आधीच्या भागात आपण पाहिले की,
राधे शहरात गेलेला होता. समीर आणि त्याची आई मीराला बघायला आले आणि त्यांचं लग्न पक्क झालं. आठ दिवसांनी मीराचं आणि लग्न समीरची झालं आणि तिची पाठवणी झाली. मीरा तिच्या सासरी गेली.
आता पुढे,
मीराने सांगितल्याप्रमाणे शामा राधेला भेटायला त्याच्या घरी गेली. सुदैवाने त्याची आई तेव्हा तिथे नव्हती. शामा त्याच्या घरी पोहोचली तेव्हा तो भिंतीला टेकून बसलेला होता. त्याच्या हातात पायल होती. शामा त्याच्याजवळ गेली.
“राधे राधे...” तिने त्याला आवाज दिला.
पण तो भानावर नव्हताच, तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला हलवलं..
“राधे..”
तेव्हा तो भानावर आला.
“शामा शामा तू इकडे कशी? तू इकडे का आली? माझी मीरा आली का? बोल ना. मला भेटायला बोलावले का तिने? थांब मी आत्ता तयार होतो आणि येतो घरी. आहे का ती? तिला का नाही आणलस? तू एकटीच का आलीस? तिला घेऊन यायचं होतं ना, तेवढा वेळ वाचला असता मी पटकन तयार होतो, मी पटकन तयार होतो मग आपण जाऊ.”
“राधे भानावर ये, राधे भानावर ये. राधे..” शामा जोरात ओरडली. तेव्हा राधे शांत झाला.
“मीराताई आलेली नाहीये तिने फोन केला होता आणि मला तुझ्याकडे पाठवले तू कसा आहेस ते बघायला. काय अवस्था केलीस एका दिवसात.”
राधे रडायला लागला, रडत रडत खाली बसला.
“मग काय करू? काय करू तू सांग ना शामा?. तुझी ताई तर मला सोडून गेली ना, गेली मला सोडून. माझं प्रेम.. माझं खुप प्रेम होते तिच्यावर.. तिचही माझ्यावर खूप प्रेम होतं आहे. मला माहितीये तिच्या मनाप्रमाणे नाही झालंय. आणि ती नेहमी माझ्यावरच प्रेम करेल मला हे ही माहिती आहे ती लग्नाला तयार नव्हती, जबरदस्तीने तिचं लग्न लावून दिले. मला सगळं माहिती आहे मी इथे असतो ना तर मी हे सगळे घडूच दिलं नसतं मी माझ्या मीराला जाऊच दिलं नसतं. मी माझ्या मीराला थांबवलं असतं.”
“प्रेम करतोस ना तिच्यावर मग लग्न का केलं नाहीस?”
“कसं लग्न करणार होतो, तुझ्या घरच्यांनी तिचा हात माझ्या हातात दिला असता का? मला नोकरी नाही, माझं घर हे असं.. दिलं असतं तुझ्या आई-बाबांनी तिचा हात माझ्या हातात.”
“प्रेम करायच्या आधी नाही कळलं तुला.”
शामाने टोमणा मारला.
“कळत होतं, सगळं कळत होतं पण नाही करू शकलो काही, प्रेम नाही वाचवू शकलो. गेली माझी मीरा मला सोडून आता मी तिला कधीच बघू शकणार नाही. माझी मीरा मला सोडून गेली.” असं म्हणून तो घरातून निघून गेला.
शामा तिच्या घरी परतली, काही वेळाने तिने मीराच्या सासूच्या मोबाईलवर फोन केला. फोन सासून उचलला.
“हॅलो.”
“हॅलो मी शामा बोलते, मीराताई आहे का?”
“हो ग, आहे ना थांब. मी तिला फोन देते.”
मीराच्या सासूने मीराच्या खोलीत तिला फोन नेऊन दिला. तिने फोन घेतला.
“हॅलो मीराताई शामा बोलते.”
“हा शामा बोल. आई आली का घरी?”
“आई अजून यायची आहे मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं बोलू शकते का?”
“हो हो बोल ना.”
“आजूबाजूला तुझी सासू आहे का?”
“नाही नाही बोल त्या गेल्या रूमच्या बाहेर.”
“ताई तू सांगितलं तसं मी राधेच्या घरी गेले होते.”
“मग काय झालं कसा आहे तो? काही बोलला का माझ्याबद्दल विचारलं का त्याने?”
“ताई त्याची अवस्था खूप खराब आहे, रडत बसला होता भानावर नव्हता. त्याच्या हातात पायल होती. त्या पायल कडे बघत बसलेला होता. मी जेव्हा गेले ना तेव्हा त्याला आवाज दिला तर त्याचं लक्ष नव्हतं. शेवटी मी त्याला हलवलं तेव्हा तो भानावर आला. म्हणाला माझी मीरा आली का? मीरा आली का माझी? तू तिला इकडे का घेऊन नाही आलीस. ताई तो खूप रडला ग, म्हणाला मी नव्हतो म्हणून माझ्या मीराचं लग्न लावून दिलं, मला माहिती आहे माझी मीरा तयार नव्हती लग्नाला, तिचं लग्न जबरदस्तीने लावून दिलय. माझी मीरा माझ्यावर खूप प्रेम करते, ताई तुमच्या दोघांचे एकमेकांवर इतकं प्रेम होतं तर का नाही लग्न केलं तुम्ही? ताई मला एका शब्दाने सांगितले नव्हतेस तू?”
“काय सांगणार होती ग, घरच्यांनी लग्न तरी लावून दिलं असतं का आमचं?”
“पण ताई तुमचं प्रेम?”
“आमचं प्रेम असच राहील, एकमेकांच्या मनात. आम्ही जरी एकमेकांच्या नजरेसमोर नसलो ना तरी एकमेकांच्या मनात सदैव राहू. मला माहितीये राधे मला कधीच विसरणार नाही आणि त्यालाही माहिती आहे मी त्याला कधीच विसरणार नाही. जरी मी त्याला दिसत नसले तरी मी सदैव त्याच्या मनात राहील. त्याच्या डोळ्यात राहील.”
“ताई धन्य आहेस ग तू, काय म्हणू मी आता तुला, इतक एकमेकांवर प्रेम करून सुद्धा तुम्ही एकमेकांचे होऊ शकला नाही. पण ताई समीर भाऊजींना सगळं माहिती आहे?”
“हो त्यांना मी सगळं सांगितलं होतं, पण तरी ते माझ्याशी लग्न करायला तयार झाले.”
“का ते कसे काय तयार झाले? नक्कीच काहीतरी असणार ताई तू स्वतःची काळजी घे. समोर जाऊन तुला त्रास देतील.”
“शामा असं काही होणार नाहीये फोन ठेव आता आपण बोलू नंतर.”
दोघींनी फोन ठेवला, मीरा त्यांच्या सासूच्या रूममध्ये गेली त्यांना फोन दिला आणि पुन्हा बाहेर आली. येऊन तिच्या खोलीत पलंगावर बसली. पायातली पायल बघितली आणि तिला त्याचे शब्द आठवले त्याने जेव्हा तिच्यासाठी पायल घेऊन आणली होती तेव्हा बोलला होता एक पायल माझ्याजवळ असू दे तू जर मला सोडून गेलीस तर तुझी आठवण म्हणून एक पायल माझ्याजवळ असायला नको का? असं म्हणून एक पायल राधेने त्याच्याजवळ ठेवलेली होती. राधेच्या तोंडचे शब्द खरे झाले आणि मीरा त्याला सोडून गेली.
संध्याकाळी समीर घरी आला, रूममध्ये आला तेव्हा मीरा खिडकीजवळ बसलेली होती.
“मीरा..” समीरने मीराला आवाज दिला.
“अहो आलात तुम्ही.”
तिने समीरची बॅग ठेवली.
“मी पाणी आणते.” असं म्हणत खोलीच्या बाहेर गेली. त्याच्यासाठी पाणी घेऊन आली, पाणी दिलं.
“तुम्ही काय घेणार कॉफी चहा? काय बनवू?”
“कॉफी चालेल.”
मीराने कॉफी बनवली त्याच्या हातात दिली आणि पुन्हा बाहेर जायला निघाली. तो समीरने आवाज दिला.
“मीरा बस ना थोडा वेळ, कुठे चाललीस?”
“स्वयंपाकाचं बघते.”
“अग नाही, काय स्वयंपाकाचा बघते? आहेत ना बाकीचे करणारे तू का चाललीस? बस थोडा वेळ इथे माझ्याजवळ.”
तिची इच्छा नसताना ती समीरच्या बाजूला जाऊन बसली.
“का असा चेहरा दिसतोय तुझा? सकाळपासून मला तू उदास वाटतेस. काय झालं घरची आठवण येते का? मला माहित आहे आज तुझा पहिला दिवस आहे ना तुला इथे अवघडल्यासारखं होत असेल. पण डोन्ट वरी इथे तुला कसलाही त्रास होणार नाही. काही चिंता करू नकोस.”
तिने चेहऱ्यावर खोटं हास्य आणलं.
“नाही, मी बरी आहे.” त्यांच्या दोघांचं बोलणं सुरू होतं तितक्यात मीराच्या सासुबाई खोलीत आल्या.
“समीर मीरा आत येऊ का?”
“आई अस विचारत जाऊ नकोस ग. तुझ्याच मुलाची खोली आहे येत जा तू बिनधास्त.”
आई हसली आणि आत आली. “समीर मी काय म्हणत होते मीरासाठी एक नवीन मोबाईल घेऊन आण, तिच्याजवळ मोबाईल नाही आहे तिला तिच्या घरच्यांची बोलायचं असलं तर बरं पडेल. एक मोबाईल घेऊन ये तिच्यासाठी.”
“हो आई, मी उद्या तिलाच घेऊन जातो आणि तिच्या आवडीचा मोबाईल घेऊन देतो. काय मग चालेल ना मीरा?”
मीराने फक्त होकारार्थी मान हलवली.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा