प्रीतबंध.भाग -८०

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध.. प्रीतबंध!
प्रीतबंध!
भाग-८०

“कदाचित हा आपला शेवटचा कॉल असेल. यापुढे आपले बोलणे होणार नाही. अभी.. तू मला विसरणार तर नाहीस ना रे?” त्या स्वराला कातरतेची झालर.


“तुझ्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!” तिच्या प्रश्नाचे उत्तर टाळत तो म्हणाला.


“अभी, मी मूव्ह ऑन होण्याचा प्रयत्न करतेय. जमल्यास तू सुद्धा यातून बाहेर पड. लग्न कर. किमान मम्मा पप्पांसाठी तरी.” ती पूढे म्हणाली.

उत्तरादाखल तो केवळ खिन्न हसला.


“अभी, असा हसू नकोस ना.”


“मग काय करू? रडून रडायचं तरी किती ना? आजकाल तर माझ्या स्वभावाचे कांगोरे मलाच अनोळखी वाटायला लागलेत गं.” त्याच्या स्वरातील आर्तता तिला इतक्या दूर जाणवत होती.


“अभी..”

“राशी, थांब जरा. कॉल बंद करू नकोस. मम्माला तुला शुभेच्छा द्यायच्या होत्या तेवढं बोलून घे.” मोबाईल विजयाच्या हातात देत तो त्याच्या खोलीत निघून गेला.


“राशी बाळा..”


“मम्मा, आय एम सॉरी.”


“अगं ए राणी, तू का सॉरी म्हणतेस? सॉरी तर मला म्हणायला हवे. मला माझ्या मुलाला जास्त आयुष्य देता आलं नाही म्हणून तुला हा निर्णय घ्यावा लागला. पण आता भूतकाळातील जखम सारखी उकरून काढू नकोस. तिला वेळीच सुकू दे. त्याचं दुखणं तिथेच सोडून तू नव्या स्वप्नांना जागा दे. आमचे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत.

बरं बाळा, मी फोन ठेवते. तू तिकडे छान एंजॉय कर. बाय.” कॉल बंद करत विजयाने मोबाईल टेबलवर ठेवला.


“बाय..” दाटून आलेला उमाळा आवरत राशीने मोबाईल कानापासून दूर केला.


“अभी.. आय लव्ह यू यार, नाही विसरता येणार तुला. कधीच नाही.” मोबाईल मधील अभीचा फोटो बघून ती रडू आवरत म्हणाली.


“ताई, मेहंदी काढायची ना?” तेवढ्यात मेहंदी काढून देणारी मुलगी तिच्या खोलीत प्रवेशली.


“मला माहिती आहे, तुम्ही जीजूसोबत बोलायचं म्हणून बाहेर आला नव्हता ना? एकदा का मेहंदीने हात रंगले की मग मोबाईलवर बोलता आलं नसतं. मला माहिती आहे ना, खूप जनींचे मी अनुभव पाहिलेत.” ती हसत म्हणाली.

तिच्या बोलण्यावर राशीही कसंनूसं हसली.


“द्या ताई हात. मस्त मेहंदी काढते आणि नाव तर असं लिहिते ना की जीजू शोधत राहिले पाहिजेत.” तिला बाहेर घेऊन जात ती.


राशी काही न बोलता तिच्या सोबत गेली. बायकांच्या घोळक्यात बसायला तिला जड जात होते. तरतऱ्हेच्या बायका आणि तशाच त्यांच्या नजरा. कुणाशी जास्त काही न बोलता तिने मेहंदी काढून घेतली.


“ताई तुम्हाला नाव दिसतेय का? शोधा बघू.” मेहंदीवाली राशीकडे बघून म्हणाली.


“तुझं नाव लिहून पण झालंय?” मेहंदीने सजलेला हात बघून राशीला आश्चर्य वाटले.


“हो तर.”


“पण मी तर नाव सांगितलंच नव्हतं.”


“तुम्ही कशाला नाव सांगायला हवं? मघाशी फोनवर बोलताना मी ऐकले ना.” बोटांची फिनिशिंग करत ती.


“काय ऐकलंस?”

“हेच की तुम्ही ‘आय लव्ह यू अभी’ म्हणत होता ते. शोधा आता तुम्हीच तुमच्या अभीचे नाव. तुम्ही शोधू शकलात तर तेही शोधू शकतील नाही तर काही चान्स नाही हं.“ ती मिश्किल हसत म्हणाली.

इकडे अभीचे नाव ऐकताच राशीच्या हृदयाचा ठोका चुकला. इतरांनी कोणी ऐकलं तर नाही ना म्हणून तिने आजूबाजूला नजर फिरवली, एवढं बरं की नेमके त्यावेळी तिथे कुणीच नव्हते.


“अगं काय केलंस हे? ते नाव नव्हतं लिहायचं. त्यांचं खरं नाव तर..”


“खरं नाव काहीही असू दे. उलट हे नाव शोधण्यात जास्त मजा येईल. म्हणजे काय ना, जीजू त्यांचं खरं नाव शोधत राहणार आणि तुमच्या मनातील नाव त्यांना दिसणारच नाही. अशाने ते हरणारच की.” तिने हसत दुसऱ्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली.


“बरं, ते असू दे. या हातावर तरी त्यांचं खरं नाव लिही.”


“या हातावर तर मी फक्त सुरुवातीचेच अल्फाबेट लिहिणार आहे, ‘ए’. तिच्या हातावर इंग्रजीतील ‘ए’ काढत त्याभोवती तिने सुंदर डिझाईन गुंफायला सुरुवात देखील केली.


“वॉव! किती सुंदर मेहंदी काढलीस गं. नवऱ्या मुलाचं नाव कुठे लिहिलंय बघू तरी?” राशीची हातभर मेहंदी बघून रुपाली डोळे विस्फारून म्हणाली.


“ते सिक्रेट आहे मॅडम. मी नाव कुठे लिहिलेय ते या ताईंनाच कळलं नाहीये तर इतरांना कळण्याची काय बिशाद?” ती बोलत असतानाच तिथे सुरेखा, नंदिनी आणि चिनू येऊन ठेपल्या.


“मी तर शोधलंय. हा बघा ‘ए’ बरोबर ना गं ताई?” राशीचा हात निरखून बघत चिनू टाळ्या वाजवत म्हणाली.

“बरोब्बर. चल, आता तुझ्या हातावर मेहंदी काढून देते.” म्हणत तिने चिनूला राशीशेजारी बसवले आणि चिनुने दुसरा हात बघितला नाही म्हणून राशीने सुटकेचा निःश्वास सोडला.


“माझ्या राशीचे हात किती सुंदर दिसत आहेत ना गं.” सुरेखा एकटक राशीकडे पाहत होती.


“आई, काळजी करू नका. आपल्या राशीचे आयुष्य आता याहून रंगीत असेल.” सुरेखाच्या खांद्यावर हात ठेवत नंदिनी.


“नंदिनी, किती चांगली आहेस गं तू. आजकालच्या मुली नणंदा घरी आल्या की हेवेदावे नि धुसपूस सुरु करतात. तू मात्र माझ्या राशीला बहिणीप्रमाणे जीव लावलास.”

“आई, कुठलंही नातं एकाबाजूने नसते ना हो. या घरात मला कायम प्रेमच मिळत आले, मग बदल्यात मलाही तेच द्यावे लागेल ना? आणि राशी आहेच मला बहिणीसारखी.” ती म्हणाली तसे सुरेखाने तिला मिठीत घेतले.

_____

“पार्सलऽऽ”

दुपारी हलका डोळा लागला तोच गेटवरच्या आवाजाने विजयाची झोपमोड झाली.

“मालती, कसलं पार्सल आहे ते बघ गं जरा. रात्रीच्या जागरणाने डोकं पार जड आलंय.” डोक्याला हात लावत विजयाने मालतीला बाहेर पाठवले.


“बाईसाहेब, अभीदादाचं पार्सल आहे. सही लागेल म्हणतोय.” रिकाम्या हाताने आत येत मालती.


“तो झोपला असेल. त्याला जागे नको करायला. मीच बघते.” म्हणत विजया बाहेर आली.

डिलिव्हरी बॉयने एक जाडजूड असे भलेमोठे पार्सल तिच्या हातात ठेवले आणि तिची सही घेऊन तो निघून गेला.

विजयाने हातातील पार्सलचा तो बॉक्स एकदोनदा उलटेपुलटे करून पाहिले. त्यावर अभीचे नाव आणि घरचा पत्ता होता पण ते पाठविणाऱ्याचे नाव कुठेच लिहिले नव्हते.

