डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
प्रिया आज माझी (भाग १४)
योगायोग म्हणावा की काय लग्न लागताना नवरीने पिवळी साडी नेसायची असते...प्रिया आज मस्टर्ड रंगाची साडी नेसली होती. काही फार जवळचे लोकं सोडल्यास मिहिकाला फारसे कुणी पाहिलेच नव्हते...ज्यांनी पाहिले होते ते ही मोबाईलमधल्या फोटोत. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना प्रिया ही आयत्यावेळी नवरी झाली आहे याची यत्किंचितही शंका वाटली नाही.
"नवरीने पाटावर उभे रहावे. " भटजीबुवा म्हणाले.
मामानी प्रियाला खुणावले तसे ती पाटावर जाऊन उभी राहिली. समोर अंतरपाट आणि त्या पलीकडे तो....तिचा शेखर...जे सर्व घडत होते ते कल्पनातीत होते. भटजींनी तिच्या हातात हार दिला. दुसरी मंगलाष्टक सुरू झाली. तिचे लक्ष मात्र अंतरपाटाकडे होते...जणू आत्ता या क्षणी ती शेखरच्या मनातील द्वंद्व जाणून घ्यायचा प्रयत्न करीत होती. एका मागोमाग एक मंगलाष्टके म्हटली जात होती. पण तिच्या कानावर काही एक ऐकू येत नव्हते.....कानावर पडत होते ते हृदयाचे ठोके.... धडधड. हे होतेय ते चांगल्यासाठी होतेय का....यातून काय साध्य होणार आहे... या लग्नाचे पुढे भवितव्य काय....
शेवटची मंगलाष्टक पूर्ण झाली.
शुभलग्न सावधान!
ती खरोखरच सावध झाली आता कुठल्याही क्षणी अंतरपाट बाजूला होईल आणि समोर शेखर दिसेल.
अंतरपाट बाजूला सरला.
"प्रथम नवरीमुलीने मुलाला हार घालावा. "
हार तिच्या हातात होता खरा पण तिचे हात त्याला हार घालवण्यास धजावत नव्हते. ती त्याच्या प्रतिसादाचीं वाट पाहत होती. पण तो यंत्रवत तिच्या समोर उभा होता.
"प्रिया...सर्व पाहतायत. शेखरच्या गळ्यात हार घाल."
मामा कुजबुजले.
मामा कुजबुजले.
त्याला हार घालण्यासाठी तिने हात उंच केला खरा पण त्याच्या उंचीइतपत ती हात वर करू शकली नाही...त्याक्षणी त्याची आणि तिची नजरानजर झाली...तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आले...आणि तिच्या थरथरत्या हातातून हार खाली पडणार इतक्यात त्याने तिचा हात अलगद पकडला आणि स्वतः मान खाली घालून तो तिच्यापुढे झुकला....कदाचित त्यालाही तिची अवस्था समजली असावी असे तिला वाटले. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जणू त्याचे असे करणे सर्वांना आवडले .
सुधामावशीचा चेहरा खुलला. शेखर हे नाते निभावून नेणार. तिला संकेत मिळाले तसे तिने वर छताकडे पाहून सद्गुरुंचे स्मरण केले आणि हात जोडले.
त्याने हार घालताना क्षणभर तिच्याकडे पाहिले. कदाचित त्याच्याही मनात तिच्याप्रमाणेच संभ्रम होता.
त्याने हार घालताना क्षणभर तिच्याकडे पाहिले. कदाचित त्याच्याही मनात तिच्याप्रमाणेच संभ्रम होता.
"शेखर..."
आपल्या आईचा आवाज ऐकताच शेखरने तिला हार घातला.
त्यानंतर काहीच वेळात लग्नानंतरचे सर्व विधी व्यवस्थित पार पडले.
संपूर्ण विधीदरम्यान तिला शेखर एकदाही हसताना दिसला नाही. प्रियाचे लक्ष राहून राहून त्याच्या उदासपणाकडे जात होते. तिला सारखं जाणवत होते की तो या लग्नापासून खुश नाही. त्याच्या या अवस्थेचे कारण ती आहे या भावनेने तिला अस्वस्थ केले.
प्रियाचे मामा मामी शेखरला आपला जावई म्हणून मिरवण्यात गुंतलेले होते. तिथे त्यांच्या ओळखीचे कुणी नव्हते तरी मुद्दाम ओळख करून शेखर आमचा जावई आहे हे बोलत होतें.
प्रियाचे प्रेम जिंकले तिला मनासारखा नवरा मिळाला म्हणून मावशीच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. स्टेजसमोर बसून ती त्यांच्याकडेच पाहत होती....तिचे डोळे भरून येत होते.
दोघं अगदी एकमेकांना शोभत होते.
.
.
क्रमशः
****
****
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
