प्रीतबंध.भाग-७६

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध.. प्रीतबंध!
प्रीतबंध!
भाग -७६

“म्हणजे तू दोन्ही पक्षाकडून आहेस तर. मग आता वरमाय म्हणून मी तुला एक जबाबदारी सोपावतेय. आमचे छानसे फोटो काढ ना.” रेवतीने हातातील मोबाईल रुपालीच्या हातात थोपवला.

‘क्लिक, क्लिक, क्लिक..’

पटापट फ्लॅश पडत होते. या आनंदी चेहऱ्याचे फोटो काढताना आपणही याचा एक भाग आहोत या जाणीवेने रुपालीचा चेहरा फुलला होता.

_______

“वॉव! ब्युटीफूल!”

हातातील मोबाईलवरची सीमाची नजर केव्हाची दूर हटत नव्हती.

“डॉक्टर सीमा, एकटीच एवढं काय बघते आहेस?”

सीमाच्या फुललेल्या चेहऱ्यावर लक्ष वेधत अभीने विचारले. तो नेमका केबिनमध्ये आला होता आणि त्याचवेळी त्याच्या कानावर तिचे शब्द ऐकू आले.


“ओह,अभिजीत सर? सॉरी, मोबाईलच्या गडबडीत तुम्ही केव्हा आलात ते कळलेच नाही.” ती उठून उभी होत म्हणाली.


“डॉक्टर सिन्हासुद्धा माझ्या सोबत आहेत. ते तरी दिसले की नाहीत?”


“ओह, सॉरी. गुडमॉर्निंग सर.” ओशाळून ती.


“गुडमॉर्निंग! एवढं काय बघत होतीस की आम्ही आल्याचे तुला जाणवले देखील नाही?” त्यांच्या खुर्चीवर बसत डॉक्टर सिन्हांनी तिला विचारले.


“ते.. ते फोटोज होते. माझ्या दादाचे लग्न फिक्स झालेय ना, तर होणाऱ्या वहिनीचे फोटो बघत होते.”


“ओहो! काँग्रच्यूलेशन्स!”


“थँक यू सर. ॲक्च्युली मी सांगणार नव्हते, पण सांगतेच. तुम्ही माझ्या वाहिनीला ना खूप चांगल्या प्रकारे ओळखता. म्हणजे आपल्या हॉस्पिटलमधले सारेच ओळखतात.” ती म्हणाली तसे अभीने तिच्याकडे पाहिले.

“ओह, रिअली? सस्पेन्स सोड आणि कोण मुलगी आहे ते तरी मला बघू दे.” सिन्हा सरांनी असे म्हणताच सीमाने त्यांच्यासमोर मोबाईल ठेवला.


“बघा सर, किती सुंदर दिसतेय ना?”


“राशी? डॉक्टर राशी तुझी होणारी वहिनी आहे?” सिन्हा सरांना केवढा तरी धक्का बसला.


“हम्म. तुम्हाला नव्हतं माहिती ना? मी फक्त अभीजीत सरांनाचं ही कल्पना दिली होती. अभीजीत सर, हे फोटोज बघा ना. हा बघा, माझा दादा आणि राशी मॅम एकत्र किती भारी दिसत आहेत ना?” तिने मोबाईल मुद्दाम अभीपुढे नाचवला.


“हम्म. छान दिसत आहेत.” तो निर्विकार पणे म्हणाला.


“तुम्हाला आनंद नाही झाला?”


“याह, आय एम हॅपी. चला आता कामावर फोकस करूया. आय थिंक आपण उद्याच्या सर्जरीबद्दल डिस्कस करायला इथे एकत्र आलो आहोत, हो ना? “ त्याने सीमाकडे अश्या काही नजरेने पाहिले की तिने लगेच ‘यस सर’ म्हणून हातातील मोबाईल सायलेंट करून बाजूला ठेवून दिला.


“एक मिनिट, सीमा हे काय होतं? राशी आणि तुझा तो सो कॉल्ड दादा यांची काय कहाणी आहे?” सर्जरीवरची चर्चा आटोपल्यानंतर अभी आयसीयूमध्ये गेला तेव्हा सीमाला थांबवत डॉक्टर सिन्हांनी तिला विचारलेच.

