Login

प्रिया आज माझी....भाग ९

Lovestory
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

प्रिया आज माझी (भाग ९)

आपले प्राण कानात गोळा करून तो पुढे काय बोलतोय हे ती ऐकू लागली.....हृदयाचे ठोके कानांवर आदळत होते.
उत्साह आणि भीतीची संमिश्र भावना तिच्या मनी दाटून आली. त्याच्या एकूण हावभावांवरून तो पुढे काय बोलणार आहे याची काहीच कल्पना येत नव्हतीं.

"प्रिया .... आय आय.....आय डोन्ट लव यु. "

तो एकदमात बोलला. त्याच्या तडकफडक वाक्याने तिला हादराच बसला. क्षणभर तिला काहीच सुचेनासे झाले. मेंदूवर कोणीतरी लोखंडी प्रहार करीत आहे असे तिला वाटले. शेखर तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. हजारो अश्रुप्रवाह तिच्या डोळ्यांतून येण्यासाठी धडपडत होते. पण शेखरसमोर तिला स्वतःला कमजोर दाखवायचे नव्हते. तिने एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला सावरले.

"शेखर..." तिच्या आवाजात थरथर होती.
समोरील पाण्याचे ग्लास त्याने तिच्यासमोर केले.

"हॅव इट...."

तिने त्याच्याकडे रागाने पाहिले....तिचे डोळे लालसर झाले होते.

"प्रिया, प्लीज ट्राय टू अँडरस्टँड मी.
माझे...माझे ... एका मुलीवर प्रेम आहे."

तिने क्षणभर डोळे मिटले . पण पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत ती म्हणाली,
"तुम्ही हे तुमच्या आईंना सांगितलेत का?"

"नाही. "

"का नाही सांगितलेत...निदान त्यामुळे इतरांना तरी मनःस्ताप झाला नसता ना. "
तिच्या रडव्या चेहऱ्यावर हे बोलताना देखील एक पुसटशी खळी उमटत होती.....त्याचे लक्ष गेले. तो क्षणभर हरवल्यासारखा झाला.

"शेखर...मी तुम्हाला काहीतरी विचारतेय...."

"आईने तुला सुन म्हणून निवडलेय. ती तुझ्याजागी कोणाचाही विचार करू शकणार नाही. तिचे मन मोडणे मला असं सहज कसं शक्य होईल?"

"स्वतःच्या आईच्या मनाचा विचार करता.....दुसऱ्याच्या मनाचाही विचार करायचा आणि आपल्या आईला तुम्हाला काय वाटते ते सांगायचे ना. "

कॉलेजमध्ये असताना एकदा तिच्याबद्दल सांगितले होते. पण त्यावेळी लग्न वैगरेचा विचारच केला नव्हता. आणि आता जेव्हा आईबरोबर बोलायचे ठरविले तेव्हा तिने तुझ्याबद्दल तिचा निर्णय सांगितला.

बाबा गेल्यापासून तिने फार कष्टाने मला लहानाचे मोठे
केलेय. तिला खुश किंवा हसताना फार क्वचितच मी पाहिले आहे. तुझ्याबद्दल सांगताना तिचा उत्साह पाहून मला पुढे बोलावले गेले नाही.

आता या बाबतीत फक्त तूच काहीतरी करू शकतेस."

"मी!"

"तू... तू जर नकार दिलास ना तर पुढचे सहज शक्य होईल."

"शेखर....माझी मावशी...मामा मामी सगळ्यांना तुम्ही पसंत आहात....मी माझ्या घरच्यांना काय सांगू...."

"काहीही सांग.... सांग की तुला मी आवडलो नाही...किंवा माझे बोलणे किंवा वागणे आवडले नाही...किंवा माझा स्वभाव आवडला नाही. "

प्रियाचे डोळे भरले. जो तिला मनापासून आवडला होता. ज्याच्याशी लग्न होण्याआधीच तिने मनोमन त्याच्याशी लग्न केले होते...त्याच्या बद्दल ती असे कसे सांगू शकणार होती.

"मी असे काही एक सांगणार नाही. "
ती निक्षून म्हणाली . त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.
ती उठली.

"आणि यापुढे मी तुमच्याशी लग्नही करणार नाही. "
आवंढा गिळत ती म्हणाली...तिच्या गालावरच्या खळीने पुन्हा त्याचे लक्ष वेधले.

"आय ॲम सॉरी प्रिया. ....आय ॲम वेरी सॉरी. "

तिने त्याच्याकडे एकदा डोळे भरून पाहिले , आपली पर्स उचलली व ती निघून गेली.

तिच्या रडण्याने त्याच्या काळजात किंचित काहीतरी हलले.

*******

"अगं, आल्यापासून नुसती रडत आहेस. काही बोलशील तर मला काही कळेल ना. "
मावशीच्या मांडीवर डोके ठेवून रडत बसलेल्या प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत मावशी म्हणाली.

"प्रिया सोन्या काहीतरी बोल बेटा....शेखर काही बोलला का?"
तिने मावशीकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यांचे झरे अविरत पाझरू लागले.

"मावशी... मावशी..."
हुंदक्यांमुळे तिला बोलताच येत नव्हते.

"उगी उगी...गप रहा....शांत हो आधी..."

प्रियाने पुन्हा मावशीच्या मांडीवर डोके ठेवले.

"मावशी.... शेखरनी माझ्याशी लग्न करायला नकार दिला आहे. "

"अगं...काय बोलतेस काय प्रिया? "

"हो मावशी..."

"शेखर असे कसे करू शकतो...माझ्या छकुलीला नकार देण्यासारखी काय खोट वाटली त्याला तिच्यात...थांब मी सुमेलाच विचारते. "

बेडवरून उठत आपला फोन घेण्यास ती टेबलाजवळ जाणार इतक्यात तिला थांबवत प्रिया म्हणाली,

"त्यांचे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. "

"कुणावर?"

"ते मी विचारले नाही. "

"अगं विचारायचे तरी. "

"मावशी त्याने काय फरक पडणार आहे? ती कुणीका असेना.... त्यांचे तिच्यावर प्रेम आहे ... त्यांना मी आवडत नाही इथेच सर्व संपले. नक्कीच ती कुणी भाग्यवान असणार. माझ्या नशिबात ते सुख नाही.

मावशी, सर्व दुर्भाग्य देवाने माझ्याच वाट्याला दिलेय का?"

सुधामावशीने तिच्याकडे हतबलपणे पाहिले आणि तिला कुशीत ओढून घेतले. तिचे डोळेही घळाघळा वाहू लागले.

भावनांचा वेग ओसरल्यावर प्रिया म्हणाली,

"मामी कुठे आहे?"

"तुझा मामा मामीला घेऊन पिक्चरला गेला आहे. ती दोघं आता रात्रीच येतील. "

"त्यांना मी काय सांगू? शेखर मला म्हणाले की लग्नाला तू नकार दे. मी जर असे केले तरच त्यांच्या आई त्यांच्या लग्नासाठी तयार होतील. "

"आता तुला त्याचा विचार करायची काही गरज नाही . त्याने तुझे मन मोडताना काडीचाही विचार केला नाही. ते काही नाही मी आताच सुमेला सर्व सांगते. "

"मावशी... असं करू नकोस प्लीज...माझ्या मनासारखे झाले नाही ...निदान त्यांच्या मनासारखे तरी होऊ दे. असे केल्याने जर ते सुखी राहणार असतील तर मी ते ही करेन. "

"अगं पण तू तुझ्या मामीचा विचार केला आहेस का...तुझ्याकडून नकार आहे असे जर तिला समजले ना तर ती पूर्ण घर डोक्यावर घेईल...तुला आणि मला दूषणे देईल ते वेगळेच. "

"मामीची बोलणी खायची सवय आहे मला. "
प्रिया खिन्न हसत म्हणाली.

*******

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.