लघुकथा
शीर्षक:- प्रतिबंध: वेगळा विचार!
गणपतीच्या मुलांना सुट्ट्या चालू होत्या. परीक्षा झालेली त्यामुळे दोन्ही मुले घरी असल्याने सारखा दंगा-मस्ती करत होतीत. सुविद्याला काय करावे हे समजतच नव्हते.
हातात मोबाईल असला की त्यावरच सर्व पाहायचे. रिल्स पाहून पाहून नेटचा पॅक संपायचा पण ह्या मुलांना काही मोबाईल हातातून सुटत नसायचा.
सुविद्या एकदिवस नवीन पदार्थ बनवण्याचा व्हिडिओ पाहत होती. ते पाहत असताना मध्येच एक जाहिरात लागली. ती जाहिरात पाहत असताना तिला एक कल्पना सुचली.
"तेज आणि तेजस्वी दोघे इकडे या." असे म्हणून तिने दोन्ही मुलांना बोलावले.
"काय गं आई? " मुले तिच्याजवळ येत विचारत म्हणाली.
"तुम्हाला ह्या वर्षी मी दिवाळीसाठी कपडे घेवू शकणार नाही." ती म्हणाली.
"अगं पण का?" तेजने विचारले.
"कारण आपल्याकडे आता पैसे कमी आहेत." तोंड लहान करत ती म्हणाली.
"पण आई बाबांनी तर पाठवले असतील ना. मग आपण बँकेच्या एटीममधून काढू." हुशार तेजस्वी म्हणाली.
सुविद्याचा नवरा हा नौदलामध्ये कार्यरत असल्याने फिरतीच्या कामामुळे काही महिने सुट्टी असल्यावरच घरी यायचा. त्यामुळे सुविद्याला एकटीने ह्या दोघांना सांभाळावे लागायचे.
"पैसे नाही आहेत." पुन्हा ती म्हणाली.
"मग आता?" दोन्ही मुले तिच्याकडे पाहून विचारत होते.
"एक काम करू शकतो पण त्यासाठी तुम्ही मदत करावी लागेल तरच होईल." ती त्यांच्याकडे पाहून म्हणाली.
"बोल आई काय करायचे?" तेजने विचारले.
तिने सर्वकाही आपल्या मुलांना सांगितले. आता त्यांच्याकडे पाहून ती म्हणाली, "हे सर्व करणार का ?"
"हो, करू, पण ते सामान कसे आणायचे त्यासाठी पैसे लागतील ना?" तेजस्वी आपला प्रश्न विचारत म्हणाली.
"हो ते मी देते पण तुम्ही ते नीट वापरा." ती म्हणाली.
"आई आम्ही तू सांगतेस तसेच करू ." असे म्हणून त्या दोघांनी पैसे घेतले.
दोघे जण काहीतरी चर्चा करून एका कागदावर काहीतरी लिहीत होते.
"पण दादा, अरे आपण सर्व बनवून ते विकायचे कुठे?" तिने विचारले.
"आपण पाहू काय करायचे. आईने हे काम आपल्याला दिलेले आहे तर ते आपण करूच." तेज तिच्यापेक्षा मोठा असल्याने तो म्हणाला.
दोघे बाजारात गेले आणि काही वस्तू विकत घेतल्यानंतर घरी येवून ते सामान आईला दाखवले. त्यानंतर जो वेळ ते व्हिडिओ गेम खेळण्यात घालवत होते तो त्यांनी व्हिडिओ पाहून काम करण्यात घालवला होता.
सुविद्या त्यांच्या खोलीत येवून आपल्या मुलांना पाहत होती. तसे बोलायला गेले तर तेज हा नववीत होता आणि तेजस्वी सहावीत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा तिने जास्त ठेवली नव्हती.
हे सर्व करत असताना गणपतीच्या सुट्ट्या संपल्या आणि पुन्हा अभ्यास सुरू झाला. मग दिवाळी येणार होती आणि ह्या वर्षी परीक्षा काही कारणाने दिवाळी नंतर ठेवण्यात आली होती. एके ठिकाणी प्रदर्शन होते. त्यात एक स्टॉल हा ह्यांच्या आईने विकत घेतला होता.
नवरात्री संपून आता दिवाळी येणार होती. त्यामुळे त्याठिकाणी खूप गर्दी होती. रांगोळ्या आणि कंदील तसेच विविध गोष्टी विकत घेण्यासाठी वेळ जशी पुढे जात होती तशी माणसांची गर्दी कमी होण्यापेक्षा वाढतच होती.
त्या स्टॉलवर सुविद्या स्वतः उभी होती. आदल्या दिवशी त्याच बाजारात जावून त्यांनी कोणत्या गोष्टींची किती किंमत आहे हे पाहून झाले होते.
एक एक करत पहिल्याच दिवशी तेज आणि तेजस्वी ह्यांनी बनवलेल्या अर्ध्या गोष्टी संपल्या होत्या. मुले खूप खूश झाली. दुसऱ्या दिवशी तर कमी वेळातच सर्व सामान संपले, परंतु तीन दिवसाचे भाडे दिल्याने तिसऱ्या दिवशी काय करायचे हा प्रश्न सुविद्याला पडला होता.
तिसऱ्या दिवशी तेज आणि तेजस्वी स्टॉलवर जायला निघाले तेव्हा त्यांची आई म्हणाली, "अरे झाले की सर्व, आता कशाला जायचे?"
"अगं आई हे बघ आम्ही काय बनवले आहे?" असे म्हणून त्यांनी एक मोठी पिशवी सुविद्या समोर ठेवली.
ते सर्व पाहून सुविद्या आश्चर्यचकित झाली. कारण मुलांनी पाच आकाश कंदील आणि सजावटीसाठी काही तोरणं बनवली होती. दिसताना ते तोरण खऱ्याखुऱ्या फुलांचे वाटत होते परंतु ते कागदी फुलांनी बनवले होते.
"हे कधी बनवले?" तिने विचारले.
"आम्हाला कंदील आणि तोरण बनवण्याचा व्हिडीओ नेट वर शोधल्यावर सापडला. तसेच तू पैसे आम्हाला दिले होतेस त्यातून काही पैसे आम्ही ह्यासाठी खर्च केले." तेज म्हणाला.
आपल्या मुलांचे तिला खूप कौतुक वाटतं होते. कारण तिने तर पणतीला रंग देवून आकर्षक बनवण्याची कल्पना त्यांना सांगितली होती परंतु मुलांनी तर तिसऱ्या दिवशीचा विचारही करून ठेवला होता.
दोन दिवसांत सर्व पणत्या विकल्या गेल्या आणि तिसऱ्या दिवशी दोन कंदील मात्र राहिले. त्यातला एक स्वतः च्या घरासाठी आणि शेवटी राहिलेला एक त्यांच्या शेजाऱ्यानी विकत घेतला.
ह्यातून फक्त पैसा कमावणे हा उद्देश नव्हता. त्या मुलांनी स्वतः बाजारात जावून वस्तू विकत घेवून किती खर्च होतो ते जाणले तसेच एका पणतीची किंमत किती असायला हवी हे त्या भावा-बहिणीने ठरवले फक्त स्टॉल वर लहान मुले वस्तू विकू शकत नाही म्हणून सुविद्या उभी होती. जास्तीचे पैसे दिल्यावर बाकी परत किती द्यायचे हेही व्यवहारातील ज्ञान तेव्हा दोघांना समजले होते.
नफा आणि मेहनत या शब्दांचा खरा अर्थ दोघांना सुविद्याने सुंदररीत्या समजावला आणि तसेच मोबाईलवर जास्त वेळ घालवण्याला प्रतिबंध तिने त्यांना कामाला लावून घातला होता.
मुले स्वत:च्या कष्टाचे पैसे पाहून खूप आनंदी होती त्यातील काही पैसे त्यांनी गरजू लोकांना दान करण्याचा विचार केला आणि आपल्याकडे खूप कपडे आहेत म्हणून त्यांनी वाचनासाठी काही पुस्तके आणि आईला एक शोपिस भेट म्हणून घेवून दिले.
समाप्त.
© विद्या कुंभार.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा