Login

प्रायव्हेट डिटेक्टिव्ह भाग - अंतिम

Gosht Eka Casechi


समरला काही सुचेनासे असे झाले. त्याने निहारिकाला फोन लावला. नेहमीच्या अपेक्षेप्रमाणेच तिचा फोन बंद होता.
'सगळी कामे एकत्र होणार कशी? आमच्या आईसाहेब तिकडे गावाकडे आमची वाट पाहतात. निहारिका कायम लग्नाची बोलणी करायला येते. ज्या केसेस येतात, त्यांना सोल्व्ह करायला बरेच महिने निघून जातात. अखेर हे पत्करलेले काम तर करायलाच हवे. या कामातून आपल्याला समाधान मिळते आणि पैसाही. हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहे.' विचार करता करता समरला झोप लागली.

"साहेब उठलात का?" सकाळी सकाळी आपटे समरच्या बेडरूमपाशी येऊन दार वाजवत म्हणाले.
"काही खास बातमी असल्याशिवाय आपटे इथे यायचे नाहीत." समर उठून पटकन आवरून आला.
"साहेब, तेजपालला एक राजवीर म्हणून लहान भाऊ आहे. तेजपालपेक्षा साधारण दोन एक वर्षांनी लहान आहे तो. पण तो इथे या दोघांच्या जवळ राहत नाही. याच शहरात राहतो आणि जिथे राहतो तिथूनच तो रोज फॅक्टरीत येत -जात असतो. त्याचं लग्न झालेले असून तो आपल्या बायकोसोबत राहतो. इतपत माहिती मिळाली आहे." विकासने दिलेली माहिती आपटेंनी समरला पुरवली.

"बरं, त्याचा पत्ता मिळाला?" समर.

"नाही. आज मिळून जाईल."

पुढच्या चार-पाच दिवसात बरीच माहिती हाती आली. तेजपालची होणारी बायको मिथिला हिने अचानक राजवीरशी लग्न केले म्हणून मालविकाबाईंनी राजवीर आणि मिथिला या दोघांना घरातून बाहेर काढले.
दीनदयाळ साहेबांच्या "विल" नुसार फॅक्टरीतला अर्धा भागीदार राजवीर असल्याने त्याला तेथून कमी केले गेले नाही. फॅक्टरीमधला अर्धा अधिक हिस्सा त्याच्या नावावर आहे. तो तेजपालने तसाच राहू दिला. आता भावाभावांचे फक्त व्यवहारिक संबंध उरलेले आहेत. विकासने बरीच माहिती मिळवली होती.

"हे सारे ठीक आहे. मात्र हा त्या कुटुंबाचा वैयक्तिक विषय असून तिथल्या तिथे सॉल्व्ह होणार होता. त्याचा माझ्याशी संबंधच काय? नक्की घोडं अडलय कुठे? आणि ही केस माझ्याकडे येण्याचे कारणच काय? यात सोडवण्यासारखे तसे पाहायला गेले तर काहीच नाही." समर विकासला म्हणाला.

"सर ते.. निहारिका मॅडम आणि तेजपाल यांचा साखरपुडा निश्चित झाला आहे."

"काय?" समरला आश्चर्याचा धक्काच बसला.

"सर, निहारिका मॅडम तुमच्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आल्या होत्या? आणि तुम्ही त्यांना थोडे दिवस थांबायला सांगितले? हे खरे आहे ना?" विकास.

"हो. पण हे सारे तुला कसे माहिती?" समरला आणखी एक धक्का बसला.

"ते महत्त्वाचं नाही सर. दीनदयाळ साहेब आणि निहारिका मॅडमचे वडील यांचा जुना परिचय होता. मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी काहीतरी बिनसले आणि दोघे बोलेनासे झाले.
नंतर दीनदयाळ साहेब गेले आणि ही दोन्ही कुटूंब हळूहळू पुन्हा संपर्कात आली. तुमचा आणि निहारिका मॅडमचा परिचय तसा नवीनच म्हणायचा. त्यामुळे तुम्हाला या बाबतीतलं काही माहिती असणं अशक्य होतं.
तेजपाल सरांच ठरलेलं लग्न मोडलं आणि त्यांनी काही दिवसांनी निहारिका मॅमला लग्नासाठी मागणी घातली." विकास.

"काही लोक आपल्या आयुष्यात येतात ते योग किंवा काही ऋणानुबंध असतात म्हणून. तसे पाहायला गेले तर या केसमध्ये काहीच तथ्य नाही." समरने विकासने सांगितलेली सारी माहिती नोट डाऊन करून घेतली.

"सर, खरी माहिती तर पुढे आहे. मगाशी म्हटलं, ते दीनदयाळ साहेब गेले..पण मला असा दाट संशय आहे की ते जिवंत आहेत. तुम्ही म्हणता तसे प्रॉपर्टीसाठी त्यांना कुठेतरी लपवून ठेवलं असावं आणि तुम्हाला फोन ज्या नंबर वरुन आला तो नंबर देखील त्यांचाच आहे." विकास पुढे म्हणाला.

समरला हीच शंका होती.

"विकास, तू म्हणतोस त्यात तथ्य नक्कीच आहे. त्या दिवशी दीनदयाळ साहेबांच्या पेंटिंगला साधा हारही घातलेला नव्हता." समर विचार करत म्हणाला.
"विकास, अजून एक काम. त्या राजवीरच्या घरावर लक्ष ठेवण्यासाठी आणखी दोन माणसे पाठवा. शिवाय आज रात्री आपण दोघे त्याच्या घराची झडती घेण्यासाठी जाऊ."

बाहेर पडण्यापूर्वी समरने निहारिकाला फोन करून सारी माहिती कळवली.

रात्री एकच्या सुमारास समर आणि विकास दोघे राजवीरच्या बंगल्यापाशी येऊन पोहोचले.

बंगल्यात सामसूम होतीच आणि सुदैवाने तिथला सुरक्षा रक्षक गाढ झोपेत होता. दोघेही कानोसा घेत बंगल्याच्या मागच्या बाजूने भिंतीवरून आत आले. विकासने पूर्ण बंगल्याला एक फेरी मारली. वरच्या मजल्यावर एका खोलीत मंद लाईट सुरू होता. बाजूला असलेल्या झाडाच्या आधाराने विकासने त्या रूमच्या खिडकीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
आत खोलीमध्ये साधारण एक पंचावन्न ते साठ वय वर्ष असलेला माणूस खोलीत पसरलेल्या मंद उजेडात काहीतरी वाचत आडवा पडला होता. बहुतेक त्या माणसाला उठता येत नसावं. बाजूलाच एक व्हीलचेअर उभी होती. विकासने आपल्या मोबाईलमध्ये जमेल तसे फोटो काढून घेतले आणि तो खाली उतरला.

नंतर समरही त्या झाडावर चढला. आतले दृश्य पाहून तो हडबडलाच. झोप आली असावी म्हणून त्या माणसाने पुस्तक बाजूला ठेवले होते. आता खोलीतल्या मंद उजेडातही त्याचा चेहरा व्यवस्थित दिसत होता. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून दीनदयाळच होता. त्याचा चेहरा हुबेहूब त्या पेंटिंगच्या चेहऱ्याशी मिळता जुळता होता.
अखेर संशय खरा ठरला, दिनदयाळ नक्कीच जिवंत होता!

दुसऱ्या दिवशी आपटे वेश बदलून कुठलीशी डील करण्याच्या बहाण्याने तेजपालच्या फॅक्टरीत दाखल झाले. तिथे त्यांची भेट मालविकाबाई आणि त्यांच्या सेक्रेटरीशी झाली. नंतर डील करण्याच्या बहाण्याने आपटे चार-पाच दिवस सलग फॅक्टरीत येत राहिले. इथेच महत्त्वाची माहिती आपटेंच्या हाती लागली.
"साहेब, मालविकाबाई आणि त्यांचे सेक्रेटरी दोघे रिलेशनमध्ये आहेत."

"काय?" समरला चांगलाच धक्का बसला.

"हो. दीनदयाळ साहेब गेल्या सात ते आठ वर्षापासून आजारी असल्याने सारा कारभार तेजपालने आपल्या हातात घेतला. दीनदयाळ साहेबांचे सेक्रेटरी कामानिमित्त घरी ये -जा करत होते. त्यातच मालविका बाई आणि त्यांत मैत्री झाली आणि हळूहळू हे संबंध खूप पुढे गेले.
काही वर्षांनंतर तेजपालच्या कानावर या साऱ्या गोष्टी येऊ लागल्या. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले. मात्र मालविका बाईंनी स्वतः हे जेव्हा कबूल केले तेव्हा त्याने खूप दंगा केला. तोवर या साऱ्या गोष्टी दीनदयाळ साहेबांच्या कानावर गेल्या होत्या. त्याचा त्यांनी चांगलाच धसका घेतला. परिणामी त्यांची तब्येत आणखी बिघडली.

मात्र नंतर तेजपालने या साऱ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या, कदाचित प्रॉपर्टीसाठी असेल. काही दिवसांनी वकिलाला हाताशी धरून तेजपालने आपले वडील गेल्याचा बनाव रचला आणि बरीच प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली.
यामुळे तेजपालचे ठरलेले लग्न मोडले.

