Login

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 11

Katha eka mirechi

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 11


आधीच्या भागात आपण पाहिले की,
मीरा लग्न होऊन सासरी आली, सासूने तिला समजावून सांगितलं, मीराला थोडं बरं वाटलं. मीराने सासूच्या मोबाईल वरून तिच्या घरी फोन केला, सासूबाईने समीरला नवीन मोबाईल घेऊन द्यायला सांगितलं.

आता पुढे,

दुसऱ्या दिवशी सकाळी समीर ऑफिसला जायच्या आधी मीराला मोबाईल शॉप मध्ये घेऊन गेला.
दुकानदाराला मोबाईल दाखवायला सांगितले.
दुकानदाराने सर्व रेंजचे मोबाईल दाखवले. समीरने एक सिलेक्ट केला आणि मीराच्या समोर ठेवला.

“मीरा बघ हा मोबाईल कसा वाटतो तुला? आवडला का?”

तिने आधी मोबाईलची किंमत बघितली आणि म्हणाली,

“अहो इतका महाग कशाला? आपण कमी किमतीचा घेऊया ना, मला फक्त बोलण्यापुरताच हवाय ना मग इतका महागडा कशाला घ्यायचा?” ती अडखळत बोलली.

“त्यात काय एवढं? घे तुला आवडला ना मग हाच घेऊयात.” समीरने तो मोबाईल सिलेक्ट केला, मोबाईल विकत घेतला आणि दोघेही निघाले.

समीरने मीराला घरी सोडलं आणि समीर ऑफिसला गेला. संध्याकाळी समीर आल्यानंतर आई त्यांच्या खोलीत आली,

“काय सुरू आहे आत येऊ का?”

“हो आई डायरेक्ट येत जा असं विचारत जाऊ नकोस.”

समीरची आई आत आली.

“मी तुमच्या दोघांसाठी सरप्राईज आणलंय.”
दोघांनी एकमेकाकडे आश्चर्याने बघितलं.
“काय सरप्राईज आहे.” समीरने विचारलं.
त्याच्या आईने त्याच्या हातात एक पॉकेट दिला.

“हे काय आहे?”

“उघडून तर बघ.”
समीरने ते पॉकेट उघडलं, त्याच्या आत दोन तिकीट होत्या.

“दोन तिकीट आहेत उटीचे.”

“तुम्ही दोघे उद्या सकाळी उटीला जाताय.”
“काय?” समीरने आश्चर्य व्यक्त केलं.

“अग आई तू काही सांगितलं नाहीस आणि असं अचानक, अगं माझं ऑफिस आहे तू आधी मला का नाही सांगितलंस मी ऑफिसमधून सुट्ट्या काढल्या असत्या अशा अचानक कसं काय होईल?”

“होईल रे, सगळ होईल. तुला सांगितलं असतं ना तर तू टाळाटाळ केली असती आणि मला आता टाळाटाळ नको होती म्हणून मी तुला न सांगता उटीच्या दोन तिकीट बुक केल्या आणि हो तिथलं हॉटेल वगैरे सगळं बुक करून झालंय. तुला तिथे काहीही जास्त करायची गरज नाही, तुम्ही फक्त तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या आणि एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना वेळ द्या. आता हेच दिवस असतात एकमेकांसोबत वेळ घालवण्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे नंतर एकदा कामाला लागलो आणि संसारात गुंतलो की नंतर फक्त काम आणि कामच असतं, बोलणं होत नाही की संवाद होत नाही आणि दुरावा वाढत जातो. तुमच्या दोघांच्या आयुष्यात मला हे सगळं नको आहे म्हणून हा सगळा अट्टाहास करते आहे, दोघेही बॅग पॅक करा आणि उद्या सकाळी निघा.”

काय ग मीरा आनंदित आहेस ना?” मीराने होकारार्थी मान हलवली.

समीरची आई त्यांच्या खोलीतून निघून गेली.

“मीरा आय एम सॉरी, तुला नाही नेता येणार मला, खरंच ग. तुला वाईट वाटलं नाही ना? पण मीरा मी काय म्हणतो तुला खरंच यायचं आहे का तुला जर यायचं नसेल ना तर मी तुझ्या गावाला सोडून देतो आणि मी जातो उटीला तिच्यासोबत.” तो अडखळत बोलला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. तो समोर काही बोलणार तितक्यात समीरची आई पुन्हा आत आली.

“काय रे काय गप्पा चालल्या आहेत, मी काय म्हणते उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, तुम्हाला डब्याला काही बनवून देऊ का? की रस्त्यात काही खाऊन घ्याल, नाही नाही बनवूनच देते जवळ असलं की कधी खायला बरं पडतं.”

“आई तू उगाच त्रास करून घेऊ नकोस गं आम्ही बघू, आता आम्ही लहान आहोत का आणि मीरा आहे ना हे सगळं बघायला. हो ना मीरा तू करशील ना सगळं.”

मीराने काहीही न बोलता फक्त मान हलवली.

“आणि हो मीरा तुझ्याकडे काही साड्या वगैरे नसतील तर माझ्याकडून घेऊन घे, मंदिरात वगैरे जायचं काम पडलं तर साडी नेस. बाकी वेळेस तुला जे कपडे घालायचे ते तू घालू शकतेस. तुझ्याकडे कपडे आहेत ना की नवीन घ्यायची गरज पडतील तर तेही घे, थंडीचे कपडे नसतील तर माझ्याकडे शॉल आहे स्वेटर आहे ते घेऊन जा. उगाच थंडीत कुडकुडत बसू नका.”

“हो आई आम्ही सगळं करतोय तु जा आता.”

“हो रे बाबा जाते.” असं म्हणत समीरची आई बाहेर गेली, समीरने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

“मीरा तुला चालेल ना मी तिच्यासोबत गेलेल?” खरं तर मीराला आनंद झाला होता की तिला बाहेर कुठेतरी जायला
मिळणार. तिचे डोळे पाणावलेले होते. काहीच उत्तर न देता ती स्तब्ध उभी होती.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all