Login

प्रीतबंध.भाग -८५

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध.. प्रीतबंध!
प्रीतबंध!
भाग -८५

“अभी, आता नको रे असं बोलू. देवाने माझ्यापुढे सत्या आणि अभी असा पर्याय ठेवलाच नव्हता रे. कुणाला तरी एकाला गमवावे लागले असते. उलट सत्याने तुला निवडायला लावून शहाणपणच केलं की. जेव्हा जेव्हा तुझा श्वास वरखाली सुरु असताना दिसतो तेव्हा जाणवतं की सत्या तुझ्यातच तर आहे. तुझ्या आत समावला आहे. तुझ्या प्रत्येक स्पंदनात माझा सत्याच आहे ना? मग तो आपल्यात नाही असं तरी कसं समजू? आता तूच माझा अभी अन् सत्याही तूच.” त्याचे मुके घेत विजया स्फून्दत म्हणाली.


“मम्मा..” त्याला पुढे शब्दच फुटत नव्हते.


“विजू, अभी.. पुरे आता. आणखी किती रडणार? आजच्या दिवसासाठी हे खूप झाले आणि आता यापुढेही डोळ्यातून अश्रू काढायचे नाहीत.” त्या दोघांना रडताना बघून वरद म्हणत होता पण त्यालाच अश्रू आवरणे कठीण जात होते.


“पप्पाऽऽ आय लव्ह यू.” विजूच्या मिठीतून दूर होत अभीने वरदभोवती हात घट्ट केले.


“आय लव्ह यू टू बेटा. कधीकधी असा वागतोस ना, तेव्हा वाटतं सत्या तर इथेच आहे, माझ्या समोर.. तुझ्या रूपात. खूपदा जाणवलं हे, पण कधी बोलता नाही आलं. सतत वाटायचं तू कसा रिऍक्ट होशील? पण आता विजू म्हटली तसं म्हणावंस वाटतंय की तूच आमचा अभी आणि सत्याही तूच आहेस रे.” त्याच्या भोवतीची मिठी घट्ट करत वरद भावनिक होत म्हणाला.

अभी, विजयाचा लाडका होता.. मम्माज बॉय! सत्या मात्र वरदशी जास्त जुळलेला होता. लहान असताना दिवसातून कितीदा तरी त्याला तो मिठ्या मारत असायचा.

तो गेला तेव्हापासून वरद या मिठीला तरसला होता.आजची ही तl मिठी अभीची नव्हतीच तर सत्याची होती. सत्याने त्याच्या लाडक्या पप्पाला मारलेली मिठी!


“अभीदादा, आतातरी जेवणात काय बनवू हे सांगणार का?” सगळ्यांचे रडके चेहरे बघून मालतीने मुद्दाम मध्येच विचारले तसे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मितरेषा उमटली.


“मालतीकाकू, आजचा मेनू तुझ्या आवडीचा. तू जे करशील ते सर्वांना आवडेल. हो ना गं मम्मा?” विजयाकडे बघून अभी.

“हो मालती, आज तू म्हणशील ते करू. मी तेवढी अभीच्या आवडीची खीर आणि सत्याला आवडायचे तशी पालक पूरी करायला घेते.” म्हणत विजया मालतीला स्वयंपाकघरात घेऊन गेली.


“बघितलंस ना तुझ्या मम्माला? शेवटी मस्वयंपाक तुमच्या मुलांच्याच आवडीचंचा करणार.” वरद म्हणाला तसे अभी मंद हसला.

________

जेवणानंतर आपल्या खोलीत आलेला अभी
छातीवर हात ठेवून स्पंदनांचा आवाज ऐकण्याच्या प्रयत्न करत होता.

‘धक् धक्..’

एका लयीत सुरु असलेले ते स्वर.

“सत्याऽऽ..” छातीवर हात तसाच ठेवून अभीने एक अलवार साद घातली.


“हेय ब्रो, तू मला ऐकतो आहेस ना? तुझा मला खूप राग आलाय, खूप, खूप जास्त. कारण काही असले तरी तू चुकीचे वागलास रे, त्याचा राग आलाय. पण तुला ना मला ‘थँक यू’ म्हणायचे आहे. खूप खूप थँक यू!

तू माझ्यासाठी एवढं केलंस. तुझ्या ठिकाणी मी असतो तर असा नसतो रे वागू शकलो. कायम भित्रा होतो ना मी, भीती वाटली असती मला. तू मोठा, म्हणून कायम तुझं मोठेपण मिरवत राहिलास, कायम माझ्या पाठीशी राहिलास. असाच माझ्या पाठीशी कायम असशील ना रे? मला एकदा ‘अभ्या’ म्हणून प्रेमाने साद घालशील का रे?”

डोळ्यातील पाणी डोळ्यातच हेलकावत अभी छातीवर हात ठेवून बोलत होता. जणूकाही समोर सत्या त्याच्याशी संवाद साधत उभा होता.

एक दीर्घ श्वास घेऊन तो जाण्यासाठी गॅलरीत उठला तोच त्याचे लक्ष सत्याने त्याला गिफ्ट केलेल्या फोटोफ्रेमकडे गेले. त्याचा आणि राशीचा तो फोटो! बेडवर असलेला तो हातात घेत त्याने अलवारपणे त्यावरून हात फिरवला.


“राशी.. कॉलेजमध्ये असताना आपलं आयुष्य किती छान होतं गं. आपण त्याच दिवसात फ्रिज होऊन जायला हवे होते, म्हणजे हा संघर्ष आपल्या वाट्याला आलाच नसता. उगाच आपण मोठे झालो गं. बघ ना, त्यावेळी तुझा हक्काने पकडलेला हा हात मला असा अर्ध्यावर सोडून द्यावा लागेल हा विचारही तेव्हा कधी मनाला शिवला नव्हता.


तू मूव्ह ऑन होते आहेस, इट्स गूड! तुलाही तुझे आयुष्य मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य आहेच की. तू कुठेही असलीस तरी माझ्या शुभेच्छा कायम तुझ्यासोबत असतील. तू मला विसरशील कदाचित; पण.. मी नाही विसरू शकणार तुला, तुझ्या प्रेमाला.. कधीच नाही. आय मिस यू डिअर, मिस यू आल्वेज.”

त्याच्या डोळ्यातील टपोरा थेंब फोटोवर पडला. त्याच्या नि तिच्या हाताने मिळून तयार झालेल्या त्या हृदयावर पडलेले ते थेंब बघून आठवणीच्या उमाळ्यांनी परत हुंदका दाटला.

मघापासून खिशात असलेले सत्याचे पत्र त्याने बाहेर काढले आणि परत त्याचे पारायण करायला सुरुवात केली.

‘..आणखीन सांगायचं तर बरंच काही आहे. पण ते जाणून घ्यायला तुला रेकॉर्डर ऑन करावा लागेल. इथे केवळ तुला वाढदिवसाच्या शुभेच्छाच मिळतील!’

सत्याने लिहिलेल्या त्या ओळी नजरेखालून जाताच त्याला पार्सलच्या बॉक्सची आठवण झाली.

“रेकॉर्डर.. काय असेल त्या रेकॉर्डर मध्ये?” स्वतःशी मोठ्याने बोलत अभी मघाच्या धांदलीत कोपऱ्यात पडलेल्या त्या बॉक्समध्ये रेकॉर्डर शोधू लागला.

________

“वॉव! आत्तू, तू किती भारी दिसत आहे.”
हळद लावायला पाटावर बसलेल्या राशीजवळ बसत चिनू तिच्या गोऱ्या चेहऱ्याकडे एकटक बघत होती.


“तू पण खूप गोड दिसत आहेस, अगदी तुझ्या आत्तूसारखीच.” डॉक्टर रुपाली चिनूच्या गोबऱ्या गालाला हात लावत म्हणाली.


“हो ना? आणि बघा ना माझा ड्रेस पण आत्तूच्या साडीसारखा येलो आहे. मॅचिंग मॅचिंग.” ती आपला ड्रेस मिरवत म्हणाली.

“हो आणि आता आम्ही तुला पण आत्तूसारखं येलो येलो करणार आहोत..” राशीला हळद लावताना रुपालीने चिनूलाही एक बोट लावले.

“राशी, नवऱ्या मुलाकडची ही उष्टी हळद तुझ्या कांतीबरोबरच नव्या आयुष्याला मस्त झळाळी आणेल यात शंकाच नाही. आशिष तुझ्यावर खूप प्रेम करतो गं, ही मेहंदी बघितली ना, किती गडद रंग चढलाय त्यावर. तुमच्या प्रेमाचा रंग देखील दिवसेंदिवस असाच गडद होऊ दे.” राशीच्या गालावर हळदीची बोटं उमटवत रुपाली गोड हसली.


