Login

प्रिया आज माझी.... भाग १

मनात नसतानाही शेखरला प्रियाशी लग्न करावे लागते पण त्याला काय माहित हे लग्न त्याचे सर्वस्व व्यापून टाकणार आहे. वाचत रहा शेखर आणि प्रियाची हळुवार फुलणारी प्रेमकहाणी.
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

प्रिया आज माझी (भाग १)

राहुलच्या बंगल्याच्या हिरव्यागार प्रशस्त पटांगणावर शेखर राहुल आणि मिहिका गप्पा मारत होते. बऱ्याच दिवसांनी ते तिघे असे एकत्र आले होते त्यामुळे कॉलेजच्या जुन्या दिवसांची उजळणी होत होती. राहुलच्या विनोदांना शेखर दादही देत होता पण त्याच्या मनात आत जे विचारांचे काहूर चालले होते ते राहुल आणि मिहिकाला दिसू न देण्याचा तो कसोशीने प्रयत्न करीत होता.
राहून राहून एकच प्रश्न त्याला भंडावून सोडत होता.
ती कुठे असेल?

"शेखर , तुला आणि मिहिकाला एकत्र पाहून खूप बरे वाटले."

शेखरचे लक्षच नव्हते.

"शेखर...."

मिहिकाने त्याला हाक मारली.

"अं ... काय..."

"तुझे लक्ष कुठेय...राहुल काहीतरी बोलतोय. "

"काय राहुल?"

"हेच की तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूप छान वाटले. कॉलेजमधले आयडियल कपल... मेड फॉर इच अदर. आता चट मंगनी आणि पट ब्याह होऊन जाऊदे. तुमच्या दोघांच्या नात्यात इतकी मोठी अडचण येऊनही तुम्ही आज एकत्र आहात. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात हे खरे आहे. "

राहुलचे शेवटचे वाक्य ऐकून शेखरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

"ओह्.. एम सॉरी...मला तुला हर्ट करायचे नव्हते. "
राहुलला त्याची चूक लक्षात आली.

"इटस ओके राहुल. या गार्डन मधली झाडे सुकल्यासारखी का दिसत आहेत....."
शेखरने विषय बदलला.

"कालपासून माळी रजेवर आहे आणि तुझ्या वहिनीला फुरसत नाही....तिची प्रिय मैत्रीण आली आहे ना...आताही तिच्याबरोबर शॉपिंगला गेलेय. "

"That's good... आपल्या फ्रेंड्सला वेळ दिलाच पाहिजे. मी घालतो पाणी...झाडांबरोबर मनातली मरगळही निघून जाईल. "

"शेखर, तू बस...तू कशाला... मी घालेन पाणी..."

"नॉट अ बिग डील..."
असे म्हणून शेखर उठलाही आणि त्याने गार्डन मध्ये ठेवलेला पाईप हातात घेतला.

"मी नळ सुरू करतो. "
राहुल उठणारच होता इतक्यात मिहिकाने त्याला तिथेच बसायचा इशारा केला आणि ती उठली.
त्याच्या बरोबर रहायचा एकही मौका ती सोडत नव्हती.

"शेखरसाठी एकदम क्रेझी आहे ही..."
राहुल पुटपुटला.

शेखर पाईप धरून गेटसमोर उभा होता.

"मिहिका, नळ पूर्ण खोलू नकोस एकदम फोर्सने पाणी येईल." राहुलने बजावले.

तिने गार्डनच्या उजव्या बाजूला भिंतीलगत असलेला नळ सुरू केला पण उत्साहाच्या भरात चुकून नळ पूर्ण खोलला गेला. पाण्याचा जोर इतका होता की शेखरने पूर्ण ताकतीनिशी पाईप पकडून ठेवला आणि त्याने मागे वळून तिच्याकडे पाहत नळ बंद करावयास सांगितले....पण मिहिकाकडून आता नळ काही केल्या बंद होत नव्हता...राहुल तिच्या मदतीस धावला...शेखरचेही लक्ष त्यांच्याकडेच होते.....

आणि अनावधानाने शॉपिंग बॅग सांभाळत आत येणारी प्रिया त्या पाण्याच्या फोर्स मध्ये सापडली.

"Excuse me.... तुम्ही काय करताय... हातातला पाईप खाली टाका ..."
पाण्यापासून स्वतःचा बचाव करून दुसऱ्या बाजूला उभी राहत पाठीमागे पाहणाऱ्या शेखरकडे पाहत ती म्हणाली.

तिचा आवाज ऐकून चमकून शेखरने तिच्याकडे पाहिले आणि तसे करताना पाइपाचा रोख पुन्हा तिच्यावर वळला. ती पूर्ण भिजून गेली होती. पाण्यापासून वाचण्यासाठी तिने आपला चेहरा लपवला.....शेखरने पाईप खाली टाकला तेंव्हाच राहुलने नळही बंद केला. तिने आपल्या चेहऱ्यावरचा हात अलगद बाजूला केला आणि समोर पाहिले आणि अनिमिष डोळ्यांनी ती पाहतच राहिली. इतक्या दिवसांनी समोर तिला पाहून तो ही हरखून गेला.

*********************************************


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all