Login

प्रिया आज माझी भाग २४

Lovestory
प्रिया आज माझी २४


डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

ऑक्टोबर चालू असल्यामुळे दुपारी कडक ऊन व संध्याकाळी थंडी असे दिवस चालले होते. आताही जरी पाच वाजावयास आले होते तरी बाहेर थोडं ऊन होतं पण वाऱ्याचा लवलेशही नव्हता. उन्हाचा रखरखाट व दमटपणा अजूनही जाणवत होता.


शेखरच लक्ष गाडी चालवण्याकडे लागत नव्हते त्याचे हात स्टेरिंग व्हीलवर होते, पण नजर मात्र इतरत्र धावत होती. कुठे प्रिया दिसते का ते तो पाहत होता. गाडी भाजी मार्केट जवळ आली. इतक्यात एका भाजी विक्रेत्याजवळ भाजी नीट पारखणारी प्रिया त्याला दिसली. त्याने आपली कार तिथे जवळच पार्क केली व तो तिथे जवळच घुटमळत राहिला. तिचे लक्ष इथे जाईल असे दिसताच आपले तिथे लक्षच नाही असे दर्शवित त्याने गाडीचा दरवाजा उघडला व तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. ती येईपर्यंत मुद्दाम गाडी स्टार्ट करत असण्याचा अभिनय त्याने केला. पण त्याचे हे प्रयत्न व्यर्थ गेले कारण त्याला पाहूनसुद्धा ती पुढे आली नाही.

'ते शेखर तर नाहीत ना! पण इथे कुठे? '

तिने त्याला लांबूनच पाहिले तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित आले व भाजीचे पैसे चुकते करून ती गाडी जवळ जाणार इतक्यात तिला सकाळचा प्रसंग आठवला.

'नको मी का जाऊ? मला काय मान नाही?
असेल ती माझ्यापेक्षा सुंदर! पण हे बोलून दाखवणे जरुरीचे होते का?
पण आता इतके अंतर चालून जाणे जीवावर आले आहे. दुपारच्या वेळेत टॅक्सी मिळत नाहीत...येताना सुद्धा पंधरा मिनिटे उभी राहिले तेंव्हा टॅक्सी मिळाली. चक्कर येईल असं वाटतंय. डोकंही गरगरतेय.'

क्षणभर तिने स्वतःला सावरले.

'पण तरीही मी जाणार नाही आणि गेले तर म्हणतील कुठून आली ही बया कुणास ठाऊक! तशीही एखाद्या उपटसुंभासारखी मी त्याच्या आयुष्यात आलेय. त्यांना तर मी नकोशीच आहे.'
तिने त्याच्या कारकडे पाहिले.

'त्यांचेही माझ्याकडे लक्ष जाईल असं वाटत नाही आणि लक्ष जरी गेले तरी ते दुर्लक्ष करतील. सकाळचा राग अजून मनात असेलच. '

त्याच्या कारच्या बाजूने डाव्या दिशेकडे वळत ती थोडी पुढे निघून गेली.

समोरून येणाऱ्या टॅक्सीला ती थांबवणार इतक्यात कारचे दार खोलत शेखर बाहेर आला.

"प्रिया..."

तिने पटकन मागे बघितले.

'त्यांच्या तोंडून माझे नाव किती गोड वाटते. '
ती मनात म्हणाली.

त्याच्याकडे पाहून ती गोड हसली. त्याच्याही चेहऱ्यावर स्मित पसरले.

"तुम्ही इथे? काही काम होते का?"

"हो . इथे मित्राकडे आलो होतो."

'आज लवकर आलेले दिसतात.'
त्याची थ्री फोर्थ आणि टी शर्ट पाहून तिने अंदाज लावला.

शेखरने पुढे होऊन दरवाजा खोलला.
प्रिया त्याच्या बाजूच्या सीटवर टेकली व तिने डोळे मिटून घेतलं. तिला अस्वस्थ वाटत होते. त्याने गाडी स्टार्ट केली.

त्याच्या मनात विचारांचे द्वंद्व सुरू होते. एक मन तिच्याकडे झुकलं होतं तर दुसरें मन त्याला मागे खेचत होते.

'मी सकाळी जे बोललो त्याबद्दल आता माफी मागावी का? खरंच एवढं कशाला बोलायचं होतं तिला!

पण मला काय करायचंय... मला हीची एवढी काळजी करण्याचं कारणच काय! माझे तर तिच्यावर प्रेम नाही.
मी तर मिहिकावर प्रेम करतो. हिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवण्याचे कारणच नाही.

पण खरंच माझे मिहिकावर खरेखुरे प्रेम आहे का? कॉलेजमध्ये असताना रात्रंदिवस तिच्याशिवाय काहीही सुचायचे नाही. आज तिला प्रत्यक्ष भेटून महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे तरी तिच्याबद्दल तशा उत्कट भावना वाटत नाहीत जशा मला कॉलेजमध्ये असताना वाटायच्या. आता तर तिची आठवण येऊन मला झोप येत नाही असेही नाही आणि तिचेही माझ्यावर प्रेम आहे की नाही याबद्दलही मला शंका वाटत आहे . माझ्याबद्दल खरे प्रेम असते तर ती असा लग्नमंडप सोडून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दूर निघून गेली नसती. बरे लांब गेली आहे तरी तिथून मला एखादा मेसेज करायची तसदीही ती घेत नाही.


कधीतरी माझ्यासारखी माणसं स्वतःचाच गैरसमज करून घेतात. शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे . मी तिच्या सुंदरतेवर प्रेम केलं. आय थिंक दॅट वॉज जस्ट फेटल अट्रॅक्शन.

या उलट हिचे वागणे. (आपल्या बाजूला डोळे मिटून पडलेल्या प्रियाकडे त्याचे लक्ष गेले.)
आज सकाळी मी इतकं दुखावून सुद्धा ती केवळ मला आवडते म्हणून अंगात ताप असताना इतक्या लांबवर ब्रोकोली आणायला आली. '

त्याने पुन्हा प्रियाकडे पाहिले.

'ही सुंदर नाही असं म्हणणारा किती मूर्ख मी!
सौंदर्य हिच्या कणाकणात आहे. सर्वांगसुंदर आहे ही. इतकी जीव लावणारी बायको मला भेटली असती का ? मिहिकाने माझ्यावर इतके प्रेम केले असते का?'

आजचा प्रसंग शेखरच्या आणि प्रियाच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरणार होता. प्रियाविषयी त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर तरी तयार झाला होता.


सकाळच्या प्रसंगाबद्दल माफी मागावी या उद्देशाने त्यांने गाडी चालवतच तिला हाक मारली.

"प्रिया "
पण त्याच्या हाकेला तिच्याकडून प्रतिसादच मिळाला नाही. त्याच्या चेहऱ्यावर काळजी पसरली. त्याने एका हाताने स्टेरिंग व्हील सांभाळत दुसऱ्या हाताने तिला हलवले.
त्याच्या थोड्याशा धक्याने ती विरुद्ध बाजूला पडणार होती इतक्यात त्याने तिला सावरले व तिला आपल्या खांद्याकडे ओढून घेतले. ती त्याच्या खांद्यावर पडली. त्याने थोपटून उठविण्यासाठी तिच्या गालाला हात लावला तर त्याला चटका बसला. ती तापाने फणफणली होती. तिला शुद्धच नव्हती. त्याने गाडीचा स्पीड वाढवला. त्यांचे कॉम्प्लेक्स येताच तो गाडीतून उतरला.

"वॉचमन लिफ्टला बोलाव." तो ओरडला तसे वॉचमन घाईतच लिफ्टच्या दिशेने धावला.

प्रियाला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेत तो धावला.

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all