Login

प्रीतबंध.भाग-८७

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध.. प्रीतबंध!
प्रीतबंध!
भाग -८७


‘सत्या काय करू? कुठल्या चक्रव्ह्यूहात मी अडकलोय यार. राशी मला हवी आहे; पण ती स्वतःहून लग्न करायला तयार झालीय मग मी काय करू शकतो? सिन्हा सर म्हणाले की तू जे गिफ्ट दिले आहेस त्याचा पॉझिटिव्ह वे ने विचार कर. कसा पॉझिटिव्ह विचार करू? सगळं एकाच ठिकाणी येऊन थांबतय.’

कितीतरी वेळ तो तिथेच बसून राहिला. त्याची विचारशक्ती जणू खुंटली होती.


‘..राशी फक्त तुझी होती आणि कायम तुझीच राहील. फक्त यावेळी तुला एक पाऊल समोर उचलावे लागणार आहे, तू ते उचलशील ना?’

सत्याचे शब्द सारखे त्याच्या कानात फिरत होते. त्याचे तेच सांगणे की ‘राशी फक्त तुझी आहे..’ त्याला एक बळ देऊ पाहत होते.


‘करू का हिंमत? सत्या म्हणतो तसं उचलू का पाऊल? पण नेमकं काय करू? उद्यावर ठेपलेलं लग्न कसं थांबवू?’ प्रश्नांनी डोक्याला नुसत्या झिणझिण्या आल्या होत्या.


शेवटी कसलासा विचार करून तो उठला. स्वतःचे प्रेम मिळवायचे म्हटले तर त्याला हिंमत करावीच लागणार होती. एक पाऊल पुढे टाकावे लागणार होते आणि या सगळ्यांची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी लागणार होती.


‘ठकठक..’

दारावर पडणाऱ्या थापेच्या आवाजाने विजयाने डोळे उघडले. दिवसभराच्या घडामोडीने त्यांचीही झोप उडाली होती. आत्ता नेमका डोळा लागला नि तेव्हाच दार वाजल्याचा आवाज झाला.


“तू थांब. मी बघतो.” ती उठायला गेली तसे तिला अडवत वरद दार उघडायला गेला.


दार उघडेपर्यंत विजयादेखील नीट उठून बसली. हल्ली एकदा जाग आली तर परत झोप येणं कठीण झाले होते. वरदची अवस्थासुद्धा तिच्यापेक्षा वेगळी नव्हती.


“अभी? काय झालं बाळा? झोप येत नाहीये का?” त्याला अस्वस्थपणे दारात उभे असलेले बघून वरदने काळजीने विचारले. अभीचे नाव घेताच विजयादेखील बेडवरून खाली उतरली.


“पप्पा, मम्मा.. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.” जसे काही मनात एक निर्धार करूनच तो आला होता.


“बोल ना. काही त्रास होतोय का?” विजयाच्या मनात एकावेळी काय काय विचार येऊन गेलेत.


“नाही गं मम्मा, मी ठीक आहे. पप्पा, मम्मा तुम्ही बसा ना. आपण बसून बोलूया.” त्यांना बेडकडे घेऊन जात तो म्हणाला.

इकडे मात्र दोघांच्या डोक्यात प्रश्नच प्रश्न पडले होते. चेहऱ्यावर दृढ निश्चय आणि सोबतीला त्याचे सयंत वागणे त्यांना कोड्यात टाकणारे होते.

“मला तुम्हाला काही सांगायचे आहे; पण कशी सुरुवात करू हेच कळत नाहीये..”


“अभी, आम्हाला घाबरवू नकोस. काय ते स्पष्ट सांग.”


मी काही सांगण्यापूर्वी तुम्ही हे ऐका. जे सत्याने पाठवलेल्या बॉक्समध्ये होते.” सोबत आणलेले रेकॉर्डर बेडवर ठेवत तो.


“रेकॉर्डर? हो, त्याच्या त्या पत्रात याचा उल्लेख होता. यामध्ये काय आहे? माझ्या सत्याचा आवाज आहे का?” एकाएकी विजयाचे डोळे भरून आले.


“अभ्या..”

अभीने रेकॉर्डर सुरु करताच परत तीच साद त्याच्यासह सर्वांनी ऐकली. पुढे एकही शब्द न बोलता अभीने सत्याचे संपूर्ण रेकॉर्डिंग त्या दोघांना ऐकवले.


