Login

प्रीत उमलताना...भाग १७(अंतिम भाग)

स्वप्नाली आणि विकास यांच्या प्रेमाला मिळेल का स्वप्नालीच्या कुटुंबाची मान्यता? जाणून घेण्यासाठी वाचत रहा प्रीत उमलताना....
मागच्या भागात आपण पाहिलं स्वप्नालीने तिचा आई वडिलांना विकासाबद्दल सगळ सांगितलं. आता तिचे आहे वडील काय निर्णय देणार चला पाहू या...

इकडे स्वप्नालीच्या आई वडिलांना मात्र स्वप्नालीच्या बोलण्याने मोठा धक्का बसला होता. ते दोघेही त्यांच्या खोलीत आले. सुधाकरराव त्यांच्या डोक्याला हात लावून बसले होते. विजयाताई त्यांच्या जवळ येताच ते म्हणाले "किती स्वप्न पहिली होती आपण या मुलीसाठी? आणि आता तिने हा निर्णय घेतलाय. कोण कुठला काल भेटलेला मुलगा. त्याच्यासाठी स्वप्नाली आपल्या विरुद्ध उभी राहिली. आता आपण काय करायचे. तिच्यावर दडपण आणून तर तिला सुयश सोबत लग्न करायला लावू शकत नाही आपण. " सुधाकररावांचं हे बोलणं ऐकून विजयाताई त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाल्या "अहो आपल्या मुलीचा आनंद हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. तेव्हा तिच्यावर दडपण टाकायचा प्रश्नच नाही. मला एक उपाय दिसतोय." "कोणता उपाय?" असे सुधाकर राव म्हणताच विजयाताई म्हणाल्या "आपण माझ्या दादाला सगळं सांगूया. तो स्वप्नालीला समजावून सांगेल. ती तिच्या मामाच सगळं ऐकते. त्याने समजावलं तर स्वप्नाली नक्की ऐकेल." सुधारकररावांना हा विचार पटला आणि त्यांनी विजाताईंना होकार दिला. विजयाताईंनी त्यांच्या पोलीस ऑफिसर असलेल्या भावाला म्हणजेच अशोक मामाना फोन केला. फोन उचलला जाताच विजयाताईंनी सगळी गोष्ट सविस्तरपणे अशोक मामांना सांगितली. विजयाताईंचं सगळं बोलणं ऐकून अशोक मामा म्हणाले " ताई स्वप्नाली ही एक हुशार, भावनाप्रधान आणि कुठल्याही गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेणारी मुलगी आहे. तेव्हा जर तिला एखादा मुलगा आवडत असेल तर तो खरोखर चांगला असण्याची शक्यता खूप जास्त आहे. तरीपण तुम्ही आता कोणताच निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. मी माझ्या पद्धतीने थोडी माहिती मिळवतो आणि मग उद्या घरी येऊन तुम्हा सगळ्यांशी बोलतो. पण मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. जर मी स्वप्नालीच्या बाजूने बोललो तर तुम्ही त्यांच्या नात्याला परवानगी दिली पाहिजे. कबूल असेल तर सांगा." अशोक मामांचे बोलणे ऐकून सुधाकरराव आणि विजयाताईंनी होकार दिला.
दुसऱ्या दिवशी स्वप्नाली ऑफिसला गेली नाही. तिच्या मनात काल रात्री घडलेल्या वादळी विचारांनी थैमान घातले होते. आई-बाबा तिच्या निर्णयाला कसा प्रतिसाद देतील या भीतीने तिची रात्र अक्षरशः तडफडण्यात गेली. सकाळपासून घरात एक विचित्र शांतता पसरली होती, जणू काही वादळापूर्वीची निरव शांतता. आई आणि बाबा दोघेही आपापल्या कामात गुंतल्यासारखे वावरत होते, पण त्यांचे डोळे आणि कान मात्र स्वप्नालीच्या हालचालींवर खिळलेले होते. इकडे स्वप्नाली ऑफिसला का आली नाही ते पाहण्यासाठी विकासने स्वप्नालीला फोन