Login

प्रिया आज माझी भाग१९

Lovestory
प्रिया आज माझी भाग १९

डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

पहाटे पुन्हा तो अंथरुणावर जाऊन पहुडला. सकाळी उठला तेव्हा लागलीच बाल्कनीत गेला. पण ती तिथे नव्हती. तो पुन्हा रुममध्ये आला . बेडवर बाजूला तिला त्याने जे ब्लँकेट पांघरलेले होते त्याची घडी दिसली. याचा अर्थ ती हॉलमध्ये गेली असावी असा अंदाज त्याने बांधला.

तो शॉवर घेऊन केस पुसत बाहेर आला. त्याने रुममध्ये भिंतीवर लावलेल्या घड्याळात पाहिले तेव्हा सकाळचे दहा वाजले होते. बाहेर हॉलमध्ये काहीतरी गडबड सुरू होती.
केस पुसत पुसतच तो बाहेर आला. ती समोरच पाटावर बसलेली होती. तिच्या समोर कासार बसला होता आणि तिला गर्द रेशमी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या चढवत होता. त्याच्या बाजूलाच सुमनताई बसल्या होत्या. त्यांच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या...त्या कासाराला एक एक करीत त्या बांगड्या हिरव्या बांगड्यांमध्ये घालायला देत होत्या.

प्रियाने केस धुतले असल्यामुळे केसांचा अंबाडा बाधून त्यावर सफेद टॉवेल गुंडाळलेला होता. त्यातून केसांची एक घट्ट बट तिच्या चेहऱ्यावर येत होती. गुलाबी रंगाची जॉर्जेट साडी तसाच मॅचींग ब्लाउस.... घट्ट बांगडी चढवताना तिने केलेली चेहऱ्याची नाजूक हालचाल....खूप मोहक वाटत होती. मध्येच सुमनताई तिच्याशी बोलत होत्या त्यावर ती हसून जुजबी बोलत होती. शेखर तिच्या चेहऱ्यावरच्या हालचाली टिपत होता

"शेखर... ये अरे..."
आईने अचानक हाक मारल्याने तो थोडा गोंधळला.

तिने त्याच्याकडे पाहिले.

" तुमचे लग्न असे घाई गडबडीत झाले...तिच्या हातात धड हिरवा चुडा देखील नव्हता. म्हटले आज पूजेला बसताना तरी हात भरलेला असू दे. ते काय आहे आपल्या कॉलनितल्या चार दोन बायका येतील म्हणून मी कासाराला बोलावून घेतले.

"आई...ते पूजा वैगरे कशाला ...मला ऑफिसला जायचे आहे" शेखर वैतागला त्याने प्रियाकडे त्रासिकपणे पाहिले.

"शेखर....लग्नानंतर पूजा होणार आहे हे मी तुला आधीच सांगितले होते ना...तू तशी सुट्टी घेतली होतीस. "

"हो आई पण ते मिहिक...."

तो अर्धवटच बोलला....प्रियाने चटकन त्याच्याकडे पाहिले तसे तिचा हात हलला आणि बांगडी चढवताना काच खळकन तुटली आणि काचेचा लहानसा तुकडा तिच्या मनगटात घुसला....तिच्या डोळ्यांत पाणी आले..."
हातावर झालेल्या जखमेपेक्षा हृदयावर झालेले घाव अधिक खोल आणि गहिरे होते.

"अगं...याला कामापुढे काहीच दिसत नाही...आता तू आली आहेस तर सुट्टी कशी घ्यायची हे शिकव त्याला.

"अरे बाबा...जरा बघून भर ना...बघ माझ्या सुनेच्या हातात काच घुसली ना."
सुमनताईंनी आपला स्वर शक्य होईल तितका नॉर्मल ठेवला.

"शेखर, तिथे टीव्हीच्या खालच्या कॅबिनेट मध्ये अँटिसेप्टिक ठेवलेय ते घेऊन येशील का जरा. "

"काही वेळाने मला महत्त्वाचा व्हिडिओ कॉल आहे...."
एवढेच बोलून तो सरळ बेडरूममध्ये निघून गेला.

"काही नाही आई...एवढे काही नाही लागले...हे काय रक्तही थांबले. "
हातावरच्या जखमेकडे पाहत भिजलेल्या स्वरात ती म्हणाली.

"चाची, मुझे लगता है नस पे लगा है... इस्पे पट्टी करा दो. "

"मैं करती हुं... ये लो तुम्हारा पैसा. तुम जाओ.."

सुमन ताई थोड्या वैतागल्याच होत्या. कासार गेल्यावर त्यांनी अँटिसेप्टिक लावून तिच्या मनगटावर पट्टी बांधली. लग्नात बांधलेल्या हळकुंडा शेजारीच लागल्यामुळे त्यांना पट्टी बांधणे थोडे अवघड गेले.


