Login

प्रीतबंध. भाग -७५

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध. प्रीतबंध!
प्रीतबंध!
भाग -७५

“यस बॉस! आय गॉट इट.”


“काय कळलं?”

हेच की द ग्रेट डॉक्टर रुपाली ‘व्हॅलीड खोटं’ बोलायला शिकल्यात.” ती खळाळून हसली तसे रुपालीच्या ओठावरदेखील हसू पसरले.
_______


“..तुमची मुलगी खरोखर नक्षत्रासारखी सुंदर आहे हो. इतकी वर्ष एक काळे ग्रहण मागे लागल्यामुळे जराशी झाकोळलीय ती; पण आता काळजीचे काहीच कारण नाही. आमच्या आशुच्या रूपाने हे ग्रहण लवकरच नष्ट होणार आहे.” राशीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत रेवती म्हणजे आशिषची मॉम म्हणाली.


“म्हणजे आमची राशी तुम्हाला आवडली म्हणायची.” तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत नंदिनीने विचारले.


“हा काय प्रश्न झाला? आशुने हिच्याबद्दल जेव्हा सांगितले तेव्हाच तर आमच्या मनात ही भरली होती. शेवटी आमच्या मुलाची चॉईस अशी तशी थोडीच असणार? राशी म्हणजे हिरा आहे हिरा. आम्ही दिवे घेऊन फिरलो असतो तरी अशी मुलगी शोधू शकलो नसतो..”


“मॉम, पुरे ना. त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर कळले आहे.” आशिषने हलकेच रेवतीचा हात दाबून तिला आवरते घ्यायला लावले.


“अरे हो, मी तर माझ्या सुनेचेच कौतुक करतेय. आजकालची मुलं ना.” ती हसत हसत पुढे म्हणाली.


..रुपाली म्हणाली होती, तसे रविवारी आशिष त्याच्या मॉम आणि डॅडसोबत राशीच्या घरी आले होते. डेनिमच्या जीन्सवर फिकट पिवळ्या रंगाच्या शर्टमध्ये आशिष एकदम उठून दिसत होता. तर आकाशी रंगाच्या शिफॉनच्या साडीत राशीदेखील अगदी गोड दिसत होती. चेहऱ्यावर साधी पावडर आणि ओठावर हलकी लिपस्टिक हाच काय तो तिचा शृंगार! तरीही तिचे सौंदर्य त्याच्यापुढे कुठेच फिके पडत नव्हते. नाही म्हणायला चेहऱ्यावर फारसा आनंद दिसत नव्हता तरी जेवढे जमेल तेवढे आनंदाचे मुखवटे घेऊन ती मिरवत होती.


आशिषचे डॅड, मिस्टर अभ्यंकर, जरासे मितभाषी होते. त्यांची कसर मात्र त्यांची सौभाग्यवती रेवतीने भरून काढली होती. गळाभर दागिन्यांनी मढलेली ती. तिला बघून समोरची व्यक्ती नक्कीच बिचकली असती पण तिच्या मोकळ्या आणि बडबड्या स्वभावाने मात्र लगेच तिने सर्वांना आपलेसे करून टाकले होते.


“अभ्यंकर साहेब, आमची राशी जर तुम्हा उभयंताना सून म्हणून पसंत असेल तर टीका लावून आपलं नातं पक्के करायला काही हरकत तर नाही ना?” अशोकने भाव पूर्ण दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले.


“अगदीच हरकत नाहीये. आम्ही तर सोबत नारळ देखील घेऊन आलोय. नारळ तुमचा आणि त्याबदल्यात तुमची लेक आमची.” मिस्टर अभ्यंकर हसून म्हणाले. त्यांना सून म्हणून राशी किती आवडलीय याचीच ती पावती होती.


“काय आशिषराव, तुम्ही काय म्हणताय?’ फोडायची का सुपारी?” रेवतीने आशिषवर नजर टाकली तसा त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी लाली पसरली.

कोण म्हणतो लग्नाच्या गोड नात्यात बांधले जाताना केवळ मुलीच्याच चेहऱ्यावर लाली चढते? अपवादात्मक आशिषसारखी मुलंही असतात की.


“आशिष, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.” इतकावेळ गप्प असलेल्या राशीने त्याच्याकडे आशेने पाहिले.


“हो, बोल ना.”


“आपण माझ्या खोलीत जाऊन बोलूया?” तिच्या डोळ्यातील अर्जव बघून त्याला नाही म्हणता आले नाही.


“मॉम-डॅड, आम्ही आलोच. एक्सक्युज मी एव्हरीबडी.” त्याने उठत एकवार सर्वावर नजर टाकली.


“आरामात या. लग्नापूर्वीचे हे दिवस देखील एंजॉय करायचे असतात बरं.” रेवती मोठयाने म्हणाली तसे दोघांनाही ओशाळल्यासारखे झाले.


“राशी, प्लीज डोन्ट माईंड. मॉम जरा मिश्किल स्वभावाची आहे.” तिच्यासोबत चालताना तो म्हणाला.


“हम्म. शी इज स्वीट, रादर तुझी पूर्ण फॅमिलीच खूप छान आहे म्हणून तर मला भीती वाटतेय.”


“कसली भीती?” तिच्या बेडवर बसत तो.


“हीच की हे नाते मी निभावू शकेल का? आशिष, तुम्ही या लग्नाला नकार द्या. माझ्याने नाही होणार हे.” ती एकाएकी लग्न तोडायचे म्हणत होती.


“हेय, रिलॅक्स तू वेडी आहेस का? अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून तर मी इथे आलो ना? आणि एक सांगू? रूपाली आँटी तुम्हाला काही बोलली नसती तरी मी आलोच असतो.”


“हा वेडेपणा झाला आशिष. हा फोटो बघताय? हा सत्यजीत.. माझा एक्स हजबंड. ज्याला अजून मला विसरता आले नाहीये..” महाबळेश्वरचा फोटो त्याच्यासमोर पकडत ती म्हणाली.


“..आणि हा अभी, ज्यावर माझे वेड्यासारखे प्रेम होते, कदाचित आजही आहे. त्याला तर मी कधीच विसरू शकणार नाही. तुमच्याशी लग्न करून मला तुमची फसगत नाही हो करायची. आईबाबा आनंदी असावेत म्हणून मी लग्नाला होकार दिला. पण त्यात मला तुमच्यासारख्या इतक्या चांगल्या मुलाचा बळी नाही द्यायचाय.” तिच्या डोळ्यात पाणी तराळले.


“हेय राशी..”


“आशिष, का करताय तुम्ही माझ्याशी लग्न?” त्याला मध्येच खोडत तिने विचारले.


“कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर.”


“प्रेम! मुळात प्रेमबिम असं काही नसतंच.”


“हेच तर तुझ्या डोक्यातून काढायला मी लग्न करतोय. खरं प्रेम किती प्रभावशील असते हे तुला पटवून द्यायचेय. देवाने त्यासाठीच मला तुझ्यासमोर आणले असावे. बरं तुझं बोलून झालं असेल तर आपण जाऊया? बाहेर सगळे वाट बघत असतील.”


“आशिष..” तिचा कातर स्वर.


“राशी, प्लीज रडू नकोस ना.” त्याने हिंमत करून तिचे डोळे पुसले.


“ऐकून तर घ्या. एक पत्नी म्हणून मी तुम्हाला कसलेच सुख देऊ शकणार नाही.”


“तू आयुष्यभर माझ्या सोबत असशील हेच मला खूप आहे.” तिच्या डोळ्यात बघत तो.


“आशिष, तुम्हाला कळत कसं नाही..”


“राशी, किती विचार करशील? आता पुरे ना. तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. आणखी कुठली अपेक्षा नाहीये आणि काळ जसा सरत जातो ना, तसे आपणही बदलत जातो. पुढे जाऊन कदाचित माझ्याबद्दलचा तुझा दृष्टीकोन देखील बदलेल. सो, जस्ट चिल!”

तिच्या गालाला हलके ओढत तो म्हणाला.

“आता परत मीच डोळे पुसणार नाही हं. लग्न काय ठरलं, तू तर मला पहिल्या दिवसापासूनच कामाला लावलेस.” तो मिश्किलपणे म्हणाला तशी ती खुदकन हसली.

