प्रीतबंध!
भाग -८९(अंतिम भाग)
भाग -८९(अंतिम भाग)
“जरा फिरसे बोल. कोणाचं लग्न?” मागून डॉक्टर सैनानी.
“माझंच लग्न.. म्हणजे फिफ्टी पर्सेंट खात्री आहे बाकी फिफ्टी पर्सेंट तिथे पोहचल्यावर कळेल.”
अभीच्या उत्तराने दोघेही त्याच्याकडे भूत पाहिल्याप्रमाणे बघत होते आणि अभी..? त्याने त्यांच्याकडे बघून ओठ रुंदावले आणि पुन्हा समोर बघून पाचवा गिअर टाकला.
“डॉक्टर अभिजीत, क्या बोल रहे हो भाई? ना बाजा, ना बाराती.. ऐसी कैसी शादी?”
“सर, आता तुम्हीच माझे बाराती आणि बँड म्हणाल तर तिथे पोहचल्यावर आपला बँड वाजला नाही म्हणजे मिळवलं.” अभी.
“अभी, आय होप द्याट यू आर नॉट जोकिंग.” डॉक्टर सिन्हा गंभीरपणे म्हणले.
“नो सर, आय एम सिरीयस.”
“मग तुझ्या घरचे कुठे आहेत? व्हेअर इज युअर फॅमिली?”
“सिन्हा सर, तुम्ही मला फॅमिलीपेक्षा कमी आहात काय?” त्याने असे म्हणताच त्यांनी एक रागीट कटाक्ष त्याच्याकडे टाकला.
“ओके, चिडू नका. सांगतो. मम्मा आणि पप्पा आपल्या आधीच निघालेत. पुढे नाक्यावर ते आपल्याला भेटतील. तिथून आपण सोबत जाऊया.”
“ओह, अच्छा. पण तुझ्यासोबत लग्न करायला राशी तयार आहे ना?”
“माहित नाही म्हणून तर फक्त फिफ्टी पर्सेंट खात्री आहे
असे म्हणालो.” अभी.
“आय थिंक, लग्नाचा मुहूर्त साडेदहाचा आहे. तोवर आपण पोहचू ना?”
“मी कार कितीही उडवत चालवली तरी तिच्या घरी पोहचायला आपल्याला किमान दहा वाजणारच. यांना इतक्या सकाळचाच मुहूर्त कशाला हवा होता काय माहित?”
“ते तरी बरे की त्यांनी आधीच मुहूर्त ठरवला होता. आपण तिथे पोहचेपर्यंत तुझा मुहूर्त टळला नाही म्हणजे मिळवलं.”
“सर, प्लीज शुभ शुभ बोला ना. इकडे माझा जीव घशात अडकत चाललाय.”अभी कासावीस होऊन म्हणाला.
“तुम्हा दोघांचं काय खुसूरपुसूर चाललंय ते मला सांगाल का? की मला केवळ श्रोता म्हणून सोबत घेतले आहे? आपण कोणाच्या घरी चाललोय आणि कोणाचा मुहूर्त आधी आहे?” दोघांच्या चर्चा ऐकून डॉक्टर सैनानीचे डोके काम करेनासे आले होते.
“डॉक्टर राशी.. तिच्याकडे आपण जातोय आणि आज तिचे दुसऱ्याच कोणाशी लग्न आहे आणि तो दुसरा कोणी म्हणजे आमची एक डॉक्टर सीमा, तिचा भाऊ आहे. कुछ बात समझ मे आयी?” डॉक्टर सिन्हा.
“ना!” डॉक्टर सैनानींनी निरागसपणे मान हलवली.
“राशी तो सत्या की वाईफ थी ना? अब और किसी दुसरे से शादी, वो किसी और का भाई ऐसे गोल गोल घुमा रहे हो? मेरे तो कुछ भी पल्ले नही पड रहा है.”
