Login

प्रीतबंध.भाग -७७

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध.. प्रीतबंध!
प्रीतबंध!
भाग -७७


मावळतीला झुकलेला सूर्य हळूहळू क्षितिजाआड दडू लागला होता. एरवी सुंदर भासणारे ते दृश्य त्याला भकास वाटू लागले. राशीच्या साथीने महाबळेश्वरला अनुभवलेला सूर्यास्त या सूर्यास्तावर मात करू पाहत होता. हळूहळू हातून सारेच निसटून गेल्याची जाणीव दृढ होत होती. आयुष्याला लाभलेले रितेपण आणखी विस्तारू लागले होते.

________


“..बाबा, मी राशीला बाहेर घेऊन जाऊ शकतो ना? अर्थात तुमची काही हरकत नसेल तर, हं.” चहाचा कप ट्रेमध्ये ठेवत आशिषन अशोकला विचारत होता.

बघण्याचा कार्यक्रम उलटून आठवडा लोटला होता आणि आता गुरुजींकडून मुहूर्ताची तारीख घेऊन ती सांगायच्या निमित्ताने तो त्याच्या होणाऱ्या सासरी आला होता आणि आता त्याला राशीसोबत काही वेळ घालवायचा म्हणून तिला बाहेर घेऊन जायचे होते.


“आम्हाला काय हरकत असणार आहे? तुमचं लग्न होणार आहे तर तुम्ही एकमेकांना भेटू शकताच की.”


“हो आणि हा मुहूर्त देखील पंधरा दिवसांवरचा निघालाय. तुम्हाला एकमेकांना नीटस जाणून घेता आलं नाहीये. तेव्हा जा आणि सोबत छान वेळ घालवा.” ट्रे घेण्यासाठी उठलेल्या नंदिनीने सल्ला दिला.


“हो, पण आशिषराव फारसा वेळ नका लावू हं.”


“नाही आई,, काळजी करू नका. साडेआठ -नऊ पर्यंत मी तिला घरी आणून सोडेल.” आशिषने त्यांना आश्वस्त केले.


“निघूया?” त्याचा राशीला प्रश्न.


“माझ्या लाडक्या नणंदेला असेच कसे घेऊन जाणार? थोडं आवरून तर घेऊ द्या. चल गं राशी.” राशीचा हात पकडून नंदिनी तिला आत घेऊन गेली.


“वहिनी, काय गं हे? इतके हेवी ड्रेस आणि दागिने? प्लीज, काहीच नको ना गं.”


“राशी, भूतकाळ विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायचे ठरवले आहेस ना? मग आता नटायला काय जातंय? आशिषरावांना देखील कळलं पाहिजे ना की ते खूप हँडसम असतील तरी आमची राशीही काही कमी नाही ते.”


“वहिनी..”

“बरं बाई, राहिलं. हे भरजरी कपडे नी दागिने राहू दे. हा ड्रेस नी त्यावर हे झुमके तरी घाल. तुला सुंदर दिसण्यासाठी नटायची गरज नाहीये पण त्या झुमक्यांना तेवढेच तुझ्या कानात झुलायला मिळेल.” तिच्या कानात झुमके घालून देत नंदिनी हसून म्हणाली.


“वहिनी, शेवटी तुझ्याच मनाचे करण्यात तू एक्स्पर्ट आहेस हं.” ओठ रुंदावत राशी ड्रेस बदलायला गेली.


“आईबाबा येते मी.” ती खोलीबाहेर आली तशी सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.


“हो गं. व्यवस्थित जा.”

“किती गोड दिसत होती हो आपली लेक!” ती नजरेआड होताच सुरेखाने डोळे पुसले.


“हो आणि आशिषराव देखील तिला किती जपतात गं.”


“आतातरी या सुखाला कोणाची नजर लागू नये म्हणजे झालं.” दिव्याची वात सरळ करत सुरेखाने देवापुढे हात जोडले.

________


“लग्नाची तारीख पंधरा दिवसांनी निघालीय. तुला कसले दडपण तर आले नाही ना?” आशिष राशीला विचारत होता.

दोघे नुकतेच एका रेस्टॉरंट मध्ये आले होते. आकाशी रंगाचा शर्ट आणि करड्या रंगाची जीन्स, हातात ब्रँडेड घड्याळ, गोरा वर्ण आणि डोळे? काळे डोळे.. सत्यासारखे! राशी तर त्याच्या डोळ्यात बघणेही टाळत होती. जितक्या वेळ नजरानजर व्हायची प्रत्येक वेळी सत्या आठवायचा आणि सत्याबरोबर अभीही.


“राशी, मी तुला काहीतरी विचारतोय. तुला दडपण तर नाही ना आलेय?” त्याने त्याचा प्रश्न रिपीट केला.


“नाही.” मान हलवून हलक्या स्वरात ती उत्तरली.

तो आणखी काही बोलणार तेवढ्यात त्याच्या मोबाईलची मेसेज ट्यून वाजली.


“एक्सक्युज मी..” म्हणत त्याने मेसेज बॉक्स उघडला.


“सॉरी, ते माझ्या लक्षातच आले नाही..” मोबाईल बाजूला ठेवत जरा ताठ बसत तो म्हणाला.


“काय?”


“हेच की तू सुंदर दिसते आहेस हे तुला सांगितलेच नाही. म्हणजे तशी रोजच सुंदर दिसतेस, आज आणखी छान दिसते आहेस.” तिच्याकडे बघून तो म्हणाला.


गुलाबी रंगाचा घेरदार अनारकली कुर्ती आणि चुडीदार तिने घातला होता. गुलाबी रंगाची चंदेरी किनार असलेली आणि त्याच रंगाची बारीक फुले असलेली ओढणी तिने समोरून ओढून घेतली होती. नको नको म्हणत असतानाही नंदिनीने तिच्या चेहऱ्यावर कॉम्पॅक्ट पावडर आणि ओठावर गुलाबी लिपस्टिक लावली होती. जोडीला कानात गुलाबी -पांढऱ्या कॉम्बिनेशनचे झुमके घातले होते.

तिचे हे साधे सोज्वळ रूपदेखील एखाद्याला प्रेमात पाडायला पुरेसे होते आणि समोर तर तिच्यावर प्रेम करणारा आशिष बसला होता. तिचे रूप बघून स्तुती करण्याची संधी तो कशी वाया घालवणार होता?


“रोज सुंदर दिसते म्हणजे? तुम्ही मला रोज बघता?” नजर किंचित वर करून तिने विचारले.


“न.. नाही. रोज बघत नाही. म्हणजे तू खरंच सुंदर आहेस तर रोजच सुंदर दिसत असणार ना? सो आय जस्ट मेक अ कमेंट.” दुसरं काही न सुचून त्याने खरेखरे सांगून टाकले. त्याचा उडलेला गोंधळ बघून तिचे ओठ हलकेच हलले.


“आशिष, मला तुम्हाला काही सांगायचे आहे.” केव्हाचा मनात घोळणारा विचार तिच्या ओठावर येऊन टेकला होता.


“हं, बोल ना.” पुढ्यात असलेल्या सूपचा आस्वाद घेत तो.


“म्हणजे.. मला माहिती आहे की तुम्ही खूप श्रीमंत आहात, तुमचा मोठा बिझनेस आहे त्यामुळे पैशांची काही कमी नाही. पण तरीही..”


“तरीही काय?”


“मला माझे हॉस्पिटल कंटिन्यू करू द्याल ना? डॉक्टर होणं माझं स्वप्न होतं. आयुष्यातील सगळी स्वप्न धुळीला मिळाली. किमान हे तरी पुरे होऊ द्याल? तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नसणार ना?” हळव्या स्वरात तिने विचारले.


“अगं, अशी काय बोलतेस? मला काय प्रॉब्लेम होणार आहे? उलट डॉक्टर बायको असल्याचे फायदे काय असतात हे माझ्याशिवाय आणखी चांगलं कोण सांगू शकेल? म्हणजे.. भविष्यात मी दुसऱ्यांना सांगू शकेल ना?” स्वतःचे वाक्य दुरुस्त करत तो पुढे म्हणाला. त्याच्या गडबडण्याकडे मात्र तिचे फारसे लक्ष नव्हते.


“माझे पेशंट म्हणजे माझा श्वास आहे. त्यांच्यावर ट्रीटमेंट करताना जे समाधान मला मिळते ते कशातही मिळत नाही. जर का हेच माझ्या हातून सुटलं तर मग मी काहीच उरणार नाही.” ती तिचे बोलणे पुरे करत म्हणाली.


“हो अगं, डोन्ट वरी. तुझा श्वास मी हिरावणार नाही. उलट तुझी सारी स्वप्न पूर्ण होतील असा तुला विश्वास देतो. मी आहे ना.” तो तिला दिलासा देण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

“आता जेवण ऑर्डर करूया? घरी जायला उशीर नको व्हायला.” घड्याळाकडे पाहत तो म्हणाला.


तिने केवळ मान डोलावली.


आशिष एक पार्टनर म्हणून तिला तसा बरा वाटत होता. त्याचे बोलणे, तिला आवडेल तसे वागणे, तिची काळजी घेणे, आईवडिलांचा आदर करणे.. सारंच छान छान होते. पण तरीही लाईफ पार्टनर म्हणून तिला काहीतरी मिसिंग वाटत होते. जी तिची आणि अभीची जुळलेली केमिस्ट्री होती.. भूतकाळातील. एकमेकांच्या मनातील सगळ्या गोष्टी न सांगता कळत होत्या. आता मात्र दोघेही परस्परांसाठी अनोळखी झाले होते. त्यांच्यासाठी तेच योग्य होते.. कदाचित!

कदाचित आशिषच आता तिचे भविष्य होता.


जेवताना दोघांचे थोडे जुजबी बोलणे झाले. राशीला स्वतःहून काही बोलायला सुचत नव्हते. आशिषच्या बोलण्याला ‘हो’ ‘नाही’ एवढेच उत्तर ती देत होती.


“निघूया?” बिल देऊन झाल्यावर त्याने तिच्याकडे पाहिले.


“हम्म.” खुर्चीवरून यांत्रिकपणे उठत तिने पर्स हातात घेतली.


“राशी, मला वाटलं आज तू मला माझ्याबद्दल काही विचारशील पण काहीच विचारलं नाहीस. स्ट्रेन्ज ना?”


“तुम्हाला माझ्याबद्दल सारे काही ठाऊक आहे हेच माझ्यासाठी पुरेसे आहे.” समोर बघत ती म्हणाली.


“तशी आपली ही डिनर डेट माझ्या कायम लक्षात राहील.” तिच्याकडे बघून तो मिश्किल हसला.


“आता आपल्याला फारसे भेटता येणार नाही ना. पंधरा दिवसात भरपूर काही करायचे आहे. शॉपिंग, ज्वेलरी.. बाकी दिवस तर असेच जातील. त्यानंतर मेहंदी, हळद.. मला तर वाटते आता आपण थेट लग्नमंडपातच भेटणार आहोत की काय?” तिच्याकडे एकवार बघून त्याने खांदे उडवले.


“म्हणून आजची ही डिनर डेट?” तिने त्याला प्रश्न केला.


“हम्म. पुढे जाऊन तू कधी म्हणू नयेस ना की इतकं लग्न झालंय पण त्यापूर्वी साध्या डेटवर देखील नेलं नाहीस म्हणून. म्हणून ही डिनर डेट. तुझ्या.. आय मिन आपल्या कायम लक्षात राहावी म्हणून.” तिच्या प्रश्नावर त्याने लगेच उत्तर दिले. जणू काही त्याला तिच्या प्रश्नाचीच वाट होती.


“आशिष, तुम्ही माझा किती विचार करता?” त्याच्या वागण्याने तिला अपराधी वाटत होते. तो जितके मनापासून तिच्या जवळ यायचा प्रयत्न करत होता, तिचे मन तितक्याच आवेगाने तिला मागे खेचत होते.


“हं, काय करणार? शेवटी हाय कमांडचा आदेश आहे, टाळता येत नाही ना?” एक सुस्कारा सोडत तो.


“हाय कमांड? म्हणजे कोण? तुमच्या मॉम का?”


“मॉम? कळेल तुला लवकरच. पण एवढं खरं की मला तिचा आदेश मोडता येत नाही. चुकूनही नाही.” तो हसत म्हणाला.

तुम्हाला कळलं? कोण आहे ही हाय कमांड? याचे उत्तर मी तरी इतक्यात सांगणार नाही. त्यासाठी तुम्हाला कथेचे पूर्ण भाग वाचावे लागतील. तोवर तुम्ही गेस करून कमेंट मध्ये उत्तर सांगू शकता.
पुढील भाग लवकरच!
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
______

🎭 Series Post

View all