प्रीतबंध!
भाग -८२
भाग -८२
“तुझ्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून तुमचा फ्रेम केलेला हा फोटो मी खूप आधीच तयार करून घेतले होते. खरं तर ते मला स्वतःच्या हाताने तुला द्यायचे होते; पण आता ते शक्य नाही याची जाणीव झाल्यामुळे मी हे पार्सल ऑफिसला नेऊन देतोय. आपल्या वाढदिवशीच त्याने ते तुझ्या हाती द्यावे म्हणून मी बक्कळ पैसेही त्याला दिले आहेत. तेव्हा तुला हे नक्की मिळेल अशी आशा करतो.
आणखीन सांगायचं तर बरंच काही आहे. पण ते जाणून घ्यायला तुला रेकॉर्डर ऑन करावा लागेल. इथे केवळ तुला वाढदिवसाच्या शुभेच्छाच मिळतील!
हॅपी बर्थडे मेरे भाई, मेरी जान!
लव्ह यू आल्वेज!”
लव्ह यू आल्वेज!”
-सत्या.
_________
‘..हॅपी बर्थडे मेरे भाई, मेरी जान!
लव्ह यू आल्वेज!’ अभीने परत त्या ओळीवरून नजर फिरवली..
लव्ह यू आल्वेज!’ अभीने परत त्या ओळीवरून नजर फिरवली..
“हॅपी बर्थडे सत्या, लव्ह यू टू..” एक अस्पष्ट हुंदका त्याच्या तोंडून बाहेर पडला.
ते छोटेसे पत्र.. अभीने मात्र कितीतरी वेळ त्याचे पारायण केले. प्रत्येक शब्दागणिक त्याला सत्याची नव्याने ओळख होत आहे असे भासत होते. आजवर त्याच्या मृत्यूबद्दल त्याला जे ठाऊक होते त्यापेक्षा खूप काही वेगळे घडून गेल्याची त्याला जाणीव झाली होती.
‘.. हे पत्र तुझ्या हाती लागेल तेव्हा मी या जगात नसेन.’
सत्याने लिहिलेली पाहिलीच ओळ.. आणि अभीची संशयाची सुई त्याच्या मम्मा पप्पांकडे वळली.
“पप्पा, हे असं का लिहिलेय याने? म्हणजे तो हे जग सोडून जाणार आहे हे त्याला आधीच ठाऊक होतं? पप्पा, सांगा ना. का हे सगळं लिहिले आहे? माझ्या श्वासात, माझ्या हृदयात तो वसलेला असेल असे त्याने लिहिलेय, म्हणजे काय? तो खरंच माझ्या आत आहे का? माझ्या छातीत धडकणारे हृदय त्याचे आहे का? पप्पा, सांगा ना. मम्मा तू तरी काही बोल ना.”
वरद काही बोलत नाहीये हे बघून त्याने त्याचा मोर्चा विजयाकडे वळवला. ती मात्र कसलेच उत्तर न देता धक्का लागल्यागत उभी होती. वरदचीही अवस्था याहून वेगळी नव्हती.
सत्या या जगात नाहीये हे दोघ्या उभयंत्यांनी हळूहळू स्वीकारले होते. पण तो जिवंत असणार नाही हे त्याचे त्यालाच कसे ठाऊक होते हे दोघांनाही उमजत नव्हते. आत्ता आत्ता कुठे जरा स्थिर झालेले त्यांचे आयुष्य अचानक तीनशे साठचा कोनातून फिरले होते.
पुन्हा डोळ्यासमोर तीच उलथापालथ, त्याचा ॲक्सीडेन्ट, राशीचा फोन, हॉस्पिटल.. सत्याचा मृत्यू आणि अभीचे ऑपरेशन..
जे सगळे विसरायचे ठरले होते त्यापेक्षा काहीतरी वेगळेच सत्य त्यांच्यापुढे उभे ठाकले होते.
“मम्माऽऽ प्लीज, आतातरी सत्य काय आहे ते मला सांग ना गं. माझी शपथ आहे तुला.” अभी रडत रडत तिला म्हणाला.
“अभी, प्लीज अशी शपथ घालू नकोस रे. तुला काही झालं तर आम्हाला पुन्हा कोण आहे?” त्याला छातीशी कवटाळत विजया स्फून्दू लागली.
“मी आज तुमच्यासमोर स्वस्थपणे श्वास घेत उभा आहे ते सत्यामुळेच ना गं? त्याच्याच हृदयाच्या जोरावर मी हे आयुष्य उपभोगतोय हे खरं आहे ना गं? फक्त एकवार हे मान्य कर ना.”
अभीच्या प्रश्नावर विजयाने शेवटी होकार देत मान हलवली
“मम्मा, आजवर हे कधीच का बोलली नाहीस गं?”
“आम्ही वचनात बांधलो होतो रे. तुला हे कळू देऊ नये याची राशीने सर्वांना सक्त ताकीद दिली होती.
