प्रीतबंध!
भाग-८३
भाग-८३
“ओह, रिअली? एकदिवस तुम्ही याच होपलेस आणि यूजलेस, हॉस्पिटलमध्ये टाइमपास करणाऱ्या मुलीला काही जाणून घेण्यासाठी विनवणी करत असाल. तेव्हा कोण यूजलेस आहे हे तुम्हाला कळेलच.”
ती बोलतच होती मात्र तिची बडबड दुर्लक्षित करून अभी केबिनचे दार उघडत धाडकन आत प्रवेशला.
“अभी.. माय बॉय!”
अनपेक्षितपणे त्याला आत आलेले बघून डॉक्टर सिन्हा काहीश्या अचंब्याने स्मित करत त्यांच्या खुर्चीवरून उठले.
______
“हे काय? मी इथे बोलतेय आणि सर मला चक्क इग्नोर करून आत गेले?” केबिनचे दार तिच्या तोंडावर आपटून अभी आत गेला तशी सीमा अभयकडे बघून म्हणाली.
“अगं, ए सीमा, जरा गप्प बस ना. काहीतरी सिरीयस मॅटर आहे. अभिजीत सर भयंकर संतापले आहेत. माझ्यावर सुद्धा ते ओरडलेत.” अभीच्या मागे येत तिथे पोहचलेला अभय सीमाला म्हणाला.
“अरे वा! अभिनंदन. म्हणजे आता तूसुद्धा माझ्यासारखा अभिजीत सरांच्या गुडबुक लिस्टमध्ये आहेस तर. नाहीतर मला सारखं वाटायचं की सर केवळ मलाच का ओरडत असतील?”
“तुला ना कसलंच गांभीर्य नाहीये. आतापासून तू सुट्टीवर आहेस ना? मग जा ना बाई तुझ्या घरी. तुझ्या भावाचं लग्न एंजॉय कर. इथे थांबशील तर अभिजीत सर तुझं एनकाउंटर करायला मागेपुढे पाहणार नाहीत.” अभयने तिच्यापुढे हात जोडले तसे तिने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले.
“वेडा आहेस का तू. ते माझं एनकाउंटर का करणार? बरं सोड, तसेही मी निघतेच आहे. उद्या लग्न एंजॉय करते. तुझा जर योग असेल तर परवा रिसेप्शनला भेटू.” असे म्हणत ती जायला निघाली.
तिच्या बोलण्याचा रोख न कळून त्याने तिचा विचार तात्पुरता सोडून दिला आणि केबिनच्या दारावर हाताने ठकठक केले.
“मे आय कम इन सर?” आत उभे दिसलेल्या डॉक्टर सिन्हाकडे पाहत त्याने परवानगी मागितली.
“नो डॉक्टर अभय, यू कॅन्ट. मला सरांशी काही बोलायचं आहे. इट्स पर्सनल!” त्याला नकार देत अभीने केबिनचे दार ओढून घेत आतून लॉक केले.
“व्हॉट हॅपन्ड अभी? ऍनिथिंग इज रॉंग?” त्याची कृती बघून डॉक्टर सिन्हांना जरा काळजी वाटू लागली.
“आणखी काय घडायचे बाकी उरले आहे? एव्हरीथिंग हॅपन्ड विथ मी इज सपोज्ड टू बी रॉंग डॉक्टर सिन्हा. माझ्यासोबत घडलेली प्रत्येक गोष्ट चुकीची आहे आणि याला केवळ तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही माझ्याशी असं का वागलात सर?” डोळ्यात राग होताच आता सोबतीला अश्रुंचा ओलावाही आला.
“अभी, काय बोलतो आहेस? किमान मला काही समजेल असे तरी बोल. मी काय केलंय? त्यांना त्याच्या बोलण्याचा अंदाज लागत नव्हता.
“फाईन! तुम्हाला माझ्याच तोंडून ऐकायचंय ना? ठीक
आहे. मी स्पष्टच विचारतो. मला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे हे सत्याला कसं कळलं सर?”
त्याच्या अनपेक्षित हल्ल्याने ने डॉक्टर सिन्हा क्षणभर खिळल्याप्रमाणे स्तब्ध झाले.
“इट वॉज अ सिक्रेट बिट्वीन अस. आपल्या दोघातील गुपित होतं ना ते? तुमच्यावर माझा किती विश्वास होता सर, स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता. तुम्ही माझे केवळ गुरु नव्हता तर त्यापेक्षाही खूप काही होतात. माझ्या मनातील वेदना माझ्याआधी तुम्हाला कळत होती.
मला वाटायचं की मी किती भाग्यवान आहे, सिन्हाजचे सर्वेसर्वा खुद्द डॉक्टर सिन्हा माझ्यावर एवढं प्रेम करतात. मला इतका जीव लावतात. तुमच्यात मी माझा देव शोधायचा प्रयत्न केला सर आणि तुम्ही? तुम्ही माझ्याच भावाला मृत्यूच्या दाढेत ढकललंत? का सांगितलंत तुम्ही माझ्याबद्दल त्याला? व्हाय सर व्हाय?”
“अभी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. इथे बस. आपण शांतपणे बोलूया.” इतकावेळ स्तब्ध असलेले डॉक्टर सिन्हा शांतपणे म्हणाले.
“अजून कुठला गैरसमज सर? मला शांत बसवून आणखी कुठलं खोटं तुम्ही बोलणार आहात? मला सगळं कळलंय. तुम्हाला वाटत असेल की याला कोण सांगणार? पण मला कळलंय आणि तुम्हाला माहिती आहे, हे कोणाकडून कळलंय? खुद्द सत्याकडून. सरप्राईजिंग ना?
त्याचं आज मला एक लेटर मिळालंय. सहा महिन्यांपूर्वी लिहिलेलं. माझ्यासाठी. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला म्हणून लिहिलेले हे लेटर. खूप छान शुभेच्छा मिळाल्यात मला. मला जीवदान मिळावे म्हणून माझा भाऊ हे जग सोडून गेल्याचं मला आज कळलं. याहून आणखी वेदनादायी काय असू शकतं?” त्याने खिशातून ते पत्र काढून टेबलवर ठेवले.
“अभी, मी त्याला काही सांगितलंय असं यात कुठेही लिहिलं नाहीये. मग तू माझ्यावर हा आरोप कसा करू शकतोस?”
“ओह, आय सी! म्हणजे तुम्हाला इथे त्याने हे डायरेक्ट मेन्शन केलेले असावे अशी अपेक्षा होती तर?” तो डोळ्यात पाणी घेऊन छद्मीपणे हसला.
“सर, हे पत्र मला मिळेल तेव्हा तो या जगात नसेल हे त्याने लिहिलेय. तो कायम माझ्या श्वासात, माझ्या हृदयात असेल हेही लिहिलेय, तरीही तुम्हाला पुरावा हवाय? पुरावा आहे सर. माझ्या छातीच्या पिंजऱ्यात प्रत्यरोपण केलेले हृदय सत्याचेच आहे हे मम्माने मान्य केलंय. आणखीन मी कुठला पुरावा देऊ?” त्याचा कंठ दाटून आला.
“अभी..”
“तुमच्याकडूनच त्याला आपल्यातील गुपित कळलंय ना सर? आणि कहर म्हणजे राशी.. राशीलाही हे ठाऊक होते? सत्याचा हार्ट ट्रान्सप्लांट केलाय हे मला कळू नये म्हणून तिने सगळ्यांकडून वचन घेतले होते. आय.. आय कॅन्ट इमॅजिन!” दोन्ही हातात डोके गच्च पकडून तो खुर्चीत बसला.
“यस, यू कॅन्ट इमॅजिन. तू सध्या जे बोलतो आहेस ना ते सारंच तुझ्या कल्पनेपलीकडले आहे आणि राशीवर कसले आरोप करतो आहेस रे? आपला प्रियकर वाचावा म्हणून नवऱ्याने मरावे असे कुठल्या मुलीला वाटणार अभी? तू जे बोलतो आहेस ते तुला तरी कळतेय का?”
“म्हणजे माझ्या छातीत जे हृदय धडकतेय ते सत्याचे नाही असे तुमचे म्हणणे आहे का?”
“नाही, तुला ट्रान्सप्लांट केलेले हृदय हे सत्याचेच आहे हे खरे आहे. पण तुझा जीव वाचावा म्हणून सत्याचा बळी दिला गेला असे तुला वाटते ते खोटे आहे. अरे, नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून धडपडणाऱ्या राशीला तिच्या हाताने तुझ्या शरीरात हार्ट ट्रान्सप्लांट करताना काय यातना झाल्या असतील याचा विचार तू करू शकशील?
त्यावेळी आम्ही सामान्य माणसं आहोत हेच आम्ही विसरलो होतो रे. आमच्यासाठी तिथे कोणी अभी किंवा कोणी सत्या नव्हता तर तिथे मृत्यूच्या दारात उभा असलेला एक पेशंट आणि मेंदूने कधीच प्राण सोडलेला एक डोनर होता अन् आम्ही सगळे फक्त आणि फक्त डॉक्टर होतो, ज्याचे कर्तव्य आपल्या पेशंटचा जीव वाचवणे एवढेच होते आणि आम्ही तेच केले.” एक आवंढा गिळून ते म्हणाले.
“सर, तुम्ही कितीही सारवासारव केली तरी सत्याला माझ्याबद्दल कसे कळले हे कोडेच उरते ना हो?” त्याच्या मनाला अजूनही समाधान लाभले नव्हते.
“तुझे कोडे मी सोडवतोय. बट ट्रस्ट मी की मी स्वतःहून त्याला काहीही सांगितलं नव्हतं आणि जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा तो असा निर्णय घेईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.”
“सर..”
“अभी, तुला मी कायम माझ्या मुलासारखा मानत आलो. तुझ्यावर माझं नितांत प्रेम होतं.. आहे. पण बाळा, मी सत्याला मुद्दाम हे सांगेल असे होत नाही ना? माझ्या डोळ्यात नीट बघ आणि सांग की मी तुझा विश्वास तोडेन असे तुला तरी वाटते का?”
“पण मग हे सगळं..?”
“तुला आठवते? ऑपरेशनच्या दोन दिवसांपूर्वी आयसीयूतील पेशंट ट्रीट करताना तुला माइल्ड अटॅक आला होता. तेव्हा आपण केबिनमध्ये बोलताना बाहेरून सत्याने बघितले. आत काय चाललंय हे बाहेरून त्याला कळत नसले तरी तुझ्याबाबतीत काहीतरी त्याच्यापासून लपलेले आहे हे त्याला जाणवत होते आणि म्हणून मग तू बाहेर गेल्यावर तो आत आला.”
“आणि तुम्ही त्याला सांगितलंत, असंच ना?”
“कसा सांगणार होतो मी? तुझ्या शपथेत अडकलो होतो ना? मी तर त्याच्याशी जनरल गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी अनावधानाने तुझी फाईल खाली पडलेली तुझी फाईल त्याच्या हाती लागली आणि.. आणि पुढे मला काहो सांगायची गरजच पडली नाही. सत्या आपल्यासारखा कार्डीयाक सर्जन नसला तरी तोही डॉक्टर होता. तुझ्या केसमधील सिरीयसनेस तो समजू शकत होता.”
“माय गॉड! एवढं सगळं घडलं आणि तेव्हा तुम्ही माझ्याशी एका शब्दानेही बोलला नाहीत.”
“कसं बोलणार? तोही तुझाच भाऊ ना? जसे तू मला शपथेच्या बंधनात अडकवलेस तसे त्यानेही मला शपथ घालून तुला सांगण्यापासून अडवले होते.”
“सर..”
“अभी, तो म्हणाला होता की तो तुझ्यासाठी डोनर शोधेल. अगदी एका दिवसात. इतके दिवस केलेली चूक सुधारण्याची ही एक संधी आहे असे तो म्हणाला होता. तो नेमकं कशाबद्दल बोलतोय हे मला समजू शकले नव्हते रे. नाहीतर त्याला असे काही करण्यापासून मी अडवण्याचा प्रयत्न केला असता ना. पण तू एक टोक, तर सत्या दुसरं टोक.. तुम्ही दोघांनीही मध्यम मार्ग काढण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. केवळ एकमेकांना त्रास होऊ नये म्हणून जपत राहिलात आणि नको ते घडून गेलं.”
“सर, आय एम सॉरी..”
“नाही, तू सॉरी म्हणू नकोस. कारण तुला दिलेला शब्द मी पाळू शकलो नाहीच. शेवटी मला तुझी शपथ मोडावी लागली आणि एका व्यक्तीला हे सांगावं लागलं. ती व्यक्ती म्हणजे..” डॉक्टर सिन्हा एक पॉज घेत थांबले.
ती व्यक्ती कोण आहे हे तुम्ही जाणताच. तरी पुढच्या भागात तिच्याविषयी लिहेनच. कथा अंतिम टप्प्यात पोहचते आहे. तेव्हा वाचत रहा आणि कमेंट करत रहा.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
______
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा