Login

प्रेयसी दान भाग १

आपल्या सच्चा प्रेमाचं दान करून प्रेयसीच्या सुखाखातर समर्पण वृत्ती जपणाऱ्या प्रियकराची एक अजरामर, रोमांचक आणि रहस्यमयी प्रेमकथा!

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा 

विषय      :-     रहस्यकथा

शीर्षक     :-     प्रेयसी दान- भाग १

          लग्नघर खरंतर नववधूच्या आगमनाने प्रसन्न होतं. नववधूच्या बांगड्यांची किणकिण... पैजणातील घुंगरांची खणखण... गोऱ्या गोऱ्या हातावर रंगलेल्या मेहंदीचा सुगंध आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची मधुर वाणी ज्यामुळे घराला नवं रूप येतं! पण नाटक अथवा सिनेमातलं प्रत्यक्षात सगळंच प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं असं नाही. कधीकधी आयुष्यात घडलेलं इतकं अद्भुत असतं की त्यावर सिनेमा... नाटक... काढलाच तर लेखकास प्रसिध्दी मिळाल्या खेरीज राहायची नाही. दिव्या आणि मिलींदच लग्न अशाच डोळे दिपून टाकणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न झालेलं होतं. दोन्ही कुटुंब तोलामोलाची आणि तेवढीच मनमिळावू देखील! त्यामुळे हौसेला मोल नव्हतं. मात्र लग्नाच्याच दिवशी आणि त्याच शुभ प्रसंगी असं काही तरी घडलं होतं ज्याचे पडसाद नवदाम्पत्याच्या वैवाहिक जीवनावर पडतील की काय या भितीने मित्र मंडळींनी घडलेली घटना दोघांपासून लपवून ठेवायची असे ठरविले.


"आपल्या मनाचा उपचार करणं... तो व्यवस्थित करवून घेणं खरंच इतकं सोप्प असतं का? आयुष्यातला एखादा प्रसंग... एखादा अनुभव.. एखादी व्यक्ती अथवा एखादं वळण स्मार्ट फोन मधल्या ट्रॅश सारखं सहज काढून टाकता आलं तर प्रत्येकाचं आयुष्य किती सुखकर होईल ना? नाही! नाही! कसलं सुखकर होतंय... उलट त्या ठराविक व्यक्ती आणि ठराविक प्रसंग मनातून जावूच नयेत असंच मनाला वाटत असतं...!" दिव्याचा स्वतःशीच चाललेला हा सततचा संवाद ऐकून मिलींद देखील काहीसा गोंधळून गेला होता.

          लग्नाच्या बंधनात बांधले जाण्यापूर्वी स्वतःचा भूतकाळ एखाद्या पुस्तकासारखा पूर्णपणे उकलून ठेवणारी दिव्या ही खरंतर मिलींदला काहीशी वेडीच वाटली होती. तिच्या सच्चेपणावर तो भाळला होता. अत्यंत सुंदर, हुशार मात्र तेवढीच निगर्वी दिव्या मिलींदला पहिल्या एक दोन भेटीतच आवडू लागली होती. मात्र जिच्या गुणी स्वभावामुळे ती पहिल्या भेटीत वेडी वाटली होती आज कालांतराने तीच दिव्या वेडी तर झाली नसेल ना या भितीने मिलींदची झोप उडाली होती...! ठरल्या प्रमाणे मिलींदच्या रजेचा जम बसला आणि फिरायला जाण्याचं निश्चित झालं. त्याला वाटलं वातावरण बदलेल आणि ठिकाणही बदलेल तर निश्चितच बायकोचं मन प्रसन्न होईल. पण कधीकधी कितीही ऋतू बदलले तरी आयुष्यातले दिवस पालटत नाहीत हेच खरं...! लग्नापूर्वी ठरल्याप्रमाणे आजही दोघांमधली स्पेस कायम होती. दिव्याच्या मनाची जोवर तयारी होत नाही तोवर पुढे जायचं नाही हे एक वचन मिलींदने दिव्या बरोबर स्वतःला देखील दिलेलं होतं आणि ते तो प्रामाणिकपणे पाळत देखील होताच...!

          दिवसेंदिवस दिव्या अत्यंत स्वमग्न होऊ लागली. "हॅलो! दिव्या कशी आहेस? काय म्हणतोय मिलींद! मजेत ना सगळ...!"

          मैत्रिणीचा आवाज ऐकताच दिव्या ओक्साबोक्शी रडायला लागली. "असं वाटतंय मी मिलींदचं आयुष्य देखील खराब करते आहे... माझ्यासोबत तो देखील थांबलाय कुठेतरी...! मी खोल गर्तेत ओढली जाते आहे आणि त्याची देखील फरफट होते आहे."

