Login

प्रिया आज माझी भाग १३

Lovestory
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


प्रिया आज माझी (भाग १३)

प्रिया आणि सुधामावशी लग्नमंडपात पोहोचल्या.
सुमन परांजपे त्या दोघींना विशेषतः प्रियाला पाहून इतक्या काही खुश झाल्या की त्यांचा आनंद पाहून आजुबाजूच्या लोकांना वाटावे की प्रिया त्यांची होणारी सून आहे. त्यांनी अक्षरशः तिचा हात धरून तिला मंडपासमोरच्या पहिल्या रांगेत बसवले. मुहूर्ताची वेळ झाली होती. शेखर स्टेजवर येऊन उभा राहिला . त्याचे लक्ष नवरीच्या रूम होता त्या वाटेकडे लागले होते. त्याचा आनंद, उत्साह... आपल्या नवरीला पाहण्याची आतुरता ...प्रियाच्या हृदयावर हलके हलके घाव करीत होती....त्याच्या होणाऱ्या बायकोच्या नशिबाचा तिला हेवा वाटू लागला. ती गंभीरपणे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होती.

प्रिया...तुझा शेखर खूप खुश आहे...त्यासाठी तू ही खुश झाले पाहिजे..

हो हो.... आय ॲम हॅप्पी फॉर यू..... शेखर....

तिने त्याच्याशी मनात संवाद साधला खरा पण असे वाटत होते जणू तिचे शब्द त्याच्या कानावर पडले जणू...आणि त्याचे तिच्याकडे पटकन लक्ष गेले आणि तो गंभीर झाला...कदाचित त्यालाही अपराध्यासारखे वाटत होते...आजच्या त्याच्या सुखात तिचा हातभार होताच ना तो तिच्याकडे पाहून तो मंद हसला .
ती काही प्रतिक्रिया देणार तेवढ्यात...

"घ्या आता तुम्ही दोघी इथं पहिल्या रांगेत बसल्या आहात ....मी तुम्हाला मागे शोधीत होते. "

"वहिनी.... तुम्हाला दोघांना लग्नाला यायचे होते तर आम्हाला का नाही बोललात?"

"परांजपे बाईनी आम्हाला स्वतः फोन करून बोलावून घेतले...म्हणाल्या , जे झाले ते विसरून जा....आणि पुढे जे होणार आहे ते चांगलेच होईल. "

"सुमा असे का म्हणाली?"

"ते आम्हालपण समजले नाहीं...पण त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही आलो...नाहीतर तुम्ही दोघी....निघताना तुम्ही येता का असे आम्हाला म्हणाला सुद्धा नाहीत.

".." मावशी पुढे बोलणार इतक्यात प्रियाने तिला थांबवले.

"मावशी, आता काही वेळातच मंगलाष्टके सुरू होतील. आपल्यामुळे इथे व्यत्यय नको यायला. "

भटजी मंगलाष्टके बोलायला सुरुवात करणार इतक्यात शेखरला कोणतातरी फोन आला.....तो बंद करण्यासाठी त्याने खिशातून बाहेर काढला आणि फोनवरील नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर किंचित चिंता जाणवली. त्याने तो फोन उचलला आणि स्टेजच्या कडेला जाऊन तो बोलू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत होते...आधी चिंता, मग चिडचिड...मग राग....त्यानंतर तावातावाने बोलणे.

नक्कीच काहीतरी बिनसलंय. हॉलमध्ये जमलेले एकुणएक जण त्याच्याकडेच पाहत होते. तो बोलत असताना तिथे सुमन परांजपे आल्या. त्याने रागाने फोन ठेवला आणि तो जे झाले ते त्यांना सांगू लागला. त्यांच्याकडे पाहून असे वाटत होते की शेखर त्यांना जे सांगत आहे ते त्यांना आधीपासूनच माहित होते.

"आई, मिहिका आज सकाळी पॅरिसला गेली आहे. तिला काहीच कसे वाटले नाही...आज इथे सर्व जमलेत...माझ्या ऑफिसमधली काही महत्त्वाची माणसे इथे येणार आहेत...इतक्या शॉर्ट नोटीसवर लोकं गावावरून इथे आली आहेत.... मिहिकाने माझा थोडा तरी विचार करायचा होता. त्याने रागाने फेटा काढण्यासाठी आपल्या डोक्यावर हात नेला इतक्यात सुमन परांजपेनी त्याला रोखले.

"शेखर.....इथे हॉलमध्ये सर्व जमले आहेत...ज्या मुलीला तुझी कदर नाही....तिच्यासाठी थांबण्यात काही अर्थ नाही...आता पर्यंत तू तुझ्या मनाप्रमाणे केलेस...त्याचा परिणाम पाहिलास ...आता माझ्या मनासारखे करशील?"

