Login

प्राईव्हेट डिटेक्टिव्ह भाग-2

Gosht Eka Casechi

दोघे बंगल्याच्या मागच्या बाजूला आले. तसा तिथला सुरक्षा रक्षक पुढे आला.
"कोण हवं आहे?"

"बंगला पहायचा होता." आपटे पुढे होत म्हणाले.

"कुठून आलात?" सुरक्षा रक्षकाने पुन्हा विचारले.

"हे काय..तुमच्या समोरून तर आलो, रस्त्यावरून." आपटेंच्या या उत्तराने सुरक्षा रक्षकाची करमणूक झाली.

"साहेब, इथे रोज कोणी ना कोणी येत असतं. माहिती विचारावी लागते आम्हाला." सुरक्षा रक्षक पुढे होत म्हणाला.

इतक्यात गेट जवळ एक गाडी येऊन थांबली. त्यातून गडबडीने एक उमदा, साधारण समरच्या वयाचा तरुण खाली उतरला.
"अरे, समरवीर! द प्रायव्हेट डिटेक्टिव्ह..तुम्ही इथे? तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. सोशल मीडियावर सध्या तुमचाच बोलबाला आहे म्हणायचा." त्या तरुणाने समर समोर हात पुढे केला.
"मी या बंगल्याचा मालक, तेजपाल. मालविका मॅडमचा मोठा मुलगा. या आत या. तेवढीच ओळख होईल आपली." तेजपाल दोघांना आत घेऊन आला.

बंगला अतिशय सुंदर होता. समरला बंगला खूपच आवडला.

"सर, चहा की कॉफी?" तेजपालने दोघांना बसायची विनंती केली.

"कॉफी चालेल. पण गार नको..गरमच हवी." आपटे समरकडे पाहत म्हणाले.

इतक्यात एक बाई सावकाशपणे जिना उतरून खाली आल्या. "समर सर, या आमच्या आई साहेब, मालविका घाटगे आणि आई हे समरवीर, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत. " तेजने ओळख करून दिली.
समरचे नाव ऐकताच मालविकाबाईंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली.
साधारण पन्नाशीच्या आसपास असलेल्या, खानदानी सौंदर्याने समोरच्या व्यक्तीला मोहित करून टाकणाऱ्या मालविकाबाई, तेजच्या बाजूला येऊन बसल्या.

"..आणि हे कोण?" आपटे बाजूच्या भिंतीवरचे मोठे पेंटिंग पाहत म्हणाले.

"ते माझे वडील. मि. दीनदयाळ घाटगे. पण ते आता ह्यात नाहीत. त्यांना जाऊन चार वर्षे होत आली."

"काय?" कॉफी पिता पिता आपटेंना जोराचा ठसका लागला.

समरने मात्र चेहऱ्यावर काहीच हावभाव न दाखवता उठून अगदी बारकाईने त्या पेंटिंगचे निरीक्षण केले.

"काय करत होते हे?" समर उत्सुकतेने म्हणाला.

"ते पहिल्यापासूनच आमची फॅक्टरी सांभाळत होते. आज हे उभे राहिलेले सारे साम्राज्य त्यांचेच तर आहे."

"मग आता व्यवसाय तुम्ही सांभाळत असाल?" आपटे मध्येच म्हणाले.

"हो. मी आणि आईसाहेब दोघे सांभाळतो. सुरुवातीस आईसाहेबांना काही जमत नव्हते. पण आता मी नसलो तरी त्यांचं काही अडत नाही. इतपत तयार झाल्या आहेत त्या." तेज.

"बरं. मिळाली तेवढी माहिती पुरे आहे. आता आम्हाला निघायला हवं." आपटे घाईघाईने म्हणाले.

"म्हणजे? कसली माहिती?" तेज आपल्या जागेवरून उठून उभा राहिला.

"सर, म्हणजे त्यांना म्हणायचं आहे, आम्हाला उशीर होतो आहे निघायला हवं. ही माहिती पुरे आता." समरने आपटेंची बाजू सावरून घेतली.

"अच्छा.. असं आहे तर. मग ठीक आहे. पुन्हा भेटू कधीतरी." तेजने दोघांना निरोप दिला.
-------------------------------------
"आपटे..तुम्हाला काही कळतं की उगीच गंमत म्हणून तुमचं वय वाढला आहे?" समर चिडून म्हणाला.

"ते चुकलं साहेब. जरा गोंधळून गेलो होतो. पण हे दीनदयाळचं कोडं नक्की काय आहे, हे आपल्याला आधी सोडवावं लागेल."
आपटेंनी सकाळच्या आलेल्या नंबरवर फोन लावून पाहिला. नंबर अपेक्षेप्रमाणे बंद होता. आलेल्या मेलवरही त्यांनी लागलीच दोन-तीन मेल टाकून पाहिले.

"मेल तर जातोय साहेब. मात्र रिप्लाय येणार नाही याची खात्री आहे."

"आलेला नंबर कोणाचा आहे? त्याची लागलीच चौकशी करा." समरने पुन्हा एकदा समोरच्या कॉफीशॉप जवळ गाडी पार्क केली.

"साहेब, पुन्हा कॉफी? आता अजिबात नको हं. मगाच्या कॉफीचा ठसका अजूनही आठवणीत आहे."

"आपटे, खरंतर या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कंपनीमध्ये पी.ए.च पद अस्तित्वातच नसतं. तुम्ही माझे सहाय्यक म्हणून काम करता खरं, ते पद मी कधीही काढून घेऊ शकतो तुमच्याकडून."

"साहेब, मस्करी नाही करत. जर दीनदयाळ अस्तित्वातच नाही, तर आपल्याला फोन केला कोणी?" आपटे खरंच मस्करीच्या मूडमध्ये नव्हते.

"साहेब, आता विकासला बोलवण्याची वेळ आली आहे. हवं तर त्याला या बंगल्यावर लक्ष ठेवायला सांगू." समरने हो किंवा नाही म्हणायच्या आत आपटेंनी विकासला फोन लावला.
अगदी पंधरा मिनिटाच्या आतच विकास हजर झाला. आपटेंनी भराभरा आज काय काय घडलं ते विकासच्या कानावर घातलं.

"विकास, दोन दिवसात या बंगल्याची सारी माहिती मला मिळायला हवी." समर.

समर आणि आपटे तिथून ऑफिसवर आले.
"डोकं चालेनास झालं आहे. सकाळी वाटलं होतं, ही केस अगदी सोपी आहे. पण प्रत्यक्षात मात्र काही भलतेच समोर आले. एका दीनदयाळाचा फोन येतो काय? त्याचा आपल्या बायकोवर संशय असतो काय? बरं, त्याची चौकशीही अगदी सहजरित्या होते. मात्र नंतर कळते की दीनदयाळ ही व्यक्ती अस्तित्वातच नाही." समर आपल्याच विचारात एकटाच बोलत होता.

"साहेब, प्रॉपर्टीसाठी हा प्लान तर केला गेला नाही ना?" आपटे.
"शक्यता तर तशी वाटते. मात्र आता सारा कारभार आईसाहेब आणि तेजपाल यांच्या हातात आहे. अर्थातच त्यांच्याकडे सारे राईट्सही असतीलच. त्यांना असा प्लान बनवायची गरजच काय?
दुसरी शक्यता म्हणजे घरात आणखी किती व्यक्ती आहेत? हे पाहायला हवे. सगळे राईट्स या दोघांच्या हातात असले तरीही या धंद्याचे भागीदार किती आहेत हेही महत्त्वाचे. धंद्याच्या नाड्या या दोघांच्या हातात देऊन सूत्र घेणारी तिसरी व्यक्ती असू शकते. ओळख करून देताना प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हटल्यानंतर त्या मालविकाबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळेच भाव तरळून गेले. ते तुम्ही पाहिलं असेलच." समर.

"हो ते मी पाहिलंच. शिवाय आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती अशी की, तेजपाल म्हणाले की मी नसलो तरी आईसाहेबांचं फारसं अडत नाही.
खरंतर दीनदयाळ गेल्यानंतर त्या मालविकाबाईंनी धंद्यात लक्ष घालायला सुरुवात केली. म्हणजे याआधी त्यांनी धंद्यात कधीच लक्ष घातले नसले पाहिजे. त्यानंतर त्या थोडं फार शिकल्या असतील. मात्र त्यांना मदत करणारी कोणीतरी व्यक्ती असू शकते आणि तेजपाल यांनी आपली ओळख "मोठा मुलगा"अशीच करून दिली.
याअर्थी मालविकाबाईंना आणखी एक लहान मूल असलेच पाहिजे." सकाळीच घडलेल्या भेटीचे विश्लेषण करता करता जो उलगडा झाला त्यामुळे आपटेंना जरा बरं वाटलं.

"आता विकासच्या माहितीची वाट पाहू. मग आज काही काम नाही. चला, आपटे तुम्हाला घरी सोडतो आणि मीही घरी जातो. तोपर्यंत आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करूच." बोलत बोलत समरने ऑफिस बंद केले.


"ग्रीष्म " बंगल्यावर नेहमीप्रमाणेच शांतता होती. समर आला तसा दादांनी दरवाजा उघडला.

"दादा, आज जेवायला काय आहे?"

"नेहमीचेच." दादांनी नेहमीप्रमाणे हसत हसत उत्तर दिले.

दादा म्हणजे समरवीरचे सोबती. बंगल्यातला सारा संसार सांभाळत होते.
"साहेब, निहारिका ताई कधीची आपली वाट पाहत आहेत."

काही मिनिटांतच समर फ्रेश होऊन बाहेर आला. त्याला पाहताच निहारिका त्याला येऊन बिलगली.

"निहारिका, अगं.." समर.
"असुदे.. आपण कितीतरी दिवसांनी भेटतो आहोत समर. खूप मिस केलं मी तुला. पण तुला माझी आठवण आली नसेल. हो ना?"

समर काहीच बोलला नाही.

" हे तुझं शांत राहणं माझा जीव घेत. बरं, तू काही विचार केलास का?" निहारिका.

"कशाबद्दल?" समर खिडकी जवळ जात म्हणाला.

"अरे, आपल्या लग्नाबद्दल. समर,गेली चार वर्ष झाली, आपण एकमेकांना ओळखतो! आपलं ठरलं होतं लग्न एकमेकांशी करायचं. विसरलास की काय? अजून किती वर्ष वाट पहायची मी?" निहारिका.

"हम्म." समर.

"विचार बदलला की काय तुझा? की विचार करायला आणखी वेळ हवा आहे? समर, तू आज ना उद्या लग्नाचा विषय काढशील म्हणून मी शांत राहिले. पण तू काही बोलायला तयारच नाहीस. आज काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे. " निहारिका वैतागून म्हणाली.

"अगं, कामाचा व्यापच इतका आहे. ही असली डिटेक्टिव्ह काम करणं सोपं नसतं. जबाबदाऱ्या असतात खूप." समर.

"म्हणून आपल्या खाजगी लाईफबद्दल विचार करू नये असे नाही ना? बस् समर, कालच बाबांच्या मित्राच्या मुलाने मला मागणी घातली, घरी सर्वांच्या समोर! एक स्थळ म्हणून तो उत्तम आहे. शिवाय स्वभावाने प्रेमळ आहे. माझ्या पॅशनला त्याचा पाठिंबा आहे." निहारिका समर जवळ येत म्हणाली.

"मग तू त्याच्याशी लग्न कर." समर शांतपणे म्हणाला.

"समर, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे." निहारिकाने समरचा हात हातात घेतला.

"तसं असेल तर थोडी थांबायची तयारी हवी." समर.

"अजून? आणखी किती दिवस?" आता निहारिकाच्या डोळ्यात राग होता.

"त्याचे उत्तर माझ्याकडे नाही." समर तितक्याच शांतपणे म्हणाला.

"असं असेल तर ठीक. ही आपली शेवटची भेट समर. इथून पुढे मी इथे कधीही येणार नाही आणि तुला विसरून जायचा प्रयत्न करेन हे मात्र नक्की." अधिक काहीही न बोलता निहारिका तिथून निघून गेली.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all