प्रीतबंध. भाग -८१

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध.. प्रीतबंध!
प्रीतबंध!
भाग -८१

“कसलं पार्सल?” वरददेखील आज ऑफिसमधून लवकर घरी परतला.


“साहेब पण आलेत होय? बरं झालं मी जास्तीचा चहा टाकला होता. साहेब तुम्ही सुद्धा चहा घ्या. मी ते पार्सल घेऊन येते बघा.” चहाचा ट्रे ठेवत मालती लगबगीने तो बॉक्स घेऊन आली.

चहाचा घोट घेत अभीने कुतूहलाने त्या बॉक्सवर नजर टाकली. आत काय असेल याची त्यालाही उत्सुकता लागली होती.


चहा झाला तसे मालतीला पार्सलचा बॉक्स घेऊन यायला सांगत अभी त्याच्या खोलीत गेला.


“काय असेल बरं यात?”

बॉक्सवरील चिकटवलेली टेप काढत असताना मनात प्रश्न घोळत होता. त्यावर लावलेले टेप देखील एवढे की काढता काढता त्याला कंटाळा यायला लागला आणि त्याही स्थितीत त्याला हसू आले.

मेडिकलच्या पहिल्या वर्षाला असताना एका वर्गातील मैत्रिणीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या मित्रमंडळाने असाच भलामोठा खोका व्यवस्थित पॅक करून तिला दिला होता. पॅकिंग काढून काढून थकलेली ती जेव्हा शेवटची टेप काढू लागली तेव्हा आत मस्तच काहीतरी गिफ्ट ठेवले आहे असा तिचा समज झाला. मात्र क्षणातच तिच्या विचारावर पाणी फेरल्या गेले कारण सर्वात खाली तिला गिफ्ट म्हणून एक कलिंगड ठेवलेले दिसले आणि मग रागाने तिचे गाल कलिंगडासारखे फुगले होते. अर्थात कलिंगड ठेवण्याची कल्पना सत्याची होती.

त्या आठवणीने अभीला हे पार्सल बघून उगाच कोणी त्याची मस्करी तर करत नाहीये ना असे वाटून गेले. पण असे करणार कोण? आणि आणखी कशी? त्याचा भाऊ आणि त्याचं प्रेम नियतीने त्याच्यापासून हिरावले होते याहून त्याच्या आयुष्याची आणखी क्रूर चेष्टा कोणती असणार होती?


त्याने शेवटची टेप काढली आणि ‘हुश्श!’ करत एकदाचा बॉक्स उघडला. त्यामध्ये आणखी काहीतरी गुंडाळून ठेवले होते. मोठे आयाताकृती असे.. कदाचित एखादी फ्रेम असावी असे भासत होते. त्याने उत्सुकतेने त्यावरचे वेष्ठन काढायला सुरुवात केली. नक्कीच कोणीतरी त्याला काहीतरी पाठवले होते पण ते काय आहे याचा उलगडा व्हायचा होता.

वेष्ठन काढल्यावर त्याने उलटी असलेली ती फ्रेम सरळ केली आणि हृदयावर ताण आल्यासारखा मटकन सोफ्यावर बसला.

“सत्याऽऽ..”

त्याच्या तोंडून एवढेच अस्पष्ट शब्द बाहेर पडले.


“अभी, कोणी पार्सल पाठवलंय आणि त्यात काय आहे हे कळलं का?”

वरद आणि विजया दोघेही त्याच्या खोलीत आले होते. खरे तर पार्सलपेक्षा आजच्या रात्रीचा मेनू ठरवायला विजया त्याच्याकडे आली होती तर वरद मुद्दाम त्याच्याशी गप्पा मारायला आला होता. समोर बॉक्स उघडा पडलेला दिसला म्हणून त्याने सहज पार्सलबद्दल चौकशी केली.


“मालती तर म्हणत होती की अभीदादाला कोणीतरी बड्डे गिफ्ट पाठवलंय. हो का रे?” विजया त्याच्याजवळ येत म्हणाली.