“अभी.. हे काय होतं? सत्या काय म्हणाला? तू आणि राशी.. तुम्ही दोघं प्रेमात होतात? तेही कॉलेजपासून? इतकी वर्ष..” विजयाच्या आवाजाला कंप फुटला होता.


“बघ ना मम्मा, सारं कसं मेस होऊन गेलं गं. सत्या माझा आणि राशीचा विचार करत राहिला आणि मी ती त्याच्यासोबत सुखी असेल या कल्पनेत राहिलो.” त्याचा कंठ दाटून आला होता.


“म्हणजे मघाशी जो फोटो पाहिला तो तुझा आणि राशीचा होता?”


“हम्म.” त्याने हुंकार भरला.


“अभी.. का वागलास तू असं? अरे त्या पोरीचा यात काय दोष? तुमच्या दोघात ती भरडली गेली रे. तिच्या मनाचा तुम्ही दोघांनीही विचारच केला नाही रे.” विजयाच्या डोळ्यातील अश्रू राशीसाठी वाहत होते.


“मम्मा, तिचा विचार करूनच मी तिला नकार देत राहिलो ना गं. तिला जर मी माझं सत्य सांगितलं असतं तर ती माझ्यापासून लांब जाऊच शकली नसती म्हणून मग मी तिच्याशी अंतर ठेवून वागू लागलो. असे करताना मलाही फार त्रास झाला पण तिचे आयुष्य सुखी व्हावे म्हणून हा मार्ग निवडला गं.”


“मार्ग कसाही असला तरी तू चुकला आहेस हेच सत्य आहे अभी.”


“हे मला कळलंय आणि म्हणून मला माझी चूक दुरुस्त करायची आहे.” तो निर्धाराने म्हणाला.


“अभी, तुझं अजूनही राशीवर प्रेम आहे?” इतकावेळ बघ्याची भूमिका घेतलेल्या वरदने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले.


“पप्पा, प्रेम म्हणजे काय हे जेव्हा कळलं तेव्हापासून राशीच्या चेहऱ्याशिवाय मला दुसरं काहीच दिसलं नाही हो. तिचं माझ्या आयुष्यात येणं माझ्यासाठी काय होतं माझं मलाच माहित.”


“मग आता तुझं म्हणणं काय आहे?”


“पप्पा, मला हवी आहे ती. खरंच हवी आहे. केवळ सत्या म्हणाला म्हणून नव्हे तर माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून ती मला हवी आहे. पप्पा, मला राशीशी लग्न करायचे आहे.”


“तुझा निर्णय पक्का आहे ना?”


“पप्पा, उद्या सकाळी तिचे लग्न होतेय हो. तेही तिने निवडलेल्या मुलाशी. मग माझा निर्णय पक्का असून काय उपयोग?”


“अभी, तू आम्हाला सांगण्यापुरते का होईना पण पुढचं पाऊल उचललेस की. आता पुन्हा मागे हटू नकोस बाळा. हेच पाऊल राशीच्या दिशेने टाक. तिला तुझ्या मनातील एकदा सांगून तर बघ.”


“आणि तिने नकार दिला तर?”


“तो तिचा प्रश्न आहे बाळा. कदाचित ती तुझी वाटही बघत असेल ही सुद्धा शक्यता असू शकते ना? पुढे जाऊन पश्चताप करण्यापेक्षा तू किमान एक प्रयत्न तर करून बघ.”


“पप्पा..”


“बी अ मॅन माय बॉय. तू आता मम्माचा पदर पकडून चालणारा छोटासा अभी नाहीस. तर एक मोठा डॉक्टर आहेस. इतरांच्या हृदयाचा गुंता सोडवत असतोस ना? मग एकदा स्वतःच्या हृदयात तर डोकावून बघ. तुझा हा गुंता तुलाच सोडवायचा आहे आणि हो, तुझ्या प्रत्येक पाऊलावर तुझ्या सोबतीला आम्ही आहोतच की.”


“ओह पप्पा, किती साध्या शब्दात सांगितले. आय लव्ह यू.” भावनिक होत अभीने वरदला घट्ट आलिंगण दिले.

“हेच शब्द उद्या राशीला म्हण. मग बघ ती तुला कशी मिठी मारते ते.” तो म्हणाला तसे अभिच्या चेहऱ्यावर हलके हसू पसरले.


“उद्या?”


“मग कधी? तिच्या मुलांच्या बारशात जाणार आहेस का? आपण उद्याच सकाळी इथून निघतोय. तिथे जे होईल ते पाहिल्या जाईल.” त्याला धीर देत वरद म्हणाला.


“मम्मा, तुला हे मान्य आहे ना?” अभीने आशेने विजयाकडे पाहिले.


“नाही, मला तुझं काहीच मान्य नाहीये. किती छळलेस तू त्या पोरीला? मला जर हे माहिती असतं तर मी तिला इथून जाऊच दिले नसते. मला खूप हर्ट केलेस अभी तू.”


“मम्मा, चुकलोय ना गं. तीच चूक सुधारण्याचा प्रयत्न करतोय ना?”


“प्रयत्न? अभी मला तुझे फक्त प्रयत्न नकोत. याद राख, जर राशीला या घरात माझी सून म्हणून परत आणले नाहीस ना, तर.. तर.. खरंच सांगते, मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही.”


“मम्मा..” त्याने आवेगाने तिला मिठी मारली.


“मला राशी हवीय रे अभी. तुझ्यासोबत ती हवीय. माझी ही इच्छा पूर्ण करशील ना रे?” त्याच्या छातीवर डोके ठेवून तिने आर्द्र स्वरात विचारले.


“अभी, मुलाची प्रेयसी सून म्हणून घरात यावी यासाठी अशी धमकी देणारी आई मी पहिल्यांदाच बघतोय. खूप रेअर कॉम्बिनेशन आहे रे हे. आता तर तुला कंबर कसलीच पाहिजे. शेवटी तुझ्या मम्माची ही इच्छा आहे.” दोघांना आपल्या मिठीत सामावत वरद हलके हसून म्हणाला.


“विजू, अशी कशी गं तू छोट्या मुलीसारखी धमकी देतेस? यावेळी आपला अभी एकटा नाहीये तर आपणही त्याच्यासोबत आहोत. आपल्याला मिळून हे सगळं घडवून आणायचं आहे. वी आर अ टीम! राशीसाठी आणि अभीसाठी आपल्याला एकत्र काम करायचं आहे. हं, फक्त त्या नवऱ्या मुलाने तेवढे ऐकले पाहिजे.” तिला गोंजारत तो म्हणाला.


“तोच तर प्रॉब्लेम आहे ना पप्पा. त्या मुलाचं तिच्यावर प्रेम आहे म्हणे.”


“तुला कसं माहित?”


“आमच्या हॉस्पिटलची एक ज्युनिअर डॉक्टर आहे, तिचाच तो भाऊ आहे. त्यने राशीला हॉस्पिटल मध्ये बघितले आणि तेव्हाच तो प्रेमात पडला अशी ती सांगत होती.”


“अरे, त्याचं लाख प्रेम असेल पण तुझं प्रेम तर कॉलेजपासूनच आहे ना? त्या तुझ्या ज्युनिअर डॉक्टरचा मला नंबर दे बघू. मी तिच्याशी बोलते आणि तिच्या भावाला माघार घ्यायला सांगते. तो ऐकेल माझं.”


“मम्मा, अगं आपण असं नाही ना करू शकत. असा फोन केला तिथे सगळा गोंधळ होईल गं आणि राशीची बदनामी होईल ते वेगळंच.”


विजू, आता विचार न करता झोपण्याचा प्रयत्न कर बघू. उद्या आपल्याला खूप मोठी कामगिरी पार पाडायची आहे एवढंच फक्त ध्यानात ठेव. अभी, तूही झोपायला जा. सकाळचं सकाळी बघू.” अभीच्या खांद्यावर हात ठेवत तो त्याला दरवाज्यापर्यंत घेऊन आला.


“पप्पा, थँक यू. माझी साथ द्यायला तयार झालात त्याबद्दल खरंच खूप थँक यू. गुडनाईट.” आपल्या खोलीत जाता जाता त्याने पुन्हा एकवार वरदला मिठी मारली.


वरद म्हणाला तसे अभी त्याच्या हृदयाचा गुंता सोडवायला तयार तर झाला पण हे सगळं इतकं सोपं असेल का? अभी आणि राशी एकत्र येऊ शकतील की त्यांची प्रेमकहाणी अधुरीच राहील? वाचा पुढील अंतिम भागात.
तोपर्यंत स्टे ट्यून्ड!
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
_____

🎭 Series Post

View all