Login

प्रिया आज माझी भाग १७

Lovestory
प्रिया आज माझी भाग १७

डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


"प्लीज प्रिया. आईची तब्येत बरी नाही. आज जर आईला याबाबतीत समजले तर तिला फार त्रास होईल."

त्याच्या हाताखालून तिने आपला हात काढला .

"शेखर , तुम्ही तुमच्या आईचा विचार केलात. मी हे सर्व माझ्या मावशीला कसे सांगू याचा विचार केलात का?...माझ्यासाठी तिने खूप स्वप्ने पाहिली. आज ती सुद्धा किती खुश होती.....आता तिला मी हे कसे सांगू की ज्या भाचीचे तिने लग्न बघितले त्या तिच्या भाचीला लग्नाच्या पहिल्या रात्री हातात घटस्फोटाचे पेपर मिळाले. "


"प्रिया, आपण यावर उद्या बोलू. "

तिचा आवाज आईला ऐकू जाईल की काय या गोष्टीची त्याला भीती वाटत होती.

बेल वाजली. डॉक्टर आले आणि प्रिया व शेखर दोघेही सुमनताईंच्या रुममध्ये गेले.

डॉक्टरांनी त्यांना चेक केले व औषधे लिहून दिली. शेखर त्यांच्याबरोबर बाहेर गेला .

"डॉक्टर काही काळजीचे कारण तर नाही ना? "

"नाही...पण त्यांनी आराम करायला हवा. त्यांचे बीपी थोडेसे वाढलेले आहे. बहुतेक स्ट्रेस मुळे असावे. ऍसिडिटी वरजी टॅब्लेट लिहून दिली आहे ती त्यांना द्या. आणि त्यांच्या आधी ज्या ब्लडप्रेशरच्या टॅबलेट सुरू आहेत त्याच कन्टिन्यु ठेवा."

"ओके डॉक्टर. "

डॉक्टर निघून गेल्यावर शेखर सुमनताईंच्या रुममध्ये गेला.
प्रिया त्याच्या शेजारी बसलेली होती आणि तिच्या हातात सुमनताईंचा हात होता. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू होते.

"आई, तुम्ही खूप विचार करता ना. "

"आता तू आलीस ना...माझे विचार बंद....सर्व तुझ्याकडे सोपवले आहे. माझ्या निवडीवर मला पूर्ण विश्वास आहे. " त्यांनी तिच्या गालाला हात लावला.

"आई तुम्ही आता आराम करा. तुम्ही काहीही खाल्ले नसेल ना. मी तुमच्यासाठी डाळखिचडी करून आणते. "

"प्रिया तू ही दमली आहेस...काही करू नकोस...आपण बाहेरून मागवू...आज नैना (हाऊसहेल्प) घरी नाही. तिच्या घरीसुद्धा तिच्या सख्ख्या दीराचे लग्न आहे. नाहीतर तिनेच काहीतरी बनवले असते. "

"आई, मी बाहेरून मागवतो. "

"मला भूक नाही. " प्रिया त्याच्याकडे न पाहता थोडे रुक्षपणे म्हणाली पण नंतर तिच्या लक्षात आले की सुमनताई तिच्याकडेच पाहत आहेत तेंव्हा तिने आपला आवाज मृदु केला.

"म्हणजे लग्नात उशिरा जेवलो म्हणून आता जेवावेसे नाही वाटत."

"आईंसाठी मी डाळखिचडी बनवते...त्यांच्यासाठी बाहेरून नको. "
पुन्हा त्याला उद्देशून ती म्हणाली पण यावेळेस आवाज सौम्य होता.

"शेखर...तुला हवे तर काहीतरी मागव. "

"हो आई. "

तो तिथून निघून गेला.

"तुम्हा दोघांना एकांत मिळावा म्हणून मी चालले होते...पण ठरवले एक आणि झाले वेगळेच.

माझा शेखर खूप चांगला आहे ग.... थोडा introvert आहे... तो थोडा वेळ घेईल...तुला सावरून घ्यावे लागेल...करशील ना माझ्यासाठी..."

मनात इतका गोंधळ चालला होता तरी तिने कसेनुसे हसत मान हलविली.


रात्री डाळखिचडी खाल्ल्यानंतर सुमनताईंनी आपल्या सुनेचे भरभरून कौतुक केले. ती दोघं शेखरच्या बेडरूममध्ये जाईपर्यंत त्या हॉलमध्येच बसून राहिल्या ....आणि ते आत गेल्यावर त्यांनी न चुकता इतर दोन खोल्यांना टाळे लावले.
शेखरने आपल्या आईची ही कृती पहिली आणि तो नाईलाजाने पुन्हा आपल्या बेडरूममध्ये आला.

पण प्रिया बेडरूममध्ये नव्हती. ती बाल्कनीत उभी होती...समोर असलेल्या महालक्ष्मी मंदिराकडे एकटक पाहत. डोळ्यातून अश्रुंच्या झऱ्याची सोबत होतीच.

"का...माझेच नशीब इतके वाईट का...मागच्या जन्मात मी नक्कीच काहीतरी वाईट केले असेल म्हणून माझ्या वाट्याला असे दुःख आले. आवडत्या माणसाशी लग्न केले...पण त्याला माझी सोबत नकोशी झाली. आता हे सगळे मामीना कसे सांगू?...मावशीला किती वाईट वाटेल. उद्या मी जेव्हा घरी परत जाईन तेव्हा माझ्याबरोबर मावशीला सुद्धा किती ऐकवतील त्या! काय करू...इथे राहू शकत नाही...दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही...."

वातावरणाच्या गारव्याला विरोध करणारे तिचे गरम अश्रू तिचे सोबत करत होते.

इकडे शेखर मात्र बेडवर पडून त्याच्या भवितव्याचा विचार करीत होता...आईला हे सगळे कसे सांगायचे.. ती तयार होईल का... प्रियावर तिचा किती जीव होता हे त्याने पाहिले होते.

विचार करता करता त्याला झोप आली.


रात्री मध्येच थंडी वाजू लागल्यामुळे त्याची झोप मोड झाली....त्याच्या पायाखाली त्याचे ब्लँकेट होते ते अंगावर तो ओढून घेतच होता इतक्यात त्याचे लक्ष बेडच्या समोर ठेवलेल्या तिच्या बॅगेकडे गेले. त्याने पूर्ण रुमभर पाहिले....प्रिया नव्हती...त्याच्या मनात वेगळीच शंका आली.

क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.