Login

प्रीत उमलताना... भाग१६

विकासने त्याचं प्रेम व्यक्त तर केलं. पण आता विकास आणि स्वप्नालीसमोर उभ राहिलय एक नवीन आव्हान.
मागच्या भागात आपण पाहिलं विकासने स्वप्नालीजवळ त्याच्या भावना व्यक्त केल्या. आतातरी सगळ व्यवस्थित होणार की त्यांच्यासमोर आणखी अडचणी उभ्या राहणार.....

विकास आणि स्वप्नाली यांच्यामधलं नातं आता खुलू लागलं होतं. दिवसभर ऑफिसमध्ये ते सोबतच असत ऑफिसमधून जाताना देखील विकास आणि स्वप्नाली एकत्र जात असत. ऑफिस सुटल्यावर कधी एखाद्या कॉफीशॉपमध्ये तर कधी एखाद्या बागेत बसून विकास आणि स्वप्नाली त्यांच्या पुढच्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असत. स्वप्नालीच्या आयुष्यात येण्याने विकासचं आयुष्य अगदीच बदलून गेलं होतं . आधी अलिप्त एकटा एकटा राहणार विकास आता ऑफिसमध्ये सगळ्यांशी मिळून मिसळून राहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर आता नेहमी एक मोहक आणि आत्मविश्वासपूर्ण हसू असायचं. त्याच्यात झालेल्या या बदलामुळे स्वप्नालीदेखील अगदी खुश होती.
दिवसामागून दिवस असे आनंदाने जात होते. स्वप्नाली आणि विकास एकमेकांना समजून घेत होते. त्यांचं प्रेम आता बहरू लागलं होतं. आणि अशाच एका शुक्रवारी स्वप्नाली ऑफिसवरून थोडीशी उशिराच घरी परतली. तेव्हा तिने पाहिले सुधाकरराव आणि विजया तिचीच वाट पाहत बसले होते. स्वप्नाली फ्रेश होऊन बाहेर आली आणि ती तिच्या आई वडिलांजवळ बसली. तिच्या चेहऱ्यावर एक छानसं हास्य होतं. तेव्हा सुधाकरराव म्हणाले " स्वप्नाली तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची होती. तुला ते सुयश देशमुखचे स्थळ आठवतंय का?" स्वप्नाली तिच्या वडिलांच्या या बोलण्याने एकदम चमकली. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य एका क्षणात गायब झाले. ती जराशी सावरून बसली आणि म्हणाली "हो बाबा पण त्याच काय आता? कुलकर्णी काकांनी सांगितल्या प्रमाणे सध्यातरी लग्नाचा योग नाहीये ना?" तिच्या या प्रश्नावर स्वप्नालीची आई म्हणाली "हो पण त्याला आता झाले चार-पाच महिने. चार दिवसांपूर्वी सुयशच्या वडिलांचा फोन आला होता. त्यानंतर मी परत कुलकर्णी काकांकडे जाऊन आले. तेव्हा काका म्हणाले आता आपण लग्नासाठी मुलं पाहू शकतो." हे ऐकताच स्वप्नाली एकदम चिडून म्हणाली "काय आई चार दिवसापूर्वी हे सगळं झालं आणि तुम्ही मला आता सांगताय?" त्यावर तिचे बाबा म्हणाले " अरे बेटा, तुला सांगणारच होतो पण हल्ली तुला यायलाच उशीर होतो मग तू जेवतेस आणि झोपतेस मग बोलणार कधी? तेव्हा रविवारी सुयश आणि त्याच्या कुटुंबाला मी बोलावलं आहे. तुम्ही एकमेकांना पहा, बोला मग पाहू पुढे काय करायचं ते?" सुधाकरराव असे म्हणताच स्वप्नाली जवळजवळ ओरडलीची "काय रविवारी ती लोक घरी येणार? बाबा तुम्ही मला हे आता सांगताय? तुम्ही मला आधी तरी विचारायचं होतं .
ते ऐकल्यावर तिचे बाबा म्हणाले "अगं असं काय करतेस मी माहिती काढली आहे सुयश आणि त्याच्या कुटुंबाची. सुयशला चांगली सरकारी नोकरी आहे. तो दिसायला देखणा आहे. त्याच्या घरची परिस्तिथी देखील उत्तम आहे. इथे पुण्यात घर आहे. गावी घर आहे भरपूर शेती आहे. आई वडील दोघे नोकरी करतात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व लोकांचे स्वभाव अगदी चांगले आहे. मग आता अजून काय हवं आहे?" सुधाकररावांचे हे बोलणे ऐकून स्वप्नाली म्हणाली "पण बाबा लग्न करण्यासाठी फक्त इतकंच पुरेसं आहे का? माझी आवड काही महत्वाची नाही का?" त्यावर सुधाकरराव काही बोलणार इतक्यात तिची आई म्हणाली " स्वप्नाली लग्नासाठी फक्त एवढ्याच गोष्टी पुरेशा नसतात. पण मुलगा त्याचे कुटुंब त्यांचे स्वभाव आणि त्यांची परिस्तिथी हे संपूर्ण आयुष्यभर लागणाऱ्या गोष्टी आहेत. ते सगळं चांगलं आहे तर मग तू का नन्नाचा पाढा लावत आहेस?" स्वप्नालीच्या आईचे बोलणे पूर्ण होताच सुधाकरराव म्हणाले" आणि बाळा आपण काय रविवारी तुझं लग्न लावणार नाही. तुम्ही एकमेकांना बघाल बोलाल मग आपण ठरवू पुढं काय करायचं ते? त्या मुलाशी न बोलता त्याला न भेटता नकार का द्यायचा?"
सुधाकरराव आणि विजय यांचं बोलणं ऐकून स्वप्नालीची अवस्था जराशी अवघड झाली. तिला त्या दोघांना नाही म्हणणे शक्य झाले नाही. स्वप्नालीने होकार दिल्यामुळे तिचे आई वडील खुश होऊन रविवारच्या कार्यक्रमाची तयारी कशी करायची ते ठरवायला लागले. इकडे स्वप्नाली झोपायला म्हणून तिच्या खोलीत आली. आणि तिने दरवाजा बंद करून विकासाला फोन लावला आणि आता घरी जे जे घडलं ते सांगितलं. विकासने तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि मग तो म्हणाला "स्वप्नाली मला वाटतंय तू तुझ्या घरी आपल्याबद्दल सगळं सांगून टाकलं पाहिजे. त्यांना असं अंधारात ठेवणं बरोबर नाही. शेवटी जर त्यांना सगळं कळलं तर त्यांना मोठा धक्का बसेल. आणि ते योग्य होणार नाही." त्यावर स्वप्नाली विकासाला म्हणाली "तुमचं बोलणं मला पटतंय विकास पण मला खूप भीती वाटते जर त्यांना हे सगळं पटलं नाही तर काय होईल?" तीच बोलणं ऐकताच विकास म्हणाला "तुझी भीती रास्त आहे स्वप्ना, पण कधी ना कधी हे त्यांना सांगावं तर लागेल ना. मग लवकरात लवकर सांगितलं तर ते जास्त चांगलं आहे. आपण जेवढं उशीरा सांगू तेवढं जास्त अवघड होत जाईल." त्यावर स्वप्नाली म्हणाली " माझं डोकं काम करत नाहीये. मला त्यांना पण दुखवायचं नाहीये आणि तुम्ही पण हवे आहात." तीच बोलणं ऐकून विकास हसू लागला. हसत हसत तो म्हणाल "ओके स्वप्ना, तू रविवारी त्या मुलाला भेट तरी आणि तो सगळं बघण्याचा कार्यक्रम झाला कि मात्र लगेच त्यांना आपल्याबद्दल सगळं सांगून टाक. जे काही होईल त्यात मी तुझ्या सोबतच असेन याची खात्री बाळग. "विकासच हे बोलणं ऐकून स्वप्नालीला जरा धीर आला. आणि ती ठीक आहे म्हणून झोपली.
शनिवारचा दिवस मुलगी बघायच्या कार्यक्रमाची प्लॅनिंग करण्यातच निघून गेला. स्वप्नालीचे आई वडील अगदी उत्साहाने सगळ्या गोष्टी करत होते. पण इकडे स्वप्नाली मात्र एकप्रकारच्या बळजबरीने सगळ्या गोष्टी करत होती. आणि अशातच रविवारचा दिवस उजाडला. सकाळी दहाच्या सुमारास सुयश आणि त्याचे आई-वडील स्वप्नालीच्या घरी आले. सुरवातीचे सोपस्कार पार पडले. त्यानंतर सुयश आणि स्वप्नाली त्यांच्या घराच्या अंगणात आले. तिथे फक्त ते दोघेच होते. तेव्हा त्यांच्यात बोलणे झाले. सुयशने स्वप्नालीला तिचे कॉलेज, ऑफिस आणि भविष्याचे प्लॅन्स याबाबदल विचारले. तसेच त्याच्या बद्दलदेखील बऱ्याच गोष्टी सांगितल्या. स्वप्नालीदेखील त्याच्याशी व्यवस्थित बोलली. पण तिच्या मनात एकप्रकारची अस्वस्थता होती. विकास सोडून दुसऱ्या कोणाशी असं मोकळेपणाने बोलणं तिला अवघड जात होतं. काही वेळ गप्पा मारून सुयश आणि स्वप्नाली घरात आले. तेव्हा त्यांनी पहिले तर त्या दोघांचे आई वडील छानपैकी गप्पा मारत होते. ते दोघे आत येताच सुयशच्या वडिलांनी त्याला सरळ विचारले " काय मग सुयश आवडली का तुला स्वप्नाली?" वडिलांच्या या अनपेक्षित प्रश्नाने सुयश एकदम भांबावला. त्याची अवस्था पाहून सुयशने वडील म्हणाले "अरे सांग कि? आम्हाला तर स्वप्नाली सून म्हणून आवडली आहे." त्यावर सुयश म्हणाल "मलादेखील स्वप्नाली आवडली आहे." सुयशने हे बोलणे ऐकून त्याचे वडील म्हणाले " सुधाकरराव विजयाताई, आमची इच्छा आहे की आपण हे नाते पुढे घेऊन जाऊ. तेव्हा तुम्ही स्वप्नालीला विचारा आणि आम्हाला कळवा तुमचा निर्णय." असे बोलून सुयश आणि त्याचे आई वडील निघून गेले.
सुयश आणि त्याचे कुटुंबीय निघून जाताच स्वप्नालीची आई तिला म्हणाली " तुला आवडला का सुयश. मला तर तो आणि त्याचे आई वडील खूप चांगली लोक वाटले. माझ्यामते आपण पुढे जाऊ शकतो." तिच्या वडिलांनीदेखील तिच्या आईच्या बोलण्याला दुजोरा दिला. आणि ते दोघे स्वप्नालीकडे तिच्या उत्तराच्या अपेक्षेने पहिले. स्वप्नालीने काही क्षण विचार केला. तिला हे कळून चुकले कि आता हीच ती वेळ आहे तिला घरात विकासाबद्दल सांगावंच लागणार आहे. तिने मनाशी विचार पक्का केला आणि ती म्हणाली " आई बाबा सुयश आणि त्याची फॅमिली चांगली आहे पण ." "पण? पण काय?" स्वप्नालीची आई काहीशा कठोर स्वरात म्हणाली. आईचा प्रश्न ऐकताच स्वप्नालीने एक दीर्घ श्वास घेतला. आणि सगळं धीर एकवटून ती म्हणाली " आई बाबा मला माझ्या ऑफिसमधील विकास खूप आवडतो. माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याचंही माझ्यावर प्रेम आहे. आणि आम्हाला लग्न करायचंय."
स्वप्नालीचे बोलणे संपले आणि तिला जाणवलं घरत एक वेगळीच शांतता पसरली आहे. स्वप्नालीच्या या बोलण्याने तिच्या आई वडिलांना चांगलाच धक्का बसला होता. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, निराशा आणि नाराजीचे भाव स्पष्टपणे दिसत होते. स्वप्नालीचे बोलणे संपल्यानंतरची ती दोन तीन मिनिटाची शांतता आता तिच्या अंगावर येऊ लागली होती. आई आणि बाबा आता काय बोलणार या विचाराने स्वप्नाली वाट पाहू लागली होती. अचानक बसलेल्या त्या धक्क्यातून सुधाकरराव सावरले आणि स्वप्नालीकडे बघत ते म्हणाले " स्वप्नाली तू आत जा. आपण याविषयावर उद्या बोलू. तू सकाळी ऑफिसमध्ये सांगून सुट्टी घे. " एवढं बोलून सुधारराव उठले आणि त्यांच्या खोलीत गेले. त्यांच्यापाठोपाठ स्वप्नालीची आईदेखील काहीही न बोलता निघून गेली. आता स्वप्नाली हॉलमध्ये एकटीच राहिली होती. आणि आता उद्या आई आणि बाबा काय बोलणार? या विचाराने तिच्या मनात एक नवीन वादळ निर्माण केले होते.

🎭 Series Post

View all