प्रीतबंध.भाग -८८

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध.. प्रीतबंध!
प्रीतबंध!
भाग -८८(अंतिमपूर्व)


“विजू, आता विचार न करता झोपण्याचा प्रयत्न कर बघू. उद्या आपल्याला खूप मोठी कामगिरी पार पाडायची आहे एवढंच फक्त ध्यानात ठेव. अभी, तूही झोपायला जा. सकाळचं सकाळी बघू.” अभीच्या खांद्यावर हात ठेवत तो त्याला दरवाज्यापर्यंत घेऊन आला.


“पप्पा, थँक यू. माझी साथ द्यायला तयार झालात त्याबद्दल खरंच खूप थँक यू. गुडनाईट.” आपल्या खोलीत जाता जाता त्याने पुन्हा एकवार वरदला मिठी मारली.


‘राशीला फोन करावा का? एकदा बोलू का तिच्याशी?’


‘नाही, नको. आता तिला फोन करणे योग्य ठरणार नाही. एकतर ही चढलेली रात्र आणि घरी पाहुण्यांचा गोंधळ..उगाच काही प्रॉब्लेम होईल. आता मला तिला कसलाच त्रास द्यायचा नाहीये. जे आहे ते उद्याचं करावे लागणार आहे. काम डाऊन अभी काम डाऊन.’ स्वतःला समजावत त्याने मोबाईल टेबलवर ठेवून दिला.


खोलीत आल्यावर त्याने किमान पाच तरी वेळा मोबाईल हातात घेतला होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तिने फोन केला तेव्हा त्याने तिचा तो नंबर लगेच सेव्ह करून ठेवला होता. आता मात्र फायनली त्याने मोबाईल ठेवून तिला आणि डोळे मिटले.

_______

झोप हरवलेल्या राशीने अलगद डोळे उघडले. खोलीतील झिरो ब्लबच्या उजेडात तिने हाताकडे नजर टाकली. मेहंदीवाल्या ताईने इतक्या बारीक अक्षरात लिहिलेले अभी आणि तिचे नाव तिला आता अंधारातही स्पष्ट दिसत होती. तिने त्या नावावरून अलवारपणे बोटे फिरवली.


‘अभी.. दोनचार दिवसांनी हातावरचे हे नाव मिटेलही; पण माझ्या हृदयावर कोरलेले तुझे नाव कसे मिटेल रे? आज फोन केला तेव्हा वाटलं मला थांबवशील, म्हणशील राशी नको गं लग्न करुस. पण तू तर चक्क मला शुभेच्छा देऊन मोकळा झालास. असा रे कसा तू कोडगा आहेस?

सत्याशी लग्न जुळले होते तेव्हाही अश्याच शुभेच्छा दिल्या होत्या आणि आजही तसेच वागलास. तुझ्या मनात मी खरंच नाहीये का रे? असा कसा दगड झालाहेस तू?’ डोळ्यात जमा झालेले अश्रू बाहेर पडण्यापूर्वीच तिने डोळे मिटून घेतले.
______


“सगळी तयारी झालीय ना गं? तिकडे मंडळी वाट बघत असतील.”म्हणत सुरेखा राशीच्या खोलीत आली. आत पाऊल टाकले तसे ती थक्क होऊन उभी राहिली.

अंगावर पिवळ्या रंगाची नववारी, डोक्याला मुंडावळ्या, हातावरील हळदीचा पिवळ्या रंगावर अधिकच खुलून दिसणारी काळपट झाक उमटलेली गर्द मेहंदी मेहंदी, हातात हिरवा चुडा..


“राशी किती गं सुंदर दिसतेस! आता या सुखाला कोणाचीही नजर लागायला नको.” डोळ्यात आनंदाश्रू घेऊन सुरेखाने काजळाचे बोटतिच्या कानामागे लावले.


“आई, कसलीच काळजी करू नका. काहीही होणार नाही बघा. कुणाचीही नजर लागणार नाही आणि लागलीच नजर तर ती काढायला आशिषराव आहेतच की.” मिश्किल हसत नंदिनीने सुरेखाच्या खांद्यावर विश्वासाचा हात ठेवला.


“हो गं. आशिषरावांच्या रूपाने खूप समजूतदार जावई मला मिळालाय. देवाचे हे ऋण मी कधीच विसरणार नाही.” डोळ्यातील पाणी पुसत सुरेखा म्हणाली.


“आई, आताच सगळं रडून घ्याल तर पाठवणीच्या वेळी काय करणार? त्यासाठी थोडे अश्रू वाचवून ठेवा की.” नंदिनी म्हणाली तसे सुरेखा खुदकन हसली.

हो गं बाई, आता नाही रडणार. काय करू? मनुष्य मनच असं आहे, दुःखी असल्यावरही रडायला येतं आणि आनंदी असल्यावरही. पण आता नाही रडणार. चला आवरा पटापट. बाहेर गाडी वाट बघत आहे.”

“हो आई. तुम्ही पुढे व्हा. आम्ही आलोच. चिनू तू ही आत्याची बॅग घेऊन आजीसोबत जा बघू.” नंदिनीने चिनूला सुरेखासोबत पाठवले आणि स्वतः राशीला घेऊन बाहेर यायला निघाली.


“राशी, तू खुश तर आहेस ना गं?” नंदिनीने हलक्या आवाजात विचारलेल्या प्रश्नावर राशीने नजर वर करून पाहिले आणि होकारार्थी मान हलवली.


“मी तुझ्यासाठी खूप खुश आहे राशी. मीच का? आई, बाबा तुझे दादा आणि आपली चिनूसुद्धा खूप खुश आहे. हा आनंदसोहळा तुझ्या आयुष्यात फक्त आनंदाचाच बहर घेऊन येईल. तू तुझ्या दोन्ही हातांच्या ओंजळीत हा बहर भरभरून साठव. इतकी आनंदी रहा की तुझा भूतकाळ आठवूनही तुला आठवायला नको. आशिषरावांच्या प्रेमात न्हाऊन निघ.” नंदिनीने तिच्या डोक्यावर हात ठेवला तशी राशीने तिला घट्ट मिठी मारली.

मनात मात्र एकच प्रश्न..

‘भूतकाळ विसरणं खरंच शक्य होईल का?’

______


भल्या सकाळीच व्यवस्थित आवरून अभी ‘सिन्हाज’ मध्ये आला होता. सिन्हा सर तिथेच हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या माळ्यावर राहत होते. सकाळी डोअरबेल वाजली तसे त्यांनी झोपेतच दार उघडले. रात्रीच्या दोन इमर्जन्सी केसेसमुळे त्यांच्या झोपेचे खोबरे झाले होते. म्हणून आज ते अजूनही रात्रीच्याच अटायर मध्ये होते.

“अभी?” त्याला बघून त्यांनी दोनदा डोळे चोळून घेऊन त्यावर चष्मा चढवला. तो समोर आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.


“सर, फक्त पंधरा मिनिटं..”


“व्हॉट?” कपाळावर आठी घेऊन त्यांची प्रश्नार्थक नजर.


“तुम्हाला आवरायला केवळ पंधरा मिनिटं आहेत. छानसे तयार होऊन या. आपल्याला एका इमर्जन्सी मिशनवर जायचं आहे. प्लीज, आता पुढले प्रश्न न विचारता तुम्ही तुमच्या कामाला लागा. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये.”

डॉक्टर सिन्हा त्याला आणखी काही विचारतील त्याआधीच त्याने त्यांना आत पिटाळले.


काही न उमजून ते आत गेले खरे पण कुठल्या इमर्जन्सीबद्दल तो बोलतोय याचा त्यांना अंदाज येत नव्हता. ते येईपर्यंत अभीने पाच सहा जणांना त्यांच्या मोबाईलवरून मेल्स आणि पर्सनल मेसेज करून ठेवले. बरोबर चौदाव्या मिनिटाला डॉक्टर सिन्हा तयार होऊन बाहेर आले.

“व्हॉट अ पंक्च्युऍलिटी सर. आय एम इम्प्रेस्ड. हा तुमचा मोबाईल आणि हा चष्मा घ्या. आपल्याला लेट व्हायला नको. डॉक्टर सैनानी खाली आपली वाट बघत आहेत.” त्यांना बाहेर काढून दरवाजा लॉक करत अभी म्हणाला.


“सैनानी? तो का वाट बघतोय आणि माझ्या मोबाईलवरून तू काय करत होतास?” मोबाईल हातात घेत त्यांनी विचारले.

“त्यांना आपण आपल्या सोबत घेऊन जात आहोत. काय ना ते आर्थ्रोपेडिक्स असल्यामुळे त्यांची गरज पडू शकते. कुणाचे हातपाय तुटले तर वेळेवर काय करणार म्हणून त्यांची सोबत.”


“अभी, तुला वेड लागलंय का?” त्याची असंबंध बडबड त्यांच्या पचनी पडत नव्हती.

“बहुतेक.” तो किंचित हसला.


“अभी, आता दहा वाजता एक अँजिओग्राफी आहे. मला लवकर परत यायला जमेल ना?” ग्राउंडफ्लोअरला लिफ्टमधून बाहेर पडताना त्यांनी विचारले.


“डोन्ट वरी सर, डॉक्टर अभय हे सांभाळून घेईल. तसेही आजच्या दिवसापुरता तो आपल्या डिपार्टमेंटचा इन्चार्ज असणार आहे.”


“व्हाट? हे कोणी ठरवलंय?”


“तुम्हीच. म्हणजे तसे मीच. तुम्ही आंघोळीला गेलात तेव्हा डॉक्टर अभयला मी तुमच्या मोबाईलवरून मेल केला. त्याबरोबर इतर ज्युनिअर डॉक्टर्सना पण त्यांचे आजचे ड्युटी अवर्स चेंज केल्याचे मेसेज केले. तसेच काही इमर्जन्सी आल्यास डॉक्टर कोठारीना बोलावण्याचे पण सांगितलेय.”


“अभी, हे काय चाललंय तुझं?”


“सॉरी सर. म्हणजे तुम्ही इथे नसाल तेव्हा असंच अरेंज केलं असतं ना म्हणून तुमचा वेळ वाचवण्यासाठी मी हे केलं.”


“गुडमॉर्निंग सिन्हा. तुम भी साथ चल रहे हो क्या?” अभीच्या अश्या चक्रम वागण्यातून बाहेर पडत नाही तोच डॉक्टर सैनानीचा आवाज त्यांच्या कानावर पडला.


“तुम भी मतलब?”


“अभी ने मुझे कल लेट नाईट मेसेज करके आज मॉर्निंग मे इमर्जन्सी कही बाहर जाना है करके बताया, तब तुम्हाला जिक्र नही किया था, करके पूछ रहा हूं.” कारच्या मागच्या सीटवर बसत डॉक्टर सैनानी.


“तू याला माझ्या आधी सांगितलंस?” सिन्हा सरांनी जरा रागात अभीकडे पाहिले.


“सॉरी सर. तुम्ही बिझी असणार म्हणून मी तुम्हाला मेसेज केला नाही, बट सी.. मी तुम्हाला घ्यायला स्वतः आलो की नाही?” त्यांचा मुड ठीक करत अभीने कार सुरु केली.


“मला घ्यायला? जवळपास तू मला किडनॅप करून घेऊन जातो आहेस असे वाटत आहे अँड प्लीज, आधी स्पीड कमी कर. अशी कार उडवत नेशील तर लवकरच मला स्वर्गात पोहचवशील.” सीट बेल्ट लावत डॉक्टर सिन्हा.


“सिन्हा, ये तो अच्छाही है. यहाँ तुझे कोई नही मिला, वहा कम से कम एखादं अप्सरा पसंद भी कर ले.”


“सैनानी, मेरे दिमाग का दही मत बना. ऐसा लग रहा है जैसे इस किडनॅपर के साथ तू भी मिला है.” डॉक्टर सिन्हानी मागे बसलेल्या डॉक्टर सैनानीवर रागाने नजर फिरवली.


“अरे, मै तो तेरा वेलविशर हूं. मेरेपे क्यू भडक रहा है?”


“सर, प्लीज तुम्ही भांडू नका. मी आधीच टेन्शनमध्ये आहे.” दोघांना शांत करण्याच्या प्रयत्न करत अभी त्यांच्या मध्ये बोलला.


“अभी, तू तर बोलुच नकोस. तुला कसलं टेन्शन आलंय? किडनॅपर कुठला. हे असे सकाळी सकाळी किडनॅप करून मला कुठे घेऊन जात आहेस ते खरं खरं मला सांग.” डॉक्टर सिन्हाचा अभीवर पलटवार.


“हां, पूछ उसे. अब मुझे लग रहा है की तेरे साथ साथ इसने मुझे भी किडनॅप किया है क्योंकी मुझे भी नही पता की हम लोग कहा जा रहे है.”


“सैनानी, तू तर मध्ये बोलूच नकोस. हं, अभी आता तरी सांग, की आपण कुठे चाललोय?”


“माझ्या लग्नाला.” तो उत्तरला तसे ब्रेक न मारताही
डॉक्टर सिन्हा धक्क्याने मागेपुढे हलले.


“जरा फिरसे बोल. कोणाचं लग्न?” मागून डॉक्टर सैनानी.


“माझंच लग्न.. म्हणजे फिफ्टी पर्सेंट खात्री आहे बाकी फिफ्टी पर्सेंट तिथे पोहचल्यावर कळेल.”

अभीच्या उत्तराने दोघेही त्याच्याकडे भूत पाहिल्याप्रमाणे बघत होते आणि अभी..? त्याने त्यांच्याकडे बघून ओठ रुंदावले आणि पुन्हा समोर बघून पाचवा गिअर टाकला.

अभी तर वरात घेऊन निघालाय. त्याचे लग्न व्हावे असे तुम्हालाही वाटतेय ना? मग चला तर डॉक्टर सिन्हा आणि डॉक्टर सैनानीसह तुमचेही स्वागत आहे; पण अजूनतरी चान्सेस केवळ पन्नास टक्केच आहेत बरं का.

कथा संपत आली तरी इथल्या पात्रांनी त्यांच्या वाचकांना केवळ रडवले. म्हणून या वाचकांसाठी अंतिम भागापूर्वीचा हा हलकाफुलका भाग.

भेटूच आज रात्री अंतिम भागात. तोपर्यंत स्टे ट्यून्ड! आणि हा भाग कसा वाटला तो सांगायला विसरू नका.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
_____


🎭 Series Post

View all