Login

प्रीत उमलताना.... भाग१४

विकासला जाणवू लागलंय स्वप्नालीच महत्व. आतातरी विकास पुढच पाऊल टाकणार का?
मागच्या भागात आपण पाहिलं विकास आणि स्वप्नालीच्या नात्यात रंग भरू लागलेत. पण भूतकाळाच्या ओझ्याने विकास पुढच पाऊल टाकू शकत नाहीये. आता पुढे काय होणार? आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि मला फॉलो करायला विसरू नका.
ऑफिसवरून विकास घरी आला तेव्हा त्याला एक आश्चर्याचा धक्काच बसला. विकासाची आई आज स्वतः बेडरूममधून बाहेर येऊन बसली होती. आईच्या तब्बेतीत झालेली सुधारणा स्वप्नालीमुळेच झाली होती हे त्याला माहीत होते. गेल्या तीन महिन्यांपासून स्वप्नाली आठवड्यातून किमान दोन तीन वेळा विकासच्या घरी जाऊन त्याच्या आईशी गप्पा मारत असे. त्या गप्पांतून जाणवणाऱ्या सकारात्मक ऊर्जेने विकासच्या आईची मानसिक स्थिती बरीच सुधारू लागली होती.
विकासने स्वतःसाठी आणि आईसाठी जेवण बनवले आणि ते दोघे जेवण करत असताना विकासाची आई विकासला म्हणाली “बरेच दिवस झाले स्वप्नाली आली नाही रे. ती आली की जरा बरे वाटते. मन उभारी घेऊ लागते. तिच्या येण्याची सवय होऊ लागली आहे आता. त्यामुळे ती आली नाही तर चुकल्याचुकल्यासारख वाटत.” त्यावर विकास म्हणाला “काय माहित आई दोन दिवस ती ऑफिसला पण आली नाही. तिला मेसेज केला फोन केला पण काही रिप्लाय नाही.” हे ऐकताच विकासच्या आईचा चेहरा गंभीर झाला.आईच्या चेहऱ्यावर झालेला बदल विकासने लगेच ओळखला आणि तिला धीर देत तो म्हणाला “ आई इतकी काळजी करू नकोस.” ते ऐकताच विकासची आई गंभीरपणे म्हणाली “विकास चांगली आणि निर्मळ मनाची माणसं आयुष्यात नेहमी येत नाहीत. त्यामुळे एकदा का अशी माणसं आयुष्यात आली की त्यांना जिवापाड जपायच असतं.” एवढ बोलून विकासची आई तिच्या खोलीत गेली.
विकासने त्याचे जेवण संपवले आणि सगळ्या गोष्टी आवरून तोदेखील आपल्या खोलीत आला. त्याने अंथरूणात पाठ टेकवली तरी त्याच्या मनात मघाशी आईने बोललेले वाक्य घुमत होतं ‘चांगली माणसं आयुष्यात आली की त्यांना जिवापाड जपायच असतं’ विकासने त्याचा फोन हातात घेतला आणि त्याने पाहिलं स्वप्नालीचा मेसेज आला होता. “ हॅलो विकास, मला डेंग्यू झाला आहे. कालपासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आज बर वाटत होतं म्हणून फोन हातात घेतला तर तुमचे मेसेज आणि मिस कॉल दिसले. खर सांगू का विकास खूप बर वाटलं तुम्हाला माझी काळजी आहे हे पाहून. खरंच विकास Missing you…” विकासला स्वप्नालीचा मेसेज वाचल्यानंतर हायस वाटलं. आणि उद्या स्वप्नालीला भेटायला जायचं असं मनाशी ठरवून तो झोपला.
विकास दुसऱ्या दिवशी ऑफिसला पोहचताच मयुरी विकासजवळ आली आणि म्हणाली “सर स्वप्नाली हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. तिला डेंग्यू झाला आहे.” ते ऐकताच विकास म्हणाला “ हो काल रात्री तिचा मला मेसेज आला होता. मी आज तिला भेटायला जायचं असा विचार करत आहे.” त्यावर मयुरी म्हणाली “मग सर आपण एकत्रच जाऊ आज ऑफिस सुटल्यावर तिला भेटायला.” विकासने तिला होकार दिला आणि ती त्याच्या कामाला लागला. दिवसभर काम करताना सुद्धा त्याच्या मनात स्वप्नालीचेच विचार येत होते.कसाबसा त्याने दिवस भरला आणि पाच वाजताच तो मयूरीजवळ आला आणि तिला जाऊया असे म्हणाला.
विकास आणि मयुरी हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा स्वप्नाली आणि तिची आई गप्पा मारत बसल्या होत्या. ते आत येताच स्वप्नालीने विकासची ओळख तिच्या आईसोबत करून दिली. स्वप्नालीचा चेहरा काहीसा निस्तेज वाटत होता. डेंग्यूमुळे तिला बराच अशक्तपणा आला होता. विकास काहीसा अवघडून बसला होता. त्याची परिस्थिती मयुरीच्या लक्षात येताच मयुरी स्वप्नालीच्या आईला म्हणाली “काकू आम्ही गडबडीत स्वप्नालीसाठी काही आणायलाच विसरलो. तिच्यासाठी आपण ज्युस आणूयात. येता का तुम्ही माझ्यासोबत? तेवढेच तुमचेपण पाय मोकळे करून होतील.” स्वप्नालीच्या आईने मयुरीला होकार दिला आणि त्या दोघी बाहेर गेल्या.
विकास हळूच उठून स्वप्नाली जवळ गेला. तिच्या नजरेला नजर देत तो म्हणाला “ दोन दिवस तुझी खूप वाट पाहिली मी. म्हणून तुला फोन,मेसेज केले. खूप काळजी वाटत होती तुझी. तू अशी अचानक कधी सुट्या घेत नाहीस ना. मग यावेळी सुट्टी घेतलीस so जरा टेन्शन आलं होत. त्याच बोलण ऐकून स्वप्नाली खुद्कन हसली. तीच हसण पाहून विकास गोंधळून गेला. मग स्वप्नाली म्हणाली “ तुमचा मेसेज आणि मिस कॉल पाहून खरंच खूप बर वाटल. मला माहित होत तुम्ही माझी काळजी करत असणार म्हणून.” त्यावर विकास म्हणाला “आता जास्त बोलत नको बसूस लवकर बरी हो आणि घरीपण ये आई देखील तुझी आठवण काढत होती.” स्वप्नाली पुढे काही बोलणार इतक्यात मयुरी आणि स्वप्नालीची आई रूम मध्ये आल्या. काहीवेळ बसून मयुरी आणि विकास हॉस्पिटलमधून बाहेर पडले. ते बसस्टॉप जवळ येताच मयुरी विकासला म्हणाली “ सर मला तुम्हाला काही अगदी महत्वाच सांगायचं आहे. आपण एखाद्या कॉफी शॉप मध्ये जाऊया का?” त्यावर विकास चालेल असं म्हणाला. आणि ते दोघे एका कॉफीशॉप मध्ये आले. विकासने कॉफीची ऑर्डर दिली आणि तो म्हणाला “ बोल काय महत्वाचं बोलायचं आहे ते?” मग मयुरी म्हणाली “ मला माहिती आहे सर तुम्ही आणि स्वप्नाली दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल फिलिंग्स आहेत. पण तुम्ही दोघपण पहिलं पाऊल टाकायला घाबरताय. पण सर एक गोष्ट तुम्हाला सांगते. खरतर ही गोष्ट कोणालाच माहित नाही काही दिवसांपासून स्वप्नालीचे आई वडील तिच्यासाठी मुलं पाहत आहेत.तीन महिन्यापूर्वी एक अतिशय चांगलं स्थळ स्वप्नालीसाठी आलं होत. त्यात नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. त्यामुळे स्वप्नाली एकदम टेन्शनमध्ये आली होती.तेव्हाच तिने मला फोन करून सगळ सांगितलं. स्वप्नालीचे बाबा पत्रिका घेऊन कुलकर्णी काकांकडे गेले होते.पण कदाचित देवाच्या मनातदेखील तुम्ही एकत्र याव अस आहे त्यामुळे स्वप्नालीच्या पत्रिकेत एक दोष असल्यामुळे तुला यावर्षी लग्नाचा योग नाही असे ते काका म्हणाले.” मयुरीचे हे बोलणे ऐकून विकास एकदम गंभीर झाला. आणि तो म्हणाला “ थॅन्क्स मयुरी. तू हे सगळ मला सांगितलस ते खूप बर झाल.” त्यावर स्वप्नाली म्हणाली “ ते ठीक आहे सर पण तुमच्याकडे फार वेळ नाही. काही दिवसात स्वप्नालीचे आई वडील पुन्हा तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करतील. आणि तेव्हा कुणीच काही मदत करू शकणार नाही. तेव्हा आता तुम्ही शांतपणे विचार करा आणि पुढं काय करायचं ते ठरवा. चला येते मी.” अस म्हणत मयुरी उठली आणि तिच्या घरी निघून गेली. विकासदेखील घरी आला. रात्री सर्व काम आटोपल्यानंतर तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत आता आणि त्याला मयुरीचे बोलणे आठवले. देवाच्या दयेने त्याला काही वेळ मिळाला होता. पण त्याला स्वप्नालीच्या घरच्यांची भीती होती. स्वप्नालीसारख्या मुलीचे आई वडील का बर त्यांच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न माझ्यासारख्या मुलासोबत होऊन देतील. माझ्या आणि स्वप्नालीच्या वयात बराच फरक आहे. त्यात माझी आर्थिक परिस्थिती देखील तितकी चांगली नाही. घरी आजारी आई आहे. गावी शेती घर अस काही नाही. मग स्वप्नालीच्या आई वडिलांनी का म्हणून तिचा हात माझ्या हाती द्यावा. असे एक ना अनेक विचार त्याच्या मनात उमटू लागले. आणि त्या विचारांच्या चक्रात विकास अडकायला लागला. त्याच मन अपयशाच्या भीतीने पुन्हा कच खाऊ लागले. आणि त्याच मोक्याच्या क्षणी त्याला त्याच्या आईने बोललेले वाक्य आठवले “चांगली आणि निर्मळ मनाची माणसं आयुष्यात नेहमी येत नाहीत. त्यामुळे एकदा का अशी माणसं आयुष्यात आली की त्यांना जिवापाड जपायच असतं”
आणि या त्याच क्षणी विकासने मनाशी ठरवले. स्वप्नालीला जिवापाड जपायचे. तिच्या आणि आपल्या आनंदासाठी आता सगळ्यांशी झगडावं लागलं तरी झगडायचं. आता पुन्हा कच खायची नाही. असा विचार पक्का होताच त्याच मन एकदम शांत झालं आणि स्वप्नाली सोबतच्या चांगल्या भविष्याची कल्पना करतच त्याला कधी झोप लागली हे त्याच त्यालाच समजलं नाही.

🎭 Series Post

View all