Login

प्रीत नव्याने बहरली...भाग 60

Love story
प्रीत नव्याने बहरली...भाग 60


सानिकाच्या बाबांनी सौरभची येण्याची व्यवस्था केली.
एक ते दीड महिन्यानंतर सौरभ त्याच्या घरी परतला. त्याला बघून त्याच्या आईचा आनंद गगनात मावेना झाला.

तिने त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या चेहऱ्याचे मुके घेऊ लागली, तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळत होते. तिला खूप खूप आनंद झालेला होता.

तिने लगेच सानिकाला फोन केला आणि तिलाही आनंदाची बातमी दिली, सानिकाला खूप खूप आनंद झाला.

पण काही क्षणातच तिच्या आनंदावर विर्जन पडलं. कारण सौरभला कुठल्याच गोष्टीची जाणीव नव्हती.
तो आईजवळ आल्याचा आनंद देखील त्याला झालेला नव्हता, मुळात तो आई जवळ आलाय याची जाण त्याला नव्हतीच.

सौरभच्या आईला खूप दुःख झालं. ती ताबडतोब सानिकाच्या सासरी तिला भेटायला गेली.

ती जेव्हा तिथे गेली तेव्हा घरी सगळेच होते.
त्यांना बघून सानिकाला धक्काच बसला. त्यांचा तो रडवेला चेहरा बघून ती लगेच उठून त्यांच्या जवळ गेली.

"काकू काय झालं? तुम्ही अश्या रडताय का?" असं त्यांना विचारल्यानंतर त्या अधिकच रडायला लागल्या.

"या या तुम्ही बसा इथे." सानिकाने त्यांना बसवलं आणि ती पाणी आणायला गेली.

"तुम्ही पाणी घ्या आधी आणि शांत व्हा."

त्या पाणी प्यायल्या.

"काकू आता सांगा काय झालंय? सौरभ बरा आहे ना आणि तो आलाय म्हणून तुम्ही खूप आनंदात होतात मग आता काय झालं?"

सौरभच्या आईने सानिकाला सगळं सांगितलं.

सानिकाच्या घरचे सगळे त्या दोघींकडे बघत होते पण त्यांना काय सुरू आहे काहीच कळत नव्हतं. त्यांचं दोघींचं बोलून झाल्यानंतर सानिका अंशुमन जवळ गेली.


"मला एक हेल्प हवी होती, प्लिज मदत करशील?"


"हो बोल ना काय झालं?"

"त्यांचा मुलगा तो मेंटली डिस्टर्ब झालाय त्याला कदाचित ट्रीटमेंटची गरज आहे. मला असं वाटतं की तू चांगला डॉक्टर शोधून त्यांना मदत करावी, एवढी मदत करशील प्लिज?"


"हो करेल ना, त्यात काय? पण कोण आहे काय करतोय कुठे राहतोय मला काहीच माहित नाही."


"मी तुला सगळं सांगेल पण प्लिज आता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. ते खूप गरजेचं आहे, तू चल माझ्यासोबत प्लिज."


"हो हो चल ना."

अंशुमन, सानिका आणि सौरभची आई तिघेही सौरभच्या घरी गेले.


सौरभ बेड बसून एकटाच बोलत होता.

त्याची अवस्था बघून सानिकाचे पाय थबकले, ती दारातच उभी राहिली.
डोळ्यांमध्ये अश्रूंनी गर्दी केलेली होती.
अंशुमनच्या हातातील हात सुटला, तसं त्याने वळून बघितलं.
त्याला तिच्या चेहऱ्यावरचे भाव दिसले.

"सानिका काय झालं?"

ती स्तब्ध उभी होती, डोळे फक्त सौरभच्या वाटेवर होते.

"सानिका आत येतेस ना?" त्याने तिला हलवलं.

"हो..हो येते ना." ती अडखडली.

ती हळूच बेडवर सौरभच्या बाजूला जाऊन बसली. ती त्याच्याकडे चेहऱ्याकडे निरखून बघत होती. त्याच्याकडे बघून आता तिला रडायलाचं आलं आणि तीने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. एक दीर्घ श्वास घेतला.


"काय अवस्था करून ठेवली आहेस रे सौरभ? हे सगळं माझ्यामुळे झालंय. सगळं माझ्यामुळे घडलं. तुझ्या या परिस्थितीला मी जबाबदार आहे. मला माफ कर सौरभ, मला माफ कर." ती मनातल्या मनात बोलत होती.

"सानिका आपण याला घेऊन जाऊया." अंशुमनने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

"हम्म."

अंशुमन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्याची ट्रीटमेंट सुरू झाली.

डॉक्टरांनी काही मेडिसिन लिहून दिली, पेशंटला आराम वाटला तर मेडिसिन सुरू ठेऊ अन्यथा त्याला ऍडमिट करावं लागेल.

सौरभला घरी आणलं. त्याची आई त्याची काळजी घेऊ लागली.

अंशुमन आणि सानिका घरी आले.

अंशुमनने सानिकाला विचारलं.

"सानिका कोण आहे हा सौरभ?"

सानिका गप्प होती.

"सानिका सौरभ कोण आहे? हा तोच तर नाही ना? सानिका मी तुला शेवटचं विचारतोय?" अंशुमनचा आवाज चढला.

सानिका घाबरली आणि तिने होकारार्थी मान हलवली.

"तू मला का बोलली नाहीस?"

"अंशुमन तुला आठवतंय एकदा बोलता बोलता मी तुझ्याजवळ विषय काढला होता, पण सगळं सांगायची हिंमत झाली नाही, मला तुझ्यापासून काहीच लपवायचं नव्हतं. पण मला तुला दुखवायचं नव्हतं, तू इतका प्रेम करतोस माझ्यावर हे बघून माझं मन सांगायला तयार होत नव्हतं."

"पण आज तर दुखावलंस?"

"मला माफ कर अंशुमन, आय एक्सट्रेमली सॉरी."
तिने त्याचा हात हातात घेतला तसा त्याने तिचा हात झटकला आणि तो खोलीतून निघून गेला.


"अंशुमन प्लिज माझं ऐकून घे ना, अरे तू ऐकलंस ते तेवढंच नाही आहे, पूर्ण ऐकून तरी घे ना."

सानिका जमिनीवर बसून रडायला लागली.