Login

प्रिया आज माझी भाग २५

Lovestory
प्रिया आज माझी भाग २५


डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


रात्रीचे दोन अडीच वाजले असतील. प्रियाला जाग आली. शरीरातून असंख्य वाफा निघत आहेत असे तिला वाटत होते. डोकंही ठणकत होते. तिच्या बाजूच्या बेडवर तिच्या बाजूला शेखर मोबाईल बघत बसला होता. तो आपल्यामुळे जागा आहे हे तिला जाणवले.

ती त्याला म्हणाली,

"शेखर अजून तुम्ही जागे आहात ?"
ती उठून बसवयास लागली पण अशक्तपणामुळे तिला ते ही सहज जमत नव्हते. तो तिच्याजवळ आला आणि त्याने तिला बसावयास मदत केली. आधारासाठी तिच्या पाठीमागे बेडला टेकून एक उशी उभी करून ठेवली. प्रिया स्वस्थपणे टेकली.

त्याने तिच्या कपाळावर हात लावला.

"अंगात अजून ताप आहेच. एवढ्यात उतरायला हवा होता. डॉक्टरांना बोलवायला पाहिजे."

"नको. मला बरे वाटत आहे. आई झोपल्या ना ?"
तापामुळे प्रियाला पूर्ण शुद्ध नव्हती पण त्याकाळात तिच्या बाजूला शेखरबरोबर सुमनताई होत्या हे तिला जाणवले होते.

"हो. आताच तिला झोपवून आलो. ऐकायला तयार नव्हती. मला म्हणत होती, शेखर तुझ्यामुळे झाले सर्व.
मलाही तेच वाटत आहे. प्रिया ... आय एम सॉरी. "

"तुमच्यामुळे नाही हो..माझी प्रकृतीच अशी आहे. हवामानात थोडा बदल झाला की होतं मला असं. स्वतःला दोषी ठरवून तुम्ही जागे आहात तर प्लीज झोपा. माझ्यासाठी एवढे कष्ट घेऊ नका. उद्या ऑफिसला जायचं असेल ना... उठायला उशीर होईल आणि सकाळचे म्हणाल तर तुम्ही चुकीचे काय बोललात! तुम्ही जिच्यावर प्रेम करता ती नक्कीच सुंदर असणार. मला फक्त उत्सुकता होती तिला पाहण्याची. तिच्याशी स्वतःची तुलना करून मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं. "

" प्रिया खरच मलाही तसं म्हणायचं नव्हतं."

"कळलं मला ते."
प्रिया हसून म्हणाली.

"झोपा आता शांतपणे. माझ्यासाठी जागू नका व अपराधीपणाची भावनाही ठेवू नका."
शेखरला तिच्या शेवटच्या वाक्याचा राग आला.

म्हणे, झोपा आता शांतपणे. मान्य आहे माझे तिच्यावर प्रेम नाही पण त्याचा असा अर्थ होत नाही ना की मी तिच्याशी मैत्री नाही करू शकत.

शेखरने रागाने आपल्या खिशातून सिगरेट काढले पण प्रियाला सिगरेटच्या धुराची एलर्जी आहे याचा विचार करून त्याने पुन्हा ती सिगरेट खिशात ठेवली .

प्रिया हसली.

"माझ्यामुळे तुम्हाला सिगरेट सुद्धा पिता येत नाही ना!
आता थोडे दिवस... त्यानंतर तुम्ही खुशाल सिगरेट पिऊ शकता. पण एक सांगू शेखर... मी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही सिगरेट नाही प्यायलात तर खूप बरे होईल. प्लीज, सिगरेट सोडून द्या. खरं तर मला असं काही बोलण्याचा अधिकार नाही . तरीसुद्धा राहावत नाही म्हणून बोलते . तुमची काळजी वाटते."

त्याची काही गरज नाही. शेखर रागाने म्हणाला व तिच्याकडे पाठ करून झोपला.

*****

सकाळचे आठ वाजले होते. प्रिया अजूनही झोपलेली होती. तिला चाहूल लागू नये म्हणून बेडरूमच्या दरवाजा हळूच खोलून तो हॉलमध्ये आला. शेखरने ऑफिसमध्ये फोन करून सांगितले की त्याला ऑफिसमध्ये यायला उशीर होईल.

इंटरकॉम वाजला.

"साहेब....खाली मॅडमच्या नावाने पार्सल आले आहे. "

"मॅडमच्या नावाने?"

"हो पार्सल वर प्रिया शेखर परांजपे असे लिहिले आहे. "

"कोणीतरी अश्विनी म्हणून आहे. म्हणजे मला ते इंग्रजी नीट वाचता येत न्हाई... पण मुरलीने नाव लिहून घेतले आहे. पार्सल घेऊन वर येऊ?"

"हो."
त्याने फोन ठेवला. तसे फोनवर हसून बोलत बोलत प्रिया बाहेर आली.

"हो थँक्यू मावशी...एकदम मजेत आहे मी. ओके बाय आपण नंतर बोलू."

तिने फोन ठेवला. शेखरला पाहिल्यावर दोघांनीही एकमेकांकडे हसून पाहिले.

खरोखरच आजचा दिवस प्रियासाठी खास होता.

दारावरची बेल वाजली. समोर वॉचमन पार्सल घेऊन उभा होता. शेखरने पार्सल घेतले आणि प्रियाला दिले.

"तुझ्यासाठी पार्सल आले आहे"

"माझ्यासाठी?..*"

तिने कुतुहलाने पार्सल घेतले. त्यावर नाव पाहून ती मंद हसली.

"कधीच विसरत नाही. " ती पुटपुटली. शेखरने एका डोळ्याने पार्सलकडे पाहिले...मघाशी हातात घेतले तेव्हा बऱ्यापैकी जड होते.

तिने पार्सल खोलले आत सारेगामा कारवां रेडिओ होता.
तिचा चेहरा खुलला. जणू कितीतरी दिवसापासून ती ज्या गोष्टीची वाट पाहत होती ती तिला मिळाली होती.

ती बटण चालू करणारच होती इतक्यात पुन्हा फोन वाजला. शेखर अजूनही डायनिंग टेबलावर बसून फोन पाहत होता. पण त्याचे कान मात्र ती काय बोलते याकडेच लागले होते.

"ओह् थँक्यू सो मच सोमिनी. आशू येईल तेव्हा माझा निरोप दे...इतके महागडे गिफ्ट पाठवायची काय गरज होती...अगं चक्क सारेगामा कारवा पाठवलाय."

आज नेमके काय आहे..सगळे हिला शुभेछा का देत आहेत?
शेखर विचार करीत होता.

"प्रिया ... अग कशी आहेस.."
सुमनताई येताच तिने सोमिनीचा निरोप घेऊन फोन ठेवला.

"बरी आहे आता मी ."

"तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

प्रियाने सुमन ताईंना वाकून नमस्कार केला.
"अखंड सौभाग्यवती भव. कायम सुखी रहा."

तिच्या हसऱ्या चेहऱ्याचे आणि आलेल्या पार्सलचे गूढ उलगडले. तिच्या बर्थडे साठी होते ते.

"हॅप्पी बर्थडे टू यू. "
मग शेखरनेही पुढे येत तिला शुभेच्छा दिल्या अर्थात तिच्या वाढदिवसाला त्याने बोललेले हे चार शब्द तिच्यासाठी जास्त मोलाचे होते हे सांगणे नकोच.


क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all