चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
लघुकथा
शीर्षक:- प्रेमस्वरूप आई
©® सौ.हेमा पाटील.
खिडकीत ठेवलेल्या नैवेद्याजवळ येऊन कावळ्याने त्यावर चोच मारली. ते पाहून तिला अधिकच उमाळा आला.
"आई, का गं अशी न सांगता निघून गेलीस?" तिने रडायला सुरुवात केली.
घरात खूप माणसे होती, परंतु ती सगळी गंभीर चेहऱ्याने वावरत होती. आज आईचं तेराव्याचं कार्य होतं. सगळे पै-पाहुणे जमले होते. तेराव्याचे पिंड पाडून झाले, सगळे विधी पूर्ण झाले. गोड नैवेद्य दाखवून झाला. कावळ्यालाही नैवेद्य ठेवला. खिडकीत येऊन कावळ्याने त्यावर लगेच चोच मारली. ते पाहून तिला वाटले,
'आई, तुझा माझ्यात सुध्दा जीव अडकला नाही का गं? किती पटकन मला सोडून निघून गेलीस?' पण याला उत्तर कोण देणार होते?
त्यानंतर पाहुणे मंडळींचे जेवण झाले. जेवणानंतर दुखवट्याचा कार्यक्रम झाला. पाहुण्यांनी आणलेल्या टॉवेल टोप्या यजमानाच्या हातात ठेवल्या. म्हातारीची लेक म्हणजेच ती समोरच बसली होती. सभोवताली घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ती उघड्या डोळ्याने पहात होती, पण त्या तिच्या मेंदूपर्यंत पोहोचत होत्या की नाही अशी शंका येत होती, कारण तिची निर्विकार नजर.
सभोवताली घडणाऱ्या घटनांचा तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. ती निश्चल नजरेने कुठेतरी शून्यात नजर लावून बसली होती. येणारे पै-पाहुणे कार्यक्रम झाला की जायच्या गडबडीत होते. जाणारे पाहुणे तिच्याजवळ येऊन तिच्या अंगाला हात लावून तिला विचारत होते,
"येऊ का आम्ही? काळजी घे. जाणारा माणूस जातो, मागे राहणाऱ्याला जगावेच लागते. आता ती काय परत येणार आहे का? सांभाळ स्वतःला." हे आणि या प्रकारचे संवाद तिच्यासमोर म्हटले जात होते. संवादातील तोच तोपणा तिच्या मेंदूपर्यंत पोहोचत होता की नाही कुणास ठाऊक? पण निरोप घ्यायला येणाऱ्या सर्वांकडे ती आपली निर्विकार नजर टाकत होती, आणि नजरेनेच त्यांचा निरोप घेत होती.
हार्ट अटॅक येऊन तिचे बाबा सहा वर्षांपूर्वीच देवाघरी गेले. ते गेल्याचे जितके दुःख झाले नव्हते, त्याच्यापेक्षा जास्त दुःख तिला आई गेल्यावर झाले होते. आपल्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीच भरली जाणार नाही असे तिला वाटत होते.
बरोबरच आहे, तिच्या कुशीत नऊ महिने काढले, आणि त्यानंतर तिच्या संगतीतच लहानाची मोठी झाली. लग्नानंतरही तिची ओढ कायमच राहिली. ती नेहमी म्हणायची,
"लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते." तिलाही हे पटायचे, कारण ती माहेरी आल्यावर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे आईला व्हायचे. ती स्वतः मात्र लेकीकडे चार दिवसाच्यांवर राहत नव्हती. कितीही आग्रह केला तरी तिला तिच्या घराची ओढ होती.
'जावयाच्या दारात किती दिवस राहायचे? आपल्याला शोभेल तेच करावे.' असे तिचे पालुपद असायचे.
'जावयाच्या दारात किती दिवस राहायचे? आपल्याला शोभेल तेच करावे.' असे तिचे पालुपद असायचे.
आता सगळेच संपले होते. ती साध्या तापाचे निमित्त होऊन अचानक कायमची निघून गेली होती. 'जाताना तिला असे वाटले नाही का, की आपल्या माघारी आपल्या लेकीचे काय होईल?' असा विचार तिच्या मनात वारंवार येत होता, आणि तिचे डोळे भरून येत होते.
कार्याला येणारे पै-पाहुणे निघून गेले होते, तरीही ती तशीच निश्चलपणे तिथेच बसली होती. वहिनी तिच्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाली,
" ताई, ही साडी घ्या." यावर तिने चमकून वहिनीकडे पाहिले. वहिनी म्हणाली,
" असे पाहू नका. अशी पद्धत आहे. आईच्या माघारी हे शेवटचे माहेर म्हणून साडी घ्यायची असते. ही साडी एक वर्षाच्या आत नेसून फाडायची असते." हे ऐकून तिने दुःखी नजरेने वहिनीकडे पाहिले, आणि त्यानंतर आईच्या फोटोकडे पाहिले.
' म्हणजे तू गेलीस आणि माझे माहेरच संपले. आता मी या घरात परकी झाले.' असा विचार तिच्या मनात आला आणि तिने "आई" म्हणून मोठ्याने टाहो फोडला.
आई हा शब्द उच्चारतानाच मायेची पखरण होते. आता आपल्या नशिबी ती माया नाही. तो प्रेमळ स्पर्श नाही. ते कुणीतरी असोशीने आपली वाट पाहणे नाही, हे सगळे तिला जाणवले. पाठीला पाठ लावून आलेला भाऊ असला, तरी आत्ता तो तिला कोणीतरी परका वाटला.
आपण इथे का बसलो आहोत असे वाटून ती ताडकन उभी राहिली, आणि आपली पिशवी उचलून दरवाज्याकडे चालू लागली. ते पाहून वहिनी म्हणाली,
" अहो ताई, थांबा जरा. ही साडी तुम्हाला इथून नेसून जायचे आहे. ही साडी नेसा, आणि मग जा." यावर ती म्हणाली,
" मला नको साडी," वहिनी म्हणाली,
"असे चालत नाही, या आत. नेसा बरं ही साडी." ती मुकाट्याने मागे वळली. वहिनीने साडी तिच्या हातात दिली. साडी घेऊन ती आतल्या खोलीकडे वळली. आपल्या अंगावरची आधीची साडी सोडून तिने ती साडी नेसायला सुरुवात केली.
ती साडी नेसत असताना त्या साडीचा स्पर्श तिला खूप दाहक वाटत होता. अंगाला चहूबाजूने सुया टोचत आहेत असे तिला वाटत होते. या साडीसोबत आपल्या माहेराचा शेवट झाला आहे, हे स्वीकारले पाहिजे असे तिचे मन तिला ओरडून सांगत होते.
आई नसेल तर त्या माहेराला काय अर्थ आहे? तिने ती साडी नेसली आणि बाहेर येऊन ती आईच्या फोटोच्या पाया पडली. त्यानंतर तिने आपली पिशवी उचलली आणि ती तडक घराबाहेर पडली. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही. आता मागे वळून पाहिले तर दरवाज्यातून ती दिसेनाशी होईपर्यंत उभी असणारी माऊली थोडीच दिसणार होती!
समाप्त ©® सौ.हेमा पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा