प्रीतबंध!
भाग -७८
भाग -७८
“हं, काय करणार? शेवटी हाय कमांडचा आदेश आहे, टाळता येत नाही ना?” एक सुस्कारा सोडत तो.
“हाय कमांड? म्हणजे कोण? तुमच्या मॉम का?”
“मॉम? कळेल तुला लवकरच. पण एवढं खरं की मला तिचा आदेश मोडता येत नाही. चुकूनही नाही.” तो हसत म्हणाला.
“त्यांचा खूप दरारा आहे म्हणजे.”
“हो तर, आहेच.” तो.
“पण प्रेमही तेवढंच आहे ना? नाहीतर एका विधवा मुलीला आपली सून करून घ्यायला त्या का तयार झाल्या असत्या?” ती खालच्या स्वरात म्हणाली.
ती म्हणाली तसे त्याने करकचून ब्रेक दाबला.
“अहो, हळू. केवढ्याने ब्रेक लावताय?” तिची छाती धडधडायला लागली होती.
“ओह, सॉरी, सॉरी. ते घर आलं ना. गप्पांच्या ओघात कळलेच नाही.” कसनुसे हसत तो म्हणाला.
“आता जास्त वेळ मला थांबता येणार नाही. घरच्यांचा निरोप घेऊन लगेच निघतो. उद्या सकाळच्या फ्लाईटने मला बंगलोरला निघावे लागेल.” कारमधून बाहेर येत तो.
“चालेल ना. आशिष, इफ यू डोन्ट माईंड मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे, तुम्ही बंगलोरहून कारने इथे आलात का?”
“नाही. ही कार माझ्या मित्राची आहे. आज हवी होती तर मागून घेतली.”
“ओह. फार दगदग केलीत तुम्ही. तारखेबद्दल फोनवरही बोलणं झालं असतं.”
“हो, पण ही डेट झाली नसती ना?”
“हो आणि तुमच्या हाय कमांडचा आदेश तुम्ही मोडू शकत नाही.”
“करेक्ट!” तो हसला तसे तिच्या ओठावरही हसू उमटले.
_________
“आशिषराव छान आहेत ना गं?” रात्री नंदिनी राशीच्या खोलीत तिच्याशी गप्पा मारायला आली होती.
“हम्म.”
“त्यांच्याशी तू थोडी थोडी खुलते आहेस. छान वाटलं. राशी, हसताना आणखी सुंदर दिसतेस तू.” बाहेर दोघांना हसून बोलताना नंदिनीने पहिले होते.
“वहिनी, प्रत्येक गोष्ट दिसते तशी नसते गं. पण हो, तसे ते चांगलेच आहेत.”
“राशी, आशिषरावांच्या आईंचा फोन आला होता. कपड्याबद्दल त्या आईंशी बोलल्या. त्यांचे कपडे ते आणि आपले कपडे आपण घेणार आहोत. तितक्या लांबून सारखं सारखं त्यांना इकडे यायला वेळ पण नाहीये ना.”
“ठीक आहे. तसंही उद्या माझा पेमेंट होईलच. जी खरेदी करायची ती आई आणि तू मिळून करून घे.”
“पैश्यांचा प्रश्न नाहीये गं वेडाबाई. कपडे घ्यायला तू सोबत हवीस की नाही. तुझ्या चॉईस शिवाय तुला कसे कपडे घेणार?”
“वहिनी, प्लीज मला या खरेदीमध्ये नको ना ओढू. तुम्ही जे घ्याल ते मला आवडेल.”
“राशी..”
“वहिनी, समज ना गं. मी बदलायचा प्रयत्न करतेय ना? पण लगेच पूर्ण नाही बदलता येणार मला. मनात एक वेगळेच काहूर माजलेले असते गं. तुझा चॉईस खूप चांगला आहे. तुला माझ्यासाठी जे आवडेल ते तू खरेदी करू शकतेस. मला चालेल.” तिच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली.
“ठीक आहे. मी तुला फोर्स करणार नाही. आता टेंशन न घेता नीट झोप. चिनू बघ, तुझी वाट बघता बघता लवकरच झोपी गेली. तूही आता आराम कर.” तिच्या जवळून उठत नंदिनी भिंतीजवळ गेली.
“वहिनी हे काय करते आहेस?” नंदिनीला कॅलेंडरवर पेनाने एका आकड्याला गोल करताना बघून राशीने विचारले.
“दहा तारखेला मार्क करून ठेवतेय. उठता बसता तुला ही तारीख दिसेल तसे भूतकाळ बाजूला सारून आता केवळ आशिषराव तुझ्या आयुष्यात आहेत हे लक्षात राहील.” तिच्या नाकाला हलकेच ओढत नंदिनी निघून गेली.
नंदिनी गेल्यावर राशी कॅलेंडरकडे बघून खिन्न हसली.
तिला वाटलं, कशी ही नियती? तिला वाटेल तसे वळण घेईल, वाटेल तिथे एकटं सोडेल अन वाटेल तेव्हा कोणाच्याही हातात आपला हात देऊन मोकळी होईल. खरंच आपण नियतीच्या हातची कठपुतळी आहोत असं म्हणतात ते काही खोटं नाहीये. कितीही काही केलं तरी आपल्याला तिच्याच प्रवाहाबरोबर पुढे जावं लागतं.. कधी स्वतःच्या खुशीने तर कधी तिच्याच मर्जीने!
ती उठून कॅलेंडरजवळ गेली, नंदिनीने आताच दहा तारखेभोवती केलेले लाल रंगाचे वर्तुळ तिला खिजवत आहे असे तिला वाटले. दहा तारखेवरून हात फिरवत तिची बोटे मागे सरकू लागली आणि सातच्या आकड्यावर येऊन विसावली.
सात तारीख! तिच्या हृदयात आत खोलवर दडलेली ती तारीख! अभी आणि सत्याच्या वाढदिवस याच तारखेला असायचा म्हणून तर त्या महिन्यातील ती तारीख खास होती.
“..देवाला आम्हाला साथ साथ एकत्र या जगात आणायचे होते म्हणून त्याने आमच्यासाठी सात तारीख राखीव ठेवली होती. फ्रॉम हेवन, वी गॉट नंबर सेव्हन!”
इंटर्न्स असताना त्यांचा धूमधडाक्यात साजरा झालेला वाढदिवस आणि त्यावेळी सत्याने केलेला हा पुळचट विनोद!
“इऽऽय सत्या, खूपच पांचट जोक होता हं हा. तुझ्या मम्माची लास्ट डेट तीस तारीख होती म्हणून ड्यू डेट सात आली हं. हे तर फर्स्ट इअरचं शेम्बडं पोरगंही सांगेल.” मंजिरी त्याला टपली मारत म्हणाली.
“ओ मोठ्या डॉक्टरीन बाई, डॉक्टर आहेस म्हणून कळतंय तुला. आम्ही डॉक्टर होण्यापूर्वी आमचं हेच लॉजिक होतं हं आणि ते कायम राहील. काय रे भावा?” त्याने अभीकडे बघून डोळ्याने इशारा केला.
“यस ब्रो यू आर राईट!” अभी.
“काय राईट?”
“तेच रे. फ्रॉम हेवन, वी गॉट नंबर सेव्हन! हम साथ साथ हैं!” त्याला केक भरवत अभीने घट्ट मिठी मारली आणि त्याला केक भरवत सत्याने ती मिठी आणखी घट्ट केली..
.. सातच्या आकडयावरून हात फिरताच राशीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. त्यांचा बिलंदर ग्रुप, एकमेकांच्या काढलेल्या खोड्या, एकत्र केलेल्या मस्त्या. महाबळेश्वर ट्रिप, कोणाला मिळालेलं प्रेम तर कुणाची हरवलेली प्रीत.. नंतर एमडीची तयारी. सिन्हाज मधली जॉईनिंग, लग्न.. सत्याचा ॲक्सीडेन्ट आणि अभीचे ऑपरेशन..!
आठवणीत पुन्हा फक्त सत्या आणि अभी.. जिथून आठवणीचे वर्तुळ सुरु झाले तिथेच येऊन ते पूर्ण झाले.
