प्रीतबंध.भाग -८६

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध.. प्रीतबंध!
प्रीतबंध!
भाग -८६

राशीने डोळे भरून खोलीभर नजर फिरवली. तिची ही खोली तिच्यासाठी पुन्हा एकदा अनोळखी होणार होती. या सहा महिन्यात घरच्यांशी नव्याने जुळलेले नाते जरासे सैल होणार होते. आपल्याच माणसांपासून ती पुन्हा दुरावणार होती.

हळदीच्या रंगाने आणखीन खुलून आलेल्या मेहंदीकडे तिने एक नजर टाकली आणि हुंदका आवरत डोळे घट्ट मिटून घेतले.

_______

“हं, हेच ते.” म्हणत अभीने बॉक्समधून हाती लागलेला रेकॉर्डर धडधडत्या हृदयाने तो चालू केला.


“अभ्याऽऽ..”

त्यातून सत्याची साद कानावर पडली अन् अभीच्या अंगावर शहारा उभा राहिला.

नुकतेच तर त्याने मनात हा विचार आणला होता, की कुठूनतरी सत्या यावा आणि त्याने ‘अभ्या’ म्हणून साद घालावी आणि रेकॉर्डर सुरु करताक्षणीच तेच शब्द कानावर पहिले पडले. कदाचित अभी त्याच्या हाकेची वाट बघतोय हे सत्याला आधीच ठाऊक असावे. शेवटी दोघांची नाळ एकत्र जी जुळली होती.


“अभ्या, आय एम सॉरी यार!”

अभी पुढे ऐकू लागला. सत्याच्या हळव्या स्वराने तोही हळवा झाला होता.


“तुला ठाऊक आहे, आता रात्रीचे तीन वाजले आहेत आणि मी आपल्या टेरेसवर हे रेकॉर्डिंग करतो आहे. काय करू? झोप पार पळाली रे आता. तुझ्याशी बोलायला म्हणून मघाशी आलो पण हिम्मतच झाली नाही बघ.”

“अभ्या..” सत्याचा आवाज एका क्षणासाठी थांबला होता.


“तुझा त्रास मला कळलाय रे अभ्या. किती दिवसापासून तू हे सहन करतो आहेस आणि आम्हाला यातलं काही कळू नये म्हणून आजवर एकटा सामोरे जात राहिलास. आमच्यावरच्या प्रेमापोटी आम्हाला इतकं कसं परकं करून टाकलंस रे. तू असा कसा रे वागू शकलास? आणि मी? मी तुझा मोठा भाऊ होतो ना? तरी मला तुझं दुःख कसं कळलं नाही. मी तुला कसं समजू शकलो नाही? उलट मीच तुला त्रास देत राहिलो.” सत्याचा पुन्हा हुंदका.


“चुकलो रे मी. तुझ्या राशीला लग्न करून आपल्या घरात घेऊन आलो. हे लग्न मी मुद्दाम नव्हतं रे केलं. मम्माची शपथ! तुला त्रास व्हावा म्हणून मी असं नाही रे केलं. तुला आठवते? राशीच्या दादाचा अपघात झाला होता, त्यावेळी मला कळलं की तिच्या घरचे तिच्यासाठी स्थळ शोधत आहेत. मी हे तुला सांगणार होतो पण तेव्हा तुमच्या दोघात कसलीतरी ठिणगी पडल्याचे जाणवत होते . तू तिच्यापासून लांब पळतो आहेस हे दिसत होतं. मग मीच एक डाव रचला. मुद्दाम स्वतःसाठी तिचा हात मागून आलो.

मला वाटलं मी असा वागतोय हे बघून तू पेटून उठशील आणि राशीवर तुझं असलेले प्रेम मम्मा पप्पांना सांगशील. माझ्या लग्नाला विरोध करून तू पुढे येशील. मलाही हेच तर हवं होतं ना. तुमचं एकमेकांवर इतकं प्रेम असूनही तुमच्यात अचानक आलेला दुरावा दूर करण्याच्या हेतूने मी लग्नाचा घाट घातला होता. झालं मात्र उलटंच. तू मला चक्क शुभेच्छा दिल्यास यार आणि नंतर मला मागे हटताच आलं नाही. ज्याच्यासाठी मी हा प्लॅन करत होतो त्याला मात्र याचे काहीच पडले नव्हते.