केला. विकासाचा फोन येताच स्वप्नाली रडू लागली. आणि रडत रडत तिने विकासाला सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या. तिचे सगळे बोलणे ऐकून विकास म्हणाला "स्वप्नाली तू काही काळजी करू नकोस. तुझ्या आई वडिलांशी मी येऊन बोलेन आणि मला खात्री आहे कि त्यांना आपल्या भावना नक्की समजतील आणि ते आपल्या लग्नाला होकार देतील. आणि त्यांचा होकार मिळेपर्यंत कितीही वेळ थांबायची माझी तयारी आहे. आणि तोपर्यंत सगळ्या परिस्थितीत मी कायम तुझ्या सोबत आहे. " विकासच्या अशा बोलण्याने स्वप्नालीला धीर आला. आणि विकासला बाय बोलत तिने फोन ठेवला.
स्वप्नाली आणि तिच्या आई वडिलांचा सगळा दिवस एका अव्यक्त ताणामध्ये निघून गेला. कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सरतेशेवटी संध्याकाळी सात वाजता स्वप्नालीच्या घराची बेल वाजली. दारात अशोक मामाला बघताच स्वप्नाली चकित झाली. आणि कालपासून अडवून ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यातून घळाघळा वाहू लागले. ती धावत जाऊन अशोक मामाला बिलगली आणि लहान मुलांसारखी रडायला लागली. अशोक मामाने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिला घरात घेऊन आले."काय झालंय माझ्या सोनपरीला? एवढी का रडतेय?" अशोक मामाने तिला जवळ बसवत विचारले. स्वप्नालीने रडत रडत काल घडलेली सगळी गोष्ट मामांना सांगितली. अशोक मामाने तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि तिला धीर दिला."तू काळजी करू नकोस बाळा. मी तुझ्या आई-वडिलांशी बोलतो," अशोक मामा म्हणाले आणि सुधाकररावांना आणि विजयाताईंना हॉलमध्ये बोलावले.
अशोक मामांनी त्यांच्यासमोर खुर्चीवर बसून गंभीरपणे बोलायला सुरुवात केली. "ताई, दाजी मला स्वप्नालीने सगळं सांगितलं. मला हे पण कळलं की तुम्ही तिच्या भविष्याची काळजी करत आहात. पण मला असं वाटतं की कोणताही निर्णय घेण्याआधी आपण सगळ्या बाजूंचा विचार करायला हवा." "अशोक, तू तर जाणतोस आमची स्वप्नाली किती हट्टी आहे. तिला काय वाटतंय तेच खरं. आम्ही तिच्यासाठी किती चांगलं स्थळ शोधून आणलं होतं आणि ती एका दिवसात सगळं..." सुधाकरराव नाराजीने बोलले. " दाजी, मला हे पण कळलं की तुम्ही सुयशबद्दल माहिती काढली आहे. तो चांगला मुलगा आहे, यात काहीच शंका नाही. पण स्वप्नालीचं मन जर दुसऱ्या कोणाकडे असेल तर तिला जबरदस्ती करणं योग्य नाही," अशोक मामा म्हणाले. "मग काय करायचं अशोक? तिला तिच्या मर्जीप्रमाणे वागू द्यायचं? त्या मुलाकडे काय आहे? ना चांगली नोकरी, ना स्वतःचं घर," विजयाताई काळजीच्या स्वरात म्हणाल्या. "ताई, मी विकासबद्दल थोडी माहिती काढली आहे," अशोक मामा म्हणाले आणि त्यांच्या हातात असलेली फाईल सुधाकररावांच्या दिशेने सरकवली. "विकास एका चांगल्या कंपनीत काम करतो आणि तो एक जबाबदार मुलगा आहे. त्याच्या भूतकाळात काही दुःखद घटना घडल्या आहेत, ज्यामुळे तो थोडा एकलकोंडा झाला होता. पण स्वप्नालीच्या येण्याने त्याच्यात सकारात्मक बदल झाले आहेत." सुधाकररावांनी फाईल उघडली आणि वाचायला सुरुवात