प्रीत नव्याने बहरली...भाग 55
अंशुमनने तिला बसवलं आणि तो तिच्यासाठी कॉफी आणायला गेला, त्याने तिला आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी बनवली आणि रूममध्ये आला. बघतो तर काय सानिका रूम मध्ये नव्हती.
त्याने हातातला ट्रे टिपायवर ठेवला आणि तो तिला बघायला बाल्कनीत गेला, सानिका तिथे नव्हती.
"सानिका..सानिका.. कुठे आहेस तू? सानिका."
तो तिला आवाज द्यायला लागला, रूम मधून बाहेर निघत हॉलमध्ये, किचनमध्ये, सगळीकडे बघितलं पण सानिका कुठेच नव्हती. त्यानंतर तो तिला शोधत शोधत टेरिसवर गेला. सानिका तिथे पायऱ्यांवर बसलेली होती. तिच्याकडे बघून तिला हुश्श झालं.
तो तिच्याजवळ गेला,
"सानिका काय ग कधीचा शोधतोय मी? कधीचा आवाज देतोय तुला आणि तू इथे येऊन का बसलीस? मी कॉफी आणायला गेलो होतो ना तुझ्यासाठी. कॉफी घेऊन आलो बघतो तर काय तू खोलीत नाही आहेस. काय झालं इथे येऊन का बसलीस आणि अशी का बसलीस तू? बोल ना काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? तू अस्वस्थ का दिसतीयेस? तुझ्या मनात काही असेल तर बोल ग."
"काही नाही."
"काही नाही काय काही नाही, चेहऱ्यावर सगळं दिसतंय काय झालं सांग मला नीट."
"ऍक्च्युली माझा एक क्लासमेट आहे त्याची तब्येत जरा गंभीर होती त्याचाच विचार करत बसले होते."
"का काय झालं त्याला?"
"काही नाही एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ती त्याला सोडून निघून गेली, सो त्याचा धक्का म्हणून तो वेड्यासारखा वागतोय. स्वतःचे हाल करून घेततर त्याने."
"त्याला सोडून गेली? दोघांचे प्रेम होतं ना एकमेकांवर मग साथ द्यायची ना? प्रेम केलं ना त्यांनी मग साथ नको का द्यायला."
"कधी कधी परिस्थिती अशी असते ना की मनात असूनही आपण काहीच करू शकत नाही. सगळं आपल्या मनाच्या विरुद्ध घडत जातं, त्यांच्या बाबतीत तेच झालं असावं."
"अग पण ती अशी कशी गेली आणि त्याने जाऊ कसे दिले तिला?"
"तो जवळ असताना तिच्या तर तिला जाऊचं दिलं नसतं. तो खूप लांब होता तिच्यापासून खूप दूर होता. त्याला कळलं की ती त्याला सोडून गेली, त्याला धक्काच बसला.
"तो वाट बघतोय तिची, एकदा तरी तिने भेटायला यावं अशी इच्छा आहे त्याची."
"मग जावं ना तिने त्याला एकदा तरी भेटायला."
"कशी जाणार? लग्न झालंय तिचं आता. नवऱ्याला न सांगता परपुरुषाला भेटणं योग्य आहे का?"
"अगं पण प्रेम आहे ना?"
"प्रेम होतं, लग्न झालेल्या मुलीसाठी तिचा नवरा सगळं काही असतो."
"असो ते त्यांचं बघतील. चल तू खाली, इथे अशी बसून राहू नकोस आणि स्वतःचा मूड खराब करू नको."
अंशुमन सानिकाला खाली घेऊन आला.
त्याने तिला रूममध्ये नेऊन बेडवर बसवलं,
"तू बस इथे मी दुसरी कॉफी बनवतो."
तो गेला कॉफी बनवून घेऊन आला, सानिका शांत बसलेली होती.
"सानू कॉफी घे, सानू प्लिज यार कॉफी घे, दुसऱ्यासाठी तू तुझा मूड का खराब करतेस?"
तिने त्याच्या हातातून कॉफीचा मग घेतला, एक घोट घेतला.
"कशी झाली?"
"कॉफी छान झाली आहे."
"मला बरं वाटावं म्हणून म्हणते आहेस की खरंच छान झाली आहे?"
"खरं छान झाली आहे, मला जशी कॉफी हवी असते ना अगदी तशीच आहे. कधी कधी तर मलाही अशी कॉफी जमत नाही. घरी तर मला कमलाचं बनवून द्यायची."
"हो आणि आता इथे मी बनवून देत जाईल."
"नाही मी शिकणार आहे."
"ठीक आहे ना मी शिकवेन तुला, चल आता पटापट कॉफी संपव आणि झोपायला हो खूप उशीर झालाय."
दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसला गेले, ऑफिसच्या कामांमध्ये सानिकाचं मन रमलं, तिला सौरभची आठवण देखील आली नाही. काम आवरून ती बसली होती की तिच्या मोबाईलवर मेसेज आला.
"तुम्ही येताय ना सौरभला भेटायला?" तिने मेसेज वाचला आणि ती पुन्हा अस्वस्थ झाली.
तिने लगेच साक्षीला फोन केला, तिला फोनवर सगळं सांगितलं आणि
"तो मला फोन करतोय, मेसेज करतोय मी काय करू? अंशुमनला सांगून मला त्याला त्रास द्यायचा नाही आहे. तो माझी खूप काळजी घेतो, मी त्याला हे सगळं सांगितलं आणि तो कसा रिऍक्ट करेल मला काहीच माहित नाही, मी त्याला सांगणार होते मी सगळं ठरवलं होतं पण नाही सांगू शकले ग."
"सानू तू आधी शांत हो. संध्याकाळी आपण भेटू आणि मग ठरवू काय करायचं ते तोवर तू शांत रहा."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा