Login

प्रिया आज माझी भाग १६

Lovestory

डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


प्रिया आज माझी भाग १६

"तुला सर्व माहिती असताना तू माझ्याशी लग्न का केलेस?"

"शेखर..."

फक्त या पलीकडे ती काहीच बोलू शकली नाही. तिचा गळा दाटला होता....तिच्यासाठी हे धक्कादायक होते.

"तुला संधी मिळाली आणि तू त्याचा फायदा घेतलास.... ओह् गॉड...तू इतकी मतलबी आहेस...तुझ्या भोळ्या चेहऱ्याकडे पाहून असे जराही वाटत नाही. "

तो रागाने तिच्या दिशेने आला तशी ती मागेमागे जाऊ लागली आणि अखेर तोल जाऊन बेडवर पडली. तिला लागले असे वाटून तो किंचित पुढे झाला. पण परत पुढच्याच क्षणी त्याला तिचे स्टेजवर येणे त्याला हार घालणं , त्याच्याशी लग्न करणे, आठवले आणि तो पुन्हा चिडला.

तो काय बोलतोय कशा संदर्भात बोलतोय हे तिला अजूनही समजत नव्हते. ती भेदरल्यासारखी त्याला पाहत होती.

"नाऊ यू आर ॲक्टिंग इनोसंट...(आता तू निष्पाप आहे असे दाखवत आहेस."

"शेखर तुम्ही काय बोलत आहात?"

"तुला माहीत नाही..... अनबीलिवेबल...तुला ज्या क्षणी माहीत पडले की मिहिका तिच्या assignment साठी फॉरेनला गेली आहे तशी तू तयार होऊन लग्नाला आलीस...तुला माहीत आहे अशा प्रसंगी माझी आई तुझ्याकडे येईल आणि तुला माझ्याशी लग्न करायला सांगेल. "

"आणि हे मला कोणी सांगितले आहे वाटते तुम्हाला...."

तिच्या या प्रश्नाचे त्याच्याकडे उत्तर नव्हते.

"आणि तुमची होणारी बायको लग्न सोडून फॉरेनला गेली याचे खापर तुम्ही माझ्यावर का फोडत आहात...आपले लग्न झाले तेंव्हा तुम्हाला कोणी मारून मुटकून उभे तर केले नव्हते ना..."

"माझे सोड ... तू... तू का तयार झालीस. "

"मी..." प्रिया विषण्ण हसली.

"माझ्याजागी तुम्ही नाहीत ना! तुम्हाला कसे कळणार ते...जिचे आईवडील नाहीत.. जिचे लग्न झाले तर आपण सुटू असे जिच्या मामा मामीला वाटते अशा मुलीसमोर तुमच्यासारखा शिकलेला, चांगले करिअर असलेला मुलगा म्हणजे चांगले स्थळ.... सुमन मावशीने मंडपात मला जेव्हा लग्नासाठी विचारले तेव्हा माझे मामा मामी सुद्धा तिथे होते...मला काय वाटतेय याचा जराही विचार न करता माझे मामा, मामींच्या सांगण्यावरून मला मंडपात घेऊन आले.
पण मी तुम्हाला हे का सांगतेय....सर्व तर तुमच्या डोळ्यांसमोर झाले आहे...."

"तू तिथे नसतीस तर ही वेळच आली नसती. "

"हो...तेच तर माझे चुकले. "

'काय सांगू तुम्हाला.....हे सांगू का की माझे तुमच्यावर प्रेम आहे...तुमच्या लग्नाच्या दिवशी मी तिथे आले कारण मला तुम्हाला शेवटचे पहायचे होते.,...डोळेभरून. '

शेखरकडे पाहत ती मनात म्हणाली.

"उत्तर नाही ना तुझ्याकडे.... वाटलेलच...ठीक आहे ....तुझ्याकडे काही उत्तर नाही ..पण माझ्याकडे एक solution आहे..."

शेखरने काही पेपर तिच्याकडे दिले.

"ह्यावर sign कर. "

ती गोंधळली आणि तिने ते पेपर खोलून पाहिले.

डिव्होर्स पेपर्स होते ते....तिचे डोळे भरून आले. पण क्षणाचाही विलंब न लावता तिने ते पेपर बाजूला ठेवले घाईतच आपल्या पर्समधून पेन काढला आणि त्या पेपर वर सह्या केल्या.

दुसऱ्याच क्षणी तिने आपली बॅग उचलली आणि ती रुमच्या बाहेर आली. शेखरही तिच्या मागोमाग बाहेर आला. तिची प्रतिक्रिया अशी असेल असे त्याला वाटले नव्हते.

"वेट...इतक्या रात्री जाऊ नकोस...उद्या सकाळी जा...."
तिची बॅग मागे ओढत तो म्हणाला.

"माझ्यासाठी रात्र आणि दिवस सारखेच आहेत शेखर..."

"प्रिया आता तुला खालून एकही वाहन मिळणार नाही....मी तुला उद्या सोडतो. "

"ते तर तुम्ही आजच केलेत..." तिने डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि ती मंद हसली.

तिचे शेवटचे वाक्य ऐकून शेखर किंचित हलला.
दारावरची बेल वाजली तसे त्याने दार खोलले. समोर सुमन आणि त्यांची बहीण म्हणजेच शेखरची मावशी होती.

"आई, बरे केलेस तू आलीस. "
शेखरने त्यांच्या हातून बॅग घेतली.
त्या आत आल्या. पण मावशी बाहेरच उभी राहिली.

"शेखर... ताईला बरे वाटत नव्हते....थोडे अस्वस्थ वाटायला लागले . तुझे काका आणि मी म्हणालो की जवळच्या हॉस्पीटलमध्ये जाऊया तर ऐकलीच नाही मग आम्ही गाडी परत फिरविली. तरी नशीब फार दूर गेलो नव्हतो. तुझ्या काकांना त्यांच्या ऑफिसमधला महत्त्वाचा कॉल आला आणि जवळ जवळ अर्धा तास ते फोनवर बोलत होते..त्यानंतर आम्ही निघालो तर हिला असे दुखायला लागले. हॉटेलमध्ये उतरून निंबूपणी दिले तेंव्हा बरे वाटले बहुतेक ॲसिडिटी झाली असावी पण आम्ही म्हटले रिस्क नको म्हणून परत आलो. "

"मावशी तू आत ये ना..."

"नाही तुझ्या काकांचे महत्त्वाचे काम आहे...तू डॉक्टरांना बोलाव आणि ते काय बोलले ते मला सांग. "

"हो मावशी. "

शेखरने दार लावले.

प्रिया पर्स खांद्याला लावून उभी आणि तिच्याजवळ तिची बॅग होती हे पाहून सुमनताईंचा चेहरा पडला.

"अगं प्रिया तू कुठे निघालीस?"

"ते मी..."
ती काही बोलणारच होती पण शेखरने तिला पुढे बोलू दिले नाही.

"आई...ती निघाली नाही काही.. तिचे सामान आताच आले....आम्ही आत ठेवतच होतो इतक्यात तू आलीस. तू तुझ्या रुममध्ये चल पाहू.. मी डॉक्टरांना कॉल करतो. "

"डॉक्टर कशाला मला ऍसिडिटी झाली आहे...तुझे लग्न होणार होते म्हणून इतकी खुश होते की मला झोपच आली नाही...म्हणून असेल. "

"तसेच असेल पण डॉक्टराना त्यावर शिक्कामोर्तब करू दे ना. "

बोलता बोलता शेखर आपल्या आईला रुममध्ये सोडून आला.

इकडे प्रिया दरवाजा खोलणारच होती इतक्यात शेखरने दाराच्या लैचवर असलेल्या हातावर आपला हात ठेवला.
त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती बावरली आणि तेंव्हाच त्याची आणि तिची नजरानजर झाली.

"प्लीज. "



क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all