Login

प्रेयसी दान - भाग ८

आपल्या सच्चा प्रेमाचं दान करून प्रेयसीच्या सुखाखातर समर्पण वृत्ती जपणाऱ्या प्रियकराची एक अजरामर, रोमांचक आणि रहस्यमयी प्रेमकथा!
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

विषय रहस्य कथा

प्रेयसी दान-भाग ८

"नेहा तर नसेल? म्हणजे...." स्वाती काही बोलते न बोलते तोच मिलींदने तिला प्रश्न केला.

"कोण ही नेहा? आणि का मागे लागली आहे दिव्याच्या? काय संबंध तिचा निनाद अन् दिव्याच्या मैत्रीशी?" मिलींदच्या बोलण्यातून ओळख नसलेल्या त्या नेहाबद्दल चीड व्यक्त होत होती.

"नेहा... आमचीच क्लासमेट! तिला निनाद फार आवडायचा. तिने बरेचदा तिचं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण निनादने तिला कधीच भाव दिला नाही." स्वाती बोलत होती.

"अच्छा निनादने भाव दिला नाही त्याचा वचपा ती असा काढते आहे तर...!" मिलींद.

"नाही... हे एवढंच नसेल! नेहाने दिव्या आणि निनाद यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा बरेचदा प्रयत्न केलेला पण खरं प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये अशी फुट पाडणं सोपं असतं का?" स्वाती.

"हो पण म्हणून ही काही पद्धत झाली का? एखाद्याच्या मनावर आघात होईल असं बोलून काय मिळालं असेल तिला?" मिलींद.

"जगण्यातली ही तत्त्वं सात्विक विचारसरणीच्या व्यक्तींसाठी असतात. नेहा सारख्या स्वार्थी मुली काहीही करू शकतात. अत्यंत गर्विष्ठ आहे ही नेहा. श्रीमंतीचा... स्वतःच्या सौंदर्याचा फार गर्व आहे तिला. भाऊजी, तुम्हाला कल्पना नाही निनादला मिळविण्यासाठी या नेहाने काय काय केलंय ते!" स्वाती.

"पण निनाद हे जग सोडून गेल्यानंतर काय अर्थ उरतो तिच्या या धूर्त प्रवृत्तीला?" मिलींद.

"कोण ही नेहा... आणि निनादच्या मृत्यूला दिव्याला जबाबदार धरणारी ही कोण? एकदा भेटलं पाहिजे." मिलींद मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होता. दिव्याच्या उपचाराला एक नवीन वळण मिळून देखील मिलींदच्या मनाची अस्वस्थता कमी झालेली नव्हती.

"कोण आपण?" सिक्युरिटी गार्डने बंगल्याच्या गेटवरच मिलींदला अडविलं.

"नेहा मॅमला भेटण्यासाठी आलोय. हे माझं कार्ड. नेहा मॅमशी फोनवर बोलणं झालंय." आपलं कार्ड दाखवत मिलींदने आपली ओळख दिली.

"सर, थांबा इथेच. मी मॅमला विचारतो." मिलींदला थांबवून गार्डने फोनवरून नेहाची परवानगी घेतली.

"अच्छा... हो हो... पाठवा त्यांना आत." नेहाने परवानगी देताच गार्डने मिलींदला बंगल्यात जाण्यास सांगितलं.

"मोठा कारभार! अशा उच्चभ्रू कुटूंबातल्या मुलीला काय असं सुचल असेल म्हणून तिने माझ्या दिव्याला नैराश्याच्या अंधारात ढकललं!" स्वतःशीच पुटपुटत मिलींदने बंगल्याच्या आत प्रवेश केला.

"बोला... काय मदत करू शकते मी आपली?" नेहाने मिलींदला बागेतल्या खुर्चित बसवंत विचारलं.


घारे घारे डोळे... गोरापान वर्ण... सुडौल बांधा आणि तिच्या ऐश्वर्याला साजेस रहाणीमान यामुळे नेहा एखाद्या चित्रपटातील अभिनेत्री एवढीच प्रभावी वाटतं होती.

"एवढ्या सुंदर मुलीला निनादने का नाकारले असेल?" क्षणभर हा एक विचार मिलींदला छेडून गेला.

"एकदा दिव्याला भेटून..." मिलींद काही बोलेल याआधीच नेहा खड्या स्वरात बोलायला लागली.