त्या काय बोलत आहेत शेखरला कळत नव्हते.


इकडे मामींनी अंधारात बाण सोडला....

"काय झाले असेल...
नवरी पळून बिळून गेली की काय?"

"मामी...काहीही काय बोलताय..." प्रियाने रागाने मामींकडे पाहिले.

शेखरच्या आईने प्रियाकडे पाहून त्याला सूचक इशारा केला.

"शेखर...ही मुलगी खरोखरच चांगली आहे. माझ्या माहितीतली आहे. तू सुखी राहशील. माझ्यासाठी एवढे कर. "

"आई..."

पुढे काय बोलावे हे त्याला सुचत नव्हते.

"शेखर आपल्याकडे विचार करायला वेळ नाही. हॉलमधल्या सर्व लोकांचे लक्ष आपल्याकडेच लागले आहे. "

"पण आई
असे आयत्या वेळी ती का करेल माझ्याशी लग्न?."

"ती तेंव्हाही तुझ्याशी लग्न करायला तयार होती पण तूच नाही म्हणालास ही गोष्ट मला माहित आहे.....तिचे तुझ्यावर इतके प्रेम आहे की ती आताही तयार होईल.
माझा शब्द ती टाळणार नाही
आता प्रश्न तुझा आहे. "

म्हणजे तिने आईला सर्व सांगितले.
शेखरला चीड आली.

"तू गप्प आहेस म्हणजे तू तयार नाहीस तर...ठीक आहे...मी आताच सर्वांना सांगते. "

"मी तयार आहे. "

सुमन परांजपे वळल्या आणि त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रु आले.

क्षणभर शेखरकडे पाहून त्या प्रिया बसली होती तिथे गेल्या. त्यांना जवळ आलेले पाहून प्रिया, सुधामावशी, आणि मामी सर्वच उठून उभे राहिले.

"सुमा, सर्व ठीक आहे ना?"

"आता सर्व ठीक होईल. "

मिहिका लग्न सोडून पॅरिसला गेली ही गोष्ट त्यांनी त्यांना सांगितली.

"आपले लग्न सोडून कोण कसे जाऊ शकते? आणि ते ही आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर . शेखरना किती वाईट वाटले असेल?"

"सर्व ठीक करणे फक्त तुझ्या हातात आहे....."

प्रियाने विस्मयाने पाहीले. मामीच्या डोळ्यांत चमक आली. जणू तिला माहितच होते की सुमन परांजपे पुढे काय बोलणार आहेत.

"माझ्या शेखरशी लग्न कर... प्लीज. "

त्यांनी तिच्यापुढे हात जोडले.

तसे तिने त्यांचे जोडलेले हात पटकन खाली घेतले आणि नकारार्थी मान हलविली.

"सुमे अगं शेखरचे त्या मुलीवर प्रेम असताना त्याच्या मनात नसताना तू उगीच.." सुधामावशी.

"शेखरच म्हणाला..."सुमन.

"काय?.."सुधा.

"हो...तू आता माझ्या सुनेला परवानगी दे....मुहूर्ताची वेळ टळून जात आहे. "सुमन.

सुधामवशीला काय बोलू सुचत नव्हते. प्रिया कुठेतरी हरवली होती.

"घ्या आता... लक्ष्मी टिळा लावायला आलेय...आणि या तोंड धुवून येते म्हणतायत. "

"ओ भटजीकाका.... मंगलाष्टके सुरू करा...नवरी येईलच. परांजपे बाई...तुम्ही जावा शेखरच्या बाजूला उभे रहा..."
सुमन परांजपे खुलून हसल्या .

"स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं
शुभलग्न सावधान.

नवरीला घेऊन या ."

"ओ तुम्ही तुमच्या भाचीला घेऊन जा.

तरी बरे आम्ही इथे हजर आहोत... नाहीतर या मावशीभाचीने काय केले असते कुणास ठाऊक..."

मामीने प्रियाचा हात मामांकडे दिला आणि त्यांना तिला स्टेजवर घेऊन जायचा इशारा केला.

"ओ मेंटल....बघत काय राहता? .. भटजी काका वाट पाहत आहेत. "

मामी फार चेकाळली की मामाना याच नावाने बोलवायची.
घाबरून मामानी प्रियाचा हात पकडला आणि किंचित खेचतच ते तिला स्टेजवर घेऊन गेले .
सुधामावशी मात्र जे होत आहे ते मूकपणे पाहत होती.
आपल्या वहिनीच्या उतावळेपणा पहिल्यांदाच प्रियाच्या चांगल्यासाठी आहे असे तिला वाटले.

क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all