“तेच बरं आहे.नाहीतर गोल गोल फिरून उगाच तुला चक्कर येईल.” त्यांच्यावर कोटी करत सिन्हा उगाचच हसले.
_________
“ऐका ना, आपण वेळेत पोहचू ना?” वरदच्या कारमध्ये असलेल्या विजयाच्या चेहऱ्यावर जाम टेंशन दिसत होते.
“आपण प्रयत्न करतोय ना. तू चिंता करू नकोस.” वरद
तिला शांत करत म्हणाला.
“माझं हृदय काळजीने जोरजोरात धडकतेय हो. मी सुरेखाताईंना फोन करून बघू का?” तिच्या चेहऱ्यावरची काळजी बघून वरदला तिला अडवता आले नाही.
ट्रिंगऽऽ ट्रिंगऽऽ
दोनदा फोन वाजूनही पलीकडून कुणीच उचलत नव्हते तसे विजयाच्या चेहऱ्यावर घाम जमा झाला.
“विजू आपण पोहचलोय. पुढच्या दहा मिनिटात त्यांच्या घरासमोर असू. लग्नाच्या घाईगडबडीत फोनकडे कुणाचं लक्ष नसेल. तू पाणी पी बघू.”पाण्याची बाटली तिच्या हातात देत तो.
पाणी प्यायल्यावर तिला बरे वाटले पण मनात मात्र प्रश्न तसाच होता की लग्नाच्या घरातील गर्दीत एकालाही फोनची रिंग ऐकू गेली नसेल का? की घरात वेगळेच काही घडले असेल?
दहाबारा मिनिटात वरदची कार राशीच्या दारासमोर उभी होती. मागोमाग अभीची कार थांबली. मनात भीती, तगमग, उत्सुकता, हृदयाची नुसती धडधड.. विविध भावनांचे नुसते काहूर माजले होते.
दोन्ही कारमधील मंडळी खाली उतरली. आता पुढे काय होईल हे माहिती नसताना समोरचे दृश्य बघून मात्र सगळे हैराण झाले.
लग्नघर म्हणून घर तसे सजले होते पण सगळीकडे शुकशुकाट होतो. घरातील एकही मनुष्य किंवा पाहुणेरावळे कोणीच दिसत नव्हते.
“लग्न इथेच होणार होते ना?” सैनानींनी शांततेचा भंग करत विचारले.
“हे लग्नघर आहे. हॉल कुठे दुसरीकडे बुक केला असेल. आपण तिकडे जाऊया.” घड्याळातील वेळ बघत सिन्हा म्हणाले.
“पण नेमके लग्न कुठे आहे हे कसे कळणार?” विजया.
“सीमा.. डॉक्टर सीमाला मी कॉल करून बघतो. ती सांगेल. तसे तिने आपल्याला कार्ड दिले होते पण सध्या ते नाहीये..” सीमाचा नंबर डायल करत अभी.
पहिल्यांदा रिंग जाऊनही सीमाने फोन उचलला नव्हता मात्र दुसऱ्या प्रयत्नात लगेच कॉल कनेक्ट झाला.
“हॅलो सीमा, अभी बोलतोय.” तिच्या हॅलो आधीच अभी तळमळीने म्हणाला.
“सॉरी? कोण?”
“अभी.. आय मिन डॉक्टर अभिजीत.”
“ओह! हॅलो सर. बाय द वे माझ्यासारख्या होपलेस आणि युजलेस मुलीशी काय काम पडलंय?”
हॅलो.. ते तुझ्या दादाचं लग्न..”
“हं, ते मस्त पार पडतंय. आमची तीच मजा चाललीय. कॉल केल्याबद्दल थँक यू. आता मी एंजॉय करायला जातेय, बाय.” अभीला पुढे कही बोलू न देता सीमाने कॉल कट केला.
“हॅलो, हॅलोऽऽ”
अभीने परत दोनदा कॉल केला पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
“नो रिस्पॉन्स!” तो ओठ दुमडून म्हणाला.
