प्रीतबंध.भाग -७९

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध.. प्रीतबंध!

प्रीतबंध!
भाग -७९

‘डॉक्टर अभिजीत.. मी तुम्हाला का फॉलो करू? पण लवकरच तुमचे पाय मात्र मला फॉलो करत माझ्यामागे येणार आहेत. सध्या तुमच्यातील सत्यजीत सरांचा मुड ऑन झालाय; पण जेव्हा तुम्ही डॉक्टर अभिजीत म्हणून विचार करायला लागाल, तेव्हा तुम्हाला माझीच मदत घ्यावी लागेल हे विसरू नका.’

समोरून धाडधाड निघून जाणाऱ्या अभीला बघून तिच्या ओठावर मंद स्मित पसरले.


“सिस्टर, काय आहे हे? हे असे केसपेपर्स? कुठली एंट्री कुठे करायची हे सुद्धा कळत नाही मग कशाला जॉब करता? पेशंटच्या जीवाशी खेळायला येता का इथे?” जनरल वॉर्डमध्ये राऊंडवर असताना एका छोट्याश्या चुकीसाठी तिथल्या नर्सवर अभी मोठयाने ओरडत होता.


“आज सरांना काय झालंय? यापूर्वी त्यांना असं कधी पाहिलं नव्हतं.” एकदोघींमध्ये एव्हाना कुजबुज सुरु झाली होती.


“त्यांच्या शरीरात लाव्हा तयार झालाय, तो बाहेर पडतोय. फक्त कोणी त्यांना बॅकआन्सर देऊ नका नाहीतर त्या तप्त लाव्ह्यासारखा त्यांचा हातसुद्धा गालावर कधी आणि कसा उमटेल कळणारही नाही.” त्यांच्यात येत सीमाने बारीक आवाजात उत्तर दिले, त्यासरशी तिथल्या नर्सेसचा हात आपसूकच गालावर गेला.


“मॅम, हार्ट ट्रान्सप्लांटनंतर असे साईड इफेक्ट होतात का?” नुकतेच नव्याने जॉईन झालेल्या एका नर्सने विचारले तसे सीमाने तिला खालून वरपर्यंत एकवार न्याहाळले.


“हम्म. तू जरा त्यांच्यापासून लांबच रहा. काय ना, त्यांच्या शरीरातील लाव्हा नको त्या ठिकाणी बाहेर पडतो आणि जिथे गरज आहे तिथे मात्र शब्दही बाहेर पडत नाही. म्हणून एक फुकटचा सल्ला देतेय, सरांपासून जपून रहा.”

तिच्या कानापाशी कुजबुजत सीमा तिच्या पेशंट्सकडे निघून गेली. ती बिचारी नर्स मात्र घाबरून अभीच्या नजरेत येणार नाही अशी दूर राहून काम करायला लागली.


“तू तिथे काय करतेस? तुला स्पेशल इन्व्हिटेशन देऊन काम समजवावे लागेल का?” त्या नवख्या नर्सवर तो खेकसला तसे ती बिचारी डोळ्यात पाणी घेऊन कामाला लागली.


“व्हॉट द हेल? व्हाय यू आर क्राईंग? मी काय तुला खातोय का?” तिच्या चेहऱ्यावरचे भेदरलेले भाव बघून त्याला आणखी चीड आली आणि राऊंड तसाच सोडून तो केबिनमध्ये निघून गेला.


“मला हे काय होतंय? का असा वागतोय?”

आरशासमोर उभा राहून तो स्वतःला विचारत होता. आल्यापासून स्टाफवर नुसती चिडचिड सुरु होती. परिणामी त्याचा गोरा चेहरा लाल झाला होता अन् डोळ्यातून नुसता जाळ बाहेर पडत होता.

स्वतःला न्याहाळत त्याने अलवारपणे डोळे मिटून घेतले. आता श्वास हळूहळू नियंत्रित होऊ लागले. डोळ्यातून बाहेर पडलेले काही थेंब अलगद गालापर्यंत पोहचले होते. क्षणात त्याला एक हुंदका दाटून आला. त्याने दोन्ही हातांच्याओंजळीत चेहरा लपवून घेत अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

दोन दिवसांपूर्वीचे त्याचे आणि विजयाचे झालेले बोलणे त्याला आठवले. सुरेखाने म्हणजे राशीच्या आईने तिला फोन करून लग्नाबद्दल कळवले होते.


“..राशीने लग्नाला होकार दिला, हीच आमच्यासाठी आश्चर्याची बाब होती हो विजयाताई. आशिषराव खूप चांगले आहेत. पोरीला आयुष्यात कसले दुःख वाट्याला येऊ नये एवढीच अपेक्षा आहे.”


“सुरेखाताई, आता कुठलेच दुःख नसणार बघा. तिला हवे असलेले सर्व सुखं तिच्या पायाशी असेल. पोरीने योग्य निर्णय घेतला हो.’ विजया डोळे पुसत म्हणाली.


“विजयाताई, तुम्ही याल ना हो लग्नाला?” सुरेखाचा हळवा स्वर.

“या आनंदाच्या क्षणाट सहभागी व्हायला कोणाला आवडणार नाही? पण नकोच आमचं येणं. मला, यांना आणि अभीला बघून तिला पुन्हा तिचा भूतकाळ आठवेल. या आनंदक्षणी भूतकाळाच्या दुःखद आठवणीचे कुठलेच गालबोट नको हो. नंतर कधी मात्र नक्कीच भेटेल.” मनावर दगड ठेवून ती म्हणाली.


“विजयाताई..”


“सुरेखाताई, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. राशी मला माझ्या मुलीसारखी आहे. तिच्या पुढच्या आयुष्यात कसले वादळ नको म्हणून मी हे बोलतेय. तुम्ही समजून घ्याल ना?” दोघींच्याही डोळ्यात अश्रुंनी गर्दी केली होती.

.. विजयाचे बोलणे आठवून अभीने लांब श्वास घेऊन हलक्या हाताने अश्रू पुसले.


‘राशी, इथेच थांबायची होतीस ना यार. का माझ्यापासून लांब निघून गेलीस? तू इथे असतीस तर कदाचित काहीतरी केले असते मी. तुझ्यावर किती प्रेम आहे हे घरी सांगू शकलो असतो कदाचित.. आता मात्र सगळे मार्ग संपलेत. एकटा झालोय गं मी, अगदी एकटा!’

केबिनच्या दाराजवळ नर्सची हालचाल जाणवली तसे त्याने बेसिनचा नळ सुरु करून चेहऱ्यावर पाण्याचा शिपका मारला आणि चेहरा पुसून ओपीडी साठी सज्ज झाला. त्याचे पेशंट आणि तो.. आता इतर गोष्टींचा विचार करायला वेळ नव्हताच.

_______


“हॅपी बर्थडेऽऽ!” रात्री बाराचा ठोका पडला आणि कानावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.

“मम्मा, पप्पा.. तुम्ही या वेळेला?” यावेळी अभीला हा अनपेक्षित धक्का होता.


“तुझा वाढदिवस असताना आम्ही आणखी कुठे असणार? बरं ते सोड. केक कट करायला बाहेर ये.” वरद अभीला हॉलमध्ये घेऊन येत म्हणाला.


“पप्पा काय हे?” सुंदर डेकोरेट केलेला हॉल बघून त्याचे डोळे पाणावले.


“माझ्या लेकाचा वाढदिवस असल्यावर दुसरं काय करणार? बघ केक देखील रेडी आहे.” टेबलवर केक ठेवत विजया.


“मम्मा, अगं काय गं हे? सत्याशिवाय हा दिवस मला नको आहे गं. तोच नाही तर कसा हा दिवस साजरा करू सांग ना?” विजयाचा हात हातात घेत तो कापऱ्या स्वरात म्हणाला.


“अभी, सत्याचे नसणे आम्ही स्वीकारलेय. तो नसला तरी तू आहेस की आमच्याजवळ. तो नसला तरी त्याचे अस्तित्व तुझ्यात जाणवते. तुझ्या रूपाने तोही इथेच आमच्यासोबत आहे रे. म्हणून तर मी दोघांच्याही चॉईसचा केक बनवलाय. आतातरी कट करशील ना?” तिच्या डोळ्यात अर्जव.

‘हॅपी बर्थडे सत्यजीत अँड अभिजीत!’

केकवरील कोरीव अक्षरातील शुभेच्छा बघून त्याचे मन भरून आले. सत्याला आवडायचा म्हणून त्यांच्या लहाणपणापासून विजया घरीच केक बनवायची. मग तो कापताना दोघांमध्ये कायम चढाओढ. सत्या मोठा म्हणून त्याला आधी कट करण्याचा मान हवा असायचा तर लहान म्हणून अभीला तो कट करायचा असायचा. मग विजया दोघांना जबरदस्तीने एकत्र केक कापायला लावायची.

अगदी मागच्या वर्षीही दोघांनी हा धिंगाणा घातला होता.


मागचे सारे काही आठवत अभीने केक कापला आणि दोघांना भरवला.

“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!” विजयाने त्याच्या माथ्यावर ओठ टेकवले.

“वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा.” वरदने त्याला मिठी मारली आणि तिघांनीही इतका वेळ थोपवून ठेवलेले अश्रू वाट काढत बाहेर पडले.

झोपायला न जाता तिघेही रात्रभर हॉलमध्येच आठवणींना उजाळा देत बसले होते. सोफ्यावर बसलेल्या विजयाच्या मांडीवर अभी डोके ठेवून शांत लेटला होता आणि बाजूलाच वरद त्याचा हात घेऊन बसला होता. आठवणींच्या गप्पामध्ये रात्र कधी सरली तिघांनाही कळले नाही.

_______


“राशी, हे गं काय? मेहंदीची वेळ झालीये आणि तू अशीच बसली आहेस? डॉक्टर रुपाली मेहंदीवाल्या ताईंना घेऊन आल्या आहेत आणि आजूबाजूच्या काही बायकाही येऊन बसल्यात. तुझं आवरलं असेल तर लवकर चल ना.” नंदिनी राशीला बोलवायला आली होती.

“वहिनी तुम्ही काढून घ्या ना. मी जरावेळ इथेच थांबते.”

“राशी, काही झालं का?”

“काही नाही गं, जरासं अस्वस्थ वाटतंय. वहिनी, तुमची मेहंदी झाली की त्या ताईला इकडेच पाठवून दे ना. मी इथेच काढेन.”

नंदिनीने थोड्या सांशकतेने तिच्याकडे पाहिले आणि मग ‘ठीक आहे’ म्हणून ती निघून गेली.

______

‘राशी कॉलिंग..’

अभीचा मोबाईल केव्हाचा वाजत होता. आता कॉल कट होईलच की त्याने मोबाईल कानाला लावला.

“हॅलो, अभीऽ, हॅपी बर्थडे!” तिचा बारीक आवाज ऐकून अभीच्या हृदयाची तार हलकेच छेडल्या गेली.

‘राशी? तुझा फोन अनपेक्षित होता गं.’ कानाला मोबाईल आणि त्याचे मनात बोलणे.

अनपेक्षित तर तिच्यासाठीही होते. हातात मोबाईल घेऊन ती किती वेळची तशीच बसून होती. आता कुठे हिंमत एकवटून तिने त्याला कॉल केला होता.

आणि तो..?
तिचे नाव वाचून किती आनंदला होता तो. तरीही कॉल घ्यावा की नाही हा संभ्रम आणि मग शेवटी आपसूकच मोबाईलच् कानाला लागला.


“थँक यू राशी.”


“अभी, माझं लग्न ठरलंय..” तिचा अपराधी सूर.


“अरे हो, मी शुभेच्छा द्यायला विसरलो होतो. अभिनंदन गं!” तो.


“कदाचित हा आपला शेवटचा कॉल असेल. यापुढे आपले बोलणे होणार नाही. अभी.. तू मला विसरणार तर नाहीस ना रे?” त्या स्वराला कातरतेची झालर.


“तुझ्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!” तिच्या प्रश्नाचे उत्तर टाळत तो म्हणाला.


“अभी, मी मूव्ह ऑन होण्याचा प्रयत्न करतेय. जमल्यास तू सुद्धा यातून बाहेर पड. लग्न कर. किमान मम्मा पप्पांसाठी तरी.” ती पूढे म्हणाली.

उत्तरादाखल तो केवळ खिन्न हसला.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
______

🎭 Series Post

View all