Login

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 13

Katha eka mirechi

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 13


आधीच्या भागात आपण पाहिले की,

मीरा आणि समीर दोघेही उटीला फिरायला गेले, राधे काही खात पीत नव्हता, कुणाशी बोलत नव्हता. तो नदीजवळ एका झोपडीत राहायला गेला, शामाने त्याला समजावलं पण तो एकेना. समीरने मीरा जवळ राधेचा विषय काढला. मीराला रडायला आलं आणि तिथून उठून गेली.

आता पुढे,



त्यानंतर समीरने राधेचा विषय काढला नव्हता. दोघेही छान फिरले, दोघांनी उटीमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवला पण त्यांच्यात ते नातं निर्माण झालं नाही, कदाचित त्याला थोडा वेळ लागणार असेल.


दोघेही उटीवरून फिरून आले,


सासुबाईने जंगी स्वागत केलं, आता आपल्याला आनंदाची बातमी मिळेल म्हणून त्या मनोमन देवाचं आभार मानत होत्या.
दुसऱ्या दिवशीपासून समीरने ऑफिस जॉईन केलं. तो ऑफिसला गेल्यानंतर सासूबाईने मीरा जवळ विषय काढला.

“काय ग कसा झाला हनिमून?”
तिने फक्त स्मितहास्य केलं.
“अग सांग ना, तुमच्या दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली होती का?”

तिने नकारार्थी मान हलवली.
“काय सांगतेस, अग त्याने पुढाकार घेतला नसेल तर तू पुढाकार घ्यायचा ना, तू पहल करायची.”

मीरा शांत उभी होती ती काहीच बोलली नाही, सासूने तिला समजावलं आणि त्या तिथून निघून गेल्या.

रात्री बराच वेळ होऊन देखील समीर घरी परत आला नव्हता. समीरच्या आईला समीरची काळजी वाटत होती, ती मीराच्या खोलीत आली. मीराला विचारलं,


“काय ग मीरा समीरचा फोन आलेला होता का? काही बोलला का तो तुला? कुठे जाणार होता का?”

“नाही आई, ते मला काहीच बोलले नाहीत.”

“अगं मग कुठे गेला? काय गेला? फोन केलास का तू त्याला?”

“आई त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे मी लावला होता.”
“हे देवा भगवंता हा मुलगा असा न सांगता कुठे गेला? त्याचा फोनही लागत नाही, किती वेळ पर्यंत वाट बघायची याची.”

“आई तुम्ही काळजी करू नका ते सुरक्षित असतील, मित्राकडे वगैरे गेले असतील. ते आले की मी तुम्हाला कळवते. तुम्ही तुमच्या रूम मध्ये आराम करा.”

“कसा काय आराम करणार, याच्या काळजीने जीव जातोय माझा.”


“आई एक विचारू का?”

“हो हो विचार ना.”

“याआधी पण हे असे कधी उशिरा आलेले आहेत का घरी.”

“नाही ग या आधी कधीच असा उशिरा आला नाही तो, म्हणूनच मला काळजी वाटते. आता लग्न झालंय घरी आपली बायको आहे त्याने लवकर यायला नको का? बरं मी जाते तो आला की कळव मला.”

“हो आई कळवते मी.”

मीराची सासू खोलीतून निघून गेली, मीराला माहिती होतं ते त्यांच्या पहिल्या बायकोकडे गेले असतील म्हणून तिने तिची काळजी दाखवली नाही. बराच वेळ होऊन गेलेला होता समीरचा काहीच येण्याचा पत्ता नव्हता. आता तिलाही काळजी वाटायला लागली. हे खरच घरी येणार आहेत की नाही आणि येणार नसतील तर मी आईला काय सांगायचं.

समीरने मीरालाही फोन करून काहीही कळवलेले नव्हतं. रात्रभर समीर घरी आलेला नव्हता.

पहाटे पहाटे मीराची सासू उठून त्यांच्या खोलीत आली. खोलीचा दार ठोकला.

मीराने दार उघडला,

“काय ग किती वाजता आला समीर? सांगितलं नाहीस मला, कळवणार होतीस ना?”

मीराने खाली मान घातली.

“आई हे आलेलेच नाहीत.”

“काय? पहाट झाली तरी आला नाही, मला सांगितलं का नाहीस? फोन केलास का त्याला?”
“फोन लावला त्यांचा फोन लागत नव्हता बंदच दाखवतोय.”

“अग मग तू मला सांगायला हवं तसं आपण चौकशी केली असती. तो त्याच्या मित्राकडे तर गेला नसेल?”

“आई मला त्यांच्या कोणत्याच मित्रांचे नंबर माहिती नाही, मी तर त्यांना ओळखतही नाही.”

“अगं हो तू ओळखत नाहीस पण मला सांगायला होतच ना मी तर ओळखते. थांब मी एक दोन जणांना फोन लावून बघते आणि नाहीच काही झालं तर बघू आपण पुढे काहीतरी विचार करू.”

त्यांचं बोलणं सुरू असताना समीर तिथे आला,

“आई हे आलेत.”

“समीर कुठे होतास तू आणि रात्रभर बाहेर होता, असा कसा बाहेर होतास तू? तुझं लग्न झालंय तुला एक बायको आहे याचे भान तुला राहिलेलं नाही. कुठे होतास कुणासोबत होतास रात्रभर?”

“मला बसू दे आधी पाणी तरी पिऊ दे, मीरा पाणी आण माझ्यासाठी.” समीर

“हो आणते.”

समीर बसला,
“अग ऑफिसच्या कामात अडकलो होतो नाही येऊ शकलो.”

“असं कुठलं रे तुझं काम की तू रात्र रात्रभर तिथे राहिलास हे असं मला यापुढे चालणार नाही.”

क्रमश:

0

🎭 Series Post

View all