“मग आता?” वरद, विजया, डॉक्टर सिन्हा आणि सैनानीचा एकाचवेळी प्रश्न.
“आता एकच ऑप्शन..”
तो काय सांगणार हे ऐकण्यासाठी चौघेही आतूर झाले होते.
“राशी! आता केवळ तीच आपली मदत करेल.” तिचा नंबर डायल करत तो उत्तरला.
तीनचारदा कॉल करूनही शेवटी ‘द नंबर यू हॅव दायल इज नॉट आन्सरिंग.’ एवढेच ऐकू येत होते.
‘प्लीज राशी, यार पीकअप द कॉल!’ मनातल्या मनात अभीचे शंभरदा तरी म्हणून झाले; पण पलीकडून रिस्पॉन्स मिळत नव्हता.
______
“नवऱ्या मुलीला घेऊन स्टेजवर यावे.” भटजीनी आवाहन केले.
“आवरा हो लवकर. आमचा दादा केव्हाचा येऊन तयार आहे. वहिनीबाई, तुम्हीही चला की.” ओळखीचा आवाज कानावर पडला तसे राशीने नजर वर करून पाहिले.
“सीमा?” तिचा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. सीमा मात्र गोड हसत तिच्याकडेच पाहत होती.
“हो, मीच. वहिनी, किती गोड दिसताय हो तुम्ही? खूपच भारी. एकदम हंड्रेड आऊट ऑफ हंड्रेड!” बोटांचा मोर करून ती म्हणाली.
“तू इथे कशी आणि हे वहिनी वहिनी काय लावलं आहेस?” राशीच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य संपले नव्हते.
“अगं, ही सीमा म्हणजे आपल्या आशिषची चुलत बहीण आहे. भावाच्या लग्नात ती असेलच ना? पण तुम्ही एकमेकींना कसे ओळखता?” डॉक्टर रुपालीने वेळ मारून नेली.
“वहिनी पूर्वी ‘सिन्हाज’ मध्ये होत्या, त्यामुळे आमची ओळख आहे. बरं वहिनी, तुम्ही लवकर या. आतापासून आमच्या दादाला ताटकळत राहायची सवय लावू नका हं.” आली तशी ती गोड हसून निघूनही गेली.
इकडे ‘सिन्हाज’ नाव ऐकल्याबरोबर दोन व्यक्तींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. एक म्हणजे राशी आणि दुसरी.. डॉक्टर रुपाली!
_______
राशी स्टेजवर आली आणि नवरदेव असलेल्या आशिषची नजर तिच्यावर खिळून बसली. वधूच्या वेशातील प्रत्येक मुलगी एक वेगळेच तेज ल्यालेली असते. इथे तर मुळातच सुंदर असलेली राशी त्याच्यासमोर होती. तिला बघून त्याचे भान हरपले नसते तरच नवल.
“दादू, आता वहिनी तुझीच होणार आहे. असे डोळे फाडून काय बघतोस?” सीमाने आशिषला धक्का मारला तसा तो चक्क लाजला.
“आय, हाय! नवरीपेक्षा तर नवरादेवाच्याच गालावर लाली चढली की. राशी, आमच्या मुलाला लाजायला शिकवलंस त्यासाठी अभिनंदन हं.” रेवती ब्लश करणाऱ्या आशिषचा गालगुच्छा घेत म्हणाली.
“मॉम, तू पण ना.” त्याने रेवतीकडे बघून डोळे जरासे मोठे केले.
“हं, हं.. बघितलेस? आत्तापासून बायकोसमोर माझ्यावर ओरडायला लागला. नवऱ्याला मुठीत ठेवायला शिकलीस हो. अभ्यंकरांची सून शोभतेस खरी.” राशीच्या चेहऱ्यावून हात फिरवत रेवती म्हणाली नी आशिषने डोक्याला हात मारून घेतला.
“मुहूर्ताची वेळ झालीय. शुभकार्याला सुरुवात करूया.” भटजींनी सूचना दिली.
राशी आणि आशिष गळ्यात हार घालून बसले होते. भटजींनी विधीला सुरुवात केली.
इकडे राशीच्या पर्समधील मोबाईल घुर्रर्र घुर्रर्र आवाज करत होता, ज्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते.
“हॅलोऽऽ”
“हॅलो, राशी ऐक ना..”
“हॅलो, आत्तू तर लग्न करते आहे तुम्ही कोण बोलताय?”
“चिनू का? बेटा आम्ही लग्नाला आलोय पण ऍड्रेस विसरलोय जरा तुझ्या आत्तूकडे फोन देतेस का?”
“आम्ही तर हॉटेलमध्ये आहोत. तिथे खूप मज्जा येतेय. तुम्ही पण लवकर या. मम्मा, हे कुठले हॉटेल गं?” बोलता बोलता चिनुने नंदिनीला विचारले.
“हॉटेल ब्लू स्टार. पण काय गं कुणाशी बोलते आहेस? आत्याचं लग्न होतंय नी तुला मोबाईल मोबाईल खेळायचं सुचलं का? डे इकडे फोन.” तिचे काही न ऐकता नंदिनीने फोन ओढून घेतला आणि न बघताच पर्समध्ये ठेवून दिला.
चिनुही कही न बोलता लग्न विधी एंजॉय करू लागली.
हार अदलाबदली झाले होते. कन्यादानाचा विधी सुरु झाला होता. भटजी सांगतील तसे अशोक करत होता.
राशीच्या टपोऱ्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. कन्यादान, नंतर मंगळसूत्र आणि मग सप्तपदी.. एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडले की ती राशी उरणार नव्हती तर सौभाग्यवती राशी आशिष अभ्यंकर होणार होती. तिचे नी आशिषचे नाव कायमचे जुळणार होते.
तिने तिच्या हाताकडे नजर टाकली. ‘अभीराशी’ मेहंदीतील ती अक्षरे तिला खुणावत होती.
‘काहीतरी चुकतंय. जे घडतंय ते मला नको आहे. अभीशिवाय मी माझं हृदय कोणालाच देऊ शकत नाही. हे थांबवायला हवे कारण भूतकाळ विसरणे मला तरी शक्य नाही.’ तिचे मन तिला ओरडून सांगत होते.
“..पहिलं प्रेम विसरणे शक्य नाही पण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. कारण या जगात कोणाचेही कोणावाचून अडत नाही. पण जर का कधी अभी परत आलाच आणि त्याने तुझा हात कायमस्वरूपी घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याला नाकारू नकोस. त्याच्या हाताची पकड तूही तुझ्या हाताने आणखी घट्ट कर. कारण आपलं पहिलं प्रेम परत मिळायलाही नशीब लागतं गं.” एकदा बोललेले डॉक्टर रुपालीचे शब्द तिच्या मनात सारखे रुंजी घालत होते.
‘त्याने येऊन माझा हात पकडण्याची मी का वाट पाहू? एक पाऊल मीही पुढे टाकू शकते ना? हिंमत करून जर मी म्हणाले की मला अभीशी लग्न करायचं आहे. हे आयुष्य त्याच्यासोबत घालवायचे आहे तर..? तर तो मला का नकार देईल? मीही त्याचं पहिलंच प्रेम आहे की. रुपाली मॅम म्हणतात तसं त्याला त्याचे पहिले प्रेम मिळाले तर तोही नशीबवानच असेल ना?’ तिचे मन तिच्याशी द्वंद्व करत होते.
“वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालावे.” भटजींनी आज्ञा केली. हातात मंगळसूत्र पकडून आशिष राशीजवळ झुकला.
‘राशी.. आत्ता नाही तर कधीच नाही. हाच तो क्षण. हा निसटला तर तू बोलू शकणार नाहीस. आशिषची माफी माग आणि मंगळसूत्र घालायला नकार दे.’ तिचे मन तिला बजावत होते.
आशिषचे हात गळ्याजवळ येताच तिने डोळे घट्ट मिटले. हृदयाची धडधड वाढली होती. नकार द्यायला शेवटी हिंमत एकवटली होती.
“थांबाऽऽ”
आशिषच्या कानावर शब्द पडले आणि त्याचे हात
तिथेच थांबले.
तिथेच थांबले.
राशी.. तिने झटक्याने डोळे उघडले. कंठापर्यंत आलेले शब्द तिच्या मुखातून बाहेर पडणार त्याआधीच कोणीतरी दुसऱ्यानेच ते शब्द बोलले होते.
“अभी?”
डोळे उघडले तेव्हा त्याचा अस्पष्ट चेहरा स्पष्ट दिसू लागला होता. हो तो अभीच होता. तिचा अभी.. ज्याची ती केव्हाची वाट बघत होती आणि आता त्याच्यासाठी लग्न मोडायला निघाली होती. तोच शेवटच्या क्षणी तिच्यासमोर उभा ठाकला होता. त्याच्याकडे बघून ती झटक्याने उभी झाली. पाठोपाठ आशिष देखील उभा झाला.
“अभिजीतराव काय आहे हे? तुम्ही असे मध्येच येऊन लग्न का थांबवत आहात?” राकेश अभीला जाब विचारायला पुढे आला.
“विजयाताई, तुम्ही तर लग्नाला येणार नव्हता ना? मग काय हे? हे असं कोण वागतं?” सुरेखाचा चेहरा रडवेला झाला होता.
“काकू, याचं उत्तर मी देतो. मला राशीशी लग्न करायचं आहे म्हणून मी हे लग्न थांबवतोय. माझं राशीवर प्रेम आहे. खूप प्रेम आहे आणि.. आणि तिही माझ्यावर तेवढंच प्रेम करते. मला माझ्या प्रेमाला दुसऱ्याच्या हातात सोपवायचे नाहीये म्हणून मी यांना मंगळसूत्र घालण्यापासून रोखले आहे.” अभी सर्वांसमोर म्हणाला. सर्व वऱ्हाडी तोंडात बोटं घालून त्याच्याकडे पाहत होते.
“राशी काय बोलत आहेत हे? हे खरं आहे का?” अशोकने राशीकडे पहिले तसे तिने नजर खाली झुकवली.
“काका, ती नाही सांगणार, कारण तिही माझ्यासारखीच कधी स्वतःचा स्टॅंड घेऊ शकली नाही. माझ्या चुकीची सजा सहन करत राहिली पण कोणाला सांगू शकली नाही.
राशी, मी आजवर केलेल्या सर्व चुकांची सगळ्यांसमोर माफी मागतो आणि तुला विचारतो की मला माफ करून माझ्याशी लग्न करशील का? माझ्या हातात तुझा हात देऊन उरलेल्या आयुष्याची सोबत करशील का?” तिच्यासमोर गुडघ्यावर बसून त्याने हातातील रिंग तिच्यासमोर धरली.
हे काय चाललंय कोणाच्याही आकलनात येत नव्हते. राशी काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. तिने एकवार अभीकडे पाहिले आणि मग आशिषकडे.
“आशिष, तुम्ही खुप चांगले आहात. खूप खूप चांगले. जी मुलगी तुमच्याशी लग्न करेल तिच्या आयुष्याचे सोने होईल. पण मला माफ करा. मी हे लग्न नाही करू शकत. कारण अभी परत आलाय आणि आपलं पहिलं प्रेम परत मिळायला भाग्य लागतं.” ती त्याच्यासमोर हात जोडून उभी होती.
“राशी..” अभी अनिमिष नेत्राने तिच्याकडे पाहत होता.
“हो अभी, तू जरी आता आला नसतास तरी मी या लग्नाला नकार देणार होते पण ऐनवेळी येऊन तू जणू माझ्या ओठातील शब्द चोरलेस. मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही रे.” अंगठी घालण्यासाठी हात पुढे करत ती म्हणाली.
तिच्या बोटात अंगठी सरकवत अभीने तिच्या हातावर ओठ टेकवले.
“राशी, आय लव्ह यू यार! अँड सॉरी फॉर एव्हरीथिंग.” त्याचा आवाज हळवा झाला होता.
“अभी, आय लव्ह यू टू!” भोवतालच्या जगाचा विसर पडून ती त्याच्या निठीत समावली.
ती पहिली मिठी.. तिची अन् त्याची.. त्यांच्या प्रेमाची! दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
“आशिष, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुझे लग्न मोडले.” मिठीचा आवेग ओसरल्यावर अभी आशिषला हात जोडून म्हणाला.
“भावा, सॉरी कशाला म्हणतोस? उलट मला तुला थॅंक्स म्हणायला हवे. तुझ्यामुळे माझे लग्न वाचले. तू वेळेवर आलास म्हणून, नाही तर जवळजवळ ते मोडलेच होते. मी दुसरं लग्न करतोय म्हणून माझ्या बायकोने मला कोर्टात खेचले असते.” डोक्यावरचा फेटा काढून आशिष हसत म्हणाला.
आता राशी आणि अभीसह सर्वांची आश्चर्याची पाळी होती. आशिष काय बोलतोय कोणालाच कळत नव्हते. रुपालीने अचानक सीमाकडे पाहिले तसे राशी आणि अभिनेदेखील तिच्यावर नजर रोखली.
“अरे, माझ्याकडे असे काय बघताय? प्रीतबंधच्या वाचकांसारखा तुम्हीसुद्धा हा ग्रह करून घेतलाय का की आम्ही दोघं नवराबायको आहोत? आशू माझा कझीन आहे यार. माझा चुलत भाऊ, माझा लाडका दादा आहे. याची बायको तर दुसरीच कुणी आहे.. म्हटलं तर या सगळ्या प्लॅनची मास्टरमाईंड!” सीमा स्पष्टीकरण देत म्हणाली.
“प्लॅन? मास्टरमाईंड? काय बोलतेस तू?” अभी.
“हां, म्हणजे ते तुम्ही आणि राशीमॅमना एकत्र आणण्यासाठीचा माझ्या खऱ्याखुऱ्या वहिनीने हा प्लॅन तयार केला होता.” ती खाली पाहत म्हणाली.
“वहिनी? म्हणजे कोण?” त्यांची उत्सुकता शिगेला
पोहचली होती.
“मै.. और कौन?”
गर्दीतून एक आवाज आला तसे सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. लग्नासाठी म्हणून तयार होऊन आलेली एक सुंदर तरुणी पुढे येत होती.
“मनी? तू?” राशीने अत्यानंदाने तिला मिठी मारली.
“मी एकटीच नही तर तिथी आणि रौनक देखील आहेत. एक सत्या सोडला तर आपली अख्खी गँग इथे आहे.“ डोळे पुसत मंजिरी म्हणाली.
“तू आणि आशिष..?”
“हम्म. आशिष खरंच माझा नवरा आहे. महाबळेश्वर.. जिथे सत्याने मला नकार दिला होता, तिथेच मला आशिष भेटला आणि आमची स्टोरी सुरु झाली. ती एक वेगळीच कथा आहे. चार महिन्यापूर्वी सीमाच्या लग्नात मला तुमच्याबद्दल कळलं आणि मनाला खूप त्रास झाला. एकमेकांवर इतकं प्रेम करणारे तुम्ही दोघं दुरावलात हे मनाला सहनच झालं नाही आणि मग मी हा प्लॅन केला अँड सी.. इट वर्क्स!”
“ओह मनी एवढं सगळं तू घडवून आणलंस? आशिषचे आईबाबा सुद्धा यात सामिल होते?”
“कोण ही रेवती आणि हिचा हा नवरा?” आशिषच्या नकली आईवडिलांना बघून ती हसली.
“अगं, हे दोघं आशुचे फ्रेंड्स आहेत. कॉलेजमध्ये असताना यांचा नाटकाचा ग्रुप होता म्हणे. मग म्हटलं द्यावा यांना चान्स आणि त्यांनीही या संधीचे सोने केले. हे भटजी हे सुद्धा आपल्याच गोटातील आहेत. आपल्या तिथीचे नवरोबा. हनिमून इन महाबळेश्वर वाले.” ती हसून म्हणाली तसे सर्वच हसले.
“पण जर मी आलोच नसतो तर?” अभीच्या प्रश्नाने वातवरण काहीसे गंभीर झाले.
“तू आलाच असतास अभी. तू इथवर पोहचलास तेव्हा कुठे आम्ही लग्नाची विधी सुरु केली. आमच्या सीमा जासूसने तुझा मोबाईल ट्रॅक केला त्यामुळे तुझे लोकेशन आम्हाला कळत होते. पण जर का नसता आला तर मी तुला कॉल करून बोलावले असते.” मंजिरी.
“ओह, सीमा तू खरंच ग्रेट आहेस.”
“नाही मी तर होपलेस आणि युजलेस आहे ना? सीमा नाक वाकडे करत म्हणाली.
“नाही, तू खरंच खूप गोड आहेस.मला जर एखादी बहीण असती तर तुझ्याच सारखी असती.” सीमाला जवळ घेत तो.
“बरं, आता हा नात्यांचा घोळ संपला असेल तर खरे लग्न लावायचे का? म्हणजे आम्ही खास त्यासाठी आलो आहोत.” डॉक्टर सिन्हा म्हणाले तश्या सगळ्यांच्या गप्पा थांबल्या.
‘राशी नवरी म्हणून अगदी परफेक्ट आहे, पण माझं काय? मी या ड्रेसवर नवरदेव बनलेला चालेल ना?” स्वतःच्या पेहरावाकडे पाहत अभी.
“डोन्ट वरी आमच्या जासूस सीमाने तुझ्यासाठी खास शपिंग केलेली आहे. तू दहा मिनिटात चेंज करून घे.” आशिष त्याला खोलीत घेऊन जात म्हणाला.
तो येईपर्यंत खऱ्याखुऱ्या भटजीनी पूजा मांडली. तोवर आशिष आणि अभी कपडे बदलून आले.
‘शुभमंगल सावधान..!’
अभी आणि राशी दोघांच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि एक प्रेमकहाणी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली.
अशोक आणि सुरेखा बरोबर विजया आणि वरदचेही डोळे आनंदाने पाणावले होते. नंदिनी आणि राकेश राशीसाठी खुश होते. चिनूही आनंदी होती.
आणि..
आणखी एक कोपरा आनंदी होता, जिथे एक त्रिकोण पुन्हा इतक्या वर्षांनी एकत्र आला होता.
“रूपा?”
डॉक्टर रुपालीकडे बघून डॉक्टर सिन्हा आणि डॉक्टर सैनानी एकाचवेळी आश्चर्याने म्हणाले.
उत्तरादाखल डॉक्टर रुपालीच्या ओठावर केवळ एक स्मित उमटले होते. कदाचित जुन्या प्रीतबंधाच्या एका नव्या पर्वाची ही सुरुवात असणार होती.
****समाप्त ****
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
फोटो गुगल साभार.
फोटो गुगल साभार.
साहित्यचोरी गुन्हा आहे. सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून youtube चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास ईरा कडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
________
________
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा