Login

प्रिया आज माझी ..भाग ६

Love Story

डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


प्रिया आज माझी (भाग ६)


प्रिया साधारण सात वर्षांची होती तेंव्हा तिचे आईवडील अनुजा आणि आशिष करंदीकर एका कार एक्सिडेंट मध्ये वारले. डॉक्टरांनी तिला वाचवले. तिची सुधा मावशी तिच्या आईची मोठी बहीण अविवाहित असल्यामुळे त्यांच्याकडेच राहायची. ती सेंट्रल गवर्नमेंट मध्ये क्लास वन अधिकारी होती. ती ऑफिसला जायची. घरी प्रियाजवळ कोणही नसायचे म्हणून तिचे मामा मामी सोलापूरवरून आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिच्याजवळ आले.


आशिष आणि अनुजाचा त्याच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह झाला होता.... विरोध होता कारण अनुजा दिसायला सावळी होती आणि आशिष एकदम गोरापान.. त्यात दोघांचीही जात वेगळी होती. त्यावेळी आंतरजातीय विवाहाला स्वीकारणारे फार कमी लोक असायचे....त्यात ज्याची जात उच्च त्यांचा या गोष्टीला फार विरोध असायचा...तेच झाले. आशिषच्या घरच्यांनी अनुजाला कधीच स्वीकारले नाही. अगदी एक्सिडेंट नंतर त्याचा मृत्यू झाला तेंव्हाही कोणीही आले नाही.

तिचे मामा म्हणजे बायकोच्या ताटा खालचे मांजर....तिच्या हो ला हो करणे एवढेच त्यांना ठाऊक! त्यांनी प्रियाला कधी आपलेपणाने जवळ घेतले नाही. ती दोघं तिचा सांभाळ करायला आली खरी पण त्यांनी त्यात आपलेच भले केले. ते त्यांच्या दोन्ही मुलांचे लाड करायचे. ते जे मागतील ते द्यायचे . पण त्यांच्या इतकी लहान असलेल्या प्रियाला त्यांनी साधे वीस रुपयांचे चॉकलेटही खरेदी करून दिले नाही. पण सुधामावशीने तिला कशाचीही कमतरता पडू दिली नाही तिचे सर्व हट्ट लाड ती पुरवायची. पण तसे म्हटले तर प्रियाने फार कधी हट्ट केलाच नाही. वेळेआधीच तिला मोठेपण आले होते. सुधामावशी ऑफिसला जायची तेव्हा तिची मामी तिच्याकडून जमेल तितकी कामे करून घ्यायची. याबाबतीत मावशीला समजले की मावशीचे आणि मामीचे खटके उडायचे. घरात वाद नको म्हणून प्रियाच म्हणायची की मामीने तिला काम करायला सांगितले नव्हते....तिला कंटाळा आला होता म्हणून तिने स्वतःहूनच काम केले.

"प्रिया...इतकी चांगली वागू नकोस गं
.. लोकं तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतील. "
मावशी म्हणायची.

दोघी एकमेकींचे सर्वस्व होत्या. कधी मामी रागावली... मैत्रिणीमध्ये खटके उडाले की प्रिया मुसमुसत येऊन मावशीच्या ओटीत तोंड लपवायची व आपले दुःख मोकळे करायची. मावशीने लाडाने डोक्यावरून हात फिरविला की मग ही पुन्हा मामीची बोलणी झेलायला हसतमुखाने तयार व्हायची.

ती हळू हळू मोठी झाली ....सुधामवशीला भेटायला तिची बालमैत्रीण सुमन परांजपे यायची. प्रियाचे वागणे , तिचा सालसपणा त्यांना फार भावला . शेखरला न विचारताच त्यांनी आपल्या मुलासाठी प्रियाचा हात आधी सुधामावशीजवळ नंतर तिच्या मामा मामींजवळ मागितला. तिच्यासाठी इतके चांगले स्थळ आले म्हटल्यावर ते नाही थोडीच म्हणणार होते आणि शेवटी ही बॅद एकदाची जाईल या जाणिवेने त्यांनी या लग्नास होकार दिला. इतक्या वर्षात स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना तिच्या मामा-मामींनी तिच्यासाठी एक चांगला विचार केला होता.

सुमन परांजपेनी सोबत आपल्या मुलाचा शेखरचा एक फोटो आणला होता. त्याला बघताक्षणी प्रिया त्याच्या प्रेमात पडली. त्यावेळेस तो अहमदाबाद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे MBA च्या शेवटच्या वर्षाला होता. त्याचाही या लग्नाला होकार आहे असे त्यावेळेस त्याने सांगितले होते. प्रियाला जणू आकाश ठेंगणे झाले होते.

या गोष्टींनंतर तो एक दोन वेळेस त्यांच्या घरी येऊन गेला होता पण त्यावेळेस प्रिया ऑफिसला गेलेली असल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट कधी झालेली नव्हती. आता शेखर कायमस्वरूपी मुंबईत आला होता त्याला मल्टिनॅशनल कंपनीत चांगली नोकरी मिळाली होती. त्या दोघांना एकत्र आणण्याचे जे स्वप्न सुमन परांजपे यांनी पाहिले होते ते आता सत्यात उतरवायची वेळ आली होती.

पण दरम्यानच्या काळात शेखरने कधीही तिला फोन केला नव्हता...या गोष्टीचे तिला कायम आश्चर्य वाटायचे कारण तिच्या इतर मैत्रिणींचे लग्न ठरल्या ठरल्या त्यांचे होणारे पती त्यांना दिवसातून दहा वेळा फोन करायचे हे तिने पाहिले होते.

मघाशी शेखर तिच्याबरोबर जे बोलला ते तिचे आणे त्याचे पहिले संभाषण होते.

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all