प्रीत नव्याने बहरली...भाग 56
सानिकाने साक्षीला फोन केला, सानिका खूप घाबरलेली होती, साक्षीने तिला समजावंल.
"सानू तू आधी शांत हो. संध्याकाळी आपण भेटू आणि मग ठरवू काय करायचं ते तोवर तू शांत रहा."
संध्याकाळी साक्षी सानिकाच्या घरी गेली, सानिकाची सासू हॉलमध्ये बसलेली होती, साक्षी आत गेली.
"नमस्कार काकू, सानिका आहे का?"
"तू सानिकाची मैत्रीण ना ग?"
"हो हो."
"सानिका आत्ताच ऑफिसमधून आली, फ्रेश होत असेल ये तू बस."
त्यांनी तिला तिच्याजवळ येऊन बसायला सांगितलं. साक्षी त्यांच्याजवळ जाऊन बसली.
"काय मग कसं चाललंय तुझं?"
"मस्त सर्व ठीक."
"काय मग लग्नाचा विचार आहे की नाही?"
"हो म्हणजे घरचे विचार करतायेत, माझं असं काही नाही."
"हो ना बाकी सगळं ठीक चाललंय."
"हो, काकू मी जाऊ का सानिकाला भेटायला तिच्या रूममध्ये."
"अगं हो थोडावेळ थांब म्हणजे अंशुमन आलाय ना तर तोही तिथेच आहे, त्यामुळे."
"हो हो चालेल मी वाट बघते थोडा वेळ."
साक्षी आणि सानिकाच्या सासू मध्ये गप्पा झाल्या. साक्षीचा चहा नाश्ता झाला. काही वेळाने अंशुमन खाली उतरला.
"अरे साक्षी तू कधी आलीस?"
"अर्धा एक तास झाला, सानिकाशी थोडं बोलायचं होतं तिला भेटायचं होतं म्हणून आले होते."
थोड्यावेळ त्यांच्या गप्पा झाल्या. नंतर साक्षी सानिकाच्या रूममध्ये गेली.
"सानू."
"साक्षी आलीस तू? अग कधीची वाट बघतेय."
"बराच वेळ झाला येऊन, सासुबाईंनी बसवून ठेवलेलं होतं, अंशुमन खोलीत होता ना म्हणून."
"कॉल करायचा ना मला, त्याला लवकर खाली पाठवलं असतं."
"बोल काय म्हणतेस?"
"काय करू मला काहीच कळत नाहीये, त्या माणसाने मला फोन केलेला होता, मेसेज केलेले होते. काय उत्तर देऊ मी?"
"हे बघ तू काही उत्तर देऊ नकोस, यानंतर जर त्याचा कॉल आला किंवा मेसेज आला तर त्याला सांग. याचा माझ्याशी काहीही संबंध नाहीये. मी आता काहीही करू शकणार नाही."
"अगं पण आता.."
"पण बिन काही करू नकोस, हे बघ तू या प्रकरणात खोलात गेलीस ना तर गोष्टी चिघळतील आणि त्याचा त्रास तुला आणि अंशुमनला होईल. त्याला काही माहिती नाहीये आणि सगळे त्याला जर कळलं तर त्याला किती त्रास होईल."
"मी पण हाच विचार करत होते, मला काही कळत नाहीये."
"यानंतर त्याचा मेसेज आला किंवा फोन आला तर डायरेक्ट सांग मी काही करू शकत नाही. माझी तुम्हाला काही मदत होणार नाही आणि मी तिकडे येऊ शकत नाही. तुम्ही प्लिज मला कॉल करू नका किंवा मेसेज करू नका. असे त्याला मेसेज टाक आणि त्याचे चॅट डिलीट कर सो सिम्पल."
सानिकाच्या डोळ्यात पाणी होतं,
"सानू का इतकी इमोशनल होतीयेस?"
"बोलायला सगळं किती सोपं वाटतं ना? पण करायला किती अवघड आहे. हे सगळं करताना असं वाटतं की माझ्या मनावर खूप मोठे ओझं आहे. मला अंशुमनला त्रास द्यायचा नाहीये आणि सौरभचे आयुष्य खराब करायचं नाहीये. तो माणूस सांगत होता त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे."
"रडू नकोस तू सांग तुला काय वाटतं? काय करावं तुझ्या बाबांना सांगून आपण त्याला इकडे आणायचं का?"
"कसं शक्य आहे माझं लग्न अंशुमनशी व्हावं म्हणून तर बाबांनी हा सगळा घाट घातला होता ना."
"तू सांग ना बाबांना आता अंशुमनशी माझं लग्न झालंय, माझा सौरभशी काहीही संबंध नाही आहे पण त्याची तिथे तब्येत खराब झाली आहे तर तुम्ही त्याला इकडे बोलवून घ्या. तो त्याच्या आई सोबत इथे राहील, त्याची आई त्याची काळजी घेईल. तिथे त्याची काळजी घेणार कुणीही नाही तू बोल ना तुझ्या बाबांशी स्पष्ट बोल."
"बाबा तयार होणार नाहीत."
"एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तू आजीशी बोल आजी बाबांशी बोलून बघेल. कदाचित ते तयार होतील."
"आजीला सांगुन बघते प्रयत्न करते. आता पुन्हा जर त्याचा कॉल मेसेज आला ना तरच मी आजीशी बोलेल नाहीतर मग नाही. माझ्यामुळे त्याला खूप त्रास झाला गं. माझ्यामुळे त्याचं आयुष्य खराब झालं. आमच्याकडे घरी येऊन खूप काही बोल बोलून गेली त्याची आई..आईची तळमळ अजून काय?"
साक्षीने सानूला जवळ घेतलं, तिचं डोकं स्वतःच्या खांद्यावर ठेवलं आणि तिच्या डोक्यावर हात फिरवला.
"नको करू इतकी काळजी, सगळ ठीक होईल. खरच सगळ नीट होईल."
दारामागे उभे असलेल्या त्या व्यक्तीच्या कानावर ही सगळं पडलं, हे सगळे ऐकून त्याला धक्काच बसला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा