Login

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 16

Katha eka mirechi

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 16


आधीच्या भागात आपण पाहिले की,


मीराला दिवस गेले, तिच्या प्रेग्नंसीच्या बातमीने समीर आणि त्याच्या आईला खूप आनंद झाला. समीर तिची काळजी घेऊ लागला. त्याला मनोमन अपराधी वाटतं होतं, मी मीरा सोबत चुकीचं तर करत नाही आहे ना असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात गिरक्या घालत होते.

आता पुढे,
बघता बघता तीन महिने पूर्ण झाले, आता समीर मीराची जास्त काळजी घ्यायला लागला.
समीर आता त्याच्या पहिल्या पत्नीकडे कमी जात असे. जास्तीत जास्त वेळ तो मीरा सोबत घालवत होता. तिला काय हवे नको ते बघत होता.
ती वारंवार समीरला बोलवत होती, पण समीर तिला भेटायला जात नव्हता. दोघांमध्ये वाद वाढायला लागले, हळूहळू दुरावा निर्माण व्हायला लागला.

मीराला समीरच्या बोलण्यातून, वागण्यातून हळूहळू सगळं कळत होतं.

................................

राधेची तब्बेत ढासळली, त्याच्या आईने त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. डॉक्टरने उपचार सुरू केले, राधे बेशुद्धावस्थेत होता. त्याची आई त्याच्या बाजूला बसून रडत होती.

‘हे देवा भगवंता काय झालं माझ्या पोराला? जिच्या साठी हे सगळं करतोय ती तिकडे ऐशो आरामात राहत आहे आणि इकडे माझा पोरगा मर मर मरतोय.’
तिचं बोलणं सुरू असताना तिथे शामा आणि तिची आई कमला राधेला बघायला गेल्या.
कमलाने राधेच्या आईच्या खांद्यावर हात ठेवला.
तशी ती वळली,
“आलात तुम्ही काय करायला आलात? तुमची मुलगी माझ्या मुलाला मरणाच्या दारात टाकून गेली, आता काय तुम्ही तो मेला की जिवंत आहे हे बघायला आलात का?”
“अहो राधेची आई काय बोलताय तुम्ही?”
“काय खोटं बोलतेय..बघा ना माझ्या मुलाची अवस्था, काय करून ठेवलंय तुमच्या मुलीने..”
कमला काहीही न बोलता तिथून निघून गेली, शामा मात्र तिथेच उभी राहिली. तिने राधेच्या आईच्या खांद्यावर हात ठेवला.

“काकू शांत व्हा, राधेला काही होणार नाही, तो बरा होईल आणि राहिला आता प्रश्न माझ्या ताईचा तर तुम्हाला काय वाटतं तिथे राहून ती सुखी असेल? नाही जितकं तुमच्या राधेचं प्रेम आहे ना माझ्या मीराताईवर त्याच्या पेक्षा जास्त प्रेम मीराताई करते राधेवर. तो तर तिचा नाईलाज होता म्हणून तिला ते लग्न करावं लागलं. ती सुद्धा राधेला विसरू शकली नाहीये. तिच्या श्वासात फक्त राधे आहे.” एवढं बोलून शामा तिथून निघून गेली.

चोवीस तासानंतर राधे शुद्धीवर आला, डॉक्टरने त्याला घरी घेऊन जायला सांगितलं. राधेची आई त्याला घेऊन घरी जायला निघाली. दवाखान्याच्या बाहेर येताच राधेचे पावलं तिथेच थांबले. त्याने त्याचा हात तिच्या हातातून सोडवला आणि तो त्याच्या दिशेने जायला लागला. मागेहुन त्याच्या आईने आवाज दिला,

“राधे राधे कुठे चाललास थांब.”

राधेची आई त्याच्या मागे गेली, त्याचा हात पकडला,

“कुठे चाललास तू आपलं घर इकडे आहे.” त्याने फक्त नकारार्थी मान हलवली. पुन्हा हात सोडला तिचा आणि निघाला.
राधे चालत चालत त्याच्याच ठिकाणी गेला, जिथे तो मीरा गेली तेव्हा पासून राहत होता. राधेची आई त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून रडत राहिली, त्याला आवाज देत राहिली पण तिची हाक त्याच्या कानापर्यंत पोहोचलीच नव्हती.

...............................

मीरा बेडरूम मध्ये झोपली होती, समीर ऑफिस मधून आला. तिला आवाज दिला.
“मीरा.”
“अहो आज तुम्ही लवकर आलात.”

“हो, हे बघ आपण बाहेर जाऊयात.”
“असं अचानक, पण कुठे ?”

“बाहेर जेवण करायला जाऊयात, तुझ्या आवडीचे पदार्थ खाऊयात.”

“अहो पण असं अचानक, आईला सांगितलेलं नाहीये आणि घरी स्वयंपाकही तयार आहे.”

“सो व्हॉट मीरा? आईला सांगू आपण आणि आईला वाटल तर आई आपल्या सोबत येईल आणि राहता राहिला प्रश्न स्वयंपाकाचा ठीक आहे ना ते आहेत वर्कर ते खाऊन घेतील, मी आईला सांगून येतो तोवर तू तयार रहा मी आलोच दोन मिनिटात.” असं म्हणून समीर खोलीतून बाहेर गेला.

तो त्याच्या आईच्या खोलीत गेला,

“आई लवकर तयार हो आपल्याला बाहेर जायचंय. आज मी बाहेर जाण्याचा प्लान तयार केलाय आपण बाहेर थोड्यावेळ शॉपिंग करूया मग डिनर करूया आणि मग घरी परत येऊया. खरंतर माझा अजून एक दोन प्लॅन्स होते पण तुला ते झेपणार नाही म्हणून सध्या एवढंच.”

“असं अचानक?”

“हो अचानक काय ग आई चांगलं केलं तरी बोलायचं नाही केलं तरी बोलायचं तुझं नेहमीच असतं, चल लवकर तयार होऊन ये, मी मीराला सांगून आलोय तीही तयार होतेय.” असं म्हणून तो तिच्या खोलीतून निघून गेला.

क्रमश:

0

🎭 Series Post

View all