“म्हणजे राशीलाही सत्याच्या मृत्यूचे रहस्य ठाऊक होते? किती मूर्ख ना मी? सगळ्यांनी मला फसवले आणि मीही फसल्या गेलो. राशीने सुद्धा माझ्याशी असे वागावे?” तो नुसता रडत होता.
“यात राशीचा काहीच दोष नाहीये बाळा. दोष तर परिस्थितीचा होता. देवाने आमच्या दोन लेकरांपैकी केवळ एकाला निवडण्याचा पर्याय ठेवला होता आणि आम्ही सत्याऐवजी तुला निवडले.” विजयाचे हुंदके थांबत नव्हते.
“म्हणजे?”
“ॲक्सीडेन्टमुळे सत्याचे ब्रेन डेड झाले होते. त्याचे केवळ श्वास सुरु होते रे. शरीराने तो आमच्यात नव्हताच. त्यावेळी तूही मृत्यूच्या दारात उभा होतास आणि मग डॉक्टर सिन्हा आणि डॉक्टर सैनानींनी मिळून हार्ट ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. आपल्या सत्याचे हृदय तुझ्या छातीत लावायचा निर्णय. ज्यामुळे कदाचित आमची दोन्ही मुलं आमच्याजवळ आहेत ही आशा आमच्या मनात निर्माण झाली आणि आम्ही त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला.” विजयाला सावरत वरदने अभीच्या प्रश्नाचे उत्तर दिले.
“पप्पा हे काय केलेत हो तुम्ही? मरणाच्या दारात असलेल्या एका लेकाला वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्याच दुसऱ्या लेकाला मृत्यूच्या दरीत ढकललेत.
डॉक्टर सिन्हा.. या सगळ्याला तेच कारणीभूत आहेत ना.? का केलेत सर तुम्ही असे? मला आता तुमच्याकडूनच जाब हवा आहे.” टेबलवरील कारची चावी घेत तो त्वेषाने खोलीबाहेर पडला.
“अभी, अभीऽऽ कुठे निघाला आहेस तू? अभी, तू कुठेही जाऊ नकोस. अहो बघा ना, कसा रागाने गेला तो. त्याला अडवा ना. अडवा ना त्याला.’ अभी गेला तसे सैरभैर होत विजया वरदला बिलगून रडू लागली.
वरदचेही डोके सुन्न झाले होते. काय घडतेय नि काय घडून गेले, त्याला थांग लागत नव्हता. अचानक सत्याचे ॲक्सीडेन्ट आणि मग अभीचे ऑपरेशन.. हा योगायोग होता की मुद्दाम घडवून आणलेला योग? त्याचे डोके तिथेच अडकले होते.
“अहोऽऽ.. आपला अभी..”
“विजू, रडू नकोस. त्याला काहीच होणार नाही. मी त्याच्या मागे जातोय, तू काळजी करू नकोस.
“मलाही सोबत येऊ द्या ना. काळजीने माझा जीव वरखाली होतोय हो.” तिचा स्वर कमालीचा आर्त झाला होता.
“तू घरीच थांब अगं. दगदगीने तुला त्रास होईल. हवं तर देवघरात बस. मी घेऊन येतोय ना त्याला? तू शांत हो बघू.” तिचे डोळे पुसत वरद दृढपणे म्हणाला. काळजीने तिला आणखी त्रास होऊ नये असे त्याला वाटत होते.
“मालती..”
“जी साहेब.”
“बाईसाहेबांकडे लक्ष दे. क्षणभर सुद्धा त्यांना एकटं सोडू नकोस. मी तासाभरात परतलोच.” विजयाला मालतीकडे सोपवून वरद त्याची कार घेऊन अभीच्या मागे निघाला.
“बाईसाहेब, बसा तुम्ही. काय घडतंय हो हे? आता कुठं काही नीट व्हायला लागलं होतं तर अभीदादा असे कुठे निघून गेलेत?” तिच्या डोळ्यातील वेदना स्पष्ट जाणवत होती. थोड्यावेळापूर्वी अभीच्या खोलीत जे घडले त्याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती.
“मला थोडं पाणी देतेस?”
“हो, हो. आणतेच.” मालतीने लगबगीने स्वयंपाकघरातून पाणी आणले.
“मालती, आपला सत्या.. त्याचा मृत्यू नैसर्गिक नव्हता अगं..” पाण्याचा एक घोट घेत विजया बोलू लागली.
“म्हणजे?”
“आपल्या अभीचा त्रास बहूतेक त्याला कळला होता म्हणून त्याने त्याच्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.” मघापासून विचार करून ती या तर्कावर पोहचली होती.
“बाईसाहेब काय बोलताय? सत्यादादाचा तर ॲक्सीडेन्ट झाला होता ना?” तिचा जणू श्वासच अडकला होता.
“हो, पण आता अभी आणि सत्याची आई म्हणून हा अपघात कसा झाला असावा हे मी समजू शकते.”
“बाईसाहेब, तुमचं बोलणं मला खरंच कळत नाहीये. असं काही नका ना बोलू. अभीदादा सुखरूपपणे घरी येतील. मी…मी ना देवाजवळ दिवा लावून येते. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना तरी करु शकतो ना? तुम्ही या माझ्यासोबत.”
मालती तिला देवघरात घेऊन गेली. अभीच्या काळजीने विजया भलतंच बोलायला लागली असे तिला वाटू लागले होते.
“देवा, आता तुलाच रे माझ्या लेकरांची काळजी. अभीला सत्य ऐकण्याचे बळ दे. त्याला सुरक्षित ठेव. त्याला काही झाले तर मी जगू शकणार नाही रे. मी उध्वस्त होऊन जाईल.” दिवा उजाळून विजयाने देवापुढे हात जोडले.
हॉस्पिटलमध्ये जाऊन अभी डॉक्टर सिन्हाकडून सत्य काढून घेणार याचा तिला अंदाज आला होता, फक्त सगळे जाणल्यावर त्याला काही त्रास होऊ नये यासाठी ती देवाला साकडे घालून बसली होती.
_______
“डॉक्टर सिन्हा हॉस्पिटलमध्ये आहेत ना?”
हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळच कार पार्क करून उतरून अभी झरझर पायऱ्या चढून त्याच्या डिपार्टमेंटकडे निघाला. त्याचवेळी डॉक्टर अभय त्याची ड्युटी आटोपून बाहेर निघत होता तेव्हा अभीने त्याला प्रश्न विचारला.
“हो, आहेत ना. पण काय झालंय सर? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही इतके टेन्स का दिसताय?” अभयने काळजीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले. अभीचा वाढलेला श्वास बघून त्याला काहीतरी होतेय हे कळत होते.
“डोन्ट टच मी. यू आर अ चिटर, रादर तुम्ही सर्वच चिटर आहात. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत चिट केलेय.” त्याचा हात झटकत अभी पुढे निघाला.
नेहमी शांत असलेल्या अभीच्या स्वभावाचे हे रौद्र रूप बघून अभयदेखील भांबावला होता.
“सर, अभी सरऽऽ..” बाहेर जायचे सोडून अभय त्याच्या मागोमाग आत जाऊ लागला.
_______
“आह! आऊच!”
सिन्हा सरांच्या केबिनमधून बाहेर निघालेली सीमा समोरून येणाऱ्या अभीला जोरात धडकली.
“व्हॉट द हेल डॉक्टर सीमा? काय आहे हे सगळं?” आज त्याच्या रागाला नियंत्रणात ठेवणे कठीण जात होते.
“अभिजीत सर, तुम्ही यावेळी इथे कसे? किती जोरात धडकलात हो. बघा ना, मला केव्हढ्याने लागले.” कपाळ चोळत ती अभीकडे बघून म्हणाली.
“तू डॉक्टर आहेस ना? मग इथे काय नुसता टाइमपास करायला आलेलीस का? होपलेस गर्ल. माझे सगळे कपडे खराब केलेत.” तो रागात म्हणाला तसे कपाळावरचा हात काढून सीमाने त्याच्याकडे वरून खालपर्यंत पाहिले आणि मग हसायला लागली.
“सर, तुमचे कपडे खराब नाही झालेत उलट छान दिसत आहेत. यू आर लकी वन हं. आज रात्री माझ्या होणाऱ्या वहिनीची हळद आहे आणि तुम्ही तिथे न येताच हळद खेळलीत.” ती मिश्किल हसत म्हणाली.
रात्रीच्या हळदीची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती. त्यामुळे आज हॉस्पिटलचे काम आवरून तिच्या ड्युटीचे दोन दिवस दुसऱ्या डॉक्टरांना सोपवून ती निघाली होती. घेऊन जायला म्हणून वॉर्डबॉयकडून तिने हळद मागवली होती आणि तीच घेऊन जाताना तिची अभीशी धडक झाली ज्यात पिशवीतील थोडी हळद त्याच्या गालाला स्पर्शून कपड्यावर पडली.
“तू ना एकदम यूजलेस मुलगी आहेस.” तिचे स्पष्टीकरण ऐकून कपडे झटकत तो म्हणाला.
“ओह, रिअली? एकदिवस तुम्ही याच होपलेस आणि यूजलेस, हॉस्पिटलमध्ये टाइमपास करणाऱ्या मुलीला काही जाणून घेण्यासाठी विनवणी करत असाल. तेव्हा कोण यूजलेस आहे हे तुम्हाला कळेलच.”
ती बोलतच होती मात्र तिची बडबड दुर्लक्षित करून अभी केबिनचे दार उघडत धाडकन आत प्रवेशला.
“अभी.. माय बॉय!”
अनपेक्षितपणे त्याला आत आलेले बघून डॉक्टर सिन्हा काहीश्या अचंब्याने स्मित करत त्यांच्या खुर्चीवरून उठले.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
______
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
______
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा