Login

प्रायव्हेट डिटेक्टिव्ह भाग -1

Gosht Eka Casechi

"साहेब, फोन.."

"कोण आहे?" समरवीर वैतागून म्हणाला.

"ते आपल्या आईसाहेब." आपटे समरवीरच्या हातात फोन देत म्हणाले. तसा समरवीरचा चेहरा त्रासिक झाला.

"बोला..आईसाहेब." समरवीर

"समर, अरे वर्ष होऊन गेलं. घरी आला नाहीस. सारे आठवण काढतात तुझी." आईसाहेब.

"पुन्हा तेच..तुम्हाला माहिती आहेच आईसाहेब, कामाच्या व्यापात वेळ मिळत नाही. आता कामाचा पसारा खूप वाढला आहे." समरवीर.

हे ऐकून पलीकडून हुंदक्यांचा आवाज आला.

"आईसाहेब मी नंतर फोन करतो." इतके बोलून समरने फोन ठेवला.

"साहेब, मी तुमचा सहाय्यक असलो तरी वडिलकीच्या नात्याने एक सांगू?" आपटे.

"हम्म्म."

"गावी जाऊन या एकदा. आई -वडील काळजी करत असतील. ते आहेत म्हणून आपण आहोत. आई -वडिलांची सर इतर कोणाला नाही. हे मात्र खरं."
बराच वेळ शांततेत गेला.

"आपटे, आपल्या कामाचे शेड्युल बघून तारीख ठरवा. गावी जाऊन येऊ आणि तुम्हीही यायला हवे सोबत." समर.

"लवकरच ठरवतो." आपटे गडबडीने म्हणाले.
\"आज साहेबांचा मूड चांगला आहे. एरवी मी सांगेल ते ऐकण्याऐवजी आपल्या मनाचेच करतात. बाकी मी पी. ए. नुसता नावाचाच.\" आपटे आपल्याच विचारात हसले.

"आपटे, एरवी मी तुमचं ऐकत नाही आणि आज कसे काय ऐकले? असाच विचार करत आहात ना?" समर.

"अं..खरं तर होय." आपटे रुमालाने घाम पुसत म्हणाले.

"किती घाबरता? चिडून बोलत नाही मी. पण चला, आजपासून मी तुमचे सगळे ऐकले असे समजा. अगदी आपल्या कामाच्या बाबतीतले सल्ले देखील! आज कॉफी ऐवजी तुमच्या आवडीचा फक्कड चहा मागवा." समर शांतपणे खुर्चीत मागे टेकत म्हणाला.

अगदी काही मिनिटांतच चहा आला.
तशी आपट्यांनी आपली डायरी बाहेर काढली आणि त्यातून ते तारखा शोधू लागले.
"साहेब, पंधरा दिवसाचं शेड्युल जाम आहे. नंतर मात्र आठ दिवस फारसं काही काम नाही. त्या दिवसांत गावी जायला हरकत नाही." आपला चष्मा सांभाळत आपटे म्हणाले.

"ठीक आहे. तुम्ही म्हणाल तसं."

"साहेब, आजच काम झालं.
पण आणखी एक बोलू? आता लग्नाचं मनावर घ्या. तिशी पार केली तुम्ही. आयुष्यात जवळच हवं कोणीतरी आणि तो आपला जोडीदार असेल तर उत्तमच. माफ करा. आज मी जरा स्पष्टच बोललो. पण अनेक दिवस मनात होते ते बोललो इतकेच." आपटे.

"सरळ सांगा ना मग आईसाहेबांनीच हे सारे बोलायला सांगितले म्हणून." समर गालातल्या गालात हसत म्हणाला. तसे आपटे स्वतःशीच हसले.

इतक्यात फोन वाजला.

"मि.समर.." पलीकडून आवाज आला.

"हा. बोला."

"तुम्हाला सागर बंगल्यावर नजर ठेवायला सांगितलं होतं. काही अपडेट्स?"

"सर, एकतर तुम्ही तुमची काहीच माहिती मला दिली नाही. धड तुमचं नावही सांगितलं नाही मला. तुमचा प्रोब्लेमही बोलला नाही. नक्की कारण काय त्या बंगल्यावर नजर ठेवायला? मला कळायला हवं." समर.

"सॉरी, मि. समर. मी दीनदयाळ. एका प्राइवेट कंपनीत काम करतो. म्हणजे माझी पोस्ट तशी मोठी आहे. पण त्याच्याशी तुम्हाला काही देणे घेणे नाही.
तर काम असं होतं की, माझं आणि माझ्या बायकोचं अजिबात पटत नाही. मी स्पष्टच बोलतो, मला तिच्यावर संशय आहे म्हणून नजर ठेवायला सांगितलं मी तुम्हाला."

"बरं. मि. दीनदयाळ, मी अर्धवट माहितीवर काम करत नाही. त्या बंगल्याचा पत्ता, तुमच्या मिसेसचे वर्णन, त्या काय करतात, काम करत असतील तर तिथला पत्ता हे सगळं मला मेल करा आणि सर, तुमचीही सगळी माहिती मला डिटेलमध्ये हवी आहे." समर वैतागून म्हणाला.

"ठीक आहे. मी मेल करेन." पलीकडून फोन बंद झाला.
पुढच्या पाच मिनिटांत मेलवरची आलेली सगळी माहिती आपटेंनी समरला वाचून दाखवली. "सागर.. तो समुद्रकाठचा बंगला! पण तिथे तर सामसूमच असते. रोज सकाळी वॉकला जाताना पाहतो मी. माझ्या माहितीनुसार तिथे कोणीच राहत नाही." आपटेंनी माहिती पुरवली.

"आपटे, सकाळी लवकर जात असाल ना तुम्ही? आज दुपारी जाऊन बघू. पण या कामात काही इंटरेस्टिंग वाटतं नाही फारसं. नवऱ्याचा बायकोवर संशय आहे ही गोष्ट काही निराळी राहिली नाही आपल्यासाठी." समर काहीसा विचार करत म्हणाला.

दुपारी एकच्या सुमारास समर आणि आपटे, सागर बंगल्या समोरच्या एका कॉफी शॉपमध्ये शिरले.

"दोन कोल्ड कॉफी." समरने आत येताच ऑर्डर दिली.

"काय रे, तो समोरचा बंगला विकायचा आहे का?तिथे सामसूमच दिसते सारी." समर ऑर्डर घेऊन आलेल्या वेटरला म्हणाला.

"नाही साहेब. मालविका मॅम तिथे राहतात ना. आपल्या कुटुंबासोबत. खरं तुम्हाला बंगला पाहायचा असेल तर जाऊ शकता. अहो, लोकं खूप लांबून येतात हा बंगला पाहायला. फेमस आहे या भागात हा बंगला आणि आत जायला वाट मागच्या बाजूने आहे म्हणून सामसूम दिसते पुढे." वेटरने माहिती पुरवली.


"सर, मला कसं माहित नाही? मी तर रोज येतो इथे." आपटे आपलं डोकं खाजवत म्हणाले.

"त्यासाठी निरीक्षण आणि लक्ष हवं आपलं. ते जाऊ दे. चला..बंगल्यावर जाऊन येऊ." समर कॉफी संपवून उठला.


क्रमशः

0

🎭 Series Post

View all