          मैत्रिणीसोबत बोलताना दिव्या फारच हळवी झाली होती. "नेमकी काय द्विधा आहे दिव्या? प्रेम करणारी... समजून घेणारी... व्यक्ती आयुष्यात जोडीदार म्हणून लाभणे हा केवळ दैवयोग नक्कीच नाही तर ते पूर्वजन्मीच संचित आहे... ते जप... प्रेमाचं रोपट बहरू देत...! भूतकाळ वर्तमानावर हावी झाला तर आयुष्यात काहीही उरणार नाही...!" स्वाती बोलत होती आणि दिव्याची नजर मात्र कुठून तरी येणारा आवाज चाचपटत होती. माणसाचं मन खरंच फार वेडं असतं. एकदा मनाने ठरविलं की डोळ्यांना तेच बघायचं असतं... कानांना तेच ऐकायचं असतं आणि देहाला तीच अनुभूती हवीशी वाटत असते...!

"स्वाती! ऐकते आहेस नं? ऐक... तेच स्वर... तोच आवाज! विसरली तर नाहीस ना तू? माझ्या तर मनातून मेंदूतून अजूनही तो स्वर गेलेला नाही."     

          दुपारची वेळ.. नीरव शांतता... कुठलाही आवाज अगदी लांबून देखील येत नसावा! अन दिव्याला चक्क गिटार सोबत निनादचा स्वर ऐकू येत होता...! निनादच्या आवाजात जादू होती पण दिव्याला अचानक असा भास होणं हे स्वातीसाठी धक्कादायक होतं.


"अगं स्वाती परवा निनाद भेटला होता...फार खालावलाय तो. अजिबात काळजी घेत नाही स्वतःची... तो स्वतःला जपेल या एका वचनावर मी हे लग्न केलं... त्याला सोडलं अन तो आता वेड्यागत वागतोय " निनादचे स्वर कानात गुंजणे मानसशास्त्रीय दृष्ट्या एक वेळ शक्य आहे परंतु तो दिव्याला भेटणे.. तिच्याशी बोलणे हे कसं शक्य आहे...!

          स्वाती विचारचक्रात गुरफटत असतानाच फोन कट झाला. हे नेमक काय होऊन बसलय? आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीचं आयुष्य नेमकं कुठे जातंय? आणि यातून तिला कसं बाहेर काढता येईल अशा एक ना दोन अनेक प्रश्नांनी स्वातीच्या मनात गोंधळ उडाला. पण मन गोंधळलं म्हणून मेंदूने विषय तिथेच अर्धवट सोडणे स्वातीला पसंत नव्हते. असं म्हणतात की संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र!


          स्वातीने लगेच मिलींदला फोन लावला. "काय साली साहिबा कशी काय आठवण आली आज आमची?" मनात विचारांचं कोलाहल माजलेलं असतानाही ते लपवत मिलींद स्वातीशी नेहमप्रमाणेच बोलत होता.


"भाऊजी! कसे आहात? तुम्ही लाख म्हणाल की मी मजेत पण मी समजू शकते... यातून मार्ग काढायला हवा." स्वाती दिव्यासाठी चिंतित होती.

"काय करावं काहीच कळत नाही. तासंतास दिव्या विचारात मग्न असते. अगदी आवडीचं देखील फारसं काही करण्यात रमत नाही. रोजची कामं काय ती कर्तव्य म्हणून पार पाडते. पण पूर्वीची हसरी आनंदी दिव्या कुठे हरवली कळत नाही. मन मोकळं बोलत नाही त्यामुळे मला अजूनच वाईट वाटतं स्वाती." मिलींद बऱ्याच कालावधी नंतर मन मोकळं करत होता.

"हो ना! अहो भाऊजी तिला निनादच्या स्वरांचा भास व्हायचा इतपत आपण समजू शकतो पण...." स्वाती बोलताना अचानक गप्प झाली.

"पण काय स्वाती बोल ना... काही विचित्र तर नाही ना घडलं? जे मला ठाऊक नाही??मी दिव्याच्या मनातलं जाणून घ्यायला फार आतुरलो आहे गं! तिच्या अबोल्याचा मला फार त्रास होतोय. निदान तुझ्याशी काही बोलली असेल तर सांग... बोल काही..." मिलींद अधिकच अस्वस्थ झाला.

          स्वाती शांत झाली. तिला अनेक विचारांनी ग्रासलं होतं. सर्व मित्र मंडळींनी मिळून ठरविलेलं होतं. अघटीत घटनेबद्दल दोघांना देखील बोलायचं नाही असं ठरलेलं असताना आज स्वाती "टू बी ऑर नॉट टू बी" या पेचात अडकलेली होती!


क्रमशः