“मॅम, खरंच या रंगावर आपल्या प्रेमाचा रंग अवलंबून असतो?” राशीने आशेने रुपालीकडे बघत विचारले.


“हम्म! असंच म्हटलं जात ना की मेहंदीचा रंग जितका गडद असतो तितकेच नवऱ्याचं आपल्या बायकोवर जास्त प्रेम असतं. तुझ्या हातावरची मेहंदी हेच तर सांगतेय.” राशीचे मेहंदीने रंगलेले हात हातात घेत रुपाली उत्तरली.


राशीने एकवार स्वतःच्या हाताकडे पाहिले आणि एक भकास हसू तिच्या चेहऱ्यावर उमटले. ही मेहंदी आशिषच्या नावाची नव्हती तर त्यात अभीचे नाव कोरले होते. मेहंदीवाल्या मुलीने इतक्या बारीक अक्षरात ते नाव लिहिले होते की वरवर शोधून ते कोणालाच दिसले नसते. राशीने मात्र रात्री उशिरापर्यंत जागून ती पिटुकली अक्षर शोधून काढली होती.

‘अभीराशी!’

दोघांच्या नावाची सुंदररित्या केलेली गुंफण बघून क्षणभर राशी किती हरखली होती? पण क्षणभरच! तिला ठाऊक होतं, ही अक्षरं चुकीने कोरल्या गेली आहेत, ज्याचे चुकूनही पुढे कसलेच भविष्य, कुठलेच नाते असणार नव्हते.

आताही हाताकडे बघून तिला तेच आठवले आणि तिने रुपालीच्या हातातून अलगद हात सोडवून घेतले.


“रुपाली मॅडम, तुमची तर मजाच आहे. नवरदेवही तुमचाच आणि नवरी मुलगीही तुमचीच. दोन्ही बाजूने तुम्हाला मिरवायला भेटतेय.” हळद लावायला आलेल्या बायकांपैकी एकजण म्हणाली.


“नाही हो. नवरदेव माझ्या ओळखीतील असला तरी तिकडून उष्टी हळद आणण्यापूरतेच मी तिकडची होते. आता मात्र मी पूर्णपणे नवऱ्या मुलीकडली आहे. राशी मला माझ्या मुलीसारखी आहे मग ही बाजू सोडून मी तिकडे कशी मिरवू?” रुपाली हसून म्हणाली.


बंगलोरहून आजच आशिषचे कुटुंब इकडे आले होते. आजपासून त्यांचे हॉटेल बुक केले होते. लग्नसमारंभही तिथल्याच सभागृहात आयोजित केला होता. राशीकडील मंडळी लग्नाच्या दिवशी तिकडे पोहचणार होती. लग्नाचा असा खूप मोठा तामजाम नव्हताच. आशिषला तर साध्या पद्धतीने सगळे करायचे होते पण त्याचे पहिलेच लग्न म्हणून सगळ्या रितिभाती करून घ्याव्यात असे सुरेखा आणि अशोकचे मत पडले होते.


त्याचाच भाग म्हणून राशीच्या घरी हळदसमारंभ सुरु होता. हळद आटोपली. पाच सवाष्ण बायकांकडून राशीला आंघोळ घालण्यात आली.


“राशी, आता शांत चित्ताने झोप बघू. उद्याची सकाळ खूप खास आहे तेव्हा मनात असली नसलेली सारी खळबळ इथेच सोडून द्यायची. तिकडे हॉलमध्ये तुझी नवी माणसे, नवे जग, एक नवे आयुष्य स्वागत करायला सज्ज आहेत. तूही भूतकाळातील सारे बंध इथेच विसरून तुझी नव्याने सुरुवात कर. काही लागलं- सावरलं तर आम्ही कायम तुझ्या सोबतीला आहोत.” नंदिनी राशीला तिच्या खोलीत घेऊन येत म्हणाली.


राशीने डोळे भरून खोलीभर नजर फिरवली. तिची ही खोली तिच्यासाठी पुन्हा एकदा अनोळखी होणार होती. या सहा महिन्यात घरच्यांशी नव्याने जुळलेले नाते जरासे सैल होणार होते. आपल्याच माणसांपासून ती पुन्हा दुरावणार होती.

हळदीच्या रंगाने आणखीन खुलून आलेल्या मेहंदीकडे तिने एक नजर टाकली आणि हुंदका आवरत डोळे घट्ट मिटून घेतले.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all