‘सत्या..किती रे मी प्रयत्न करायचा? आणि दरवेळी मीच का रे हरायचे? का मी काहीच विसरू शकत नाहीये? जितक्या ताकतीने पुढे पाऊल टाकतेय, का तू मला परत तितक्याच ताकदीनिशी अभीजवळ नेऊन उभे करतोस? कशासाठी?’ तिचा उमाळा दाटून आला.
“आत्तू, तू तिकडे काय करतेस? झोपायला ये ना. आय एम वेटिंग.” चिनूचा आवाज आला तशी राशी बेडकडे वळली. चिनू झोपेतून उठून बसली होती.
“हो रे राजा, मी आलेच बघ.” डोळे पुसून ती तिच्याजवळ गेली आणि तिला कुशीत घेऊन झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागली.
_______
“गुडमॉर्निंग सर!”
अभी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करणार तोच त्याला मागून एक गोड आवाज कानावर पडला.
“डॉक्टर सीमा, सकाळी सकाळी माझा मुड खराब होणार नाही याची खबरदारी घे, प्लीज.” मागे वळून तो सीमाला म्हणाला तसे तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले.
“अभिजीत सर, हे असं नाही चालणार हं. तुमचं म्हणजे कसं आहे ना, कि चित भी मेरी आणि पट भी मेरी टाईप. म्हणजे तुम्हाला ग्रीट केलं तरी प्रॉब्लेम आणि नाही केलं तरी चिडचिड. मग आमच्यासारख्या बिचाऱ्या लोकांनी काय करावं बरं?” तिचे डोळे तसेच मोठे होते.
“ते डोळे आधी जागेवर ठेव आणि तुझी चिवचिव बंद करून राउंडवर जा. इथे येऊन आपली कामं देखील करायची असतात हे विसरू नको.”
आशिष आणि राशीचे एकत्र फोटो दाखवल्यापासून अभी सीमाशी जरा फटकून वागत होता. आजही तिला बघून लगेच त्याच्या रागाचे बटण ऑन झाले.
“अरे हो, कामावरून आठवले. तुमच्याशी एक महत्त्वाचे काम होतेच. हे घ्या इन्व्हिटेशन कार्ड. दहा तारखेला दादूचे लग्न आहे आणि तुमचे येणे आवश्यक आहे, त्यासाठी ही निमंत्रण पत्रिका. काय ना हे सगळं इतकं घाईघाईत होतेय म्हणून मग काकाने जास्त कार्ड्स छापले नाहीत. खूप साऱ्या लोकांना व्हाट्सअप वरतीच निमंत्रण दिलीत आणि केवळ खास लोकांसाठी कार्ड्स छापलेत. त्यामुळे माझ्याकडे सिन्हा सर आणि तुमचे कार्ड आहे. बाय द वे, राशीमॅम कडूनही तुम्हाला बोलावणे असेलच ना?“ तिची अखंड बडबड परत सुरु झाली.
“हो आहे. सुरेखा काकूंनी स्पेशल फोन करून आम्हाला निमंत्रण दिलंय. आतातरी तुझं समाधान झालं का? आणि हो, हे तुझे कार्ड नकोय मला. बाय अँड डोन्ट फॉलो मी.” तिच्यावर खेकसत तो झर्रकन केबिनच्या दिशेने निघून गेला.
‘डॉक्टर अभिजीत.. मी तुम्हाला का फॉलो करू? पण लवकरच तुमचे पाय मात्र मला फॉलो करत माझ्यामागे येणार आहेत. सध्या तुमच्यातील सत्यजीत सरांचा मुड ऑन झालाय; पण जेव्हा तुम्ही डॉक्टर अभिजीत म्हणून विचार करायला लागाल, तेव्हा तुम्हाला माझीच मदत घ्यावी लागेल हे विसरू नका.’
समोरून धाडधाड निघून जाणाऱ्या अभीला बघून तिच्या ओठावर मंद स्मित पसरले.
प्रिय वाचकहो, मागील भागात एक प्रश्न विचारला होता. काहींनी त्याचं उत्तर विजया सांगितले तर मॅक्सिमम वाचकांनी डॉक्टर सीमाचे नाव घेतले. हे उत्तर अर्थातच बरोबर आहे.. की चूक? येणाऱ्या काही भागानंतर कळेलच. तोवर स्टे ट्यून्ड!
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
______
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा