Login

प्रीतबंध.भाग -८४

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध.. प्रीतबंध!
प्रीतबंध!
भाग -८४

तुम्ही दोघांनीही मध्यम मार्ग काढण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. केवळ एकमेकांना त्रास होऊ नये म्हणून जपत राहिलात आणि नको ते घडून गेलं.”


“सर, आय एम सॉरी..”


“नाही, तू सॉरी म्हणू नकोस. कारण तुला दिलेला शब्द मी पाळू शकलो नाहीच. शेवटी मला तुझी शपथ मोडावी लागली आणि एका व्यक्तीला हे सांगावं लागलं. ती व्यक्ती म्हणजे..” डॉक्टर सिन्हा एक पॉज घेत थांबले.


“ती व्यक्ती राशी होती, हो ना?” अभीनेच त्यांचे वाक्य पूर्ण केले.


“हो. बरोबर. तिला सांगणं गरजेचं होतं; कारण त्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. सत्याचा अपघात, त्यामुळे तुला आलेला अटॅक.. तुझी कुठलीच शाश्वती उरली नव्हती आणि त्याचवेळी मला आलेले मेल्स चेक करताना मला सत्याचे नाव दिसले. त्याने तुझ्या अवस्थेवरचा तोडगाच जणू माझ्यासमोर मांडला होता.

त्याने त्याचा मुद्दाम घडवून आणलेला अपघात आणि त्याचे हृदय तुला ट्रान्सप्लांट करण्याची माझ्यावर अन् राशीवर सोपवलेली जबाबदारी. त्याची शेवटची इच्छा म्हण हवं तर किंवा तीच इच्छा मनात ठेवून घडवून आणलेला शेवट समज. मला हे सगळं राशीला सांगणं भाग होतं रे. तुझ्या, सत्याच्या सगळ्या शपथा बाजूला सारून मला तिला हे सांगावं लागलं.

एका बाजूला सत्या आणि दुसऱ्या बाजूला तू.. एका बाजूला तिचा नवरा आणि दुसऱ्या बाजूला प्रेमाच्या आणभाका घेतलेला तिचा भूतकाळ! निर्णय घेणं फार कठीण होतं. तरी तिने तो घेतला. सगळ्या नात्यांना दूर सारून तिने एक डॉक्टर म्हणून निर्णय घेतला आणि तुला प्राधान्य दिलं.

अभी, आता तूच ठरव, मी चुकीचा होतो का? की राशी तिचं कर्तव्य करून चुकली? की सत्याचे वागणे चुकीचे होते?”

जागेवरून उठून त्याच्या खांद्यावर हात ठेवत डॉक्टर सिन्हा त्याला विचारत होते.


“आय एम सॉरी सर. चूक तर माझ्याकडून घडली. माझा आजार हा अशाप्रकारे समोर आला नसता तर हे असं काहीच घडलं नसतं.” आवेगाने त्यांच्या मिठीत शिरत तो म्हणाला.


“अभी, चूक तुझी तरी कुठे होती? जे घडलं ते आपलं प्रारब्ध होतं. आपल्याला वाटतं आपण असे वागलो, ते मिथ्या असते रे सगळे. नियती आपल्याकडून सारं काही करवून घेत असते. सत्याचे आयुष्य नियतीने कदाचित एवढेच रेखाटले असेल, म्हणून त्याने हा निर्णय घेतला. निमित्त मात्र तुझ्या आजारपणाचे झाले. यात तुझा दोष नाहीये ना बाळा. ना तू त्याला काही सांगितलंस, ना मी. पण त्याला कळण्यापासून आपल्याला रोखताही आलं नाही.” त्याच्या पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले.


“मी तुमच्याशी खूप वाईट वागलो ना हो सर? रागात काय काय बोललो. आय एम सॉरी! पण काय करू? गोष्ट सत्याची होती ना, बोलताना भानच राहिले नाही. मला माफ करणार ना?” तो लहान मुलासारखा कान पकडून म्हणाला.


“मघाशी वडिलांसारखा मानतो म्हणालास ना मला? मग माफी कसली मागतोस रे? उलट मला तुझं हक्क गाजवणं, अधिकारवाणीने बोलणं आवडलं. तू माझा आवडता स्टुडन्ट आहेस, माझ्या मुलासारखा आहेस मग तुझं एवढं बोलणं मी पचवू शकतोस ना?” ते मंद हसून म्हणाले तसे अभीचे ओठ देखील रुंदावले.


“अभी, विनोदाचा भाग सोडला तर मला तुझी एक चूक दूर करायची आहे. तू आताच म्हणालास, की गोष्ट सत्याची होती म्हणून. चुकतोहेस बाळा तू. ही गोष्ट केवळ सत्याची नव्हती. तर सत्याबरोबर अभीचीही होती आणि त्यापेक्षा जास्त राशीची होती. तुम्ही दोघं रक्ताच्या नात्यातले होतात म्हणून एकत्र भरडले गेलात पण राशीचे काय? तिचे तुझ्याशी प्रीतबंध होते म्हणून तिला हे सारे सोसावे लागले का? तिचं तुझ्यावर प्रेम करणं चुकीचं होतं का अभी?”

सिन्हा सरांच्या प्रश्नावर अभी मान खाली घालून उभा होता.


“अभी, राशीचे लग्न होतेय. तुला रुचतेय हे?” त्यांचा प्रश्न त्याच्या काळजावर प्रहार करत होता.


“ती मूव्ह ऑन होतेय सर. हे चांगलेच आहे ना? खुश राहण्याचा तिलाही हक्क आहे ना सर?” डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा पुसत तो म्हणाला.


“ती कोणासोबत जास्त खुश असेल हे तुला माझ्यापेक्षा अधिक चांगले कळत असेल असे मी समजत होतो. पण जर का नसेल समजले तर प्लीज यावर विचार कर.” त्याच्या दोन्ही खांद्यावर थोपटत ते म्हणाले.

_____

“अभीऽऽ कुठे आहे तो? डॉक्टर, तुम्हाला तो दिसला का?” अभीच्या मागे निघालेला वरद हॉस्पिटलमध्ये पोहचला होता आणि या घडीला डॉक्टर सिन्हांच्या केबिनबाहेर उभे असलेल्या अभयला विचारत होता.


“ते आत सिन्हा सरांसोबत काहीतरी डिस्कस करत आहेत. काही झालेय का?” अभयने त्याला प्रश्न केला.


“काही विचारू नका. सगळा घोळ झालाय. अभीला सगळं सत्य कळलं म्हणून तो त्यांना जाब विचारायला आलाय. डॉक्टर, दार उघडा ना. मला भीती वाटते आहे.”


“काका, अहो शांत व्हा. आत सिन्हा सर असल्यावर कसली काळजी आणि कसली भीती? ते सारं नीट हॅन्डल करतील, डोन्ट वरी.” आतापर्यंत स्वतः घाबरलेला अभय वरदला समजावत होता. खरं तर त्याचीच चिंता अजून मिटली नव्हती.


“अभी, मला वाटतं आता तू केबिनचे दार उघडलेस तरी चालेल. बाहेर असलेल्यांना उगाच गैरसमज निर्माण होईल.”

“हो, मला आता जायला हवं. मम्मा पप्पा काळजीत असतील. बाय सर, येतो मी. सॉरी वन्स अगेन.” त्यांना मिठी मारून तो निघाला.


“अभीऽऽ” त्यांच्या हाकेने त्याचे पाय थबकले.

“ वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा! सत्याने तुला आज जे गिफ्ट दिलंय त्याचा पॉझिटिव्ह वे ने विचार कर. ये आता.” हलके स्मित करून ते त्याला म्हणाले. उत्तरादाखल अभिने ओठ गच्च मिटून केवळ मान हलवली.


“पप्पाऽऽ” बाहेर येताच त्याला तिथे वरद उभा दिसला.


“अभी, तू ठीक आहेस ना बाळा?” त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे काहूर.


“हो, पप्पा. सॉरी तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला. चला,
आपण घरी जाऊया.” त्याचे शांत बोलणे ऐकून वरदला धक्का बसला. येताना इतका रागात असणारा हा आता एकदम शांत कसा झाला हेच त्याला कळले नाही.


“डॉक्टर अभय, आय एम सॉरी. मी तुला उगाच ओरडलो.” त्याची माफी मागून वरदसह तो घरी जायला निघाला. इकडे मात्र विचारमग्न होऊन अभय केबिनमध्ये गेला.

“सर, डॉक्टर अभीजीत..”

“ही इज फाईन नाऊ.”

“पण इथे आले तेव्हा किती रागात होते? त्यांना नेमके काय झाले होते सर?”


“जे झालं ते चांगल्यासाठीच होतं अभय. त्याला त्याच्या सर्जरीबद्दलच सत्य कळलं. आपण जे त्याला कळू नये म्हणून जपत होतो, तेच जाणून त्याच्या रागाचा स्फोट झाला. पण जे घडलं ते एकाअंती चांगलंच होतं. आता किमान तो आपल्याला पुढे काही विचारणार तरी नाही.”


“पण हे कसे घडले सर? आय मिन त्यांना कोणी सांगितलं असेल?”


“ती जराशी किचकट आणि लांब स्टोरी आहे. केव्हातरी सवडीने सांगेन. या घडीला मात्र मला एक स्ट्रॉंग कॉफी आणि एकांत हवाय. जरा रिसेप्शनवर सांगतोस का?”


“याह, शुअर सर.” त्यांचा इशारा ओळखून अभय केबिनबाहेर गेला.

डॉक्टर सिन्हा डोक्याला हात लावून बसले होते. एवढं सगळं कळून देखील अभीवर शारीरिकरित्या काही त्रास झाला नव्हता. त्याचे हृदय मानसिक ताण सहन करण्यास सक्षम आहे याचाच हा पुरावा होता.

‘सत्या, जाताना तू केवळ अभीला जीवदान दिले नाहीस तर एक स्वस्थ आयुष्य दिलंस. खरंच ग्रेट आहेस तू.’ एक खोल श्वास घेत त्यांनी कॉफीचा कप ओठाला लावला.
_______

“मम्माऽऽ”

घरी परतल्यावर अभीने देवासमोर साकडे घालून बसलेल्या विजयाला हाक दिली.


“अभी.. माझा अभी.. तू ठीक आहेस ना रे?” तिच्या चेहऱ्यावर त्याच्यासाठीचे प्रेम आणि काळजी.


“मम्माऽऽ आय एम सॉरी. माझ्यामुळे आपल्या सत्याला हे पाऊल उचलावे लागले. सॉरी गं मम्मा. प्लीज मला माफ कर.” तिला घट्ट मिठी मारून तो रडत होता.


“अभी, आता नको रे असं बोलू. देवाने माझ्यापुढे सत्या आणि अभी असा पर्याय ठेवलाच नव्हता रे. कुणाला तरी एकाला गमवावे लागले असते. उलट सत्याने तुला निवडायला लावून शहाणपणच केलं की. जेव्हा जेव्हा तुझा श्वास वरखाली सुरु असताना दिसतो तेव्हा जाणवतं की सत्या तुझ्यातच तर आहे. तुझ्या आत समावला आहे. तुझ्या प्रत्येक स्पंदनात माझा सत्याच आहे ना? मग तो आपल्यात नाही असं तरी कसं समजू? आता तूच माझा अभी अन् सत्याही तूच.” त्याचे मुके घेत विजया स्फून्दत म्हणाली.

“मम्मा..” त्याला पुढे शब्दच फुटत नव्हते.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all