Login

प्रीत उमलताना.... भाग ३

विकास आणि स्वप्नाली यांच्यात झालेल्या भांडणानंतर विकास स्वप्नाली सोबत बोलू पाहतोय. विकास स्वप्नालीचे गैरसमज दूर करू शकेल का???
मागच्या भागात आपण पाहिलं विकासच्या अलिप्तपणामुळे स्वप्नालीच्या मनात विकास बद्दल राग आणि कुतूहल हे दोन्ही निर्माण झालेत. त्या रागातच स्वप्नाली विकासला बरच काही बोलून गेली. आता पुढं काय होणार? चला जाणून घेऊया.

तिच्यासमोर विकास येऊन बसला होता. विकासकडे पाहतच स्वप्नाली उठून जाऊ लागली. ते पाहून विकास म्हणाला “ स्वप्नाली मला नाही माहित की तुला माझ्या वागण्याचं इतकं वाईट का वाटलं? कदाचित तुझं वय कमी असल्यामुळे तुझा बाहेरच्या जगाचा सुद्धा अनुभव कमी आहे. त्यामुळे मी तुला एक सल्ला देतो. इथं ऑफिसमध्ये आपण सगळ्या गोष्टी इतक्या मनाला लावून घ्यायच्या नसतात. आणि मी जे वागलो आणि वागतो ते पूर्णपणे प्रोफेशनल आहे. मी इथं येतो आणि माझं काम प्रामाणिकपणे करतो आणि तिथच या ऑफिसच्या जगाशी माझा संबंध संपतो. मला वाटत मी पुरेसे स्पष्ट बोललोय. तुदेखील समजून घेशील माझं म्हणणं.” विकासच बोलण ऐकत ऐकत स्वप्नालीचा राग निवळत चालला होता. विकासच बोलण ऐकून स्वप्नाली म्हणाली “ विकास सर मला एकदम मान्य आहे की माझं वय कमी असल्यामुळे मला बाहेरच्या जगाचा अनुभव कमी आहे. पण जो काही माझा थोडासा अनुभव आहे त्या अनुभवावरून मी एवढं नक्की सांगू शकते की तुम्ही इथ जॉईन झाल्यापासून जसं स्वतःला सगळ्यांसमोर दाखवू पाहताय तसे तुम्ही नक्की नाही. आता तुम्ही अस का करताय हे मात्र मला माहित नाही. आणि मी मघाशी जे वागले त्याबद्दल सॉरी.” हे बोलून स्वप्नाली तिथून उठून तिच्या जागेवर येऊन बसली.
स्वप्नाली जरी तिच्या जागेवर येऊन बसली असली तरी तिचं डोकं अजून शांत झालं नव्हतं. स्वप्नालीला अस्वस्थ पाहून मयुरी तिच्या जवळ आली आणि म्हणाली "स्वप्नाली का ग काय झालं? थोडी disturbed वाटते आहेस." ते ऐकून स्वप्नाली म्हणाली "काही नाही ग . हे नवीन आलेले विकास सर जरा विचित्रच वागतात ना."
"अरे यार तू अजून त्या खडूस एकलकोंड्याचा विचार करत आहेस? त्यांना इथं येऊन दोन दिवस झालेत पण मला मात्र त्यांचा स्वभाव फारच एकलकोंडा आणि खडूस वाटलं." मयूरीच हे बोलणं ऐकून स्वप्नालीने थोड्यावेळापूर्वी कॅन्टीनमध्ये जे घडले ते मयुरीला सांगितले. आणि ती पुढे म्हणाली ," मयुरी विकास सर आज माझ्याशी जे बोलले त्यावरून मला इतकंच जाणवलं की ते जरी सगळ्यांपासून बाजूला एकटे एकटे रहात असले तरी त्यांचा मूळ स्वभाव असा एकलकोंडा वाटत नाहीये. तसे असते तर ते परत माझ्याशी बोलायला आलेच नसते." हे सगळे ऐकून मयुरी हसत म्हणाली " ऐ बाई तुला जरा जास्तच इंटरेस्ट आहे त्यांच्यात असं मला वाटायला लागलंय. जरा जपून हा त्यांचं वय ३६-३७ असेल आणि काय माहित त्यांचं लग्नपण झालेलं असेल." तिचं बोलणं ऐकून स्वप्नाली चिडून तिला म्हणाली " मयुरी तू तुझं काम कर आणि मी पण माझं काम करते." ती काम करायला तिच्या लॅपटॉपकडे वळली तेव्हा तिची नजर विकासाकडे गेली. तो तिच्याकडेच पाहत होता. स्वप्नालीची आणि विकासाची नजरानजर होताच विकासने त्याची नजर परत त्याच्या लॅपटॉपकडे वळवली.
असेच तीन ते चार महिने निघून गेले. विकास आणि स्वप्नाली रोज ऑफिसमध्ये एकमेकांच्या समोर येत असत पण त्या दोघांमध्ये एक अदृश्य असा तणाव निर्माण झाला होता. त्या दोघांमध्ये फक्त कामाच्या निमित्ताने संभाषण होत असे. स्वप्नाली ही मुळातच हुशार आणि बोलकीअसल्यामुळे ती तिच्या टीममधल्या इतर सर्व लोकांशी अतिशय मिळूनमिसळून रहात असे. आणि त्याचवेळी विकास मात्र स्वतःचे काम करत कोणाशीही जास्त न मिसळता एकटा एकटा राहत असे. त्याच्या अश्या वागण्याने टीममधील बाकीच्या सर्वानी त्याला ऑफिसमधल्या सोशल लाईफमधून जवळपास वजाच केले होते.
पण असे असले तरी विकास कामाशी संबंधित गोष्टींमध्ये मात्र टीममधील कोणालाही कसलीही मदत करायला कायम तत्पर होता. तसेच तो त्याच्या कामाशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये अतिशय पारंगत असल्यामुळे टीममधील जवळपास सगळेच लोक विकासाची कामाच्या निमित्ताने मदत घेत असत. पण जसे काम संपेल तसे विकास एक्दम अलिप्त होत असे. याच तीन चार महिन्यात स्वप्नाली मात्र विकासाचे अतिशय बारकाईने निरीक्षण करत होती. आणि जसजसे दिवस पुढे जात होते तसतसे तिला विकासाबद्दल एकप्रकारची आपुलकी निर्माण होत होत. पण या आधीच्या सर्व गोष्टींमुळे तिने विकास सोबत फक्त प्रोफेशनल संबंध ठेवले होते.
एकेदिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्वप्नाली बसची वाट पाहत उभी होती. तेव्हाच तिथे विकासदेखील तिथे आला. त्याने तिच्याकडे पाहताच एक स्माईल केली. पण स्वप्नालीने मात्र त्याच्याकडे पाहूनदेखील न पाहिल्यासारखं केलं आणि ती बसची वाट पाहू लागली. तेवढ्यात तिची बस आली आणि ती बस मध्ये चढली. विकाससुद्धा त्याच बस मध्ये चढला . बसमध्ये चढताच त्याने पाहिले स्वप्नाली एका सीटवर एकटीच बसली होती. ते पाहून तो तिच्याजवळ गेला आणि तिला विचारले " स्वप्नाली मी बसू शकतो का इथे?" त्याच्याकडे पहात स्वप्नालीने तिची बॅग उचलली आणि विकासला बसायला जागा दिली. विकास तिच्याशेजारी बसला. काही वेळ दोघेही शांत बसून होते. काही वेळाने विकास स्वप्नालीला म्हणाला " स्वप्नाली मी मागच्या दोन-तीन महिन्यापासून जे वागलोय त्याबद्दल सॉरी. पण मी तसाच आहे. मला नाही आवडत असं लगेच अनोळखी माणसांशी बोलायला किंवा मैत्री करायला." त्याचे बोलणे ऐकून स्वप्नाली शांतपणे म्हणाली " its ok sir; तसही आपण प्रोफेशनल वागलं पाहजे. याचा आता मला अनुभव आला आहे." ते ऐकून विकास उदासपणे हसला आणि जागेवरून उठत म्हणाला "चला माझा स्टॉप आला."
विकास खाली उतरला आणि मग स्वप्नाली एकटीच बसून गेल्या दोन तीन दिवसात जे घडला त्याचा विचार करू लागली. आणि आता उतरताना विकासच उदासपणे हसणं तिच्या लक्षात आलं. आणि त्या उदास हसण्याने स्वप्नालीच्या मनातलं विकास बद्दलच कुतूहल आणखीनच वाढलं होतं. इकडे बसमधून उतरून घरी चालत चाललेल्या विकासाच्या मनातदेखील विचारांच मोहोळ उठलं होतं . तो त्याच्या मनाशीच बोलत होता " मी खरंच फार तुसड्यासारखे सगळ्यांशी वागत आहोत का ? पण मी तरी काय सगळ्यांना सांगू आधीचा विकास जसा होता तसा आता नाहीये. आधीच्या मनमिळाऊ सगळ्यांशी हसत खेळत राहणाऱ्या विकासने काही धक्के असे पचवलेत की तो हसरा मनमिळाऊ विकास आता संपलाय.

तर कसा वाटला हा भाग नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटच मला लिहिण्यासाठी प्रेरणा देतात.
माझं लिखाण आवडलं असल्यास मला नक्की फॉलो करा.
धन्यवाद.

🎭 Series Post

View all