प्रेमसिया: CRUEL LOVESTORY (भाग - १)

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.

                       आज तिला ऑफिसला निघण्यासाठी जरा उशीरच झाला होता. आज काम जास्त होतं आणि नेमका आजच तिला उठायला उशीर झाला होता. टेन्शनमध्ये तिच्या आवरण्याचा स्पीड देखील वाढला होता. रोज लवकर उठून आरामात आपलं आवरणारी नेमकी आज जास्त काम असलेल्या दिवशी उशिरा उठली होती. आवरताना काही गोष्टी तिच्या लक्षात राहत होत्या तर काही गोष्टींचा विसर पडत होता. अशाने तिला आवरायला आणखीनच उशीर होत होता.

त्या आलिशान बंगल्यामध्ये एक ती आणि तिचा मोठा भाऊ राहत होते. स्वयंपाक करणाऱ्या मावशी, बंगला साफ करणारे नोकर सोडले तर इतर कोणीही बंगल्यात येत जात नव्हतं, पण हे सर्वजण जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंतच बंगल्यामध्ये राहत होते. त्यांच्या कायमस्वरूपी राहण्याची सोय बंगल्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये केलेली होती. अर्थातच, त्या एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये एकमेव ती आणि तिचा भाऊ दोघेच राहत होते. आईवडील लंडनमध्ये असलेला त्यांचा व्यवसाय सांभाळत होते, तर इथे भारतामध्ये हे दोघे भाऊबहीण आपला वेगळा सुरू केलेला व्यवसाय सांभाळत होते. त्यांचे बॉडीगार्ड्सही जास्त नव्हते. जे काही होते ते देखील बंगल्याच्या बाहेरच. आत येण्याची कोणालाही परमिशन नव्हती.

" सियाऽऽऽऽऽ, चल बाळा लवकर उशीर होत आहे. " तिच्या भावाने हॉलमध्ये आल्यावर तिला आवाज दिला.

तो नाश्ता करण्यासाठी डायनिंग एरियाकडे जाणार होता. तेव्हा त्याने तिलाही नाश्त्यासाठी आवाज दिला होता.

" आले दादा. " सिया रूममधून बाहेर पडून मोठ्याने आवाज देत म्हणाली.

तिचा आवाज ऐकल्यानंतर तो डायनिंग एरियाकडे वळला. काही वेळाने तीही येऊन त्याच्या शेजारी नाश्ता करायला बसली.

" आज उशीर कसा काय झाला आमच्या सिया राणीला? " तिच्या भावाने तिच्याकडे पाहत मस्करीने विचारलं.

" फूड अँड बेव्हरेज साठी बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट्स आले होते. तेच चेक करत होते. ते सर्व चेक करण्यासाठी मला ऑफिसमध्ये काल अजिबातच वेळ मिळाला नव्हता, म्हणून मी ते डॉक्युमेंट्स घरी घेऊन आले होते. मी मॅनेजर आहे तर काळजीपूर्वक पडताळणी करावी लागणारच. कर्तव्यात कसलीही चूक नको, म्हणून दोन तीनदा सर्व बायो चेक करून पाहत होते. त्यात फूड अँड बेव्हरेजसाठी चुकीचा कर्मचारी आपण निवडू शकत नाही. हॉटेलमध्ये सर्वच सेवा महत्त्वाच्या असतात, पण सर्वात जास्त खानपान सेवा व्यवस्थित कार्यरत राहायला हवी. रात्री त्याच गोष्टींचा विचार करून करून उशिरा झोप लागली होती. " सिया हसून म्हणाली, त्यावर तोही हसला.

" तू योग्य त्याच व्यक्तीची निवड करशील याची मला खात्री आहे सिया. चल आता लवकर नाश्ता करून घे. ऑफिसला जाण्यासाठी सोबतच निघू. "

आपल्या कामांमध्ये ती किती सिरीयस असते हे त्याला चांगलंच माहित होतं. त्यावर तोही जास्त काही बोलला नव्हता आणि मग दोघेही शांतपणे नाश्ता करू लागले. जेवताना किंवा नाश्ता करत असताना दोघेही कधीच बोलत नसायचे. त्यांना ते आवडत नव्हतं. नेहमी खाऊन झाल्यावरच दोघेही कामाविषयी किंवा अन्य कुठल्या विषयावर चर्चा करत असायचे.

             शौर्य श्रीकांत धर्माधिकारी. ३५ वर्षांचा राजबिंडा तरुण, दिसायला कमालीचा हँडसम. एका हॉटेलचा मालक होता, पण अजूनही अविवाहित होता. पाहिजे तशी मुलगी त्याला अजून तरी मिळाली नव्हती. २५ वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांनी म्हणजेच श्रीकांत यांनी त्याला आपल्या बिझनेसमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्याला आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे त्याने वयाच्या ३० व्या वर्षी स्वबळावर स्वतःचा आवडता बिझनेस सुरू केला होता. नशिबाने त्याला इतकी साथ दिली होती की जॉब करून, पैसा कमावून त्यानंतरच त्याने आपला व्यवसाय उभारला होता.

एक दोन वर्षे त्याने छोटं हॉटेल सुरू केलं होतं, पण जसे पैसे जमा होऊ लागले तसं त्या छोट्या हॉटेलचं मोठ्या हॉटेलमध्ये रुपांतर झालं होतं. तसा तर त्याने हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केलेला होता, पण वडिलांचा स्वभाव पाहता त्याचं हॉटेल उभारण्याचं स्वप्न अपूर्णच राहणार असं त्याला नेहमीच वाटत होतं. त्याच्या याच नकारात्मक विचारातून कधी सकारात्मक बदल घडायला लागले त्यालाही समजलं नव्हतं. आवडतं क्षेत्र असल्याने त्याने मेहनतीने या पाच वर्षांच्या काळात त्याचा व्यवसाय बराच पुढे नेला होता. शहरातील किंवा शहराच्या बाहेरचेही आपलं साधं लग्न असो की वाढदिवस असो, छोटी पार्टी असो की मोठी पार्टी असो, त्याच्याच हॉटेलशी संपर्क करत होते.

                नशिबाप्रमाणेच त्याच्या या प्रवासात त्याच्या बहिणीचीही त्याला साथ मिळाली होती. त्याची बहीण म्हणजेच, सिया श्रीकांत धर्माधिकारी. २७ वर्षांची तरुणी. नाकी डोळी सुंदर आणि गोरीपान, हुशार, प्रत्येक कामात निपुण अशी होती. मागच्या एक वर्षापासूनच शौर्यला हॉटेलमध्ये मदत करत होती. तिनेही भावाच्या पावलावर पाऊल ठेवत हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला होता, पण शौर्यप्रमाणे स्वतःचं हॉटेल असावं असं तिने कधीच स्वप्न पाहिलं नव्हतं. आपल्या दादाला मदत करायची हेच तिने ठरवलं होतं.
   
सियाच्या कामावर शौर्य खूप खुश असायचा. खुश होऊन सर्व कारभार त्याने तिच्यावर सोपवला होता. म्हणजेच त्याने तिची हॉटेल मॅनेजर म्हणून निवड केली होती. ती हुशार असल्याने स्टाफही तिच्यासोबत मन लावून काम करायचा. आपल्या बहिणीची प्रगती पाहून शौर्यला खूपच आनंद होत होता. याशिवाय सियाचं अजून एक सिक्रेट होतं. ते सिक्रेट शौर्य सोडला तर इतर कोणालाही माहित नव्हतं. अगदी त्यांच्या आईवडिलांनाही नाही.

पंधरा वीस मिनिटांनी दोघांनी आपला नाश्ता संपवला आणि तिथून हॉलमध्ये निघून आले. तिथे आल्यावर शौर्य बोलू लागला.

" आता निघुयात ऑफिससाठी? " शौर्यने तिला विचारलं.

" हो दादा, निघुयात. बाकीचं डिस्कशन ऑफिसमध्येच करूयात. " सिया हसून म्हणाली आणि मग दोघेही ऑफिसकडे जायला निघाले. त्यांच्या गाडीच्या पुढे आणि मागे एक एक बॉडीगार्ड्सची गाडीही होती.



काय असेल सियाचं एक सिक्रेट?



क्रमशः


🎭 Series Post

View all