Login

प्रिय अरुण यास

Priy Arun Yas
प्रिय अरुण यास

. खरेतर तुझी माझी मैत्री कशी झाली ते आठवत नाही. कधीतरी ती शाळेत पाचवीत असतांना झाली आणि काही दिवसात घट्ट होत गेली. शाळेचे रंगीबेरंगी दिवस संपले. कॉलेजही झाले. तू दुकान टाकले. व्यापार धंदा करू लागला. मी नोकरीला लागलो. मैत्री टिकून होती. पण अर्थातच पूर्वीसारखा वेळ नसायचा. तुला धंदा वाढवायचा होता... मला नोकरीत प्रमोशन..

नेमका गैरसमज कुठे झाला माहित नाही.कदाचित माझ्याकडून चूक झाली असावी. पण त्या किरकोळ गोष्टीचा मी पर्वत केला आणि तुझ्याबद्दल मनात अढी ठेवली. त्याच दरम्यान तुझे लग्न ठरले. तू स्वतः पत्रिका द्यायला आला. मी वरवर हसून स्वागत केले पण तूझ्या लग्नाला जाणार नाही हे आधीच ठरवले होते. लग्न बाहेरगावी होते.आदल्या रात्री लग्नाचे वऱ्हाड निघणार तेव्हा तू कोणालातरी मला घ्यायला पाठवले. मी गेलो नाही तेव्हा तू स्वतः मला घ्यायला आला. मी आजारी असल्याचा बहाणा केला आणि गेलो नाही.माझा खोटेपणा तुला लक्षात आला असेल. तरी तू काही बोलला नाही.परत परत आग्रह करत राहिला..
मी गेलो नाहीच.

काही दिवसांनी माझे लग्न ठरले.मीही रितीप्रमाणे तुला आमंत्रण दिले. तू येणार नाही हे मला माहित होते. माझेही लग्न बाहेरगावी होते. तुझ्या लग्नाच्या वेळी तू जसा आला तसा मीही आलो तुला बोलवायला.. वऱ्हाड निघण्याच्या वेळी.. उगाच कोणी म्हणायलो नको की मी बोलावले नाही तू नाही म्हणाला.. आता येऊ शकत नाही. काहीतरी व्यापाऱ्याला माल देणे जरुरी आहे. रात्री तो येणार आहे. मी वरवर आग्रह केला. तू येणार नाही हे माहित होते.

लग्नगावी पोहचलो. सर्व विधी होऊन दुपारी मंगलाष्टक सुरु झाल्या. आणि अचानक माझ्या बाजूला घामेघूम झालेला तू येऊन उभा राहिला.मी आश्चर्याने बघतच राहिलो... एवढ्या गडबडीतही मी तुला हात दिला.

पुढे कळले की खरोखरच व्यापारी रात्री आला होता.. त्याला माल देऊन तू जी गाडी मिळेल त्या गाडीने निघाला आणि दोनतीन गाड्या बदलत पोहचला. एक छोटया कृतीने तू मैत्री कशी निभावावी हे दाखवून दिलेस..

गोष्ट इथेच संपत नाही. एकदा मोटरसायकलने जात असतांना एक खड्डा चुकवण्याच्या नादात गाडीवरचा कंट्रोल गेला. जोरात पडलो. डोळ्यापुढे अंधार आला. डोळे उघडले तर मी हॉस्पिटलमध्ये आणि तू शेजारी बसलेला. कोणीतरी व्यापाऱ्याने मला पडतांना पहिले आणि लगेच तुला फोन केला आणि तू हातातले काम टाकून धावत आलास... पुढे ऍम्ब्युलन्स मागवणे ऍडमिट करणे आणि मला शुद्ध येईपर्यंत तिथे बसून राहणे हे सगळे तू केले. खरे तर घरी फोन केला असता तरी तुझी जबाबदारी संपली असती.. पण तू थांबला.. अगदी मला डिस्चार्ज मिळेपर्यंत.

मित्र कसा असावा तर तुझ्यासारखा असावा.

आज तुझ्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा..
तुम जिओ हजारो साल...
तुझाच..


0