राजवीरला हे सारे मुळीच पसंत नव्हते आणि दीनदयाळ साहेब काहीच करू शकत नव्हते. नंतर तो साहेबांना घेऊन गुपचूपपणे घरातून बाहेर पडला. काही दिवसांनी त्याने दीनदयाळ साहेबांच्या म्हणण्यानुसार मिथिलाशी लग्न केले. आता ते तिघे एकत्र राहतात. त्याचा मालविका बाई अन् तेजपाल यांचा काहीच संबंध नाही."

"अस्स..मग राजवीरने आपले वडील जिवंत आहेत
हे साऱ्या जगाला ओरडून का नाही सांगितलं?" समर.

"कारण तेजपालने विलनुसार राजवीरची फॅक्टरीमधील भागीदारी तशीच राहू दिली आणि एक बंगला त्याच्या नावे करून दिला. शिवाय जीवे मारण्याची धमकी दिल्याने, दीनदयाळ जिवंत आहेत हे कोणालाही न सांगण्याचे वचन त्याने तेजपालला दिले आहे. मिथिलाच्या माहेरची प्रॉपर्टी भरपूर आहे. शिवाय ती एकुलती एक आहे." आपटेंनी पुढची माहिती पुरवली.

"साहेब, आता दिनदयाळ साहेबांची भेट घ्यायला हवी."

"नक्कीच."

रात्री समर आणि आपटे राजवीरच्या बंगल्यावर आले. अर्थातच वेष बदलून.
तिथे राजवीरला धाक दाखवून त्यांनी दीनदयाळ साहेबांची भेट घेतली.

"सर, मला फोन तुम्हीच केला होता हे आता स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर तुमचा काहीच कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही."

"समरवीर, तुम्ही फेमस डिटेक्टिव्ह आहात, हे अख्ख्या शहराला माहिती आहे. सोशल मीडियावरून नंबर शोधून मी तुम्हाला फोन केला खरा. मात्र नंतर राजवीरला संशय आल्याने त्याने माझ्याकडून फोन काढून घेतला. त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचे सारे मार्ग माझ्यासाठी बंद झाले. पण मला खात्री होती, तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहचालं.
नंतर राजवीरला विश्वासात घेऊन मी ही सारी माहिती फॅक्टरीत आलेल्या आपटेंपर्यंत पोहोचवली. आता तुम्ही वेष बदलून आलात. नाहीतर राजवीरने तुम्हाला मला सरळपणे भेटू दिलं असतं." दीनदयाळ म्हणाले.

"मग अचानक राजवीरचे मन बदलण्याचे कारण काय?" आपटे म्हणाले.

"तेजपालचे वागणे. राजवीरच्या नावाचा फॅक्टरी मधला अर्धा हिस्सा तेजपाल स्वतःच्या नावे करू पाहत होता म्हणून..
राजवीर चुकलाच. मात्र आता त्याला पश्चाताप होतो आहे. मी जिवंत असल्याचे कोणालाही न सांगण्याचे वचन जरी त्याने तेजपालला दिले असले तरी राजवीरने माझा उत्तम सांभाळ केला. गेल्या तीन-चार वर्षात मला काहीही कमी पडू दिले नाही. फॅक्टरी मधली घडणारी प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट तो माझ्या कामावर घालत होता. जेव्हा तेजपालने सगळंच हडपण्याचा डाव मांडला, तेव्हा राजवीरला आपल्या चुकीचा पश्चात्ताप झाला. मग मी त्याला विश्वासात घेऊन ही बाब त्याच्या कानावर घातली.

"समर, मला वाटतं तू आम्हाला नक्कीच न्याय मिळवून देशील." दीनदयाळ साहेबांच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटले. "माणसाने आयुष्यात नेहमीच सरळ मार्गी राहून चालत नाही. परिस्थिती आपल्या विरुद्ध असली म्हणजे त्याचा गैरफायदा घेणारी आपलीच लोकं असतात."

"दीनदयाळ साहेब, न्याय तर तुम्हाला मिळणारच. आता पुढची प्रोसिजर कायद्यानुसार होईल. त्याची काळजी नसावी." समर राजवीर आणि दीनदयाळ साहेबांचा निरोप घेऊन बाहेर पडला.

"आज माझी पंधरावी केस यशस्वीरित्या सॉल्व्ह झाली. माझे उत्तम सहकारी सोबत असल्यावर अडचण कसली?" समर अभिमानाने आपटेंकडे पाहत म्हणाला. "आज कधी नव्हे ते आमच्या आई साहेबांची आठवण झाली. गावी जाऊन यायलाच हवं." समरने आपली गाडी सुरू केली आणि मागे वळून त्या बंगल्याकडे पाहिले.
..आणि रात्रीच्या भयाण शांततेत समरच्या जाणाऱ्या त्या गाडीचा आवाज बराच वेळ घुमत राहिला.