Login

प्रिया आज माझी.... भाग ५

Love Story

डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

प्रिया आज माझी (भाग ५)


"प्रिया, प्रिया......"

सीमामामींनी आपला फोन हॉल मध्येच ठेवला आणि त्या बाथरुम बाहेर आल्या. काल त्यांनीच तिला घरातले पडदे हातानी धुवायला सांगितले होते आज सकाळी उठल्या उठल्या तिने ते भिजत ठेवले होते आणि आता ती ते घासून धुवत होती.

"ते हातातले काम बाजूला ठेव नंतर कर....शेखर केंव्हाचा कॉल करतोय... तू उचलत नाहीस म्हणून त्याने मला केला. त्याने विचारले तर कपडे धुवत होतीस असे नको सांगूस... सांग तुझे ऑफिसचे काम करीत होती....नाहीतर उगीच मामीला बदनाम करशील...."

"या आधी तिने असे केले आहे का?..कशाला उगीच बोलत बसतेस. "
आपल्या बेडरूममधून हळू हळू चालत पुढे येत सुधामावशी म्हणाली.

"घ्या....भाचीला जरा काही बोलले की मावशीला लगेच पुळका आला. जाणारे गेले आणि माझ्या माथ्यावर दोघी दोघींचे ओझे ठेवून गेले. "


"वहिनी , आमचे कसले गं ओझे?...प्रिया जॉब करते...माझी केंद्रशासनाची पेन्शन आहे....आमच्या दोघींची सर्व कमाई आम्ही दादाच्या सुपूर्द करतो. तुम्हाला एका काडीचाही खर्च येत नाही....हे घरही प्रियाच्या वडिलांचे आहे...उलट तिच्यामुळे तुमच्याच डोक्यावर छप्पर आहे..."
सुधामावशी चिडून म्हणाली पण उभे राहिल्यामुळे तिच्या गुढघ्यातून वेदना उठल्या आणि ती कळवळली तसे आपल्या ओढणीला हात पुसून प्रियाने तिला आधार दिला.


"आम्ही इथे नसतो तर ही तुमची दुखणी कुणी निस्तरायची होती....कधी गुढघे दुखतात तर कधी दमा बळावतो. दहा वेळा हॉस्पीटलमध्ये न्यावे लागते.....तरी बरे अमेयला हॉस्टेलमध्ये ठेवले आहे आणि श्रेया जर्मनीला आहे...आमच्या मुलांपेक्षा तुमचेच करावे लागते..."

"हॉस्पिटलमध्ये तू कधी नेलेस गं?...मला प्रियाच नेते. मागे ऑफिस सोडून धावत आली होती. "

"मावशी, जाऊदे गं तू आधी रुममध्ये चल. "

प्रिया सुधाला घेऊन रुममध्ये निघून गेली.
त्यांच्या पाठोपाठ सीमामामी आली.

"ए बाई.... मावशीची सेवा नंतर कर..पहिला त्या शेखरला फोन लाव. तो वाट पाहत असेल...नशिबाने एवढ्या सोन्यासारख्या मुलाचे स्थळ चालून आले आहे... एकदाचे तुझे लग्न झाले की आम्ही मोकळे होऊ. "

सुधामावशीकडे पाहत तोंड वाकडे करीत मामी म्हणाली व तिथून निघून गेली.

"बाकी जाऊ दे...वहिनी शेखरबाबतीत जे बोलली ते अगदी बरोबर बोलली...मुलगा अगदी सोन्यासारखा आहे गं... माझे राहू दे..लाव लाव तू त्याला फोन लाव."

प्रिया फोन शोधू लागली....तितक्यात सीमा मामीनी तिला फोन आणून दिला.

"फोन ठेवायचा एकीकडे आणि शोधायचा एकीकडे...कसले भान नसते. ...हिला कधी कोणी फोन केला तरी वेळेत उचलत नाही....माझी श्रेया ... दुसऱ्याच बेलमध्ये फोन उचलते. ....आता बघत काय बसलेस शेखरला फोन लाव. "

मामीच्या आवाजात जरब होती. त्या आल्या तशाच ठसक्यात निघून गेल्या.

त्या गेल्याचे पाहून सुधा मावशी म्हणाली.

"हिच्या श्रेयाला कामे काय असतात. दिवसभर फोन हातात....तिथे जर्मनीला दुसरे ती काय करतेय... पार्ट्या करायच्या आणि इंस्टाग्राम वर फोटो टाकायचे...हिला भारी तिचे कौतुक.... अगं पण तू मुलीला तिथे शिकायला पाठवलेस ना...कधी एका शब्दाने तरी तिला काही बोलतेस का....नुसते या पोरीला बोलत असते....तिला दिवसभर ऑफिसमध्ये कामे असतात...घरी आल्यावर आम्हा सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा असतो...काय तर म्हणे तुझ्या हातचे जेवण तुझ्या मामांना आवडते.... गोड बोलून पोरीकडून काम करून घेतात. सुट्टीच्या दिवशी सुद्धा आराम नाही..."
सुधामावशी बेडवर बसून आपले गुढघे दाबत म्हणाली.

"मावशी, फार दुखतेय का.... थोडे नारायणी तेल लावते म्हणजे बरे वाटेल. "

"नको सोने, माझं काय रोजचेच आहे तू बाहेर गॅलरीत जा आणि शेखरशी निवांत बोल...तो वाट पाहत असेल. "

प्रियाने मान किंचित हलवली आणि ती फोन घेऊन गॅलरीत आली.

"हॅलो"
आता कुठच्याही क्षणी त्याचा आवाज कानावर पडेल या जाणिवेने ती लाजली. तिचे आणि त्याचे हे पहिलेच बोलणे होते आणि ते ही फोनवर . याआधी तिने त्याला एक दोनदा पाहिले होते आणि तेंव्हाच तो तिला फार आवडला होता. शेखर तिच्या सुधामावशीच्या मैत्रिणीचा सुमन परांजपे यांचा एकुलता एक मुलगा. दोन्ही मैत्रिणींनी मिळून या दोघांचे लग्न फिक्स केले. त्यानंतर त्या दोघांचे हे पहिलेच बोलणे.

"हॅलो... मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. "
तिला अपेक्षित होते की तो ही तिच्याशी बोलायला उत्सुक असेल... तिला विचारेल की तू कशी आहेस ? पण इथे तर त्याने डायरेक्ट विषयाला हात घातला होता.
तिला काय बोलू ते सुचत नव्हते तसे तो पुढे म्हणाला,

"आज संध्याकाळी भेटू शकतेस का?"

"हो. "

"मग ठीक आहे. ठीक सहा वाजता हायवेला लागून असलेल्या आलोक रेस्टॉरंटवर ये . "

त्याने फोन ठेवलाही.

त्याच्याकडून इतका कोरडा प्रतिसाद मिळाल्यावर तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

***************


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all