****

घरकामासाठी असलेली दोन माणसे सुधाकर आणि कृष्णा पूजेची तयारी आणि मांडणी करीत होते. नैनाच्या जागी तिने आपली सबस्टिट्यूट मनिषा पाठवली होती. तशी मनिषा या आधी दिवाळीतून आणि मे महिन्यातून नैनाच्या जागी आली होती त्यामुळे तिला इथे वावरायची सवय होती.

"मनिषा....खिचडी झाली असेल तर बाहेर आण. आणि शेखरलाही नेऊन दे. आज ती दोघे पूजेला बसणार आहेत ..त्यांचे दोघांचेही उपास आहे. आणि मलाही तेच दे. वेगळा नाश्ता नको..."

"आई तुम्हाला काल ॲसिडिटी झाली होती.. साबुदाण्याच्या खिचडीने अजून त्रास होईल. मी तुमच्यासाठी रव्याची खीर बनवते. "


"नको ..तुझ्या हाताला लागले आहे....तसे म्हटले तर तुझ्या हातून अग्नीची पूजा करून घ्यायची होती पण त्याआधीच काल घरी आल्यापासूनच तू स्वयंपाकाला लागलीस. ना हातावर मेहंदी...ना बांगड्या...ना कसली हौसमौज...मी सांगितले आणि तू पाटावर उभी राहिलीस. ...आजकाल लग्नात मुली आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून घेतात...प्रत्येक गोष्टीच्या रिल टाकतात ...माझ्यामुळे तुझे ते सर्व राहून गेले."

"आई...तुम्ही वाईट वाटून घेऊ नका... सर्व गोष्टी सर्वांच्या
नशिबात नसतात. विधिलिखित होते माझे या घरात येणे ... आणि..."

"आणि मला इतकी चांगली सुन मिळाली हे माझ्या नशिबात होते म्हणून हे सर्व घडून आले. "
हे वाक्य बोलताना सुमनताई काहीशा चलबिचल झाल्या.

मनिषा खिचडी घेऊन तशीच बाहेर आली.

"काकू... साहेब सँडविच मागत आहेत. "

"त्याला कळत कसे नाही...पूजा संपेपर्यंत उपास असतो ..."

"आई, आता आमचे लग्न झाले म्हटल्यावर मी उपवास केला तरी त्यांना पुण्य भेटणारच न...मग त्यांनी उपास नाही धरला तरी चालेल. तसेपण पुरुषांना हे उपास वैगरे नाही जमत. "

"आतापासूनच नवऱ्याची इतकी काळजी.
बरे बरे...तू म्हणतेस तर तसेच होऊ दे. "
सुमनताई कौतुकाने म्हणाल्या.

"मनिषा ...सँडविच कर आणि त्यातलेच मला देखील दे. "

"पण तुमच्यासाठी रव्याची खीर .."

"ते नंतर बनव...आज पूजा होईपर्यंत काही करू नकोस ... भटजी काकांकडून तुझ्या करवी अग्नी पूजन झाले की मग गोड काहीतरी करायचे असते ना तेंव्हाच कर. पूजेला वेळ आहे ....तोपर्यंत रुममध्ये आराम कर. "

******

हातावरच्या जखमेवर पट्टी बांधली होती तरी जखम थोडी
चुरचुरत होती म्हणून जखमेवर फुंकर मारीत ती रुममध्ये शिरली आणि तेवढ्यातच फोन खिशात ठेवून इयरपॉड लावून फोनवर बोलत येणाऱ्या शेखरशी तिची टक्कर झाली....ती त्याच्यावर आपटणारच होती इतक्यात आपले दोन्ही हात समोर धरत तो मागे झाला....पण समोर दार आहे असे समजून पुढे येणाऱ्या बेसावध असलेल्या तिचा तोल गेला आणि ती पुढे पडणारच इतक्यात त्याने तिला जवळ येऊन सावरले. भेदरल्यामुळे तिची स्पंदने वाढली होती...आणि आता या वेळी त्याच्या छातीजवळ असणाऱ्या तिची स्पंदने त्याला स्पष्ट ऐकू येत होती.

तिने मान वर करून त्याला पाहिले...क्षणभर नजरानजर झाली.. दोघेही मागे झाले.

तू ठीक आहेस का....असे त्याने तिला मनातच विचारले. कारण ज्या क्षणी त्याला समजले की मिहिकाने ती काल लग्नाच्या वेळी नव्हती त्याची आगाऊ कल्पना दिली होती ..लग्न पुढे नेणे शक्य होते तरीही प्रियाने त्याच्याशी लग्न केले होते या गोष्टीमुळे त्याच्या मनात तिच्याविषयी अढी बसली होती.

पण त्याला बिचाऱ्याला काय माहित तो ज्या गोष्टीसाठी तिला दोष देत होता त्यात तिची काहीही चुकी नव्हती...ती निष्पाप होती.

क्रमशः




सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.