“ती फार अशी इंटरेस्टिंग कहाणी नाहीये पण म्हटलं तर तशी क्युटशी लव्ह स्टोरी आहे. दादा आणि डॉक्टर राशी लग्न करत आहेत.” ती स्मित करत म्हणाली.


“तेच विचारतोय, राशी त्याच्याशी का लग्न करतेय?” राग आला असूनही त्यांचा शांत स्वर.


“ते मला काय माहिती ना? मी तर आताच फोटो बघितले. दादा मॅमना लाईक करत होता एवढंच काय ते मला माहित. “ तिचेही तितकेच शांत उत्तर.


“सीमा, मला चिडायला भाग पाडू नकोस. खरं काय ते नीट उलगडून मला सांग. अभीला हे सारं कसं ठाऊक?”


“अहो, मागे मीच त्यांना विचारले होते की अजूनही त्यांचं राशी मॅमवर प्रेम आहे का असं. तर त्यानी नकार दिला आणि दादाचा मार्ग मोकळा झाला.” ती खांदे उडवत म्हणाली.


“तुझ्यासाठी हे सगळं बोलणं किती सोपे आहे ना? पण अभीच्या मनाचा विचार केलाहेस तू?”


“आणखी किती विचार करणार सर? त्यांचा विचार करता करता राशीमॅमबद्दल विचार करणं सुटून जाईल ना? त्यांनाही त्यांचे आयुष्य आनंदात घालवायचा पूर्ण हक्क आहे. अभीजीत सरांसाठी त्यांनी स्वतःवर आणखी किती आवर घालायचा? सॉरी टू से, बट आशिष दादा त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.” ती ‘बेस्ट’ या शब्दावर जोर देत म्हणाली.


“बरं बाई, तू जा आता. तुलाही घरी जायची घाई असेल ना?”


“हो आहेच. लग्नाची शॉपिंग जी करायची आहे. नेमकं लग्न महिन्यावर आलंय आणि माझी काहीच तयारी झाली नाहीये.” ती उठत म्हणाली.

तिचा उत्साह बघून डॉक्टर सिन्हाने डोक्यावर हात मारून घेतला. त्यांची कृती बघून सीमाला हसू येत होते. गालातल्या गालात हसून ती केबिनबाहेर गेली.


“अभीजीत सरऽऽ” राउंडवरून येत असलेल्या अभीला तिने गाठले.

“तुम्हालाही शॉपिंग करावी लागेल ना? एक मस्तपैकी शेरवानी घेऊनच टाका. लग्नात तुम्हाला मिरवावे लागेल ना? त्याचं काय आहे, राशी मॅम कडून आमंत्रण नसलं, तरी माझ्याकडून मात्र नक्कीच असेल. शेवटी माझ्या दादाचे लग्न आहे.”


“सॉरी, मला हे असे लग्ना-बिग्नात मिरवायला अजिबात आवडत नाही.” तिच्यापासून रागाने दूर होत अभी निघून गेला. त्याचे वागणे बघून सीमाला मात्र हसू येत होते.


“तिर सिधा निशाणेपे लगा हैं, देखते हैं आगे क्या होता हैं..”

व्हाट्सअप चॅटिंग उघडून तिने मेसेज टाईप करून तो कोणालातरी पाठवला. त्यावर लगेच रिप्लाय म्हणून तुटलेल्या हृदयाचे आणि हसण्याच्या इमोजींचा वर्षाव सुरु झाला. इमोजी बघून तिचेही ओठ हलले. हसऱ्या चेहऱ्याने ती ओपीडीला गेली.
________


“अभी, असा चेहरा का पाडून बसला आहेस? तुझा चहा देखील गार झालाय. अजून घेतला नाहीयेस. काय झालंय बाळा? बरं वाटत नाहीये का? अभीऽऽ मी तुला काहीतरी विचारतेय.” कुठल्याच प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने विजया वैतागून त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली.


“अभी, काय झालंय?” त्याच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला करत विजयाने आता काळजीने विचारले.


“कुठे काय? काहीच तर नाही.”


“काहीच कसं नाही? तू चक्क रडतो आहेस? का रडतोहेस बाळा?” विजयाच्या जीवाची घालमेल सुरु झाली.


“मम्मा, काही नाही गं. तू चहा गार झाला म्हणालीस ना? दे मी गरम करून घेतो.”


“अभी, काय झालंय?” तो उठला तसा विजयाने त्याचा हात पकडला.


“मम्मा, तुझी लाडकी राशी लग्न करतेय.” शेवटी त्याने सांगितले.


“काय?” त्याच्या हातावरची तिची पकड अचानक सैल झाली.


“तुला तर ठाऊकच असेल ना? तुझा त्यांच्याकडे सतत फोन चालू असतो तेव्हा हेही बोलणं झालंच असेल की.”


“नाही रे.. या विषयावर काहीच बोलणं झाले नाहीये. उलट मागच्या वेळी तर राशीशी सुद्धा माझं बोलणं झालं होतं; तेव्हा तीही काही बोलली नाही. पण अभी, तुझ्या डोळ्यात पाणी का?”


“असंच गं. असं वाटलं, नाती किती लवकर बदलतात ना? तिला आपल्याला साधं सांगावं असंही वाटलं नाही.” तो खिन्न हसून म्हणाला.


“असू दे रे. सांगावे वाटेल तेव्हा सांगतीलच की. राशी नव्याने आयुष्य सुरु करायला बघतेय तर चांगलंच आहे. मी देवाजवळ दिवा लावून आलेच बघ. तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हेच मागणं मागते माझ्या विठुरायाला आणि तुझ्यासाठी दुसरा चहाही घेऊन येते.” त्याचा हातातील चहाचे कप सोबत नेत ती म्हणाली.


‘तुला कसं सांगू मम्मा, त्या मुलाशी लग्न करून तिची कुठलीच इच्छा पूर्ण होणार नाहीये. वरवर आनंदी दिसत असली तरी तिची अवस्था काय असेल हे कळतेय मला. प्रेमातील हे जळणे माझ्यासकट तिच्याही वाट्याला आलेय गं, पण मी काहीच करु शकत नाहीये.’ त्याला पुन्हा हतबल झाल्याची जाणीव झाली.


सीमाच्या मोबाईलमधील सकाळी बघितलेला फोटो त्याला आठवला, आताही ती तशीच मलुल दिसत होती जशी तिच्या लग्नात ती सत्याच्या बाजूला उभी होती. त्याने त्याचे डोळे मिटून घेतले.

महाबळेश्वरचे मंतरलेले दिवस त्याच्या नजरेसमोर फिरू लागले होते. ते चोरटे स्पर्श, एकमेकांना भेटण्याची ओढ, मनातील सारं ठाऊक असतानाही प्रेमाची कबुली ऐकायला आतुरलेले मन. तो सनसेट पॉईंट, सत्याने जुळवून आणलेले ते कॅम्पफायर..त्याने तिच्यासाठी गायलेले गाणे आणि.. सर्वांच्या साक्षीने तिच्यासमोर व्यक्त केलेले प्रेम! तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, हलकेच मारलेली मिठी, ते बोलके स्पर्श..! एखाद्या चित्रफितीसारखे सारे सोनेरी त्याच्या नजरेसमोरून पुढे सरकत होते.

‘सत्या, तू हवा होतास रे आता. तू असतास तर चित्र काहीतरी वेगळे असते ना यार. राशी माझी नसती तरी किमान नजरेसमोर तर असती. नेहमीप्रमाणे तू काहीतरी जुगाड केला असता ना. का गेलास तू मला सोडून? तुझ्याशिवाय माझे कुठलेच पान हलत नाही हे ठाऊक असतानाही मला एकटं टाकून का गेलास रे?’ रडू उरात दाबून ठेवल्यामुळे त्याचे श्वास जड आले होते.

‘असे तिन्ही सांजेचे रडू नये.’ कधीतरी विजयाने त्याला सांगितलेले आठवले. एक खोल श्वास घेत तो बाहेर गॅलरीमध्ये आला.

मावळतीला झुकलेला सूर्य हळूहळू क्षितिजाआड दडू लागला होता. एरवी सुंदर भासणारे ते दृश्य त्याला भकास वाटू लागले. राशीच्या साथीने महाबळेश्वरला अनुभवलेला सूर्यास्त या सूर्यास्तावर मात करू पाहत होता. हळूहळू हातून सारेच निसटून गेल्याची जाणीव दृढ होत होती. आयुष्याला लाभलेले रितेपण आणखी विस्तारू लागले होते.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
______


🎭 Series Post

View all