हे कोणी आणि का पाठवले असेल याची क्षणभर तिला उत्सुकता वाटली; पण मग हॉस्पिटलच्या कामाचे असेल म्हणून तिने ते ड्रेसिंग टेबलवर ठेवून दिले.


“काय आहे हो एवढं या पार्सलमध्ये? खूप मोठं असं काहीतरी वाटतंय.” डोक्याला बाम लावून द्यायला म्हणून आलेल्या मालतीने विजयाला विचारले.


“काय माहित गं. त्याच्या हॉस्पिटलचे काही असेल नाही तर पुस्तकं असतील. तो नेहमी पुस्तकं मागवत असतो ना.”


“होय हो. नाहीतर वाढदिवसाचं एखादं गिफ्ट बिफ्ट कोणी पाठवलं असेल.” मालती डोक्याची मालिश करत म्हणाली.


“इतक्या वर्षात कोणी असं गिफ्ट पाठवलं नाही, आत्ता कोण पाठवेल गं. काहीही तुझ्या डोक्यात येतं. बरं मी थोडावेळ झोपते. अभी उठला की त्याला हे द्यायची आठवण काढशील. हल्ली मी फार विसरभोळी होत चाललेय. लक्षातच राहत नाही.” अंगावर पांघरून घेत विजया.


मान डोलावून मालती बाहेर गेली. वरद ऑफिसमध्ये गेला होता. अभी आणि विजया वामकुक्षी घेत होते. तिला घर असे रिकामे रिकामे भासू लागले. मागच्या वर्षी राशीमॅडम आणि सत्यादादा असताना किती भारी वाटत होते. नवीन नवीन लग्न झालेल्या राशीमॅडम, सत्यादादा आणि अभीदादासाठी केलेला केक, ते कापताना त्यांचे झालेले लुटपुटीचे भांडण.. त्यांच्या आवडीचे जेवण..

सारे काही आठवत तिच्या ओठावर हसू आणि डोळ्यात आसू उभे राहिले. या घरातील प्रत्येक गोष्टीत तीही मनाने जुळली होती.


“मालती काकू, काय गं एकटी एकटीच काय हसतेस?” तिच्या मागे अभी येऊन उभा होता हे तिला कळलेच नाही.


“अभीदादा, तुम्ही केव्हा उठलात?आणि इकडे केव्हा आलात?” तिने स्वतःला सावरत विचारले.


“तू हसत होतीस तेव्हाच आलो. काकू, डोकं खूप जड आलंय गं. मस्त आलं घातलेला चहा कर ना.”


“हो करते आणि जेवणात काय स्पेशल करू?”


“तुला वाटेल ते कर. तसेही तुझ्या हातचं सारंच स्पेशल असतं.” तो सोफ्यावर बसत म्हणाला.


“अभी, उठलास तू?” काही वेळात विजया त्याच्याजवळ येऊन बसली.


“हम्म. तू ओके आहेस ना.”


“हो रे. चहा घेतल्यावर आणखी बरं वाटेल.” त्याच्या केसातून हात फिरवत ती.


“अभी, अरे आठवलं बघ. मघाशी तुझं काहीतरी पार्सल आलं रे. तू झोपला होतास तर ते माझ्याच खोलीत ठेवले बघ.”


“माझं पार्सल? पण मी तर काहीच ऑर्डर केलं नव्हतं.” आश्चर्याने तो.


“कसलं पार्सल?” वरददेखील ऑफिसमधून घरी परतला.

“साहेब पण आलेत होय? बरं झालं मी जास्तीचा चहा टाकला होता. साहेब तुम्ही सुद्धा चहा घ्या. मीते पार्सल घेऊन येते बघा.” चहाचा ट्रे ठेवत मालती लगबगीने तो बॉक्स घेऊन आली.

चहाचा घोट घेत अभीने कुतूहलाने त्या बॉक्सवर नजर टाकली. आत काय असेल याची त्यालाही उत्सुकता लागली होती.

..तुम्हालाही ती उत्सुकता लागलीय हे मला ठाऊक आहे. पुढच्या भागात कळेलच तोवर स्टे ट्यून्ड! पुढचा भाग जरा महत्त्वाचा आहे तेव्हा तो स्किप करू नका.
कीप रिडींग, कीप कमेंटिंग!
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
______
प्रीतबंध!

🎭 Series Post

View all