केली. विकासच्या नोकरीबद्दल, त्याच्या कामाबद्दल, त्याच्या स्वभावाबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल त्यात सविस्तर माहिती दिली होती. त्याच्या आईच्या आजारपणाबद्दल आणि त्याच्या बहिणींच्या जबाबदारीबद्दल वाचून त्यांना थोडं वाईट वाटलं. "या मुलावर तर खूप मोठी जबाबदारी आहे," सुधाकरराव म्हणाले. "हो दाजी पण तो त्या जबाबदारीला व्यवस्थितपणे तोंड देत आहे. आणि मला असं वाटतं की स्वप्नाली त्याला या परिस्थितीत खूप मदत करू शकेल. ती एक समजूतदार आणि प्रेमळ मुलगी आहे," अशोक मामा म्हणाले. "पण त्याचं भविष्य काय आहे? आमच्या स्वप्नालीला तो सुखी ठेवू शकेल का?" विजयाताईंनी पुन्हा त्यांची चिंता व्यक्त केली. "ताई, भविष्य कोणालाच माहित नसतं. पण मला विकासच्या डोळ्यात स्वप्नालीसाठी खरं प्रेम दिसलं. आणि मला खात्री आहे की प्रेम आणि साथ असेल तर ते दोघेही आपलं भविष्य नक्कीच चांगलं बनवतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नाली त्याला पसंत करते आणि त्याच्यासोबत आनंदी राहू शकते," अशोक मामा म्हणाले. स्वप्नाली शांतपणे तिच्या मामांचं बोलणं ऐकत होती. तिच्या डोळ्यात एक छोटीशी आशा चमकत होती. अशोक मामा पुढे म्हणाले, "आणि तुम्ही मला वचन दिलं होतंत की जर मी स्वप्नालीच्या बाजूने बोललो तर तुम्ही तिच्या निर्णयाला परवानगी द्याल." सुधाकरराव आणि विजयाताई एकमेकांकडे बघू लागले. त्यांना अशोक मामांच्या बोलण्यात तथ्य वाटत होतं. त्यांना स्वप्नालीचा आनंद महत्त्वाचा होता आणि अशोक मामांच्या मतावर त्यांचा विश्वास होता. "ठीक आहे अशोक," सुधाकरराव म्हणाले, "जर तुला इतकी खात्री आहे तर... आम्हाला काही हरकत नाही." विजयाताईंनी स्वप्नालीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात त्यांना विनंती आणि प्रेम दोन्ही दिसत होतं. त्यांना जाणवलं की स्वप्नालीने तिचा जीवनसाथी निवडला आहे आणि तिच्या निर्णयाचा आदर करणं हेच योग्य आहे. "हो बाळा," विजयाताई म्हणाल्या आणि स्वप्नालीला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवला, "आम्हाला तुझा आनंद महत्त्वाचा आहे." स्वप्नालीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती धावत गेली आणि तिच्या आई-वडिलांना घट्ट मिठी मारली. "थँक्यू आई-बाबा! तुम्ही माझ्या भावना समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!" अशोक मामा हसले आणि म्हणाले, "चला आता रडू नका. विकासला बोलवा आणि त्याला पण सांगा." स्वप्नालीने लगेच विकासला फोन केला आणि त्याला आनंदाची बातमी सांगितली. विकासला विश्वास बसत नव्हता. तो लगेच स्वप्नालीच्या घरी आला आणि त्याने स्वप्नालीच्या आई-वडिलांचे आभार मानले. त्यानंतर घरात आनंदाचं वातावरण पसरलं. अशोक मामांनी विकासला जवळ बोलावून त्याला काही महत्वाचे सल्ले दिले आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्वप्नाली आणि विकास दोघेही खूप आनंदी होते. त्यांच्या प्रेमाला अखेर त्यांच्या घरच्यांचीही मान्यता मिळाली होती.

🎭 Series Post

View all