंतर शौर्य त्याच्यापुढे उभा राहून रागाने म्हणाला.

त्याच्या बाजूलाच सिया देखील उभी होती. दोघे भाऊ-बहीण नेमकेच हॉटेलला पोहोचले होते आणि समोर त्यांना हा खेळ दिसत होता. सिया प्रेमजवळ गेली आणि तिने त्याला हाताला धरून उभं केलं. जशी ती त्याला धरायला खाली वाकली, तसा प्रेम तिच्या त्या सुंदर रुपड्याकडे पाहतच राहिला.

" तुम्ही ठीक आहात मिस्टर प्रेम? " सिया त्याला काळजीने विचारत होती, पण त्याचं त्याकडे लक्षच नव्हतं.

रोज पॅन्ट शर्ट सारख्या फॉर्मल ड्रेसमध्ये असणारी ती, आज सलवार सूटमध्ये त्याच्यासमोर उभी होती. केस मोकळे सोडलेले होते आणि कपाळावर छानशी नाजूक टिकली लावलेली होती. आज ती नेहमीपेक्षा खूपच वेगळी आणि सुंदर दिसत होती. तिच्याकडे पाहण्याच्या मोहात तिने त्याला काय विचारलं ते त्याच्या कानांना भिडलंच नव्हतं. तिच्या देखण्या रूपाची जादू होती ती.

" मिस्टर प्रेम... " तो काहीच उत्तर देत नव्हता म्हणून सियाने किंचित त्याच्या हाताला धरून हलवलं. तेव्हा कुठे तो भानावर आला आणि पुन्हा तिच्याकडे पाहू लागला.

" हं? क... काय मॅडम? " ती आपल्याशी काहीतरी बोलत होती हे त्याला समजलं, पण काय बोलली ते समजलं नव्हतं म्हणून त्याने काय असा प्रश्न केला.

" तुम्ही ठीक आहात ना? लागलं तर नाही ना तुम्हाला कुठे? मारलं का तुम्हाला त्या माणसाने? " सिया पुन्हा काळजीने त्याला विचारत होती.

" नाही मॅडम, मला नाही मारलं त्यांनी. आपल्या स्टाफला मारत होते ते. " प्रेम समोर उभ्या असलेल्या वेटरकडे इशारा करत म्हणाला. तसं सियाचं लक्ष त्याच्याकडे गेलं.

" अरे बापरे! " अशी म्हणत ती त्या वेटरजवळ गेली, तसं त्याने आपलं अंग आखडून घेतलं.

" मसीरा, यांच्यावर योग्य ते उपचार कर. बरंच लागलं आहे. " सिया मसीराकडे पाहत म्हणाली. त्यावर तिने होकारार्थी मान हलवली आणि वेटरला घेऊन तिथून निघून गेली.

" इथून पुढे, माझ्या हॉटेलच्या जवळपासही भटकायचं नाही. माझे हे शब्द लक्षात ठेवायचे. " शौर्य फक्त एवढंच म्हणाला आणि त्या माणसाने तिथून धूम ठोकली.

" माफ करा! थोडी गैरसोय झाली. आपण आत येऊन सेवेचा आनंद घ्यावा ही विनंती. " शौर्य घोळका करून उभ्या असलेल्या लोकांकडे पाहत म्हणाला. त्या सर्वांनीही तो विषय झटकला आणि जेवणाचा आनंद घेण्यासाठी हॉटेलमध्ये निघून गेले.

" सॉरी सर! मी त्या सरांना आवरण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण ते सर ऐकायलाच तयार नव्हते. " शौर्य आपल्याला रागवेल म्हणून प्रेम आधीच माफी मागत होता, पण शौर्य त्याच्याजवळ आला आणि त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

" तुम्ही योग्य तेच केलं. तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत होतात. तुम्हाला माफी मागण्याची गरज नाही. आता आत जाऊन सोय बघा. झालेला विषय तिथेच सोडून द्या. " शौर्य किंचित हसून त्याच्या खांद्यावर हलकं थोपटत म्हणाला, तसा प्रेमच्या मनावरचा भार कमी झाला आणि त्याने हसून होकार दिला. त्यानंतर शौर्य तिथून निघून गेला आणि सिया प्रेमजवळ आली.

" तुम्ही एवढे घाबरला का आहात मिस्टर प्रेम? " सिया मगाशी शौर्यसोबत बोलताना तो किती घाबरला होता याचं निरीक्षण करत होती.

" ते... मला जॉईन होऊन जास्त दिवस झाले नव्हते. आज असं वाटलं की मागच्या दोन्ही हॉटेलप्रमाणे इथूनही मला जावं लागतं की काय, म्हणून थोडा घाबरलो होतो. " प्रेम खाली मान घालून बोलत होता आणि सिया त्याच्या बोलण्यावर हसली.

" किती घाबरता तुम्ही मिस्टर प्रेम. तुमच्या प्रामाणिकपणामुळे मी तरी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. " सिया अशी म्हणाली आणि हॉटेलकडे जायला निघाली. तिचा आपल्यावर असलेला विश्वास पाहून प्रेम सुखावला. ती हॉटेलकडे चालली होती तर तो मागून तिला जाताना पाहत होता. नंतर त्याने हसतच आपल्या केसांवरून हात फिरवला आणि तोही हॉटेलकडे जायला निघाला.



*************************



" सूर्याची काय अपडेट आहे? " सत्येंद्र यांनी त्यांच्या अंगरक्षकाला विचारलं.

" बॉस, छोटे बॉस एकदम ठीक आहेत. त्यांनी निरोप पाठवला आहे की तुम्ही त्यांची काळजी करून तब्येत खराब करून घेऊ नका. महत्त्वाच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ते तुम्हाला फोन करू शकत नाहीत, असं सांगितलं आहे. " अंगरक्षकाने माहिती दिली, तसं आपोआप सत्येंद्र यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं.

" जर ते फोन करू शकत नाहीत तर मग तुम्हाला कसं कळालं? " त्यांनी हसतच पुढचा प्रश्न विचारला.

" बॉस, आपल्या सिक्युरिटी टीममधून एक असा गार्ड निवडला आहे जो त्यांच्याशी फेस टू फेस बोलू शकेल. कोणालाही संशय येणार नाही अशा वेशभूषेमध्ये त्याला पाठवलं जातं. रोज त्याच गार्डकडून आपल्याला माहिती मिळते. " अंगरक्षकाने पूर्ण माहिती दिली तेव्हा सत्येंद्र निश्चिंत झाले, तरीही त्या बापाची काळजी काही शांत होत नव्हती. त्यांनी पुढचा प्रश्न विचारलाच.


" तो गार्ड विश्वासू आहे ना? त्याची टेस्ट घेतली होती का? " सत्येंद्र यांनी काळजीने विचारलं.

" हो बॉस, काळजी नसावी. परीक्षा घेऊनच त्याला नेमलं आहे. " अंगरक्षक त्यांची चिंता दूर करत म्हणाला. त्यांनी तसेच आपले डोळे मिटले आणि आपल्या सिंहासनावर रेलून बसले.

" केव्हा येणार आहेत वगैरे काही कळवलं का? " सत्येंद्र यांनी आपले डोळे बंद ठेवूनच विचारलं.

" पुढच्या महिन्यात दहा तारखेला येणार असं कळवलं आहे बॉस. त्यांचं काम पूर्ण झाल्याशिवाय ते येऊ शकणार नाहीत. कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या महिन्यात दहा तारखेला काम पूर्ण करायचंच असं त्यांनी ठरवलं आहे. " अंगरक्षकाने सूर्यांशने जी माहिती दिली होती ती सत्येंद्र यांना सांगितली.

" ठीक आहे. बाहेर जाऊन थांबा. आम्हाला थोडा आराम करायचा आहे. " सत्येंद्र म्हणाले आणि अंगरक्षकाला तिथून जायला सांगितलं.

" ओके बॉस... टेक केअर! " अंगरक्षक म्हणाला आणि सत्येंद्र यांच्या रूममधून बाहेर जाऊन थांबला.

तो बाहेर गेल्यानंतर त्यांनी आपले डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर किंचित हसू आणि डोळ्यांत किंचित अश्रू तरळले होते.



क्रमशः