Login

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 17

Katha eka mirechi


❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 17
आधीच्या भागात आपण पाहिले की,

राधेची अवस्था खूप खराब झाली होती, त्याला दवाखान्यात ऍडमिट केलेले होतं, बरा झाल्यानंतर तो घरी न जाता पुन्हा त्याच्याच ठिकाणी गेला. इकडे समीर ऑफिस मधून लवकर आला. आज त्याने बाहेर जाण्याचा प्लान बनवलेला होता.

आता पुढे,

“मीरा तयार हो ग लवकर, किती वेळ? आईला सांगून आलो, आई तयार होतेय. चल.. चल लवकर लवकर जाऊया जास्त उशीर करायला नको.” समीर फ्रेश होता होता बोलत होता. तो तयार झाला मीराही तयार झाली. दोघेही हॉलमध्ये येऊन बसले.

“आई झालं का तुझं? ये लवकर.”

“हो रे आलीच आहे.”

तिघेही बाहेर निघाले,

“मीरा तू तुझ्यासाठी पाणी घेतलेस का? हे बघ बाहेरचं थंड पाणी पिऊ नकोस. घरचं बॉईल वॉटर घे तुझ्यासाठी.” समीरने तिला बजावून सांगितल.

“हो हो घेतले.”

तिघेही बोलता-बोलता गाडीत बसले, आणि हॉटेलमध्ये गेले.

तिथे तिघेही बसलेले असताना अचानक समीरचं लक्ष बाजूच्या टेबलवर गेलं. बाजूच्या टेबलवर त्याची पहिली बायको बसलेली होती. ती ही एका दुसऱ्या पुरुषासोबत हे बघून समीरला धक्काच बसला.

समीर तिच्याकडे बघतच राहिला, काही वेळाने तिचंही लक्ष त्याच्याकडे गेलं. तो आपल्याकडे बघत आहे तिच्या लक्षात आल्यानंतर ती वॉशरूमचा बहाना करून तिथून उठून गेली, त्यानंतर तिने तिच्याबरोबर बसलेल्या पुरुषाला फोन करून बाहेर बोलावलं आणि दोघे तिथून निघून गेले. समीर ज्या पद्धतीने तिच्याकडे बघत होता त्यावरून मीराच्या सगळं लक्षात आलं, तिने फक्त समीरला डोळ्याने इशारा करून आधार दिला.

समीरचं आता कशातच लक्ष लागत नव्हतं, त्याचं खाण्यातही लक्ष नव्हतं, आई त्याच्याशी बोलत होती पण तो त्याच्याच विचारात गुंतलेला होता.

‘ही माझ्याशी अशी कशी काय वागू शकते, लग्न माझ्याशी करते आणि फिरते दुसऱ्याशी. नाही नाही मला बोलावच लागेल. मी तिच्याजवळ जात नाहीये, तिच्याकडे राहायला जात नाही याचा अर्थ असा नाहीये की तिने कोणत्याही पुरुषासोबत फिरावं आणि कोणत्याही पुरुषाला आपल्या सोबत झोपावं हे चुकीच आहे. मी मीराशी लग्न केलं ते फक्त बाळासाठी. माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून मी तिला सोडलं नाही नाहीतर मी तिला सोडून दुसऱ्याशी लग्न करू शकलो असतो पण मी असं काही केलं नाही. मग तिने असं का वागावं मला तिच्याशी बोलणं गरजेचं आहे.’ समीर मनातल्या मनात विचार करू लागला.

जेवण झाली, फिरणं झालं नंतर तिघेही घरी गेले, समीरला रात्रभर झोप लागली नव्हती. सतत तिचे विचार डोक्यात सुरू होते. ती अशी का वागली हाच विचार मनात घोळत होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला न जाता तो सरळ तिच्याकडे गेला. तिला या सगळ्याचा जाब विचारला. आधी तर ती खोटं बोलली पण पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर तिने सगळं खरं खरं सांगितलं. समीर तिच्याकडे जात नव्हता तिला वेळ देऊ शकत नव्हता आणि तिला तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज होती आणि म्हणून तिने हे पाऊल उचललं. ती स्पष्टपणे बोलली. समीरच्या पायाखालची जमीनचं सरकली. त्याने असा कधीच विचार केलेला नव्हता. त्याच्या मनात फक्त ती आणि तीच होती. मीरा सोबत तर त्याने फक्त बाळासाठी लग्न केल होतं, त्यातही त्याचा काही स्वार्थ नव्हता तो सगळं त्याच्या पहिल्या बायकोसाठीच करत होता. पण तिने याची जाणीव ठेवली नव्हती. समीर तसाच घरी आला हताश होऊन सोफ्यावर बसला. मीराच्या लक्षात आलं.

मीराने विचारलं,
“काय झालं? अहो आज इतक्या लवकर कसे काय आलात?”
“काही नाही.” अस म्हणून तो खोलीत गेला.

मीराही त्याच्या मागे मागे गेली,
“बोला ना, अहो काय झालं? कुणी काय बोललं का तुम्हाला? कुठे गेला होतात? हे बघा तुम्ही मला काही सांगणार नाही तोपर्यंत मला काहीच कळणार नाही आणि मग माझी अस्वस्थता वाढत जाईल, प्लिज काय झालं सांगा ना.

मीराने इतका आग्रह केल्यानंतर समीर त्याच्या जागेवरून उठला आणि त्याने मीराला घट्ट मिठी मारली.

मीराला खूप आश्चर्य वाटलं, काय झालं असेल.

तिनेही त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
समीरच्या डोळ्यातून अश्रू निघाले, मीराला जाणवलं, तिने लगेच त्याला दूर करून समोर चेहरा करून विचारलं.
“अहो रडताय तूम्ही? काय झालंय.”
समीरने घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला, मीराला काय बोलावं कळेना. तिने त्याला बसवलं, त्याच्या समोर स्वतः बसली,त्याच्या हातात हात घेतला,
“अहो, सगळं नीट होईल. काळजी करू नका.”
तिने त्याला धीर दिला.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all