“चला, म्हणजे मला तुला हसवता आले तर. आता एक डायलॉग राहिलाय, हसताना किती गोड दिसतेस. अशी रडत नको जाऊ ना यार.” तो नाटकी सुरात म्हणाला आणि राशीचे ओठ आणखीनच रुंदावले.

_______


“चल बाई, आता लवकर माझी सून म्हणून घरी ये. तुला सोबत घेऊन मी केव्हा मिरवते असे झालेय मला. आपण दोघी ना मस्त पबमध्ये, किटी पार्टीजना जात जाऊ. तुला बघून माझ्या मैत्रिणी किती जळतील याची कल्पना करूनच अंगावर मूठभर मांस चढल्याचा फील येतो आहे.” राशीची ओटी भरून झाल्यावर रेवती अती आनंदाने काय काय बोलत होती.


“मॉम, इनफ! माझ्या लग्नानंतर तू राशीला घेऊन मिरवशील तर मी कोणाला मिरवणार यार?” आशिष म्हणाला तसे सर्व हसायला लागले.


“ते लग्नावरून आठवलं. आपल्याला हे लग्न जरा लवकर करावे लागेल. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. मला दोन महिन्यांनी जर्मनीला जावे लागणार आहे. गेल्यावर दोन महिने परत यायला जमणार नाही, तेव्हा या दोन महिन्यातच एखादा चांगला मुहूर्त बघून हे कार्य उरकून टाकूया. त्याचं काय आहे ना, मुलं एकदा बंधनात अडकली की माझीही काळजी मिटेल. अशोकराव, तुम्ही काय म्हणता?” मिस्टर अभ्यंकर अंगावरचा कोट सावरत म्हणाले.


“तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण केवळ दोन महिन्यात तयारी करायला आम्हाला जमेल का?” अशोकने चाचरत विचारले.


“बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. तसेही आपल्याला खूप काही फाफटपसारा करायचा नाहीये. त्यामुळे मॅनेज होईल. मला विचाराल तर मी कोर्ट मॅरेज करायला देखील तयार आहे.” आशिष.


“असं कसं? तुमचं हे पहिलेच लग्न आहे. तुमचा योग्य मान तुम्हाला मिळायला नको का?” इतकावेळ शांत असलेला राकेश म्हणाला.


“राशीला दुःखी करून मला कुठलाच आनंद मिळवायचा नाहीये. त्यामुळेच हे लग्न साधेपणाने व्हावे असे मला वाटते.”


"आशिष, दादा म्हणतो ते खरं आहे. तुमचा मान तुम्हाला मिळायला हवा. हे लग्न अगदीच साधेपणाने नको करायला.”राशी राकेशच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली.

हे बोलणेही तिला किती कठीण जात होते हे तिचे तिलाच माहित. या लग्नामुळे ती दुःखी नाही तर खूप आनंदी आहे हे दाखवण्याचा तिचा उगाच सगळा आटापिटा चालला होता.

“आजचा दिवस फारच शुभ होता. रुपाली याचे सगळे क्रेडिट तुला जाते. तुझ्यामुळेच या नात्याला आकार देता आलाय. थँक यू डिअर! ” रुपालीच्या गालावर ओठांची मोहर उमटवत रेवतीने तिला घट्ट मिठी मारली.. अ टाईट हग!


“अगं, रेवा असे का म्हणतेस? आशिष मला माझ्या मुलासारखाच आहे. त्याच्यासाठी मी एवढं करूच शकते. खरं म्हणजे हे सगळं मी आशिषपेक्षा राशीसाठी केलंय. तीसुद्धा मला मुलीसारखीच आहे ना गं?” रुपाली हळवे होत म्हणाली.


“म्हणजे तू दोन्ही पक्षाकडून आहेस तर. मग आता वरमाय म्हणून मी तुला एक जबाबदारी सोपावतेय. आमचे छानसे फोटो काढ ना.” रेवतीने हातातील मोबाईल रुपालीच्या हातात थोपवला.

‘क्लिक, क्लिक, क्लिक..’

पटापट फ्लॅश पडत होते. या आनंदी चेहऱ्याचे फोटो काढताना आपणही याचा एक भाग आहोत या जाणीवने रुपालीचा चेहरा फुलला होता.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
______

🎭 Series Post

View all