प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग ९ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.

" सांगितलेलं काम आज रात्री झालं पाहिजे. जर नाही झालं तर तुमच्यातून कोणीही जिवंत राहणार नाही. समजलात? " देवांश काही माणसांना सूचना देत होता.

त्याचीही दहशत बरीच होती त्यामुळे त्याच्यासमोर उभे असलेले लोक त्याच्या बोलण्याने घाबरत होते. देवांश किती दुर्गुणी मनुष्य होता हे कोणापासूनही लपलेलं नव्हतं.

" हो बॉस, आम्ही आज तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. " त्यांच्यातला एक जण म्हणाला.

" तक्रारीची संधी मिळाली तरी ती ऐकायला तुम्ही जिवंत राहणार नाही. जर स्वतःच्या जीवाची काळजी असेल तर आज काम झालंच पाहिजेत. " देवांश पुन्हा एकदा त्यांना धमकी देत म्हणाला. त्याच्या धमकीमुळे लगेच ते लोक तिथून निघून गेले आणि त्याने सांगितलेलं काम हाती घेतलं.

" आधीच बजावून सांगितलं होतं की माझ्या वाटेला जाऊ नकोस, पण तुला तर काही ऐकायचंच नसतं. जर तुला तुझ्या मनाचं करायला आवडतं तर मलाही माझ्या पद्धतीनेच काम करायला आवडतं. तू मेल्यानंतर सुद्धा मी ती वस्तू शोधून काढू शकतो. इतके दिवस तू माझा जो अपमान केला आहे, त्या अपमानाचा बदला म्हणून आज तुला मरावंच लागेल. आता फक्त तयार राहा. उद्याची पहाट तुला दिसणार नाही मिस सिया धर्माधिकारी. " देवांश क्रूर हसत स्वतःशीच बोलत होता.

आज काहीही करून त्याला सियाला आपल्या मार्गातून हटवायचं होतं. ती त्याच्यासोबत जे वागत होती त्यामुळे त्याला तिचा भयंकर राग आलेला होता. तिने आपला अपमान केला असा त्याने समज करून घेतला होता.

हो, तो समजच होता, कारण ती खरंच त्याचा अपमान करत होती. जे त्याला सहन होत नव्हतं.



*********************



सिया नेमकीच तिचं काम आवरून केबिनमधून बाहेर पडली होती. आज तिला नेहमीपेक्षा जास्तच उशीर झाला होता. नेहमीपेक्षा हॉटेलमध्ये आज जास्त गर्दी होती. त्यात अजून एका लग्नाची ऑर्डर त्यांना मिळाली होती. त्या सर्व व्यवस्थेमध्येच तिला किती उशीर झाला ते समजलं नव्हतं. रात्री ११ः३० वाजता ती तिच्या कामातून मोकळी झाली होती आणि तिथून जायला निघाली होती. मसीराला तिने तिच्या वेळेवर घरी जायला सांगितलं होतं, कारण तिची आजारी असलेली अम्मी घरी एकटीच असायची आणि घरही लांब होतं. सकाळी ती वेळेच्या आधी यायची त्यामुळे सियाला काळजी नसायची.

लग्नाची ऑर्डर मिळालेली असल्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रमुख अजूनही कार्यरत होते. तसं तर हॉटेल २४ तासांसाठी सुरू होतं. हॉटेलच्या नवीन नियमांनुसार डिपार्टमेंटचे प्रमुख हे ११ वाजेनंतर निघून जात होते. प्रत्येक डिपार्टमेंट्समधील प्रमुखांच्या विनंतीवरून नवीन नियम लागू केला होता.

' आम्हाला २४ तास थांबायला जमत नाही, त्यामुळे रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत आम्हाला सुट्टी द्यावी. ' अशी त्यांनी मागणी केली होती.

त्यांना कामाची गरजही होती आणि प्रत्येकाचा घर संसारही होता त्यामुळे दोन्हींकडे लक्ष ठेवावं लागणार होतं. वेटर्सही सकाळी वेगळे आणि रात्री वेगळे असे दोन गटात विभागलेले होते, त्यामुळे सर्वांना व्यवस्थित नियोजन करून काम करता येत होतं.

आज गडबड असल्याने सर्वांनी जास्त वेळ घेतला होता. थोड्यावेळाने डिपार्टमेंट्सचे प्रमुख आणि दिवस पाळीचे वेटर्स निघून जाणार होते. रात्र पाळीचे कार्यकारी मंडळ आपापल्या प्रमुखांच्या सूचनांचे अनुसरण करून आळीपाळीने कार्यरत होणार होते.


सिया केबिनमधून बाहेर आल्यानंतर तिची नजर सहजच किचनच्या दिशेने गेली. बाहेर कोणी दिसत नव्हतं पण आतून काही जणांचा बोलण्याचा आवाज येत होता. तिची पावले आपोआप त्या दिशेने वळाली. तिथे प्रेम त्याच्या टीम मेंबर्सना काहीतरी सांगत होता. ती बाहेरच उभी राहून त्याचं निरीक्षण करत होती. तो बोलताना तिला खूपच आकर्षक वाटत होता. कधी त्याच्या चेहऱ्याचं, तर कधी त्याच्या हातवारे करून बोलण्याचं बारीक नजरेने निरीक्षण करत होती. ती थोडी बाजूला असल्याने कोणाचंही तिच्याकडे लक्ष गेलं नव्हतं.

" बाकी उद्या आल्यानंतर बोलू. काही गरज पडली तर मला फोन करून बोलवाल. " त्याच्या टीमला सूचना देऊन झाल्यानंतर तो जाण्याआधी शेवटचं वाक्य म्हणाला आणि जायला वळला.

तो दरवाजाच्या दिशेने येत आहे हे समजताच ती थोडी बाजूला सरकली. त्याला आपण दिसू नये म्हणून भिंतीच्या आडोशाला थांबली होती. तेवढ्यात तो बाहेर आला आणि तिने कितीही प्रयत्न केले तरी ती त्याच्या नजरेत आलीच.

" हॅलो मॅडम, काही हवं होतं का? " तिच्याकडे लक्ष गेल्यानंतर त्याने हसून तिला विचारलं, तेव्हा तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि ती किंचित हसली.

" नाही नाही, सहजच बोलण्याचा आवाज कानांवर आला म्हणून इकडे आले होते. " सिया हसून म्हणाली, तसा तोही हसला.

" आज शौर्य सर लवकर गेले का घरी? "  प्रेमने इकडे तिकडे पाहून विचारलं, कारण शौर्य कुठे दिसत नव्हता.

" हो, दादा आज लवकरच गेले घरी. माझं आत्ताच काम आवरलं होतं म्हणून आता मी सुद्धा निघाले होते. चला बाय, भेटू उद्या. " सिया म्हणाली आणि तिथून जायला निघाली. तेवढ्यात तिच्या काहीतरी लक्षात आलं आणि तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं.

" मिस्टर प्रेम, तुमच्याकडे वाहन नाहीय ना जाण्यासाठी? " सियाने लक्षात आल्यानंतर त्याला विचारलं, त्यावर त्याने हसून खाली मान घातली. कदाचित तिच्या त्या प्रश्नाने त्याला कमीपणा वाटला असेल.

' आपल्याकडे साधी बाईक सुद्धा नाही म्हणून ती आपल्यावर हसत असेल का? ' असा तो मनोमन विचार करत होता.

तिला त्याच्या मनातला प्रश्न समजला नव्हता, पण त्याच्याकडे बाईक नाही याचं तिला वाईट वाटलं होतं. रोज सकाळी आणि रात्री तो कसा येत जात होता हे तिला काहीच माहित नव्हतं. त्याच्याकडे जी काही जमापुंजी होती आणि त्याच्या वडिलांनी जे काही थोडेफार पैसे दिले होते, त्यातून तो फक्त फ्लॅट घेऊ शकला होता. त्याचं रोजचं येणं जाणं हे बस किंवा टॅक्सीनेच असायचं. रात्री नक्कीच त्याला अडचण येत असणार हे तिला आत्ता जाणवलं.

" तुमची हरकत नसेल तर... मी सोडू शकते तुम्हाला घरी. " सिया त्याचा विचार करत म्हणाली. त्यावर त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं.

" अहो... नको... नको मॅडम, मी जाईन आरामात नो प्रॉब्लेम! " प्रेम अडखळत बोलत होता. बहुतेक त्याला तिच्यासोबत तिच्या आलिशान गाडीमध्ये बसणं योग्य वाटत नव्हतं.

" रिलॅक्स मिस्टर प्रेम, निःसंकोचपणे तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. मला काही प्रॉब्लेम नाही. आपल्या बाकीच्या स्टाफकडे स्वतःची वाहने आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं वाहन घेत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आणू आणि सोडू शकते. " सिया त्याच्या मनाची अवस्था समजून घेत म्हणाली. त्यावर तो विचार करू लागला. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला.

" एक्सक्यूज मी मॅडम! " असा म्हणत तो फोन उचलून बाजूला गेला.

जसा तो फोनवरील बोलणं ऐकत होता तशा त्याच्या डाव्या हाताच्या मुठी रागाने आवळल्या जात होत्या. गळ्यावरच्या आणि हातांच्या नसा एकदम आकसल्या गेल्या होत्या. त्याने सियाकडे पाठ केलेली होती त्यामुळे तिला त्याचा रागाने लालबुंद झालेला चेहरा दिसत नव्हता. ती तशीच त्याची बोलणं पूर्ण होण्याची वाट पाहत होती. तो इकडून काही बोलत नव्हता. फक्त समोरून जे बोलणं कानावर पडत होतं ते ऐकायचं काम करत होता. एक अक्षरही न बोलता त्याने फोन ठेवून दिला आणि स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू लागला. अगदी काहीच सेकंदात त्याने स्वतःला नॉर्मल केलं आणि चेहऱ्यावर एक हसू घेऊन सियाकडे वळला. ती अजूनही तिथेच उभी होती.

" मग, काय निर्णय घेतला तुम्ही? " सियाने आतुरतेने त्याला विचारलं. मनातून तिची इच्छा होती की त्याने सोबत येण्यासाठी होकार द्यावा.

' का इच्छा होती? ' हा प्रश्न कदाचित तिला पडला नव्हता.

" ओके मॅडम, मी तुमच्यासोबत येतो. " तो हे वाक्य बोलला आणि तिच्या चेहऱ्यावर खूप म्हणजे खूप मोठा आनंद पसरला.

माहित नाही का? त्याचं कारण तिलाही कळत नव्हतं. आनंद मात्र झाला होता. ते नजरेच्या कोपऱ्यातून त्यानेही पाहिलं होतं. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू फुललं होतं.

' आपल्या एका होकाराने तिला एवढा आनंद होतो. जसा मी तिला पसंत करतो, तशी ती सुद्धा मला पसंत करत असेल का? ' त्याने तिचा आनंद पाहून मनातल्या मनात स्वतःलाच प्रश्न विचारला.

तो ' मी तुमच्या गाडीने येतो ' असं न म्हणता, ' मी तुमच्यासोबत येतो ' असा म्हणाला होता, त्यामुळे तिला अजूनच छान वाटलं होतं.

" चला. " ती म्हणाली, तसा तो त्याच्या विचारातून बाहेर आला.

तिने चालता चालताच ड्रायव्हरला फोन करून कार तयार ठेवायला सांगितली. तिच्यामागेच तो सुद्धा निघाला. दोघेही हॉटेलमधून बाहेर पडले आणि कारमध्ये जाऊन बसले. तिच्या कारच्या मागे आणि पुढे एक एक अंगरक्षकांची कारही निघाली होती.

दोघेही मागे बसलेले होते त्यामुळे त्यांच्या गप्पा सुरू झालेल्या होत्या. बोलता बोलता प्रेम मध्येच बाहेरच्या दिशेने नजर वळवत होता. बाहेर अजूनही कसलीच हालचाल जाणवत नव्हती, तरीही तो लक्ष ठेवूनच होता. त्याच्या असं करण्याचं कारण म्हणजे, देवांश सियावर हमला करणार आहे हे मघाशी रॉबर्टने फोनवर त्याला सांगितलं होतं. म्हणूनच त्याला राग आला होता. काहीच हालचाल नव्हती म्हणून त्याने सियाची नजर चुकवून रॉबर्ट आणि प्रीतमला मेसेज करून अलर्ट राहायला सांगितलं. कधी काय होईल सांगता येणार नव्हतं.



पण तेवढ्यात अचानक...



देवांश सियासाठी रचलेल्या षडयंत्रात यशस्वी होईल का? की प्रेम तिला वाचवण्यात यशस्वी होईल? काय झालं असेल अचानक?



क्रमशः

🎭 Series Post

View all