लग्नाच्या शेवटच्या क्षणपर्यंत मला हेच वाटत होतं अभी की तू हे लग्न थांबवशील, तुमच्यातील भांडण विसरून तू भर मंडपात एखाद्या हिरोसारखा येऊन मला अडवशील आणि राशीला घेऊन जाशील. तू नाही तर किमान राशी तरी मला म्हणेल, की हे लग्न तिला नकोय. तुझ्याशिवाय ती कुणाचाही विचार करू शकत नाही.. पण असं काहीच घडलं नाही.

ना राशी बोलली, ना तू. शेवटी मला राशीच्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र बांधव लागलं. माझाच डाव माझ्यावर उलटला होता रे. तुम्हा दोघांना एक आणण्याच्या चक्रामध्ये मीच अडकलो. तेव्हा मला हे ठाऊकच नव्हतं की तुझ्या आजारपणामुळे तू राशीपासून दूर पळतो आहेस. कदाचित राशीने तुला सोडून दुसऱ्या कुणाशी संसार थाटावा हेच तुला हवं होतं.” त्याचा एक उसासा आणि क्षगणभराची विश्रांती.


“अभी खरं सांगू?” सत्याचा आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला.

“हे लग्न केवळ दिखाव्यासाठी होते रे. राशी आणि मी कधीच त्या दृष्टीने एकत्र आलो नाही. तुमच्या दुराव्याचं काही कारण मिळेल म्हणून मीच तिला कधी डिवचायचो. त्या बिचारीलाच तुझ्या अशा वागण्याचे कारण ठाऊक नसल्यावर मला कुठला सुगावा लागणार होता?


आमच्या लग्नाला वर्ष झाले नि आताशा जाणवायला लागलंय की ती हळूहळू माझ्याकडे आकर्षित होतेय. मला कळतंय की हे प्रेम नाहीये, तर सहवासातून वाटणारे आकर्षण आहे आणि मला नकोय हे. माझ्याबद्दल राशीच्या मनात प्रेम, आकर्षण काहीच नकोय कारण ती केवळ तुझीच आहे. तिच्या आईवडिलांनी तिचे दुसरीकडे लग्न लावून देऊ नये म्हणून तिला मी माझ्याकडे एक ठेव म्हणून सुरक्षित ठेवले आहे.

पण आता पुरे अरे. हे बस झालंय. असे किती दिवस मी तुझी ठेव स्वतःकडे सांभाळणार ना? तुझं प्रेम तुला परत द्यावेच लागेल. म्हणून मी ठरवलं होतं की राशीला डिवोर्स द्यायचा. किमान त्यानंतर तरी तुला तुझी चूक उमगेल आणि तुम्ही दोघं एकत्र याल. आज हॉस्पिटलनंतर यासाठी मी एका वकिलांकडे जाणार होतो.. तर आजच मला डॉक्टर सिन्हांच्या केबिनमध्ये अनावधानाने तुझे सत्य कळले.


त्या फाईलमधील तुझ्या आजारपणाबद्दल वाचून, नंतर सरांकडून ऐकून मी हादरलो होतो रे, पण काही क्षणच. नंतर वाटलं की घटस्फोटाच्या ठपक्यापासून वाचायला देवाने मला ही संधी दिलीय. आजवर केलेल्या सगळ्या चुका सुधरण्याची संधी!

अभी, माझं हृदय तुला ट्रान्सप्लांट केले की सगळेच प्रश्न मिटणार आहेत. मी जर नसेन तर घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येणार नाही आणि पुढे तू आणि राशी लग्न करून सुखाने राहू शकाल.

बस! माझा निर्णय झालाय. अगदी ठाम निर्णय. तसेही मी सिन्हा सरांना सांगितलेच आहे की उद्या तुझ्यासाठी डोनर उपलब्ध असेल. तो मीच असेल अभ्या, तुझा सत्या या रूपाने कायम तुझ्याजवळ असेल.” सत्याचा स्वर स्थिर होता. कदाचित मनातील बोलून त्याला मोकळे वाटत असावे.


“अभी, माझं बोलून झालंय. आता तू मला वचन दे की तू राशीला कधीच अंतर देणार नाहीस. ऑपरेशननंतर बरा झालास की लगेच मम्मा पप्पांना खरं काय ते सांगून लग्नाचा प्रस्ताव ठेव. सुरुवातीला कदाचित त्यांना हे चुकीचे वाटेल पण नंतर पटेलही. तशी तुझी लव्हस्टोरी इतकी सोपी कुठे आहे? राशीला तुझ्या समोर येण्यासाठी आधी माझ्या कचाट्यात सापडावे लागते हे तर कॉलेजपासूनच ठरलेलं आहे कारण तू स्वतःहून काहीच करू शकत नाहीस.


तुला आठवते ना? तू राशीला प्रपोज करावंस म्हणून देखील मलाच योग घडवून आणावा लागला होता. आता तर प्रश्न लग्नाचा आहे मग मला हे करावे लागेलच ना?भलेही माझा पाहिला डाव फसला असेल तरीही हा प्रयत्न मात्र नक्कीच यशस्वी होईल. राशी फक्त तुझी होती आणि कायम तुझीच राहील. फक्त यावेळी तुला एक पाऊल समोर उचलावे लागणार आहे, तू ते उचलशील ना?


अभी तुला माझी शपथ, आपल्या प्रेमाची, आपल्या मैत्रीची.. आपल्या रक्ताची शपथ. राशीला कधीच अंतर देऊ नकोस. तुझ्याशिवाय ती जगू शकणार नाही. तिला तू हवा आहेस आणि मला तुम्ही दोघं हवे आहात.. एकत्र.. तुमच्या प्रीतबंधात बांधलेले!

अभी, ऐकशील ना रे एवढं? माझी शेवटची इच्छा पूरी करशील ना?” सत्याचा आवाज बंद होऊन कितीतरी वेळ अभी केवळ त्याचा हुंदका ऐकत होता.


“सत्या.. तू कुठल्या मातीचा बनला आहेस रे? स्वतःला खूप महान बनवायला निघालास. तू राशीशी लग्न करतोस हे ऐकून खुश होतो ना मी. कारण तू तिला लाईक करतोस हे मला कळत होतं. माझ्यापेक्षा तुझ्या हातात ती सेफ राहील हेच मला वाटत होते आणि तू सगळे फासे उलटे करून टाकलेस आणि आता कसल्या शपथा घातल्यास?

काय सांगू अरे, राशी लग्न करतेय. ती स्वतःहून लग्नाला तयार झालीय. मूव्ह ऑन व्हायचं म्हणतेय ती आणि तू तिला परत माझ्याकडे घेऊन यायला सांगतोस, कसं शक्य आहे हे सत्या? कुठून आणू मी ही हिंमत?”

त्याचा स्वर थिजला होता.


‘..ती कोणासोबत जास्त खुश असेल हे तुला माझ्यापेक्षा अधिक चांगले कळत असेल असे मी समजत होतो. पण जर का नसेल समजले तर प्लीज यावर विचार कर.’ घरी परतण्यापूर्वी डॉक्टर सिन्हा त्याला सांगत होते ते आठवले.

तो तिथेच भिंतील रेलून बसला. घट्ट मिटलेल्या डोळ्यातून उष्ण धारा गालाला स्पर्शत होत्या.


‘सत्या काय करू? कुठल्या चक्रव्ह्यूहात मी अडकलोय यार. राशी मला हवी आहे पण ती स्वतःहून लग्न करायला तयार झालीय मग मी काय करू शकतो? सिन्हा सर म्हणाले की तू जे गिफ्ट दिले आहेस त्याचा पॉझिटिव्ह वे ने विचार कर. कसा पॉझिटिव्ह विचार करू? सगळं एकाच ठिकाणी येऊन थांबतय.’

कितीतरी वेळ तो तिथेच बसून राहिला. त्याची विचारशक्ती जणू खुंटली होती.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार

🎭 Series Post

View all