“अभी, काय झालेय? तू असा का बसला आहेस आणि हे काय आहे? बघू तरी.” धक्का लागल्यागत बेडवर बसलेल्या अभीकडे एक नजर टाकून विजयाने त्याच्या हातातील फ्रेम स्वतःकडे घेऊन बघायला सुरुवात केली.

ती एक मोठी फोटोफ्रेम होती. विस्तीर्ण पसरलेले आकाश. त्यावरील तांबड्या नारिंगी रंगाची उधळण अन् ते रंग दोघांच्या हाताच्या हृदयात बंदिस्त करणारे पाठमोरे ते दोघे..

पांढरा शर्ट आणि निळी डेनिमची जीन्स घातलेला, डोळ्यावर गॉगल चढवलेला तो, आणि तिही निळ्या जीन्सवर पांढरा क्रॉप टॉप घातलेली. दोघांचे हात एकमेकांच्या कमरेत गुंफलेले अन दुसऱ्या हातांनी हृदयाचा आकार बनवून त्यात आकाशीची ती फिकट होत जाणारी छटा सामावून घेताना इतरांशी अनभिज्ञ असणारे ते..

“अभी.. हा तू आहेस ना? आणि ही मुलगी..? ही रे कोण?” काहीश्या नवलाने विजया त्याच्याकडे आणि त्या फोटोकडे पाहत म्हणाली.

तिच्या प्रश्नावर त्याचे काहीच उत्तर आले नाही. कसला प्रतिसाद द्यायला तो तिथे होताच कुठे? तो केव्हाचा भूतकाळतील त्या आठवणीत परत गेला होता.


महाबळेश्वर.. तिथला सनसेट पॉईंट! तो आणि राशी.. बोलत बोलत सर्वांपासून थोडे दूर आलेले..


नभीचा तो तांबूस रंग डोळ्यात साठवता साठवता तिच्या बोटात गुंफलेली त्याची बोटे हलकेच सोडवत अभीने तिचा हात वर उचलला. त्याच्या उजव्या पंजाचा अंगठा खालच्या दिशेने झुकवत त्याने बाकीच्या बोटांना अर्ध्यात वाकवले आणि त्याचवेळी राशीच्या वर उचललेल्या डाव्या हाताची बोटे तशीच वाकवत त्याने स्वतःच्या बोटांना लावली. दोघांच्या एकत्र जुळलेल्या बोटांनी एक परफेक्ट हृदयाचा आकार तयार झाला होता.


"हे आपलं हृदय! तुझं अर्ध नी माझं अर्ध.. आणि दोघांच मिळून एक संपूर्ण." त्याने डावा हात तिच्या कंबरेभोवती घट्ट करत तो म्हणाला.

राशीचा हात देखील आपसूकच त्याच्या कमरेवर विसावला.

नभातील विस्तारलेला, काहीसा फिका होत असलेला तांबडा रंग त्यांच्या या हृदयात सामावून गेला होता आणि मनातील प्रेमाचा रंग अधिकाधिक गडद होऊ लागला होता.

…आणि त्याच वेळी "व्हॉट अ परफेक्ट पोज!" म्हणत काहीशा अंतरावर असलेल्या सत्याने कॅमेरात तो क्षण टिपला होता.


“अभीऽऽ मी काही विचारतेय. हा तूच आहेस ना? आणि ही सोबत असलेली मुलगी कोण आहे? हिच्याबद्दल आजवर कधी बोलला नाहीस ते?” त्याच्या खांद्याला पकडून हलवत विजयाने पुन्हा विचारले.


“मम्मा, सत्या..”

“सत्या काय? तूच आहेस हा. पाठमोरा असलास तरी तुला ओळखू शकत नाही असे तुला वाटते का?” त्याच्या डोक्यात टपली मारत विजया.


“मम्मा, अगं तो मीच आहे पण हा फोटो.. हा फोटो सत्याने क्लिक केला होता, त्याच्या पर्सनल कॅमेऱ्यामध्ये. तो फोटो मला कोणी पाठवला असेल आणि तेही आजच्या दिवशी?” अचंबित होत त्याने तो फोटो परत हातात घेतला.