"काय संबंध? मी का भेटू त्या स्वार्थी मुलीला! अडलंय माझं खेटर! जिच्यामुळे निनाद कधीच माझा झाला नाही... जिच्यामुळे निनादचे स्वर कायमचे थांबलेत... तो फक्त निराशेच्या गर्तेत गेला नाही तर हे जग सोडून गेला त्या मुलीला मी भेटू?" नेहाच्या बोलण्यातून दिव्याबद्दल असलेला व्देष तर व्यक्त होत होताच पण गर्व देखील कुटून भरलेला होता तिच्या एकूण वागण्यात. मिलींदला काही क्षणापूर्वी पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं.

"बरोबर होता निनाद... अशा मुलीचं सौंदर्य बघून तो भाळला नाही यामागे या मुलीचा भयंकर ॲटीटयूड होता तर!" मिलींद मनातच विचार करत होता.

"काय बोलताय आपण हे... जरा विचार करून बोला! तुमची श्रीमंती... तुमचं ऐश्वर्य तुम्हाला कुणावरही असे आरोप करण्याची मुभा देतं नाही!" मिलींदने नेहाला खडसावलं.

"काय चुकीचं बोलले मी? तिने निनादला माझं होऊ दिलं नाही... नाहीतर आज तो आपल्यात असता. निनादचे बाबा आणि माझे बाबा फार जवळचे मित्र! आमचं दोघांच छान जमलं असतं. बरोबरीतलं असतं आमचं नातं. दिव्याने स्वतः देखील कुठे साथ दिली त्याची." नेहा.

"तिने निनादला सोडलं यामागे त्याचं भलं व्हावं हीच भावना होती तिची. मात्र निनादने तुम्हाला टाळलं यात तिचा काय दोष?" मिलींदने प्रश्न केला.

"दिव्या निनादच्या मनातून उतरावी म्हणून काय नाही केल मी!" नेहा.

"एकदा तरी स्वतः त्याच्या मनात घर करण्याचा मनापासून प्रयत्न केला असतास तर कदाचित... पण तिला मनातून उतरवताना स्वतः कोणत्या पातळीला गेलात आपण!" मिलींद.

"मी जे केलं ते माझ्या निनाद वरच्या प्रेमासाठी!" नेहा.

"हो पण म्हणून तो हे जग सोडून गेल्यावर देखील तुम्ही दिव्याला छळणं सोडलं नाही!" मिलींद.

"मी? काय केलं मी निनादच्या डेथ नंतर? तुमच्या लग्नात आले होते मी कारण निनादच्या आयुष्यातून दिव्या कायमची निघून जाते आहे हा आनंद माझ्यासाठी मोठा होता." नेहा.

"माझ्या लक्षात आहे अजूनही. तुम्ही दिव्याच्या कानात काहीतरी पुटपुटला होतात." मिलींद.


"तिच्या कानात मी हेच पुटपुटले होते की बाई खूप खूप आभार... निनादला सोडलंस!" नेहा.

"तुमच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे पण... मार्ग दिसत नाही दुसरा." मिलींद हताश झालेला होता.

"कोण असेल मग नेमकं?" मिलींद.

"मला ठाऊक आहे की ती व्यक्ती कोण आहे जिने दिव्याला निनादच्या मृत्यू बाबत चुकीच्या पद्धतीने सांगितलंच नाही तर दिव्याने निनादच्या मृत्यूसाठी स्वतःला जबाबदार धरावं म्हणून पूरेपूर प्रयत्न देखील केले!" नेहा.


"कोण... कोण आहे ती व्यक्ती?" मिलींद.

"मी का सांगू? तुमचं तुम्ही शोधा !" नेहा फारंच गर्वात होती.

तेवढ्यात मिलींदला दिव्याच्या तब्यतीबाबत घरून फोन आला आणि त्याला घरी निघून जावं लागलं.

"साहेब ताईंना फार चक्कर येतं होत्या आणि गरगरल्याने त्या पडल्या असत्या म्हणून मी त्यांना झोपवलं. सकाळ पासून काही खाल्लेलं नव्हतं त्यांनी म्हणून मी फोन केला तुम्हासनी." कामवाल्या काकूंनी सांगितलं.

"बरं केलंत काकू तुम्ही फोन केलात ते! डॉक्टरांकडे घेऊन जातो दिव्याला." मिलींद.

"साहेब लहान तोंडी मोठा घास पण ताईंना तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडं नेण्यापेक्षा गायनिक का काय म्हणतात त्यांच्याकडं घेऊन जा." काकू.

मिलींद दिव्याला गायनाकालॉजिस्टकडे घेऊन गेला आणि काकूंचा अंदाज खरा ठरला. घराला घरपण देणारा नवीन पाहुणा मिलींद-दिव्याच्या आयुष्यात येणार होता.