“हे काय बोलतोस अभी? सत्याने काढलेला फोटो तुला कोण पाठवेल?” वरदच्या मुखावर देखील आश्चर्य पसरले होते.

“तेच तर मला कळेना.” त्याने तो फोटो पुन्हा मागूनपुढून उलटपालट करून बघितला आणि मग त्याच्यावरच्या पॅकिंगवरच्या वेष्ठणाला हलवून बघितले तशी त्यातून एक छोटीशी चिट बाहेर पडली.


‘डिअर ब्रो,

ऑन अवर बड्डे,
धिज इज स्मॉल गिफ्ट फ्रॉम मी..
अ कॅण्डिड फोटो ऑफ यू विथ युअर्स प्रेशियस लव्ह!
स्टे आल्वेज ब्लेस्ड टुगेदर!

-सत्या..’

त्या चिठ्ठीवर लिहिलेला तो छोटासा मजकूर.. आणि तेही सत्याच्या अक्षरातील. अभीचे तर डोकेच गरगरायला लागले.


“अभी, तू प्रेमात होतास..? म्हणजे आहेस? कोण आहे बाळा ही मुलगी? जिच्यासाठी सत्याने इतका सुंदर शब्द वापरलाय?” विजया अजूनही त्या फोटोतून बाहेर पडली नव्हती.


“मम्मा, प्रश्न हा नाहीये गं. तुला कळत कसं नाहीये? आपल्या सत्याने हे पाठवले आहे. म्हणजे तो..” बोलता बोलता तो हुंदका देऊ लागला.


“अभी, शांत हो. हे अक्षर सत्याचे असले तरी सत्या आपल्यात नाही हेही तितकेच खरे आहे. फक्त हे कोणी पाठवले असेल हा मात्र विचार करण्यासारखा प्रश्न आहे.”वरद त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला.

आता विजयादेखील ती चिठ्ठी हातात घेऊन त्यावरचे अक्षर निरखू लागली.

“कसं शक्य आहे हे? सत्याला तर तुम्ही तुमच्या हाताने अग्नीडाग दिला ना हो.” वरदच्या मिठीत शिरत तिने आपल्या भावानांना वाट मोकळी करून दिली.

मनात एक विचार घेऊन अभी बेडवरून उठला आणि पार्सलच्या बॉक्समध्ये आणखी काही आहे हे बघण्यासाठी तो खाली बसला. परत एकदा त्या बॉक्समध्ये हात टाकल्यावर त्याला पुन्हा काही वस्तू त्याच्या हाताला लागल्या.

एक रेकॉर्डर आणि एका लिफाफ्यात एक छोटेखानी पत्र!


“अभी,

हे पत्र तुझ्या हाती लागेल तेव्हा मी या जगात नसेन. पण भावा, जिवंत नसेन तरी प्रत्येक क्षणाला मात्र मी तुझ्यासोबत असेन. तुझ्या श्वासात आणि तुझ्या हृदयात सुद्धा मीच वसलेला असेन.

तुझ्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून तुमचा फ्रेम केलेला फोटो मी खूप आधी तयार करून घेतले होते. खरं तर ते मला स्वतःच्या हाताने तुला द्यायचे होते; पण आता ते शक्य नाही याची जाणीव झाल्यामुळे मी हे पार्सल ऑफिसला नेऊन देतोय. आपल्या वाढदिवशीच त्याने त ते तुझ्या हाती द्यावे म्हणून मी बक्कळ पैसेही त्याला दिले आहेत. तेव्हा तुला हे नक्की मिळेल अशी आशा करतो.

आणखीन सांगायचं तर बरंच काही आहे. पण ते जाणून घ्यायला तुला रेकॉर्डर ऑन करावा लागेल. इथे केवळ तुला वाढदिवसाच्या शुभेच्छाच मिळतील!

हॅपी बर्थडे मेरे भाई, मेरी जान!
लव्ह यू आल्वेज!”

-सत्या.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
______

🎭 Series Post

View all